Ad will apear here
Next
मनोमित्र ही सामाजिक चळवळ होण्याची आवश्यकता : डॉ. अतुल ढगे


रत्नागिरी :
‘सध्या नैराश्यासह मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांविषयीचे अज्ञान, गैरसमज दूर करण्यासाठी ‘मनोमित्र’ ही कार्यशाळा आयोजित केली जाते. मानसिक आजारांविषयी जनजागृतीसाठी ‘मनोमित्र’ ही सामाजिक चळवळ होण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन डॉ. अतुल ढगे यांनी केले. 

माइंड केअर हॉस्पिटलतर्फे ‘मनोमित्र’ ही एकदिवसीय कार्यशाळा २१ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत विद्यार्थी, डॉक्टर, शिक्षक, महिला आदींनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीसह, राजापूरपासून अगदी मुंबईपर्यंतच्या व्यक्तीही यात सहभागी झाल्या होत्या. 

या वेळी डॉ. ढगे यांनी मानसिक आजार म्हणजे काय, त्याची कारणे, आजार कसा ओळखावा, तपासण्या कोणत्या असू शकतात, आजाराबाबतचे गैरसमज, त्यावरील योग्य उपचार याविषयी मार्गदर्शन केले. 

‘मानसिक आजारांबाबत असलेले अज्ञान, गैरसमज, स्वतःच्या विश्वात मग्न असलेली लोकांची जीवनशैली आणि मानसिक आजारांच्या बाबतीत असलेले गैरसमज यांमुळे रुग्णांना वेळेवर व व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. त्यामुळे बऱ्या होऊ शकणाऱ्या आजारांचे रूपांतर कायमस्वरूपी आजारांत होते. त्याचा परिणाम रुग्णाच्या व त्याच्या नातेवाईकांच्या आयुष्यावर होतो. हे अज्ञान, गैरसमज दूर करण्यासाठी ‘मनोमित्र’ उपक्रम राबविला जातो,’ असे डॉ. ढगे म्हणाले.‘मानसिक आजारांबाबत अजूनही समाजामध्ये अज्ञान आहे. व्यक्तीचे मानसिक आरोग्य हरवत चालले असून, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या अवतीभवती किंवा नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराचे रुग्ण वावरत असतात. परंतु या आजारांविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने आपल्याला ते ओळखता येत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्याची इच्छा असूनही नेमके काय करायला हवे हे समजत नाही. शहरी भागात मानसिक आजारांविषयी विविध माध्यमांद्वारे जागृती केली जाते; मात्र ग्रामीण भागामध्ये अजूनही अंधश्रद्धा आणि करणी, भानामती अशा गोष्टींचा जनमानसावर प्रभाव असल्याने मानसिक आजारांकडे व मनोरुग्णांकडे त्या दृष्टीने पाहिले जाते. यामुळे या रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना हालअपेष्टाही सहन कराव्या लागतात. त्यामुळे ग्रामीण भागात, तसेच रत्नागिरीसारख्या शहरातदेखील याबाबत जागृती होणे गरजेचे आहे,’ असे डॉ. ढगे यांनी सांगितले. 

मानसिक आजारांविषयी जनजागृतीसाठी माइंड केअर हॉस्पिटलतर्फे ‘मनोमित्र’ ही एक दिवसाची मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते. पुढील कार्यशाळा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये आयोजित केली जाणार असून, त्यासाठी इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भागात ही कार्यशाळा आयोजित करायची असल्यास स्वयंसेवी संस्थांनी किंवा इतर संस्थानीही संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक : ९५०३४ २११२४, ८३०८७ ८४४२२ 

(छोट्या-छोट्या मानसिक समस्यांतून मार्ग कसा काढायचा याबद्दल मार्गदर्शन करणारी ‘मनी मानसी’ ही लेखमाला पुण्यातील समुपदेशक मानसी तांबे-चांदोरीकर यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर लिहिली आहे. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi