Ad will apear here
Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)
पाडळे किनारा

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण वाशिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील गुहागर व चिपळूण तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या वाशिष्ठीच्या उत्तर तीरावरील दापोली परिसरातील काही निसर्गरम्य ठिकाणे.
...........
रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर टोक म्हणजे दापोली परिसर. पुणे-मुंबई, तसेच सातारा-कोल्हापूरपासून मध्यवर्ती असलेले हे ठिकाण ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. हवेत दमटपणा असला तरी येथे उकडत नाही. 

दापोली तालुक्याला ५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. दापोली परिसर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. येथील निसर्ग पर्यटकांना भुरळ पाडतो. नारळ-सुपारीच्या, तसेच आंब्याच्या बागांनी हा परिसर अक्षरशः नटलेला आहे. पश्चिमेला निळाशार समुद्र, तर पूर्वेला सदाहरित वृक्षांनी आच्छादलेले डोंगर व त्यातून डोकावणारी सुंदर टुमदार कोकणी घरे हे चित्र सर्वत्र दिसते. हवापालट करण्यासाठी आलेला माणूस येथे पुन्हा पुन्हा येतच राहतो. सागरी महामार्गामुळे आता उत्तरेच्या केळशीपासून दक्षिणेला सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यापर्यंत आपले वाहन घेऊन जाणे शक्य झाले आहे. 

दापोली परिसरातील अनेक नररत्ने अलीकडच्या शतकात चमकली आहेत. त्यामुळे दापोलीला नररत्नांची खाणच म्हणायला हवे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण दापोलीत गेले. दापोलीजवळील वणंद हे गाव म्हणजे त्यांच्या पत्नीचे माहेर. गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळवून रँग्लर हा किताब मिळविणारे रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे दापोलीजवळील मुर्डी गावचे. दुसरे रँग्लर चंद्रकांत पेंडसेही याच परिसरातील. ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा कादंबऱ्या लिहिणारे श्रीपाद नारायण पेंडसे म्हणजेच तुमचे-आमचे आवडते लेखक ‘श्रीना’ आसूद गावचे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चिखलगाव दापोली तालुक्यातीलच. साने गुरुजी पालगडचे, तर दुर्गमित्र गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात ‘गोनिदा’ हे गुडघे गावचे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे मुरुडचे, तर कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक करजगावचे. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, रघुनाथ धोंडो कर्वे, भार्गव महादेव फाटक ऊर्फ बाबा फाटक हे याच तालुक्यातले. बाबा फाटक काही काळ वाई येथे राहिले होते. त्या वेळी त्यांचे कार्य मी समक्ष पाहिले होते. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची इमारत

दापोली :
हे या भागातील मोठे शहर आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वाकवली गावातील मोठी आमराई खेडमार्गे येताना आपले स्वागत करते. दापोलीत असलेला कृषी विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. विद्यापीठाची सर्व प्रक्षेत्रे फिरायची असल्यास फक्त विद्यापीठातच एक दिवस पुरत नाही.

दापोली, आंजर्ले, केळशी, हर्णै ही सर्व नावे काव्यात्मक वाटतात. दापोली हे हॉटेल्स, रिसॉर्टस् व होम-स्टे यांनी गजबजले आहे. सर्व प्रकारचे जेवण येथे मिळते. १८१८मध्ये ब्रिटिश राजवट आल्यावर जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इस्ट इंडिया कंपनीच्या शासन काळात कॅम्प दापोली वसवण्यात आली. संपूर्ण कोकण भागात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातील इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण होते. दाभोळ किंवा बाणकोट बंदरात आल्यावर दापोली हे मुक्कामाचे ठिकाण झाले होते. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणाच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे व पर्यटनाचे केंद्र झाली. 

सेंट अँड्र्यूज चर्च : दापोलीमधील १८१०च्या सुमारास बांधलेले हे चर्च दुर्लक्षित आहे. गॉथिक रोमन शैलीतील हे चर्च रोमन स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी व सैनिक यांच्यासाठी हे चर्च बांधण्यात आले. येथे सहा फूट उंचीची घंटाही होती. कालांतराने येथील प्रार्थना थांबली व हे ठिकाण दुर्लक्षित झाले. स्थापत्यशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. 

केशवराज मंदिर

आसूदचा केशवराज :
दापोली-हर्णै रस्त्यावर सात किलोमीटरवर हे ठिकाण आहे. रस्त्यापासून साधारण १५ मिनिटे चालत जावे लागते. तेथे पोहोचल्यावर सर्व श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटते. अत्यंत साध्याशा मंदिरातील केशवराजाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. हे मंदिर साधारण एक हजार वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या वाटेवर नारळाची, आंब्या-फणसाची दाट झाडी आहे. ते पाहून मन मोहून जाते व त्यामुळे चालण्याचा त्रास वाटत नाही. दाट झाडीमुळे सूर्यप्रकाशसुद्धा सहज जमिनीवर पडत नाही. वाटेत नदीवरचा साकव (पूल) ओलांडून दुसऱ्या डोंगरावर जावे लागते. १५-२० मिनिटांची चढण चढून गेल्यावर केशवराज मंदिर लागते. 

गोमुखातून सतत पाणी वाहत असते.गर्द झाडीत लपलेले केशवराज मंदिर दगडात बांधले आहे. मंदिराच्या आवारात गोमुख आहे. या गोमुखातून १२ महिने थंडगार व स्वच्छ पाणी वाहत असते. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपती, तर खालच्या बाजूस ‘शरभा’ची मूर्ती आहे. डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला गरूड आहे. केशवराजाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी चारही आयुधे आहेत. कार्तिकातल्या पहिल्या एकादशीपासून पाच दिवस येथे उत्सव असतो. 

पाटाचे पाणीचढणीची, पण रम्य पायवाटआसूद आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर चालविलेली पाटाच्या पाण्याची वाटप पद्धत. डोंगरउतारावर सुपारी बागा, मध्येच एखादा नारळ आणि बागेतून जाणारी चिऱ्यांची वाट. या वाटेच्या शेजारील पाटातून वाहणारे स्वच्छ पाणी सुपारीच्या बागेत सोडलेले दिसते. पाट पद्धतीने पाणीवाटपाच्यायापद्धतीला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. डोंगरमाथ्यापासून ते अगदी ३०० मीटर तळाला असलेल्या सुपारी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या पाटातून हे पाणी नैसर्गिक उतार, साधनसामग्रीचा वापर आणि गावकऱ्यांच्या कल्पकतेने बांधापर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही अनुदान किंवा पाठबळ या पाणीवाटप व्यवस्थेला नाही. केवळ आहे तो गावकऱ्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि नियोजन. 

आसूदचा श्री व्याघ्रेश्वर : केशवराज मंदिरापासून पश्चिमेला अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर व्याघ्रेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या सभागृहात लाकडी खांब असून, त्यांच्यावर पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. गाभाऱ्यात असलेले शिवलिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, काळभैरव आणि झोलाईदेवी इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. व्याघ्रेश्वर मंदिर नदीच्या काठावर असून, नदीला सुंदर घाट बांधण्यात आला आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार केला असून, अत्यंत सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे. मूळ मंदिर तसेच ठेवले आहे. जुनी शिल्पे अद्यापही पाहण्यास मिळतात. येथे रशियातून लोक ध्यानधारणेसाठी येतात. मागील वर्षी मी तेथे गेलो असताना एक ग्रुप आला होता. ते वरचेवर येतात, असे पुजाऱ्याने सांगितले. हा परिसर अत्यंत सुंदर असून, शेजारी ग्रामदेवतेचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. येथे मंदिरापर्यंत गाडी जाते.
 
पाडळे किनाऱ्याकडे जाणारा रस्ता..

पाळंदे किनारा :
हर्णै बंदराच्या अलीकडेच हा छोटा किनारा आहे. 

हर्णै किनाराहर्णै : हर्णै बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. हर्णै नाव घेतले की ‘गारंबीचा बापू’ आठवतो. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीमध्ये हर्णैचा बऱ्याचदा उल्लेख आला आहे. हे कोळ्यांचे बंदर असून, मासळी बाजारासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील दोन महिने सोडले तर हे कायम गजबजलेले असते. हर्णैच्या पुढे आहे सागरी सुवर्णदुर्ग. या जलदुर्गामुळे हर्णै बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णैच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड. 

सुवर्णदुर्ग

सुवर्णदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळील पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूंनी तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळामुळे हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात. पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत; पण कुठेही मंदिर नाही. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे येथील देऊळ कान्होजीने केव्हा तरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ. स. १६६०मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे. 

कड्यावरच्या गणपतीचे मंदिर

कड्यावरचा गणपतीआंजर्ल्याचा कड्यावरील गणपती : डोंगरमाथ्यावर असलेले हे गणपती मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. आंजर्ल्यावरून केळशीच्या बाजूस किंवा मंदिरापासून लांबवर दिसणारा समुद्रकिनारा पाहणे सुखावह असते. पूर्वी हर्णैच्या पुढे तरीत बसून पलीकडे जाऊन गणपतीला खूप पायऱ्या चढून जावे लागे. आता जोग नदीवर मुर्डीमार्गे पूल झाला आहे. त्यामुळे मंदिरापर्यंत गाडी जाते. ५५ बाय ४० फूट आकाराच्या असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिरासमोर सुंदर तळे आहे. आजूबाजूचा परिसर नव्यानेच फरशी बसवून सुशोभित केला आहे. श्रीगजाननाचे प्रथम पाऊल जेथे पडले, तेथपर्यंत सुंदर पदपथ केला आहे. आंजर्ले गावाचा समुद्रकिनारा अत्यंत शांत व सखल आहे. येथे त्या मानाने गर्दी कमी असते. 

सावणे किनारा : आंजर्ल्याच्या पुढे सावणे किनारा आहे. हादेखील फारशी गर्दी नसलेला सागरकिनारा आहे. 

पाडले गाव

पाडले किनारा :
डावीकडील बाजूस समुद्रकिनारा व उजवीकडील बाजूस डोंगररांगा असे सुंदर नैसर्गिक वरदान लाभलेले हे शांत व रम्य ठिकाण सावणे किनाऱ्याच्या पुढे आहे. येथेही फार गर्दी नसते. अधूनमधून दिसणारे खडक, त्यावर आपटणाऱ्या लाटांचे नृत्य हे पाहून मन हरखून जाते. याच खडकामध्ये मानवी पायाचा भव्य असा आकार/ठसा दिसून येतो. यालाच भीमाचा पाय असे म्हटले जाते. कोकणचे खरे सुंदर ग्रामीण रूप येथे पाहायला मिळते. कौलारू घरे व त्यासमोरील अंगणामध्ये असलेल्या फुलांच्या छोट्याशा बागा व घराच्या मागील बाजूस नारळ, सुपारी व आंब्याच्या बागा दिसून येतात. गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विविध खेळप्रकारांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावाला फार पूर्वीपासून भजन-कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे. या गावांनी अनेक संगीतकार, गायक मंडळी संगीत क्षेत्राला दिली आहेत. गावामध्ये भजनाचे अनेक कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू असतात. तसेच गावामध्ये १०० वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर, गणपती मंदिर आहे. दत्ताचे मंदिर हे गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. 

केळशीचा किनारा

केळशी :
केळशी हे आमचे विद्वांस घराण्याचे मूळ गाव. आमचे आता तेथे काही नाही. तरी कुळाचार म्हणून आमच्या घराण्यातील लोक येथे देवदर्शनाच्या निमित्ताने येत असतात. केळशी गाव नारळी-पोफळीच्या बागांमध्ये दडले आहे. याकूबबाबाच्या दर्ग्यापासून या गावाचे विहंगम दर्शन होते. फक्त आणि फक्त नारळी पोफळी दिसतात. घरे दिसतच नाहीत. या झाडीतच वाड्या आणि त्यातील घरे लपली आहेत. यातच होम-स्टे उपलब्ध करून स्थानिकांनी उपजीविकेचे नवीन साधन शोधले आहे. गावातील मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणाऱ्या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. या पाखाड्या इथे पडणाऱ्या धो-धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून जांभ्या दगडापासून (चिरे) केल्या आहेत. पावसाळ्यात बिदीवर असणाऱ्या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधलेले दिसतात. 

केळशीला तीन किलोमीटर लांबीचा मऊशार वाळूचा भव्य किनारा आहे. केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरीत्या तयार झालेली एक वाळूची टेकडीही आहे. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. त्यानंतर डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्वसमावेशक संशोधन पुढे आणले. ही टेकडी त्सुनामीमुळे झाली असावी, असे म्हणतात. भारजा नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कार्बन-१४ पद्धतीने कालमापन केले असता, तो कोळसा ११८० वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून आले.

याकूब बाबांचा दर्गा

याकूब बाबांचा दर्गा :
याकूब बाबा हे सूफी संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी येथे वास्तव्यास होते. याकूब बाबा हे सिंध प्रांताकडून बाणकोटमार्गे केळशीला आले, असे सांगितले जाते. याकूब बाबांची समाधी अत्यंत साधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा होती. महाराजांच्या कार्याला त्यांनी आशीर्वाद दिल्याचे सांगितले जाते. महाराजांनी त्यांच्या दर्ग्याचे बांधकाम सुरू केले व ते छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केले. 

केळशीचे महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर :
पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. केळशीचे महालक्ष्मी मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. दर वर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिर परिसर स्वछ ठेवण्यात येतो. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचे माहेर चिपळूणला व सासरचे घर केळशीला आहे. 

बाणकोटचा किल्ला

बाणकोट :
हे रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर-पूर्व टोक. येथील खाडी पार केली, की पलीकडे रायगड जिल्हा चालू होतो. बाणकोटचा उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या शतकात ग्रीक प्रवासी प्लिनी याने मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे; मात्र त्यानंतर याचा उल्लेख १६व्या शतकापर्यंत कोठेही आढळत नाही. १५४८च्या सुमारास हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिंमतगड असे नाव दिले. 

बाणकोट हे जुने बंदर आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाणकोट किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून, समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वारासमोर खाडीच्या पलीकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या बाजूस बांधलेले ‘आर्थर सीट’ हे स्मारक आर्थर मॅलेट याची पत्नी व मुलीचे आहे. १७९१मध्ये पुण्याचा रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट महाबळेश्वरला जाण्यासाठी मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. बाणकोट येथील खाडीत त्याची पत्नी सोफिया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. यास ‘आर्थर सीट’ म्हणून ओळखले जाते. तो महाबळेश्वर येथे गेल्यावर सावित्री नदीच्या उगमस्थानावर बसून बाणकोटच्या दिशेने पत्नीची आठवण जागवत असे. 

आंजर्ल्याचा किनारा

महाबळेश्वरच्या प्रसिद्ध ‘आर्थर सीट’ पॉइंटचे नाव यावरूनच देण्यात आले आहे. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला ‘हिंमतगड’ असे नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास ‘व्हिक्टोरिया’ असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील नऊ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटिशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले; मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली. 

वेळास कासव महोत्सव

वेळास :
पेशवाईतील धुरंधर राजकारणी नाना फडणवीस यांचे हे मूळ गाव. नानांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर सातारा येथे आले. नाना फडणवीसांचा जन्म सातारा येथील. येथे त्यांचे घर किंवा काही नाही. त्यांचा एक छोटा पुतळा येथे बसविण्यात आला आहे त्यांनी बांधलेले एक मंदिर येथे आहे. वेळास आता कासव महोत्सवामुळे प्रसिद्ध झाले आहे. चिपळूणच्या भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मंडळाच्या उपक्रमातून कासवाच्या पिलांना संरक्षण दिले जाते. ‘घरात हसरे तारे’ ही कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी द. वि. केसकर यांची सासुरवाडी वेळास येथे आहे. 

भाऊ काटदरे

कसे जाल दापोली येथे?
दापोली परिसर जलमार्गाने आणि रस्त्याने जोडलेला आहे. पुण्याहून ताम्हिणी घाटातून म्हसळ्यामार्गे थेट दापोलीत येता येते. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधून दापोलीला जाण्यासाठी फाटा फुटतो. खेडमधून दापोली २८ किलोमीटर आहे. आंबेनळी घाटातून महाबळेश्वरलाही जाता येते. नव्या सागरी महामार्गामुळे आपल्या छोट्या गाडीसह फेरीबोटीतून दाभोळपासून वेंगुर्ल्यापर्यंतचा प्रवास करता येतो. जवळचे रेल्वे स्टेशन खेडला आहे. दापोली, दाभोळ, खेड, तसेच बहुतेक समुद्रकिनारी राहण्यासाठी चांगली हॉटेल्स व होम स्टे (निवासी व्यवस्था) आहेत. अति पावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जावे. 

(या लेखातील काही फोटो ratnagiritourism.in या वेबसाइटवरून घेतले आहेत.)

- माधव विद्वांस

ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language