Ad will apear here
Next
वर्षाकाल
तालानुसारे पडतात धारा. (फोटो : अनिकेत कोनकर)

‘कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता’मध्ये आज परशुरामतात्या गोडबोले यांची ‘वर्षाकाल’ ही रचना. प्रत्येक कडव्याची वेगळ्या वृत्तात केलेली मांडणी आणि उपमा अलंकाराचा प्रभावी वापर हे या रचनेचं वैशिष्ट्य.
..........
(वसंततिलका)
हा मेघ आर्द्रमहिषोदरतुल्य काळा,
शंखाकृती धरि करांत बलाकमाळा;
विद्युत्प्रभा वसन पीत कसोनि हातें, 
वाटे दुजा हरिच आक्रमितो नभातें ॥१॥

(शार्दूलविक्रीडित)
भासे कौरवराष्ट्रतुल्य नभ हें जें अंधकारा धरी, 
हर्षानें बहु गर्जना करी शिखी दुर्योधनाचे परी;
द्यूतीं निर्जित धर्मसा पिक वनीं आला असे संप्रती,
गेले स्त्रीसह हंसपांडव तसे अज्ञातवासाप्रती. ॥२॥

धाराजर्जर दर्दुर प्रसरती पंकीं उड्या घालिती,
झाले मोर विमुक्तकंठ, फुललीं झाडें पहा डोलती;
साधूला खळमंडळी तशिच ही चंद्रास मेघावळी -
झांकी; ती कुलटेसमान चपला राहे न एके स्थळी. ॥३॥

(आर्या)
तो मेघराज नेतो हरुनि नभी करसमूह चंद्राचा, 
राजा जसा स्वनगरा नेतो कारभार अबल शत्रूचा. ॥४॥

(शार्दूलविक्रीडित)  
मेघीं आर्द्रतमालपत्रमलिनीं आकाश आच्छादिलें
बाणीं हस्तिस तेंवि वारुळशता धाराशतें भेदिलें;
शोभे वीज वनावरीहि, दिवटी प्रासादमाथां जशी,
चंद्राची हरिली प्रभा जलधरे स्त्री दुर्बलाची तशी. ॥५॥

(उपजाति)
विद्युल्लतांनी जळतेंच काय?
धाराजळांनी गळतेंच काय?
बलाहकांनी हंसतेंच काय?
वायुभ्रमें नि:श्वसतेंच काय? ॥६॥

ताडावरी कर्कश शब्द होतो, 
जळीं स्थळीं केवळ मंद हो तो;
जशा विण्याच्या झडतात तारा, 
तालानुसारे पडतात धारा. ॥७॥


(स्रोत : आठवणीतल्या कविता : भाग ३)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi