Ad will apear here
Next
रहा गर्दिशों में हरदम...
फोटो : विकिपीडियासंगीतकार आणि गीतकार रवी यांचा जन्मदिन तीन मार्च, तर स्मृतिदिन सात मार्च. त्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गीताचा...
.........
आज तीन मार्च! संगीतकार रवी यांचा जन्मदिवस! हा कलावंत संगीतकार म्हणून लोकप्रिय होताच; पण तो गीतकारही होता, याची माहिती अनेकांना नाही. १७-१८ चित्रपटांकरिता त्यांनी गाणी लिहिली होती. त्यांची संख्या ३५ आहे. १९७४चा ‘घटना’ हा चित्रपट आणि १९७७ चा ‘प्रेमिका’ हा चित्रपट... या दोन चित्रपटांतील सर्व गाणी रवी यांनी स्वतः लिहिली होती. 

...आणि आपल्या परिचयाची गीते म्हणाल तर ‘वचन’ चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले ‘चंदा मामा दूर के...’ हे गीत, तसेच मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘एक पैसा दे दे बाबू’ हे गीत, ‘अरब का सौदागर’मधील ‘ये महफिल सितारों की...’, ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’ चित्रपटातील ‘टिम टिम करते तारे...’, ‘दस लाख’ चित्रपटातील ‘गरिबों की सुनो...’, तसेच ‘एक फूल दो माली’ चित्रपटातील ‘औलादवालो फूलो फलो...’, १९७२च्या ‘धडकन’मधील ‘मैं तो चला जिधर चले रस्ता...’... ही अशी छान गीते रवी यांनी लिहिली होती. 

तीन मार्च १९२६ रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या रविशंकर शर्मा यांना बालपणापासून संगीताची आवड होती आणि त्यांनी आपण गायक बनायचे असे ठरवले होते. कॉलेजचे शिक्षण चालू असतानाच त्यांना पोस्ट खात्यात नोकरी लागली. तेथे पाच-सात वर्षे नोकरी करून पार्श्वगायक बनण्याच्या इराद्याने ते मुंबईत आले. दिल्लीत असतानाच त्यांनी इलेक्ट्रिशियन होण्याच्या दृष्टीनेही ज्ञान घेतले होते. त्यामुळे मुंबईत येताना त्यांनी त्या संदर्भातील आपल्या साहित्याची पिशवीही बरोबर आणली होती. त्यामुळेच मुंबईत आल्यावर चित्रपटसृष्टीचे दरवाजे ठोठावूनही काही काम मिळेना, तेव्हा पोट भरण्यासाठी त्यांनी काही दिवस मुंबईत मूळजी जेठा मार्केटमधील पंखे साफ करण्याचे, दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. 

त्या हलाखीच्या दिवसांत दिल्लीत राहणाऱ्या त्यांच्या पत्नीने काही अडचणीमुळे त्यांच्याकडे पंचवीस रुपयांची मागणी केली. खूप प्रयत्न केल्यावर त्यांच्याकडे दोन रुपयेच जमले! ते पत्नीला पंचवीस रुपये पाठवू शकले नाहीत. अशा अवस्थेत मुंबईत राहत असताना ‘फिल्मिस्तान स्टुडिओ’मधील संगीत विभागात काही माणसे हवी आहेत, असे त्यांना कळले. ते तेथे गेले. त्यांची परीक्षा घेतली गेली आणि संगीतकार हेमंतकुमार यांचे सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली: तेथे ते तबला वाजवत असत. ‘आनंदमठ’ चित्रपटातील गीतात ते कोरस म्हणून गायले. ‘शर्त’, ‘नागिन’, ‘सम्राट’, ‘दुर्गेश नंदिनी’, ‘चंपाकली’ या चित्रपटांना हेमंतकुमार यांचे संगीत होते. या चित्रपटांसाठी हेमंतकुमार यांना संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी साह्य केले होते. हेमंतकुमार गाण्याचे खासगी कार्यक्रम करत असत, त्या वेळीही ते रवी यांना सहायक म्हणून नेमत असत. 

एकदा त्यांना दिल्लीतील एक ओळखीचा मुलगा भेटला व त्याने त्यांची चित्रपट निर्माते देवेंद्र गोयल यांच्याशी गाठ घालून दिली. त्यामधूनच त्यांना स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी मिळाली. तो चित्रपट होता १९५५चा ‘वचन’! स्वतंत्रपणे संगीतकार बनवण्यासाठी हेमंतकुमार यांनी त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर त्यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. ‘गुरुदत्त फिल्म्स’च्या ‘चौदहवी का चाँद’ने त्यांचे भाग्य उजळले. 

‘फिल्मिस्तान’मध्ये काम करत असताना एक दिवस त्यांच्याकडे राजेंद्रशंकर (गायिका लक्ष्मीशंकर यांचे पती) आले व म्हणाले, ‘मी तुमच्यासाठी पंडित रविशंकर यांचा एक संदेश घेऊन आलो आहे.’ ‘नागिन चित्रपटाच्या संगीताचे सहायक म्हणून तुम्ही काम केले आहे; मात्र लोक त्याबद्दल मला विचारतात,’ असा पंडित रविशंकर यांचा निरोप होता. त्या सुरुवातीच्या काळात संगीतकार रवी हे आपले नाव रविशंकर असे लावत असत. त्यामुळे नावातील साधर्म्य आणि त्यामुळे होणारा घोटाळा टाळण्यासाठी पंडित रविशंकर यांनी संगीतकार रवी यांच्याकडे विचारणा केली, की ‘आपण नाव बदलाल की मी बदलू?’ तेव्हा संगीतकार रवींनी सांगितले, ‘पंडितजींनी नाव बदलण्याची गरज नाही. मी नाव बदलेन.’ आणि तेव्हापासून संगीतकार रवी यांनी आपले नाव ‘रविशंकर शर्मा’ याऐवजी फक्त ‘रवी’ असे लिहिण्यास सुरुवात केली. 

संगीतकार रवी यांनी फक्त हिंदी चित्रपटांनाच संगीत दिले असे नाही, तर तेरा मल्याळी चित्रपटांना, तसेच काही गुजराती चित्रपटांनाही संगीत दिले होते. ‘सूर की कोई भाषा नही...’ असे  विचार असणाऱ्या या कलावंताला मात्र अनेकदा उपेक्षाच अनुभवावी लागली होती. ‘चौदहवी का चाँद’ चित्रपटातील गीताबद्दल गीतकार व गायकाला पुरस्कार देऊन गौरवले गेले; पण त्याला संगीत देणारा मात्र उपेक्षितच राहिला. पुरस्कार देणाऱ्यांनी तर उपेक्षा केलीच; पण आम्हा चित्रपटप्रेमींपैकी कित्येक जण त्यांना संगीतकार मानत नसत आणि ‘कोण संगीतकार रवी ना....’ असे म्हणून उपहास करताना मी अनुभवले आहे; मात्र त्यांना ‘चलो एक बार फिरसे..’, ‘मिली खाक में मोहब्बत...’, ‘दिन है बहार के...’ अशा कित्येक गीतांवर डोलताना मी पाहिले आहे. 

असो! असते एकेकाचे नशीब! कर्तृत्वाच्या काळात रवी यांची उपेक्षा झालीच; पण त्यानंतर उतारवयात त्यांच्या कौटुंबिक समस्यांमुळे त्यांच्या वाट्याला आलेले दु:ख वृत्तपत्रांमधून वाचनात आले आणि मन सुन्न झाले. ‘दो बदन’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेले ‘नसीब में जिस के जो लिखा था..’ हे शकील यांचे गीतच संगीतकार रवी यांच्या प्रत्यक्ष जीवनात अनुभवाला आले, हीच त्यांची मोठी शोकांतिका!

रवी किती मोठे संगीतकार होते, हे दाखवण्यासाठी अनेक गीते आहेतच; पण मला मात्र त्यासाठी ‘दो बदन’ सिनेमातील गीतच पुरेसे वाटते. शकील बदायुनी यांनी लिहिलेली दोन ओळींतील मोजक्याच शब्दांची कडवी, पण ती संगीतात गुंफताना रवी मोहम्मद रफी यांच्याकडून अशी आळवून घेतात, की ते तीव्रपणे हृदयात घुसते. यातील संगीत, चाल, वाद्यमेळ या रवी यांच्या वैशिष्ट्याबरोबर मोहम्मद रफी यांचा स्वर व शकील बदायुनी यांचे प्रभावी शब्द हेही सर्व महत्त्वाचे आहेच. असे जेव्हा सर्वच महत्त्वाचे एकत्र येते, तेव्हाच ते गीत ‘सुनहरे’ बनते, नाही का?

शकील मुळात ही अशी असफल प्रीतीची गीते लिहिण्यात ‘माहीर’! आणि त्याचे शब्द रक्तबंबाळ करणारेच असतात. आता बघा ना ‘दो बदन’ चित्रपटातील या गीतात तो म्हणतो - 

कभी डगमगाई कश्ती, कभी खो गया किनारा

माझ्या प्रीतीचा तारा हा नेहमीच (असफलतेच्या) अंधारात राहिला. (माझ्या प्रीतीची) नाव कधी (असफलतेच्या सागरात) डगमगली. (तर) कधी (तिला) किनाराच मिळाला नाही. (प्रिय व्यक्तीच्या प्रेमाचा आसराच मला मिळाला नाही.) 

आपले हे दुःख मांडताना तो पुढे सांगतो, की -

कोई दिल के खेल देखे, के मोहब्बतों की बाजी 
वो कदम कदम पे जीते, मैं कदम कदम पे हारा 

कोणी (हे) हृदयाचे खेळ बघा (कसे आहेत ते) (आम्ही ते खेळलो. या) प्रीतीच्या खेळात (प्रेमाच्या बाजीत) ते पावला-पावलावर जिंकत गेले (आणि) मी (मात्र) पावला-पावलागणिक हरतच गेलो. 

हे सर्व पाहिल्यावर मला वाटते, की -

ये हमारी बदनसिबी जो नहीं तो और क्या है?
के उसी के हो गए हम, जो न हो सका हमारा

(अहो) हे आमचे दुर्भाग्यच नाही का, की जे आमचे होऊ शकत नाहीत त्यांचे आम्ही झालो. (आम्ही त्यांना आमच्या प्रीतीची देवता मानू लागलो आणि ते मात्र कोणा दुसऱ्यातच गुंतले होते.)

आणि आपल्या दुर्दैवाबद्दल अखेरच्या कडव्यात शकील लिहितो - 

पडे जब गमों से पाले, रहें मिट के मिटनेवाले 
जिसे मौत ने ना पूछा, उसे जिंदगी ने मारा

जेव्हा दुःखाशी सामना झाला, तेव्हा ज्यांना संपून जायचे होते, ते संपून गेले (पण माझ्यासारखा दुर्दैवी जीव मात्र की) ज्याला मृत्यूनेही विचारले नाही (आपलेसे केले नाही) (आणि ज्याला) जीवनानेही मारून टाकले. (धड जगूही दिले नाही व मरूही दिले नाही.)

या संपूर्ण रचनेत ‘हारा- तारा- मारा’ अशी यमके जुळवली आहेत; पण ते कृत्रिम वाटत नाही. दोन ओळींच्या कडव्यातील पहिली ओळ दोन वेळा अप्रतिमपणे सादर केली जाते. मोहम्मद रफी सारा ‘दर्द’ आपल्या आवाजात एकवटून गातात. 

असे गीत संगीतात बांधणारे रवी यांना १९७१मध्ये ‘पद्मश्री’ने गौरवले गेले होते. १९६१चा ‘घराना’, १९६५चा ‘खानदान’ हे चित्रपट त्यांना फिल्मफेअरचे पुरस्कार मिळवून देणारे ठरले; पण अशा मोजक्याच घटना. इतर वेळी मात्र संगीतकार रवी हे उशिरा उच्चारायचे नाव असा प्रकार घडायचा! त्यांनी १९२६च्या तीन मार्चला पृथ्वीवर आगमन केले आणि २०१२मध्ये सात मार्च रोजी या जगाचा निरोप घेतला. या प्रतिभासंपन्न संगीतकार व गीतकाराला विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language