Ad will apear here
Next
पाच वर्षांचा रवी ठरला बुद्धिबळातील ‘बेस्ट यंगर परफॉर्मर’
औरंगाबादच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंचे यश
नंदुरबार : नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पाच वर्षांच्या रवी रंगूनवाला या खेळाडूने ‘बेस्ट यंगर परफॉर्मर’ म्हणून बाजी मारली. 

चार दिवस सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रत्येक फेरीत बोर्डवर संघर्ष करत कोल्हापूर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथील खेळाडूंना धूळ चारून रवीने स्पर्धेत चार गुण संपादन करून हे पारितोषिक मिळवले. 

सहा वर्षांच्या गटात नंदुरबारचा कर्णधार पार्श्व भंडारी याने आठपैकी पाच डाव जिंकून स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सहा वर्षांच्या गटात राज्यातील एकूण ९० खेळाडूंचा सहभाग असताना प्रत्येक डावात तीन तासांपेक्षा अधिक वेळ बसणाऱ्या पार्श्वने बीड, जालना, मुंबई, पुणे येथील खेळाडूंचा पराभव करत स्पर्धेत १७व्या स्थानावर मजल मारली. पार्श्वच्या या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा बुद्धिबळ संघटना राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची राज्य संघटनेकडे शिफारस करणार असून, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारा या गटातील तो जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरेल. 

आठ वर्षांच्या मुलींच्या गटात व १४ वर्षांच्या मुलांच्या गटात सहभागी झालेले अनुक्रमे निकिता बागुल व विनीत बागुल यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे चार व पाच गुण संपादन केले आणि स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. २००पेक्षा जास्त खेळाडू गटात सहभागी असताना दोघांनी १९वा क्रमांक पटकावला. आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असलेल्या विनीत बागुलची महाराष्ट्राच्या १४ वर्षांच्या संघासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिफारस केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यास तोदेखील १४ वर्षे गटातील जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरेल. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ११ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. खेळाडू अश्वमेघराज चेस क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असून, खेळाडूंना मेघा खोंडे, अश्विनी खोंडे, अश्वमेघराज खोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

या स्पर्धेत वर उल्लेख केलेल्या खेळाडूंसह दुर्वेश मराठे, कृष्णा पाटील, दिशांक सूर्यवंशी, नीरज धगधगे, भुवी भंडारी, सिद्धी जैन, तन्मय भदाणे यांनी सहभाग घेतला होता. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language