Ad will apear here
Next
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर
पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या; तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या ‘शिखर फाऊंडेशन’ अडव्हेंचर क्लबच्या गिर्यारोहकांनी नुकताच हिमालयातील लेह जवळील स्टोक रेंज मधील स्टोक-कांगरी या २० हजार १६८ फूट उंचीच्या शिखरावर विक्रमी वेळ साधत भगवा फडकवला.

अनेक हिमालयीन मोहिमेचा अनुभव पाठीशी असणाऱ्या ‘शिखर’ टीमचे नऊ गिर्यारोहक २९ जुलै रोजी दिल्ली मार्गे श्रीनगरला पोहचले. काहीशा भितीदायक वातावरणातच, सतत धुमसत असणारे श्रीनगर सोडले. पृथ्वी वरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या भूमीतून पुढचा प्रवास सुरू झाला. आकाशाला गवसणी घालणारे उंच-उंच पर्वत आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे सुचिपर्णी वृक्ष, मधूनच दिसणारे बर्फाचे पांढरे शुभ्र पर्वत असा निसर्गमय प्रवास करत सोनमार्ग, बालताल, झोजीला पास, द्रास मागे टाकत टीम कारगिल युद्ध भूमीवर पोहचली. कारगिल युद्ध भूमीवर मनोभावे नतमस्तक होऊन कारगीला पहिला मुक्काम केला.

श्रीनगर ते कारगील हा निसर्गरम्य परिसर, पण कारगील ते लेह पूर्ण पणे उजाड आणि ओसाड बर्फाच्छादित शिखरांच्या वाळवंटातला साडेसात तासाचा रुक्ष प्रवास. या प्रवासा दरम्यान पथ्थर साहिब गुरुद्वारा, चुंबकीय टेकड्या, मून लँड अशा प्रसिद्ध स्थळांना भेटी देत टीम लेह मुक्कामी पोहचली. लेह मध्येच ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे; टीमच्या हालचाली मध्ये शिथिलता निर्माण झाली होती. एक्सपिडीशनसाठी याचा त्रास होणार हे जाणून, पुढचे चार दिवस वातावरणाशी जुळून घेण्याच्या हेतूने लेह शहरासह हायस्ट मोटोरेबल रोड समजला जाणारा खार्दूगंला पास, नूब्रा व्हॅली, पेंगँग लेक, चांगला पास, सियाचीन बेस आणि त्याच बरोबरीने विविध मॉनेस्ट्रीनां भेटी देत ‘शिखर’ टीमची एक्सपेडिशनच्या दृष्टीने जय्यत तयारी झाली होती.

उत्साहाने ओतप्रोत भरलेली ‘शिखर’ टीम पाच ऑगस्टच्या भल्या सकाळी एक्सपिडीशनसाठी स्टोकच्या दिशेने रवाना झाली. लेह ते स्टोक पर्यंतचा १८ कि.मी. चा प्रवास पूर्ण करून टीम खऱ्याअर्थाने मोहिमेसाठी सज्ज झाली. स्टोक ते चांगमा हा पहिला टप्पा, पण चांगमाला मुक्काम न करता टीम ने थेट १४ हजार फूट उंचीवरील मनोकर्मा पर्यंत मजल मारली आणि टीमने अर्धी लढाई खऱ्या अर्थाने इथेच जिंकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साही चेहऱ्याने सर्व गिर्यारोहकांचा चमू बेस कँपच्या दिशेने रवाना झाला. सकाळी आठ वाजता निघालेली टीम दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बेस कँपला पोहचली. बेस कँप ते स्टोक-कांगरी समिट हे साधरणत: आठ तासाचे अंतर आणि खरी लढाई होती ती बेस कँप ते शिखर माथा. म्हणून टीमने पुढील दोन दिवस पुन्हा वातावरणाशी जुळून घेण्याच्या हेतूने समिट मार्गावर सराव मोहिमा आखल्या, मनाची आणि शरीराची पूर्ण तयारी झाल्यानंतर टीमने मोहिमेची आखणी केली. मोहिम रात्री चालू होऊन सकाळच्या समिट नंतर दुपारपर्यंत गिर्यारोहक बेस कँप वर येणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने जय्यत तयारी झाली. अनुभवी गिर्यारोहक जालिंदर वाघोले मोहिमेचे नेतृत्व करणार होता. त्याला संजय बाटे आणि नितिन टाव्हरे साथ देणार होते. मोहिमेमध्ये यांच्या बरोबरीने भास्कर मोरे, प्रमोद जाधव हे ही सहभागी होणार होते. बेस कँपची जबाबदारी ‘शिखर’चे अध्यक्ष विवेक तापकीर यांच्यावर होती त्यांच्याबरोबर दिंगबर सुरजोसे हे ही असणार होते.

मोहीम फत्तेच्या इराद्याने सात ऑगस्टच्या संध्याकाळी साडे नऊ वाजता ‘शिखर फाऊंडेशन’चे पाच मोहीमवीर सह्याद्री पासून कोसो दूर असलेल्या स्टोक-कांगरी मोहिमेवर निघाले. बेस कँप वर तशी लगबग जाणवत होती. आणखी काही गिर्यारोहक शिखराच्या दिशेने रवाना होते. जय भवनी! जय शिवाजी! हर-हर महादेवच्या मराठमोळ्या शिवगर्जनेने बेस कँप वर नवचैतन्य निर्माण झाले. रक्त गोठवणाऱ्या थंडीत टीम समिटच्या दिशेने रवाना झाली. देशभर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण साजरा होत होता, पण पौर्णिमेच्या चंद्राची साथ मिळावी म्हणून सणवार बाजूला ठेवत याच दिवशी मोहिमेची आखणी केली होती. चंद्रप्रकाशात चंदेरी दिसणाऱ्या शिखराचा वेध घेण्यासाठीच सर्वजण सरसावले. वाटाड्याच्या (शेर्पा) मदतीने टीमने बेस कँप सोडला. साधारणत: दीड तसाच ओपन वॉक झाल्यानंतर शिखर दिसायला सुरुवात होते आणि खरी कसोटी या ठिकाणापासून सुरू झाली. उंची वाढत होती तसे श्वासोश्वास घेण्यास त्रास जाणवत होता. दीड तासाच्या चढणी नंतर जालिंदर, नितीन आणि संजय ग्लेशिखर पर्यंत येऊन पोहोचले. रात्रीचे अकरा वाजले होते, पाठीमागे टॉर्चचा प्रकाश दिसत होता. फॉरेनर्स ट्रेकर्सची टीम कांगरीच्या दिशेने वर सरकत होती. भास्कर आणि प्रमोद मागे पडल्यामुळे त्यांना येऊ देणे जरुरी होते. वेळ जास्त जात असल्यामुळे थंडी गोठवून टाकत होती, त्यामुळे निर्णय बदला आणि दुसरा गाईड त्यांच्या मदतीला ठेऊन पुन्हा या तिघांनी पुढे कूच चालू ठेवली. पुढचा प्रवास हा संपूर्ण पणे ग्लेशियर मधून होता. ४० ते ५०° चढण त्यामुळे ग्लेशिखर वरून घसरण्याची शक्यता; म्हणून प्रत्येक पाय ठेवताना घ्यावी लागणारी काळजी. रात्र वाढत होती तसा पारा गोठत होता. त्यामुळे गती पण महत्त्वाची होती. जालिंदरला हिमालयीन ग्लेशिखरचा अनुभव असल्यामुळे त्याच्या चालीत आत्मविश्वास जाणवत होता. नितीन मात्र नवखा असला तरी; सह्याद्रीतील भक्कम अनुभव त्याच्या पाठीशी होता. रात्र पुढे सरकत होती तशी ही जोडी पण पुढे सरकत होती. दोन तासांच्या चढाई नंतर ग्लेशियर पार करून दोघे ही शोल्डर पर्यंत पोहचले. ग्लेशियर पेक्षा पुढची चढाई कठीण होती. शोल्डर वॉक म्हणजे ७०° मधील सरळ चढण. पायाखाली निसटणार बर्फ, थंडीने कडक झालेले अंग, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि त्यामध्ये सरळ उभी चढण, म्हणजे जीवन मरणाची लढाईच. खरे तर हेच साहस गिर्यारोहकांना हिमालयाकडे आकर्षित करत असते. गिर्यारोहक सुद्धा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करत असतो. दोघांचेही शरीर थकले होते, पण मन नाही. दोघांकडेही आंतरिक शक्ती जबरदस्त असल्यामुळे मार्गक्रमण जोरदार पणे चालू होते. एकमेकांस साथच नव्हे तर धीर देत, तीन तासाच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक कसोटी पाहणाऱ्या चढाई नंतर नितीन आणि जालिंदर शोल्डर पार करून रिजवर पोहचले. दोघेही प्रचंड दमले होते. चंद्र पश्चिमेकडे झुकला होता. उतुंग हिमालयाची शिखरे चंद्रप्रकाशात न्हाहून निघाली होती. हिमालयाचे सौंदर्य पाहून थकवा कमी झाला होता. विजय समीप आल्यामुळे दोघांच्या ही चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. पुढील मार्ग चढणीचा नसला; तरी रिज वरुन चालणे धोकादायक होते. अतिशय निमुळती वाट आणि दोन्ही बाजूला खोल दरी, त्यामुळे तोल संभाळत चालणे क्रमप्राप्त होते. चंद्र क्षितिजकडे झुकला होता. पूर्वेला लाली पसरली होती. खालच्या बाजूने येणाऱ्या टॉर्चचा प्रकाश मंद झालेला दिसत होता. ज्यासाठी केला होता अठ्ठाहास ते आज प्रत्यकक्षात साकारत होते. शरीर थकले होते, पण डोळ्यात आनंद आश्रू होते. अंगात त्राण नावाचा वायू शिल्लक नव्हता, पण ‘शिखर फाऊंडेशन’चे नाव स्टोक-कांगरी सारख्या बलाढय शिखरावर कोरताना मनामध्ये प्रचंड आनंद होता. थंडीमध्ये सुद्धा अंगावर रोमांच उभे राहिले होते. हीच ती आठ ऑगस्ट २०१७ ची आनंददायी पहाट. पहाटे चार वाजून ५५ मि. जालिंदर आणि नितीनने एकमेकांस कडकडून मिठी मारत; स्टोक-कांगरीच्या शिखरावर पाय ठेवला आणि गरठलेल्या हिमालयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील अशी शिवगर्जना देत जय भवानी! जय शिवाजी! चा नाद संपूर्ण स्टोक रेंजमध्ये दुमदुमला. जालिंदरने व्हाकिटॉकी वरून बेस कँपला संदेश देत समिटचा वृत्तांत कळवला. त्या नंतर शेर्पाने सुद्धा समियची बातमी बेसच्या ऑफिसला कळवली. पहाटेच्या संधीप्रकाशात स्टोक रेंजची हिमालयीन शिखरे डोळ्यात साठवत, काही आठवणी कॅमेऱ्यात बंद करत परतीचा मार्ग पकडला.

अगोदरच अंगात त्राण नसल्यामुळे चालणे कठीण झाले होते. जालिंदरचा बूट त्रास देत होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यासाठी लवकर खाली जाणे जरुरी होते. नितीन जास्त फिट वाटत होता, त्यामुळे उतरतेवेळी नितीनने पुढाकार घेत बेस कडे प्रस्थान ठेवले. असंख्य संकटाचा सामना करत, कधी पडत, तर कधी एकमेकांना आधार देत सलग चार तासाच्या प्रवासानंतर ग्लेशियर पार करून दोघेही प्लेन वॉक पर्यंत पोहचले. बेस कँप वरून यांच्या स्वागतासाठी टीम ग्लेशियर पर्यंत पोहचली होती. दोन्ही टीमची भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष करत आनंद साजरा करत, एकमेकास आलिंगन देत सर्व जण बेस कँपकडे रवाना झाले.

या मोहिमेमध्ये ‘शिखर फाऊंडेशन’चे अध्यक्ष विवेक तापकीर, संजय बाटे, जालिंदर वाघोले, नितीन टाव्हरे, भास्कर मोरे, प्रमोद जाधव, दिंगबर सुरजोसे, निलेश नितनवरे आणि किशोर बोराटे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते. टीमच्या वतीने सर्वांचा लोहगाव विमानतळावर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी टीमचे ज्येष्ठ गिर्यारोहक विक्रांत शिंदे, प्रविण पवार आणि टीम शिखरचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी तापकीर यांनी सर्व टीमचे आभार व्यक्त केले. ‘विशेष म्हणजे स्टोक-कांगरी समिटवर आणि बेस कँपवर दिवसेंदिवस दुर्दैवी घटना मध्ये रेस्क्यू घडत असतानाच्या पार्श्वभूमीवर ‘शिखर फाऊंडेशन’ची मोहिम सुरक्षितरित्या पार पडली; त्याचे सर्व श्रेय टीमच्या योग्य नियोजनाला जाते,’ असे गौरव उद्गार विवेक तापकीर यांनी काढले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZCPBF
Similar Posts
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन पुणे : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे : ‘घरातील कीटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे प्रकार घरात चालतात, त्यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या फवारणीमुळे प्रदूषणाला सुरुवात होऊन, पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language