Ad will apear here
Next
बाळासाहेब
हरणतळ्याच्या बाळ्याला जो चांगला म्हणेल, तो वेडा. त्याचे प्रताप जेवढे सांगावेत तेवढे कमी.
बाळ्याने घराच्या पडवीत पाऊल टाकताच सदबाने त्याच्या अशी कानाखाली वाजवली की आख्खी पडवी दणाणली. दुस-या गालावर मारण्यासाठी त्याने हात उगारला तर बाळ्याने बापाचा हात वरचेवरच धरला. बाळ्या बापापेक्षा एक फूट उंच आणि शरीराने धिप्पाडही. मनात आलं असतं तर त्याने बापाला जागेवरच फिरवलं असतं पण बाळ्याने तेवढी मर्यादा अजून तरी सोडली नव्हती.
बाळ्याला नुकतंच अठरावं वर्ष लागलेलं. हरणतळ्याचा बाळ्या गावात कुप्रसिध्द; असं पोरगं शत्रूच्याही पोटी येऊ नये. शाळेत असताना त्याला कधी कोणी चांगलं म्हणालं नाही. गरीब पोरांना मारायचं, सुंदर पोरींची छेड काढायची, शिक्षकांच्या सायकलींची हवा सोडून द्यायची, काॅप्या करायच्या, असले त्याचे उद्योग. वस्तीवर म्हाता-या माणसांची धोतरं ओढायची, म्हाता-या बायकांच्या डोक्यावरचे पदर पाडायचे, कोणी पायाने अधू असेल तर त्याची चालायची नक्कल करायची, अशा त्याच्या त-हा. जी पोरं चांगली होती ती त्याने बिघडवली, जी अगोदरच बिघडलेली होती त्यांना पारच कामातून घालवलं. शाळेच्या नावाखाली कधी हरणतळ्यात पोहत बसायचं, कधी खंडोबा डोंगरावर जायचं तर कधी वाण्याच्या मळ्यात. लोकांची आंब्याची झाडं व पेरूच्या बागाही त्याने सोडल्या नाहित. गावात नुसता उच्छाद मांडलेला.
बिड्या तर तो लहानपणापासूनच ओढायचा. ते कमी होतं की काय म्हणून आता तो जुगार खेळू लागला, मटक्यावर पैसे लावू लागला, गांजा चरसची नशाही करू लागला. आता असे छंद करायचे म्हणल्यावर पैसे पाहिजेत. मग बाळ्या चोरी करू लागला. घरात कधी आईची पिशवी तर कधी बापाचे पायजामे चाफू लागला. पैसे गरजेपुरतेच घ्यायचा तरीही घरच्यांच्या ते लक्षात आलं. बापाने त्याची बेदम धुलाई केली पण मार खाऊन तो दगड झालेला. मान-अपमान अशा गोष्टी त्याला समजतच नव्हत्या. त्याने पुढे घरातल्या वस्तू विकायचा सपाटा लावला. भंगारवाल्याला विकता येतील अशा सर्व वस्तू त्याच्या घरातून गायब होऊ लागल्या. पुढे वस्तीवरच्या इतर घरातलं भंगार सामानही चोरी होऊ लागलं. लोकांना चोर माहित होता पण हाताशी लागेल तर.
काकडआरतीचे दिवस होते. त्या दिवशी सदबाची महापूजा. बाळ्याची इच्छा नसताना सदबा त्याला पहाटे उठवून देवळात घेऊन गेला. तिथं गेल्यावर हा मख्खासारखा उभा. बापाने 'सगळ्यांच्या पाया पड' म्हणून सांगितलं. भजनाला उभ्या टाळकरी लोकांच्या एकेक करत तो पाया पडत गेला, पण वरचेवरच. 'खाली वाकायला कंबर मोडती काय?' बाप दबक्या आवाजात म्हणाला. विणेक-याच्या पुढे वाकून बाळ्याने त्याच्या पायाला असा जोरात चिमटा काढला की त्याने किंचाळून उडीच मारली. काकडआरती काही वेळ थांबली. सदबाने बाळ्याला मंदीरातच प्रसाद दिला असता पण तोवर बाळ्याने वस्ती गाठली.
'कसलं बांडगुळ घरात जल्माला आलंय देवाला माहित!' बाळ्याने घरात पाऊल ठेवताच त्याची लहान बहिण म्हणाली. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं व भाकरीची टोपली उचकटली. घरात कोण जेवलंय, कोण उपाशी आहे याची चौकशी न करता टोपल्यातल्या दोन्ही भाकरी त्याने दुधात चुरगाळल्या.
'माझ्या आईबापांनी कसली पापं केली असतील म्हणून असली ब्याद त्यांच्या पदरात पडलीय...' त्याची बहिण बोटं मोडत होती. बाळ्याला तेवढीच एक बहिण. भाऊ नव्हता. त्याने थोडा वेळ तिचं ऐकलं आणि मग उठून तिच्या पेकाटात अशी लाथ घातली की ती मोठमोठ्याने बोंबलू लागली. ती जसजशी रडू लागली तसतसा बाळ्या तिला जास्तच मारू लागला.
'रोग बसला तुझ्यावर! किडं पडून मरशील एक दिवस!' ती त्याला शिव्याशाप देत होती. तेवढ्यात सदबा कामावरून घरी आला. ह्या बहिणभावांची भांडणं पाहून त्याने कोप-यातली काठी उचलली आणि बाळ्याला सपासाप मारायला सुरुवात केली. पण बाळ्याची कातडी गेंड्याची. चेह-यावर काठी पडणार नाही याची काळजी घेत त्याने बापाचा मार खाल्ला. त्याच वेळी त्याची आई घरात आली. ती मध्ये पडली तर तिलाही दोनचार काठ्या खाव्या लागल्या. शेवटी तिनेच रडून रडून हा गोंधळ थांबवला. घरात त्याची आई सोडली तर तो सगळ्यांना नकोसा झाला होता. त्या दिवशी ती खूप रडली. मुलगा असा दिवटा निघाल्यावर ती बिचारी तरी काय करणार?
सदबा गावातल्या सावकाराकडे मुनिम होता. सावकाराचे पैशाचे सगळे व्यवहार तोच पाहायचा. एकदम ईमानदार माणूस. त्या दिवशी दुपारी घरी येताना काही रोख रकमेचा लिफाफा चुकून त्याच्या खिशात आला. दुपारचं जेवण झाल्यावर परत ते पैसे पेढीत जमा करता येतील. घरी आल्यावर हातपाय धुवायला म्हणून सदबाने कपडे काढले. खुंटीवर अडकवलेली कोपरी बाळ्याने पाहिली. तीन चार दिवस झाले त्याने गांजा ओढला नव्हता. दोन तीन दिवस झाले भंगारवाल्याला विकण्यासारखं त्याला काही मिळालंही नव्हतं. बापाच्या खिशातून चार सहा आणे घ्यावेत. बाप बाहेर न्हाणीत गेलेला बघून त्याने त्याच्या कोपरीत हात घातला.
'ताई, जेवायला वाढ गं मला,' स्वयंपाकघरात बापाचा आवाज ऐकून तो दचकला. कोपरीच्या खिशात घातलेल्या हातात एक लिफाफा आला होता. त्यात काहितरी होतं. लिफाफा उघडायला आता वेळ नव्हता. हातात लिफाफा घेऊन तो मागच्या दाराने बाहेर पळाला.
हरणतळ्याच्या काठावर येऊन त्याने तो लिफाफा फोडला. त्यात नोटा होत्या. बाळ्या दचकला. एवढे पैसे त्याने कधी पाहिले नव्हते. खरं तर तो आता घाबरलाही होता. त्याने त्या नोटा मोजून पाहिल्या. पाचशे रूपये भरले. त्याने त्यातले दहा रूपये काढून घेतले व बाकीचे पैसे पुन्हा लिफाफ्यात ठेवले. पण आता लिफाफा फुटला म्हणजे आपली चोरी उघडी झाली. काय करावं? तो गावात आला.
खिशात पैसे असतील तर काय करता येणार नाही? गांजा, बिड्या ओढता येईल. जुगार खेळता येईल. वरच्या आळीतला हिंमतराव काय करत नाही? सगळंच करतो की. आणि ते काय बिनपैशाचं करतो का? आपल्याला सुध्दा हिंमतरावासारखीच ऐश करायची. पण त्यासाठी पैसे पाहिजेत. आज तर आपल्याकडे पैसे आहेत पण हे चोरलेले पैसे कधीतरी संपून जातील. मग काय? काय तरी कामधंदा करावा, पैसा कमवावा आणि मग मनाला वाटेल तशी ऐश करावी. पण आपल्याला धंदा करायला पैसे कोण देईल. बाप तर फुटकी कवडी पण देणार नाही. आता खिशात आहेत हेच पैशे धंद्यात लावले तर? दुधाची डेअरी टाकावी. गवळ्यांकडून दूध घ्यायचं आणि गि-हाईकाला विकायचं. नको म्हशी पाळायला आन् नको धारा काढायला! आपल्या गावातल्या भिक्याची डेअरी किती चांगली चालती. तसंच करतो. डेअरी उघडायला दोनशे रूपये भांडवल खूप झालं. पण इथं गावात काय करता येणार नाही. हे पैशे घेऊन मुंबईला जाऊ. तिकडे एकदा जम बसला की बापाला व्याजासकट पैसे परत करू.
'मालक, मी चोरी केली नाही. माझा पोरगा पैसे घेऊन गेलाय,' सदबा सावकाराची विनवणी करू लागला. 'मला दोन दिवस द्या. मी त्याला शोधतो आन् तुमची पै-न-पै देतो.'
'तुझा पोरगा किती गुणाचा आहे ते मला नको सांगू. मला माझे पैसे पाहिजेत,' सावकार म्हणाला. 'मी पोलिसात तक्रार दिलेली आहे. पुढं जे व्हायचं ते होईल.'
आणि मग पुढं जे व्हायचं होतं तेच झालं. सदबाला अटक झाली, कोर्टात पैसे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि सदबा पाच वर्षांसाठी तुरूंगात गेला.
बाळ्याने पुणे स्टेशनवरून मुंबईची गाडी पकडली. काही दिवस जीवाची मुंबई करू आन् मग धंद्याला लागू. तो एसटीमधून खाली उतरला आणि खिशात हात घातला. खिशात पैसे नव्हते. गाडित चोराला मोर भेटला.
स्टेशनवर उतरल्यावर त्याने थोडी हातचलाखी करायचा प्रयत्न केला पण हे लोहगाव नव्हतं, मुंबई होती. लोकांनी लगेच पकडून त्याला बेदम मारला. त्याचं वय आणि खेडवळ अवतार बघून लोकांनी त्याला सोडला; नाहीतर त्यालाही मुंबईच्या तुरूंगाची हवा खायला लागली असती.
इकडे त्याचा बाप तुरूंगात गेला आणि आईने अंथरूण धरले. आपला गुणी मुलगा एकीकडे तर नवरा दुसरीकडे. दोन आठवड्यातच ती इतकी खचली की तिचं अंथरुणातून उठणं अवघड होऊन बसलं.
गेटवे ऑफ इंडियापुढे ब्रिटिश इंडियन आर्मीची कवायत चालली होती. एका विशिष्ट तालात वाजणारा बॅन्ड आणि त्यावर कवायत करणारे सैनिक. कवायत संपते. सैनिकांच्या कप्तानापुढे एक उंचापुरा धिप्पाड तरूण उभा असतो.
'काय हवंय तुला?' कप्तानाने विचारले.
'मला भरती व्हायचंय?' तो तरूण उत्तर देतो.
'मरायची भीती नाही वाटत?'
'नाही. मराठ्याची औलाद आहे.'
'खूप कष्ट करावे लागतील.'
'करीन.'
'अरबी समुदापलिकडे येमेन देशात जावे लागेल.'
'तयार आहे.'
कप्तानाने पाहिले की तो तरूण हजरजबाबी आणि तल्लख होता. आता घरी जायची सोय नव्हती म्हणून बाळू सैन्यात भरती झाला.
तिस-याच दिवशी त्यांची पलटण घेऊन एक मोठं जहाज येमेन देशाला निघालं. आयुष्यात कोणतीही गोष्ट कसलाच विचार न करता करणारा बाळू आता विचारात पडला. गंमत म्हणूनच तो सैन्यात भरती झाला होता. जहाज जसजसं पाण्यात दूर जाऊ लागलं आणि जमिनीचा किनारा मागे पडू लागला तसतसा तो घाबरला. त्याला आपल्या वस्तीची, गावाची, आईबापाची आठवण येऊ लागली. आता आपल्याला परत जमिन दिसेल की नाही या विचारानेही तो धास्तावला. त्याला मरण्याची भीती नव्हती पण पहिल्यासारखं मोकाट जीवन इथं जगता येणं शक्य नव्हतं. त्याच्या डोळ्यांपुढे हरणतळं, खंडोबा डोंगर, वाण्याचा मळा, गांजाचं दुकान, जुगाराचा अड्डा आणि त्याचे गावातले टुकार मित्र, हे सगळं येऊ लागलं. या जहाजातून उडी मारून मुंबई गाठावी असा विचारही मनात आला पण आता ते शक्य नव्हतं.
येमेनमध्ये येऊन त्यांच्या पलटणीला आता तीन महिने झाले होते. सैनिकी कवायत, त्यांचे जीवन, नवा देश पाहण्याचं औत्सुक्य, आता सर्व काही संपलं होतं. बाळूला जुने दिवस आठवू लागले. आपण आपल्या आईबापाला किती त्रास दिला या जाणीवेने तो अस्वस्थ होऊ लागला. बाप व बहिणीने आयुष्यभर त्याचा तिरस्कारच केला होता पण आईचं काय? बापाने त्याला मारल्यावर ती मुळूमुळू रडायची. त्याच्यासारखा कुपुत्र पोटाला आला असूनही ती माई कधीही त्याच्यावर रागावली नव्हती. आईच्या आठवणींने तो व्याकुळ झाला. आईविषयी कधी नाही इतकं प्रेम आता त्याला वाटू लागलं.
'मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला. तुमच्यापासून दूर करून देवाने मला माझ्या पापांची शिक्षा दिली आहे. आई, मी मरून जावं अशीच तुमच्या सगळ्यांची इच्छा असेन. माफी मागायला पण मला तोंड नाही. आई, चुकलोच मी. आता तूही माझा तिरस्कार करत असशील. तुझ्या या वाया गेलेल्या पोराला एकदा माफ करशील ना? आई, खरंच तुझी खूप आठवण येतेय. जमलं तर पत्राचं उत्तर पाठव.' आईच्या नावे लिहिलेलं ते पत्र बाळूने आपल्या देशाला पाठवलं.
एक महिना झाला पण त्याच्या पत्राचं उत्तर आलं नाही. त्याला काळजी वाटू लागली. आपण पैसे चोरले. आपला बाप ते पैसे कसं भरून देणार? सगळी जमिन विकूनही त्याच्या मुनिम बापाला ते पैसे फेडता आले नसते. आपण सगळ्या घराचं वाटोळं करून बसलो. त्याला खूप वाईट वाटायचं. एवढा निष्ठूर भावनाशून्य तरूण आता आईबाबांच्या आठवणीत रडत बसायचा. तो गाव सुटला, ते मित्र सुटले, ते वातावरण सुटलं आणि नव्या देशात नव्या भुमिकेत त्याच्या विचारात बदल होऊ लागला. सगळ्या सैनिकांच्या घरून त्यांना पत्र यायची. पण बाळूला कोण पत्र लिहिणार? कोणी काही विचारल्यावर 'आमच्या घरच्यांना लिहिता वाचता येत नाही' अशी थाप तो मारायचा.
पण एक दिवस बाळूचं पत्र आलं. त्याने ते वाचलं. त्याचा बाप पाच वर्षांसाठी तुरूंगात गेलेला असतो. मागच्या तीन महिन्यांपासून त्याची आई अंथरुण धरून असते. या सगळ्यांना तोच जबाबदार असतो. त्याची बहिण लग्नाला आलेली असते. त्याच्या आईने त्याला 'कसल्याही परिस्थितीत घरी परत ये' अशी विनवणी केलेली असते. त्याने केलेल्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायची वेळ आलेली असते.
'कप्तानसाहेब, मला घरी जायचंय,' बाळू म्हणाला.
'का? काय झालं?'
'माझी आई खूप आजारी आहे. तिला बघायला घरी कोणीही नाही,' बाळू असं म्हणाल्यावर कप्तान हसला.
'ऐक, आता दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे. कोणत्याही सैनिकाला आता सुट्टी मंजूर होणं शक्य नाही.' कप्तानने वस्तूस्थिती सांगितली.
'तसं असेल तर माझा राजीनामा घ्या!'
'मी मराठा आहे! मरायला घाबरत नाही,' असंच म्हणाला होता ना तू? कप्तान कुत्सितपणे बोलला. 'का आता युध्दाचं नाव ऐकून आई आठवली?' बाळू निरूत्तर झाला.
तीन महिन्यांनी दुसरं पत्र आलं. त्याची आई वारली होती आणि त्याच्या चुलत्यांनी त्याच्या बहिणीचं एका लंगड्या पोराबरोबर बिनहुंड्याचं लग्न लावून दिलं होतं. बाळूचं डोकं सुन्न झालं. या जगात त्याच्यावर प्रेम करणा-या एकमेव व्यक्तीच्या मृत्यूला तोच कारणीभूत झाला होता. स्वतःच्या आईला मारल्याचं पाप आता मी कुठं आणि कसं फेडू? आपण आपल्या जन्मदात्या बापाला छळलं, लहान बहिणीला गुरासारखं मारलं, आणि आता आईचाही जीव घेतला. बाळूच्या मनाला अपराधीपणाच्या या भावना रात्रंदिवस टोचत होत्या.
दुसरं महायुद्ध पेटलं. येमेनमधून त्यांची पलटण युरोपात येऊन धडकली. आता ती पलटण जर्मन सैन्याशी लढत होती. बाळूच्या आयुष्याला काही ध्येयच राहिलं नव्हतं. आपण आपल्या घराचं वाटोळं केलं. आता आपला जगून काय उपयोग?
तो रणांगणावर उतरला. ज्या मोहिमेवर कुणीही जात नव्हतं, तिथं तो जाऊ लागला. नवनवी आव्हाने स्विकारायला तो नेहमी तयार असायचा. कसलंही जोखमीचं काम असू द्या, ते काम करायला तोच पुढे असणार. युध्द लवकर संपण्याची चिन्हे नव्हती. मराठ्यांच्या त्या पलटणीत बाळासाहेब एक मोठा योद्धा म्हणून नावारूपाला आला.
वीर बाळासाहेंबाच्या कथा युरोपभर होऊ लागल्या. त्याने एकट्याने जाऊन कसा जर्मन टँकर उध्वस्त केला, त्यांच्या पलटणीच्या कप्तानाला कसं मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, एका धुमश्चक्रीत जीवाची पर्वा न करता आपल्या सैनिकबंधूंसाठी वीर बाळासाहेब स्वतः पुढे जाऊन कसे संरक्षक ढाल बनले, अवघड परिस्थितीतही ते कसे खंबीर दिसतात, जिथे बहादूरातल्या बहादूर शिपायाची बोबडी वळते तिथे वीर बाळासाहेब कसे निकराने पुढे जातात, आपल्या एका मृत सहका-याच्या प्रेताला अग्नि मिळावा म्हणून या वीराने कसं त्याचं प्रेत आपल्या खांद्यावर टाकून आणलं... एकाचढ एक किस्से. युध्दनीती आखताना वरिष्ठ अधिकारीसुध्दा आता बाळासाहेबांचा सल्ला घेऊ लागले होते. पुढे चार वर्षांनंतर ते युध्द संपलं. बाळासाहेबांची छाती वेगवेगळ्या पदकांनी सजली होती. त्यांच्यासारखा योद्धा सबंध युरोपात नव्हता. सगळ्या जगात त्याने आपल्या भारत देशाचं व पलटणीचं नाव केलं.
०९. सदबा जेलमधून सुटतो
सदबाला जेलमध्ये येऊन चार वर्षे झाली होती. आता त्याच्या अंगावर फक्त हाडेच शिल्लक राहिलेली. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याची एक वर्ष अगोदर सुटका होणार असते. उद्याच तो सुटकेचा दिवस. त्या संध्याकाळी सदबा आपल्या अंधारकोठडीत बसलेला असतो.
'उद्या तुमची सुटका होणार. आता कुठं जाणार तुम्ही?' तिथे पहारा देणारा पोलिस त्याला विचारतो.
'मी कुठं जाणार? जायला मला आता आहे तरी कोण? ना बायको ना मुलगा? तुम्ही ठेवलंत तर या अंधारकोठडीच आयुष्य काढेन,' खाली मान घालून सदबा म्हणाला.
'असं कसं? तुम्हाला मुलगा आहे असं ऐकलंय मी. हो... पण त्याच्यामुळेच तुम्हाला इथं यावं लागलं नाही का? खूपच वाईट होता का हो तो?' त्या पोलिसाने दबत दबत विचारलं. त्याला काही उत्तर देण्याअगोदरच सदबाला रडू फुटलं. मग तो पोलिस काही न बोलता तिथून निघून गेला.
होय, माझा बाळू! मी त्याला कधी समजूनच घेतला नाही. लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्याच्यावर खेकसायचो. तो अभ्यास करायचा नाही म्हणून मी त्याला मूर्ख ठरवलं. शिव्या दिल्याशिवाय त्याच्याशी कधी एक वाक्यही बोललो नाही. माझ्या चुकांमुळेच माझा बाळू जास्त बिघडला. थोडं समजून घेतलं असतं, थोडं समजून सांगितलं असतं तर पोरगं एवढं हाताबाहेर गेलं नसतं.
एकदा माझ्या बाळूने वासराच्या पाठित गुद्दा घातला म्हणून मी त्याला आसूडाने मारलं. पहिलीला असताना शाळेतून पळून आला म्हणून दुस-या दिवशी सगळ्या शाळेपुढं त्याला बांबूने मारलं. माझ्या लेकराला मी कधी समजूनच घेतलं नाही. तो कोणाबरोबर राहतो, काय करतो, कुठे जातो याचा कधी तपास केला नाही. फक्त चुकला कि शिक्षा द्यायची एवढंच काम मी केलं. शेवटी पोरं म्हणजे तरी काय? मातीचं गोळंच की. आईबाप जसे घडवतील तसंच ते घडणार. कुठं असेल माझा बाळू आता? गांजा चरशीच्या व्यसनाने त्याला संपवलं तर नसेल? अरे देवा! काय विचार करतोय मी हा? त्याला जवळ घेऊन कधी दोन गोड शब्द मी बोललो नाही. त्याच्या पाठीवर कधी हात फिरवला नाही. मीच माझ्या पोराच्या आयुष्याची माती केली. म्हातारा सदबा रात्रभर त्या अंधारकोठडीत रडत होता.
दुसरा दिवस उजाडला. येरवडा जेलच्या तुरूंगापुढे कितीतरी लोकांची गर्दी. तुरूंगातून सुटका होणा-या कैद्यांचे नातेवाईक आले होते. किती आनंदी होते ते लोक. कोण नाचत होतं. कोण गात होतं. कोण मिठाई वाटत होतं.
जेलर आल्यावर सुटका होणा-या सगळ्या कैद्यांना ओळीत उभं केलं गेलं. एक पोलिस ज्याचं नाव पुकारायचा तो कैदी जेलरकडे जाऊन त्याला सलाम करायचा, आपला सुटका परवाना घ्यायचा आणि आनंदाने बाहेर गेटकडे जायचा. गेटवर पोहोचल्यावर त्याचे नातेवाईक मोठ्याने ओरडायचे. कोणी कोणी फटाकेही वाजवत होते.
शेवटी सदबाचा नंबर आला. त्याने जेलरला सलाम केला, आपला परवाना घेतला व बाहेर गेटकडे आला. गेटजवळ सुटलेले कैदी आणि त्यांना भेटायला आलेले नातेवाईक पाहून तो खिन्न झाला. गेटमधून बाहेर न जाता तो आतच मैदानात बसून राहिला. त्या तुरूंगाबाहेर जायची त्याची इच्छाच नव्हती. गेटजवळ काही पोलिस उभे होते. ते सदबाला 'बाहेर जा' म्हणून खुणावत होते. कोणी मोठा अधिकारी येणार असतो.
एक पोलिस सदबाच्या हाताला धरून त्याला बाहेर काढणार तोच बाहेरून सैनिकांची एक पलटण आली. कवायत करत पायी चाललेल्या पलटणीच्या मागे घोड्यावर बसलेला त्यांचा कप्तान असतो. खाकी वर्दी, कोटाच्या खिशाला लावलेली वेगवेगळी मानचिन्हे, डोक्यावर रूबाबदार टोप घातलेल्या त्या अधिका-याला पाहून गेटवरचे सगळे पोलीस ताडकन सावधान अवस्थेत उभे राहिले. त्यांनी त्या अधिका-याला सलाम ठोकला.
किती भाग्यवान आहे तो अधिकारी ज्याला एवढी मोठी पलटण सलाम ठोकत आहे. धन्य त्या अधिका-याचे आईबाप. मीच कसला कर्मदरिद्री की माझ्यासाठी इथं कुणीही आलं नाही.
घोड्यावर बसलेल्या सैनिकी अधिका-याची नजर गुडघे पोटाशी धरून जमिनीवर बसलेल्या सदबाकडे गेली. तो पटकण घोड्यावरून खाली उतरला आणि सदबाकडे निघाला. सदबासुध्दा मान वर करून त्या अधिका-याकडे पाहू आला.
'माफ करा कप्तानसाहेब, पण हा म्हातारा उठतच नव्हता. तुम्ही राहू द्या, आम्ही त्याला बाहेर हाकलतो,' एक पोलिस पळत येऊन त्या अधिका-याला म्हणाला. त्या अधिका-याने हात दाखवून त्या पोलिसाला दूर उभं केलं. आता तो सदबाच्या खूपच जवळ आला. सदबाने काही वेळ त्या अधिका-याच्या चेह-याकडे निरखून पाहिले आणि मग तो एकदम दचकून उभा राहिला.
'अरे पोरा... तू?'
कप्तान बाळासाहेबांनी रडतरडतच आपल्या बापाचे पाय धरले.
(मुन्शी प्रेमचंद यांच्या 'कप्तानसाहब' या कथेचं स्वैर मराठी रूपांतर)
विजय निंबाळकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RRXHDC
Similar Posts
कष्टाचा पैसा सकाळचे अकरा वाजले आणि मारुतीच्या देवळात पत्यांचा डाव पडला. 'चट्-चट्' 'टर्र-टर्र' आवाज करत एकजण पत्ते पिसत होता. साहेबरावला आलेला बघून त्याच्या वाट्याचेही पत्ते टाकले गेले. गाभार्‍यात जाऊन मारुतीचं दर्शन घेतल्यावर साहेबरावने कपाळाला तेलकट शेंदराचा टिळा लावला आणि बाहेर कोपऱ्यात बसलेल्या टाईमपास गँगच्या गुडघ्याला गुडघे लावून बसला
पोलिस पाटील 'च्यामायलाऽ मोगलाई माजली काय इथं?' हाॅटेलात चाललेल्या गोंधळाबद्दल कळताच ढोलाची टिपरं हातात घेऊन त्या राकट पोरांनी हाॅटलाकडे धाव घेतली. 'काय झालं रे?' उत्तराची वाट न पाहता
रिकामट्रेकडे बसचा ड्रायव्हर स्टेअरिंगवर येऊन बसला आणि तीन चार पोरं केबिनमध्ये शिरली. ड्रायव्हर तरूण आहे का अनुभवी याच्याशी त्यांना काही घेणं-देणं नव्हतं. तो कोणती गाणी लावणार हे महत्त्वाचं. गाण्याचा पहिला फोल्डर ड्रायव्हरचं टोपननाव ठरवणार! त्याने गाणी लावली आणि त्याला टोपननाव पडलं - 'दर्द'. कारण बस चालू केल्याबरोबर
लीलाच्या लग्नातली भांडी रागाने फणफणतच लीला वाड्याच्या मधल्या अंगणात आली. जोरदार हातवारे करून ती बडबडत होती. नंदीबैलाचं ढुमकं ऐकून लहान मुलं घराबाहेर पळत यावीत तशी लीलाची वटवट ऐकून तिच्या जावा घराबाहेर आल्या. वाड्यातली बच्चेमंडळी लिलाच्या जवळ येऊन उभी राहिलेली. काही समजलं नाही तरी करमणूक होणार एवढं त्यांना माहीत होतं.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language