Ad will apear here
Next
इंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र!
'इंटरनेट ऑफ थिंग्ज'चे कल्पनाचित्र (स्रोत : विकिपीडिया)‘इंटरनेट’ ही गोष्ट आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. इंटरनेटमुळे दूरवरच्या माणसांमधील संवाद सुलभ झाला. आता या इंटरनेटमुळे वेगवेगळी साधने, यंत्रेही एकमेकांशी संवाद साधू लागली आहेत. त्यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ असे म्हणतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कामे सोपी होणार आहेत, कार्यक्षमता, उत्पादकता वाढणार आहे आणि खर्च कमी होणार आहे. ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची व्याप्ती उलगडून दाखविणारे नवे पाक्षिक सदर आजपासून सुरू करत आहोत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनीअर असलेल्या आणि ‘आयओटी’चा विशेष अभ्यास असलेल्या अनुष्का शेंबेकर हे सदर लिहिणार आहेत. 
..........
अमितला ऑफिसला जायला आज जरा उशीरच झाला होता. त्यामुळे जाताना गाडीचा वेग किंचितसा वाढलाच होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हातातील स्मार्टवॉचमध्ये बघितल्यावर त्याच्या लक्षात आले, की ऑफिसमधील मॅनेजरचा फोन आहे. त्याने लगेचच स्मार्टवॉचचे बटण सुरू करून वायरलेस ब्लूटूथ इअरफोनच्या साह्याने बोलण्यास सुरुवात केली. 

हे आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन आयुष्यातील चित्र आहे, नाही का!

वेगवेगळ्या साधनांमधील, यंत्रांमधील या संवादाचा अजाणतेपणे आपल्याकडून वापर केला जात आहे. त्यालाच ‘आयटी’ म्हणजेच माहिती-तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी - IoT) असे म्हणतात. आयओटी हा शब्द आताच प्रचलित होऊ लागला असला, तरी या संकल्पनेचा वापर आपण १९९९पासून करत आहोत. उदाहरणार्थ, कम्प्युटरला मोबाइल जोडला जाणे असो किंवा हॉस्पिटलमध्ये पेसमेकरच्या साह्याने हृदयाचे ठोके लहानशा स्क्रीनवर पाहणे असो. गेल्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले, की त्याचे नव्याने बारसे करणे भाग पडले. ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या ऑटोआयडी केंद्राचे सह-संस्थापक केव्हिन अॅश्टॉन यांनी या संकल्पनेला ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ असे नाव दिले. 

‘आयओटी’च्या जागतिक प्रमाणकांनुसार (ग्लोबल स्टँडर्डस्) सेन्सर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, प्रोसेसर, ऊर्जा कार्यक्षमता, किंमत प्रभावीता, गुणवत्ता, विश्वसनीयता आणि सुरक्षा ही सात डिझाइन वैशिष्ट्ये मानली जातात.

वस्तू (Product) आणि सेवा (Service) अशा दोन क्षेत्रांत ‘आयओटी’चा प्रामुख्याने वापर झालेला आढळतो. परंतु सध्या उत्पादन व उद्योग क्षेत्रात ‘आयओटी’चा वापर होऊ आणि वाढू लागला आहे. खरे तर, या क्षेत्रातही आयओटी आधीपासूनच वापरले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे खाद्य उत्पादन उद्योगात वापरले जाणारे तापमानाचे सेन्सर्स. त्यांच्या साह्याने विशिष्ट तापमान सातत्याने राखणे शक्य होते. 

वेगवेगळ्या उद्योगांमध्ये उत्पादन पद्धती वेगवेगळ्या असतात. तरीही प्रत्येक उद्योगात ‘आयओटी’चा वापर करता येतो/येऊ शकतो. कारण आयओटी हे एकच तंत्रज्ञान नसून, विविध उद्योगांच्या गरजेनुसार त्यात बदल करून आवश्यकतेनुसार वापरता येण्याजोगे ते तंत्रज्ञान आहे. पाण्याला मिळालेल्या वाटेनुसार प्रवाहाचा आकार बदलत जातो, अगदी तसेच. 

उदाहरणार्थ, वस्त्रोद्योगातील एखादा कारखाना उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीतून सर्वाधिक उत्पादन करण्याचा विचार करत आहे. यासाठी त्यांना आयओटी तंत्रज्ञान वापरणे खूप फायद्याचे ठरू शकते. कापडाचा एकूण होणारा वापर, इतर साधनसामग्रीचा वापर, वाया गेलेले कापड व साधनसामग्री ही माहिती त्यांना ‘आयओटी’मुळे अचूकपणे मिळू शकेल. आपली साधने कुठे विनाकारण खर्ची पडत आहेत, हे यातून उद्योग व्यवस्थापकांच्या लक्षात येऊ शकेल. ते नुकसान कमी करण्यासाठी उत्पादनपद्धतीत धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. मनुष्यबळ, पैसा, यंत्रे व सामग्री यांच्या योग्य नियोजनाने उत्पादन खर्च कमी करून एकूण नफा वाढवता येऊ शकतो. यामुळे कार्यक्षमतेत केवळ पाच ते दहा टक्के वाढ झाली, तरी सध्याच्या व भविष्यातील नफ्यात मोठी वाढ होऊ शकते.

‘आयओटी’च्या सामर्थ्याची ही केवळ झलक आहे, आयओटी हे क्रांतिकारी पाऊल आहे. नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करून आणखी सोप्या, सुलभ, सोयीस्कर पद्धतीने आणि कमी खर्चात कशा करता येऊ शकतील, हे ठरवण्यासाठी ‘आयओटी’ क्षेत्र मोठे योगदान देऊ शकते.

तंत्रज्ञान हे नेहमीच आपले जीवन बदलत असते. त्याचा वापर करताना ते आपल्याला एका नवीन उंचीवर नेत असते. सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम ते आपल्या जीवनावर करू शकते. ‘आयओटी’ही त्याला अपवाद नाहीये. ‘आयओटी’चा वापर विशिष्ट विभागात/पद्धतीत कसा करायचा, त्यातून अधिकाधिक फायदा कसा मिळवायचा, त्याआधारे उद्योगाची धोरणे कशी आखायची, रोजच्या आयुष्यात याने काय फरक पडणार आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यांची उत्तरे या सदराच्या पुढील भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाहू या.

अनुष्का शेंबेकर- अनुष्का शेंबेकर
मोबाइल : ९८२२९ ९९३६६
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language