पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय साधणारे विविध उपक्रम यावर चर्चा, परिसंवाद अनुभवकथन असे याचे स्वरुप आहे.
कैलास मानसरोवर यात्रा, नर्मदा परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, दत्त परिक्रमा, पंच कैलास, पंच बदरी, पंच केदार, स्वर्गारोहीणी यात्रा, गिरनार, पीठापूर, कुरवपूर, इत्यादी अनेक यात्रा परिक्रमांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होताना दिसत आहेत. फक्त सहल-चैन किंवा फक्त धार्मिक-अध्यात्मिक किंवा फक्त साहसी ट्रेक-माऊंटेनिअरिंग असे याचे स्वरुप नाही. यामध्ये साहस आहे, अध्यात्म आहे, नागरी सुविधांचा अभाव आहे,शारिरीक कष्ट आहेत, मनाच्या संयमाची परीक्षा आहे आणि तरीही, यातून मिळणारी एक रोमांचक अनुभूती आहे.

विशेष म्हणजे या यात्रा परिक्रमा करून आल्यानंतर त्यातील अनुभवांवर आधारित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली आहे. त्याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदे हर’, प्रा. क्षितीज पाटुकले यांचे ‘कर्दळीवन : एक अनुभुती’, बाबा भांड यांचे ‘कैलास मानसरोवर यात्रा’ या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे. त्यातून देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर नागरिक अशा यात्रा परिक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. सामाजिक समन्वयाचे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. विशेषतः महिला आणि युवा पिढी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहे. या सर्वांचे एकत्रीकरण करण्याच्या हेतूने ‘कर्दळीवन सेवा संघा’ने ‘साहसी यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे; तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत, सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील करणार असून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा., मिलिंद जोशी, गिरीप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे, काशी पंचक्रोशी परिक्रमा संघाचे अध्यक्ष पंडीत विश्वनाथशास्त्री पाळंदे, भारती ठाकूर, उष:प्रभा पागे, श्रीहरेकाका, ब्रह्मा रेड्डी, पिंपरी चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, रविंद्र गुर्जर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, या संमेलनाच्या आयोजनातून नर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील शूलपाणिच्या जंगलामध्ये राहणाऱ्या मामा लोकांच्या अत्यंत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. भारती ठाकूर या सुप्रसिद्ध लेखिकेने मंडलेश्वरजवळ लेपा गावामध्ये ‘नर्मदालय’ ही निवासी शाळा आणि कौशल्य शिक्षण प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. साहित्य संमेलनातून सी. एस. आर. असा हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनामधून सामाजिक उपक्रमासाठी भरघोस निधी दिला जाणार आहे. ‘अधिकाधिक बंधू भगिनींनी या संमेलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करावे,’ असे आवाहन कर्दळीवन सेवा संघाचे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले आहे.
कार्यक्रमाविषयी :
यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन
दिनांक : २८ जानेवारी २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क :
कर्दळीवन सेवा संघ - ७०५७६ १७०१८, ९३७११ ०२४३९