Ad will apear here
Next
कलाकारांच्या घरचा गणेशोत्सव
गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी सगळे जण सज्ज झाले आहेत. घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र एक आगळा उत्साह आहे. चैतन्यमय वातारवण निर्माण झाले आहे. कलाकार मंडळीही बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. त्यांच्या घरचा गणेशोत्सव कसा साजरा होतो, ते यंदा तो कसा साजरा करणार आहेत, त्यांनी काय तयारी केली आहे, याविषयी जाणून घेऊ या त्यांच्याचकडून..
.............


अक्षर कोठारी (‘छोटी मालकीण’ मालिकेमधील श्रीधर) :
माझं बालपण सोलापूरातल्या माणिक चौकात गेलं. तिथे आजोबा गणपतीचं मंदिर सुप्रसिद्ध आहे. या गणपतीला सुमारे १३२ वर्षांची परंपरा आहे. नावाप्रमाणेच गणपतीची मूर्ती आपल्याला आजोबांसारखी भासते. गणेशोत्सवाच्या काळात इथे एक वेगळंच चैतन्य असतं. डोळे दिपवणारी रोषणाई, भक्तांच्या रांगा आणि बाप्पाचं डोळ्यात साठवून ठेवावं असं रूप. आम्हा मित्रांचं लहानपणी एक लेझीम पथक होतं. मीही त्यात सहभागी होत असे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही बाप्पासमोर लेझीम खेळायचो. ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. गेल्या १० वर्षांत कामाच्या गडबडीमुळे मी जाऊ शकलो नाही; पण यंदा मात्र मी आवर्जून सोलापुरातल्या आजोबा गणपतीचं दर्शन घेणार आहे.

नम्रता प्रधान (‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा) :
गणपतीबाप्पा हे माझं सर्वांत आवडतं दैवत. बाप्पाच्या सजावटीपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत सगळ्यात माझा सहभाग असतो. गेल्या वर्षी मी बाप्पाच्या आवडीच्या जास्वंदीच्या फुलाची सजावट केली होती. यंदा शूटिंगमुळे मला सजावटीमध्ये सहभाग घेता आला नाही; मात्र सजावटीत छत्रीचा वापर जरूर करा, असं मी माझ्या फॅमिलीला आवर्जून सांगितलंय. स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ या मालिकेमुळे मला ‘छत्रीवाली’ ही नवी ओळख मिळालीय. बाप्पाच्या आशीर्वादामुळेच ही सुवर्णसंधी मला मिळालीय. त्यामुळे यंदा बाप्पाची आरास छत्रीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

संकेत पाठक (‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रम) :
मी मूळचा नाशिकचा. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. माझी आई दर वर्षी घरीच कागदापासून गणपतीची मूर्ती तयार करते. मीही तिला मदत करतो. ‘निसर्ग जपा, तरच तो तुमचं रक्षण करील’ हा संदेश मला माझ्या कुटुंबाकडून लहानपणापासून मिळत आलाय आणि तोच मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितो.

संग्राम समेळ (‘ललित २०५’ मालिकेतील नील राजाध्यक्ष) :
लहानपणी गणपतीची सुट्टी पडली, की मी माझ्या आजोळी जात असे. तिकडे सोसायटीच्या गणपतीला वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. मी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचो. तुमच्यातले कलात्मक गुण अशाच स्पर्धांमधून ठळक होत असतात, असं मला वाटतं. माझ्या घरीही दर वर्षी बाप्पाचं अगदी थाटामाटात आगमन होतं. यंदा समेळांच्या बाप्पाचं ७५वं वर्ष आहे. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. बाप्पा तुझा आशीर्वाद असाच आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो, हीच इच्छा.

हरीश दुधाडे (‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रतापराव रांगडे-पाटील) :
गणपती म्हणजे ६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता. आज मी जो काही आहे ते बाप्पाच्या कृपेमुळेच. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या एकपात्री आणि एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत मी लहानाचा मोठा झालो. अभिनय क्षेत्रात येईन की नाही, हे त्या वेळी मला ठाऊक नव्हतं; पण बाप्पाला माहीत होतं हे नक्की. दर वर्षी गणेशोत्सव जवळ आला, की माझी आई माझ्याकडून एकपात्री नाटक बसवून घ्यायची. आणि मग वेगवेगळ्या मंडळांमधून मी ते सादर करायचो. खास बात म्हणजे सगळ्याच मंडळांमधून मला हमखास बक्षीसही मिळायचं. तेव्हापासूनच अभिनयाची गोडी मला लागली. अहमदनगर ते मुंबई हा पल्ला याच आत्मविश्वासामुळे मी गाठू शकलो. मला आठवतंय, एमबीए करत असताना मी गणपतीला रोज एक फूल वाहायचो. परीक्षेत पास होण्यासाठी नाही, तर मी एका मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं, त्यात निवड व्हावी यासाठी. विशेष गोष्ट अशी, की मी त्या वर्षी पासही झालो आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मालिकेसाठी माझी निवडही झाली. बाप्पाकडे लावलेली ही गोड ‘सेटिंग’ मला कायम आठवते. या वर्षी शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मी घरच्या गणपतीच्या दर्शनसाठी जाणार आहे. आणि जास्तीत जास्त वेळ बाप्पासोबत व्यतीत करणार आहे.

नूपुर परुळेकर (‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा) :
गणपतीबाप्पा सगळ्यांचाच लाडका देव आहे, तसाच माझाही आहे. काहीही झालं, तरी बाप्पा आपलं रक्षण करतो, ही गोष्ट माझ्या मनावर लहानपणापासूनच कोरली गेलीय. मला आठवतंय लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची. खेळून झाल्यावर घरी परत येताना किंवा घरात एकटं असताना मला सतत माझ्यासोबत कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. मनातली ही भीती मी जेव्हा माझ्या आईला सांगितली तेव्हा तिने मला अजिबात न घाबरण्याचा सल्ला दिला. तुझ्यासोबत असणारी ती व्यक्ती म्हणजे गणूबाप्पाच असल्याचं सांगून तिने माझ्या मनातली भीती घालवली. आज ही गोष्ट आठवली तरी हसू येतं; पण अडचणीत असताना आईचे हे शब्द आठवतात आणि बाप्पा सतत सोबत असल्याची जाणीव होत राहते. मला सख्खा भाऊ नाही. माझ्या आयुष्यातली ही उणीव गणपतीबाप्पानेच भरून काढलीय. गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी केली जाणारी ऋषीची भाजी मला प्रचंड आवडते. बाप्पासोबत या वर्षीही या भाजीचा आस्वाद मी घेणार आहे.

एतशा संझगिरी (‘छोटी मालकीण’ मालिकेतली रेवती):
मी मूळची परळची. गिरणगावातच लहानाची मोठी झाल्यामुळे गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह असतो. माझ्या सोसायटीच्या गणपतीला आम्ही सगळे जण खूप धमाल करतो. आमच्याकडे दर वर्षी मोदक खाण्याची स्पर्धा असते. मला मोदक प्रचंड आवडतात. मी या स्पर्धेत दर वर्षी भाग घेते. बाप्पाने आजवर मला न मागता खूप गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वरदहस्त माझ्या पाठीशी राहो, हेच मागणं मागेन.

अजिंक्य राऊत (‘विठूमाऊली’ मालिकेतील विठ्ठल):
आमच्या गणपतीबाप्पाची आरास खूपच खास असते. बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही लाडूंचा वापर करतो. त्यामुळे दर वर्षी मला खूप लाडू खायला मिळतात. यंदा बऱ्याच गणेश मंडळांचे आणि घरगुती गणपतीही विठूमाऊलीच्या रूपात साकारलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या गणपतींचं दर्शन घेण्याची उत्सुकता आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi