Ad will apear here
Next
डायनासोरचे वंशज


‘मॅडम, मी आपल्याकडे दुपारी दीड वाजता येतोय... ’ असा मोबाइलवर मेसेज आला आणि बरोबर दीड वाजता डावकिनाचा रिच्या आमच्या घरात दाखल झाला. हातात दोन पुस्तकं आणि एक सुरेख डायरी, चेहऱ्यावर प्रसन्न हसू... मी त्याचं स्वागत केलं... गप्पा झाल्या आणि त्यानं आणलेलं एक पुस्तक माझ्या हातात दिलं. त्याला ते पुस्तक खूप आवडलं होतं आणि मी ते वाचावं असं वाटल्यामुळे तो ते घेऊन आला होता. 

फेसबुकवर डावकिनाचा रिच्या सगळ्यांना माहीत आहेच. रिचर्ड डॉकिन्सचा चेला, अनुयायी, चाहता, फॉलोअर, शिष्य वगैरे वगैरे... आता त्याचं खरं नाव मला कळलं असलं तरी माझ्यासाठी तो कायमच डावकिनाचा रिच्याच असणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला हाडाचा कार्यकर्ता, विज्ञानवादी, विज्ञानावर लिहिणारा आणि तेही आपल्याला समजेल अशा भाषेत... ज्याप्रमाणे आमची ‘प्री’ ही राजकुमारी आइन्स्टाइनच्या प्रेमात पडून त्याला ‘अल्बू’ म्हणते, तसंच सगळी वैज्ञानिक मंडळी या डावकिनाचा रिच्यासाठी त्याचे ‘भिडू’ असतात... अनेक अंधारातले, उपेक्षा वाट्याला आलेले वैज्ञानिक हा शोधून काढतो आणि त्यांच्याबद्दल लिहितो. मला त्याच्या पोस्ट नेहमीच आवडतात. त्यात विज्ञान असतंच, पण त्या वैज्ञानिकाचा संघर्ष असतो, त्याचा दृष्टिकोन असतो आणि विज्ञानाचं आयुष्यातलं महत्त्वही असतं. 

तसं पाहिलं तर रिच्याची आणि माझी ओळख फेसबुकवरचीच; पण अल्पावधीत तो माझा चांगला मित्र, स्नेही... नात्याला काहीही नाव द्या, पण जवळचा झाला. ३० किलोमीटर अंतर पार करून हा तरुण भेटायला भर उन्हात भेटायला येतो काय आणि जणू काही घरापासून पाच मिनिटांच्या बागेत आल्यासारखा चेहऱ्यावरचा आविर्भाव काय, वर ‘त्यात काय एवढं’ असं खांदे उडवत म्हणतो काय... खरोखरच मी भारावून गेले. डावकिनाचा रिच्या, तू एक कार्यकर्ता म्हणून, एक वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून खरोखरच भावलास... 

तर सांगत काय होते, त्यानं मला ‘डायनासोरचे वंशज’ हे पुस्तक दिलं आणि तो गेला... पुस्तकावर लेखकाचं नाव होतं दीनानाथ मनोहर... मला आठवलं, काही वर्षांपूर्वी मुंबईत असताना मी आणि माझा मित्र मनोज आचार्य आम्ही ‘कबीरा खडा बाजार में’ या दीनानाथ मनोहर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गेलो होतो. त्या वेळी हाडाचा कार्यकर्ता असलेला हा साहित्यिक - दीनानाथ मनोहर यांची छबी लक्षात राहिली होती... 

आज दिवसभराची कामं आटोपून ‘डायनासोरचे वंशज’ हे पुस्तक हातात घेतलं... 

मी या पुस्तकानं झपाटून गेले, २०११ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आपण अजूनपर्यंत वाचलं नव्ह.तं याचं खूप खूप वाईट वाटलं. मानसशास्त्राच्या अंगानं प्रवास करणाऱ्या या सगळ्या कथा एका अद्भुत विश्वात मला घेऊन गेल्या. या पुस्तकात एकूण १० कथा आहेत; पण एका दमात या कथा वाचता येत नाहीत. प्रत्येक कथा मेंदूला झिणझिण्या आणते. विचारात पाडते आणि पुढे जाऊ देत नाही. आजच्या या वेगवान पळापळीच्या जगातही थांबवून ठेवण्याची ताकद या कथांमध्ये आहे. मी अजून सगळ्या कथा वाचलेल्या नाहीत; पण व्यळक्तज झाल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा शब्दप्रपंच... 

पहिली कथा ‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’... यात सगळी टेक्नॉलॉजी... तेच शब्द... कम्प्युटर, वर्ड प्रेस, माउस, फाइल्स, ई-मेल, डाउनलोड वगैरे वगैरे... ही कथा स्क्रीनसेव्हेरमध्ये गुरफटलेली... एका अगम्य जगात थेट क्रेट बेटावरच्या मिनोअन संस्कृतीमध्ये घेऊन जाणारी कथा... ही संस्कृती समुद्रात नष्ट झालेली... या स्क्रीनसेव्ह रमधून ते जग आणि आजचं जग यातलं माध्यम बनलेला कथेतला नायक... सगळं काही सांगत नाही, पण ही कथा बांधून ठेवते. रहस्यकथा, गूढकथा, विज्ञानकथा अशा सगळ्या प्रकारांना ती आपलंसं करून वाचकाच्या मनावर अधिराज्य करते... कथा संपली तरी मी त्याच जगात होते... त्या कथेतून मी बाहेर निघू शकत नव्हरते... कारण रोजचं लिखाण याच कम्प्युटरवर मी करणारी... त्यातल्या सगळ्या तंत्राशी परिचित असलेली... तरी दीनानाथ मनोहर जेव्हाट त्यातून एका वेगळ्या जगात पोहोचवतात, तेव्हाप... त्यांच्या या अप्रतिम अशा कथानिर्मितीसाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. 

मध्ये काही वेळ सोडून, पुन्हा पुस्तक हातात घेतलं आणि ‘संस्कार’ ही कथा वाचायला सुरुवात केली. एका संशोधिकेचं संशोधन, त्यातले गिनिपिग्ज आणि १३ गिनिपिग्जनंतर गोंधळलेली तिची अवस्था, १३नंतर नेमकं काय बिनसलंय याचा ती शोध घेत राहते आणि त्यानंतर तिला जे सत्य कळतं त्यानं आपणही अस्वस्थ होतो... संस्कार म्हणण्यापेक्षाही आपल्या मानसिकतेवर प्रचंड प्रमाणात पडलेला पगडा आपण कितीही वर्षं झाली तरी कसा झुगारून देऊ शकत नाही, तो आपल्या सबकॉन्शस माइंडमध्ये कसा तळ ठोकून बसलेला असतो हे सांगणारी कथा... या कथेनंही मी कितीतरी वेळ अंतर्मुख झाले... पुन्हा दीनानाथ मनोहर यांनी टिपलेले एक एक बारकावे बघून हा माणूस मला कधी मानसशास्त्रज्ञ, कधी संशोधक तर कधी तंत्रज्ञ आहे असंच वाटायला लागलं. त्यांचं चालू काळाबरोबरचं अपडेट राहणं आणि ते आपल्या लिखाणात उतरवणं मला खूप आनंद देऊन गेलंच, पण त्यांच्याविषयीचा आदरही वाढवून गेलं. 

तिसरी मी वाचलेली कथा म्हणजे ‘अखेर’. या कथेत कॅटल ब्रीडिंग फार्ममध्ये संशोधक म्हणून काम करणारी नायिका... तिचं कामातलं झपाटलेपण अनुभवत असतानाच, तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगतीनं आपण काय काय प्रगती/अधोगती करतो आहोत याचाही प्रवास आपल्याला घडतो. पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्य, त्यातला संघर्ष, प्रयोग सिद्ध करण्याचं मानगुटीवर बसलेलं भूत, त्याचबरोबर आतल्या मनाला दाबून दडपून ठेवलेलं... ते मनही कधीतरी जागृत होऊन बंड करतं... आणि मग एका अनाकलनीय प्रदेशातला प्रवास सुरू होतो... या प्रवासात जग वेगळ्या टाइमलाइनमध्ये प्रवास करतं. एकीकडे हे सगळं अदभुत तर वाटतंच, पण खरंही वाटतं आणि त्याचबरोबर मानसशास्त्रीय अंगावर प्रकाशझोतही टाकतं. ही कथा वाचणं म्हणजे एक थरार देणारा अनुभव आहे. 

या सगळ्या कथांमधून दीनानाथ मनोहर यांची कल्पनाशक्ती, त्यांच्यातलं माणूसपण किंवा कार्यकर्तेपण आणि अफाट बुद्धिमत्ता, त्यांनी केलेलं वाचन सगळं काही डोकावतं. मानवी संबंध, माणुसकी, मानसिकता, जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर इतकं काही या कथांमधून येतं की कथेबरोबर प्रवास करताना दीनानाथ मनोहर यांच्याबरोबरही एक समांतर प्रवास वाचकाचा सुरू राहतो. या पुस्तकाचं अतिशय समर्पक आणि बोलकं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. 

थँक्यू दीनानाथ मनोहर, थँक्यू डावकिनाचा रिच्या आणि थँक्यू समकालीन प्रकाशन. जरूर वाचा ‘डायनासोरचे वंशज!’

- दीपा देशमुख, पुणे



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CUBSCW
Similar Posts
हरित द्वीपाचा राजा नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग ‘मनोविकास’निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं.
एबारो बारो - सत्यजित रे कालपासून ‘एबारो बारो’ हा सत्यजित रे (राय) यांचा कथासंग्रह - ज्याचा अनुवाद विलास गिते यांनी केला आहे वाचत होते. ‘एबारो बारो’ म्हणजे आणखी बारा! साकेत प्रकाशनानं १९९२ साली प्रकाशित केलेला हा अनुवाद आजही तितकाच ताजा वाटतो.
नवं पुस्तक : नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार आदी गोष्टींचा समावेश असलेलं साहित्यातलं एक नवं दालन नारायण धारप यांनी वाचकांसाठी खुलं करून दिलं आणि त्यात वाचकांना गुंतवलं. अशा या लोकप्रिय लेखकाबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे नवं पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच प्रसिद्ध होत आहे
लव्ह इन द टाइम ऑफ करोना रोहन प्रकाशनानं नुकताच प्रकाशित केलेला ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा कथासंग्रह असून, यात गणेश मतकरी, नीरजा, श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर आणि हृषीकेश पाळंदे या लेखकांच्या करोना काळातल्या कथा आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language