तीन जानेवारी ही युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हजारो वर्षे सामाजिक बंधनात अडकलेल्या स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली करून देणाऱ्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीत अडकलेल्या शूद्र व अतिशूद्रांचे कल्याण करणाऱ्या समाजक्रांतीच्या प्रणेत्या म्हणजे सावित्रीबाई फुले होत.
तीन जानेवारी १८३१ रोजी त्यांचा जन्म झाला. नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील हे त्यांचे पिता. तत्कालीन परिस्थितीत सावित्रीबाईंचा वयाच्या नवव्या वर्षी १३ वर्षे वय असलेल्या जोतिबांशी विवाह झाला आणि दोन गुणी, सुस्वरूप व कर्तृत्ववान व्यक्ती एकत्र आल्या. या समगुणी समविचारी दोन शक्ती एकत्र आल्या व फुले दाम्पत्याबरोबरच भारताच्या युगप्रवर्तक क्रांतिकार्याचा प्रारंभ झाला.
स्त्रीशिक्षणाचे क्रांतिकारी कार्य
समकालीन पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे सामाजिक स्थान गौण होते. मानवतेच्या भूमिकेतून स्त्रियांकडे पाहिले जात नव्हते. स्त्रिया व शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रिया शिकल्या तर त्यांच्या ४२ पिढ्या नरकात जातील, त्यांच्या जेवणात आळ्या पडतील, धर्माला काळिमा लागेल अशा खुळचट समजुती समाजात रूढ होत्या.
अशा परिस्थितीत १९व्या शतकात पुण्यासारख्या घरात जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवून भारताच्या इतिहासातील स्त्री शिक्षण क्रांतीचा प्रारंभ केला. जोतिबांनी भारतातील मुलींची पहिली शाळा एक जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात सुरू केली; पण या शाळेत शिकविण्यास शिक्षिका मिळेना. म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंनाच शिकवून तयार केले व शिक्षिका म्हणून नेमले. हा स्त्रीसमानतेचा भारतातील पहिला जाहीरनामा होता.
या वेळी शाळेत जात असताना सावित्रीबाईंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांच्या अंगावर घाण फेकणे, दगड मारणे, शिव्याशाप देणे, सटवी, धर्मबुडवी असे असे शिव्याशाप देऊन सनातन्यांनी त्यांचा छळ केला. हे सगळे सावित्रीबाईंनी सहन केले; पण या कार्यापासून त्या परावृत्त झाल्या नाहीत.
जोतिबांच्या तालमीत तयार झालेल्या त्या करारी व जिद्दीच्या धाडसी शिक्षिका होत्या. जोतिबा व सावित्रीबाईंनी स्त्रिया व शूद्र, अतिशूद्रांच्या शिक्षण कार्यास वाहून घेतले. सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता हरघडी अवहेलना, त्रास, छळ सहन करून त्यांनी केलेल्या कार्याला भारताच्या इतिहासात तोड नाही. म्हणून महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई युगपुरुष व युगस्त्री ठरतात.
त्या काळात महाराष्ट्र व इतर राज्यांत एकही भारतीय शिक्षिका म्हणून कुणी काम केल्याचे उदाहरण नव्हते. त्यामुळे सावित्रीबाई भारतातील आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरतात.
एकापाठोपाठ एक अशा पुणे व परिसरात एकूण १८ शाळा यांनी सुरू केल्या. सामाजिक प्रतिकूलता, अनंत अडचणी, विरोध, आर्थिक चणचण इत्यादी अनेक संकटांना सामोरे जाऊन केवळ चार वर्षांत एवढ्या शाळा सुरू करून जोतिबांबरोबर सावित्रीबाईंना दिव्य करावे लागले. विटंबना झाली, अवहेलना झाली, माणुसकीला काळिमा फासणारा छळ झाला, तरी स्वीकारलेल्या कार्यापासून बाजूला गेल्या नाहीत. उलट अंगीकृत कार्य जिद्दीने पार पाडले. म्हणूनच आज २१व्या शतकातील सावित्रीबाईंच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात मुक्तपणे वावरत आहेत. आधुनिक भारतातील स्त्रीशिक्षण क्रांतीच्या त्या आद्य प्रणेत्या ठरतात.
समाजसुधारणेतील अपूर्व योगदान
महात्मा जोतिबांच्या सामाजिक सुधारणेच्या क्रांतीकार्यातही सावित्रीबाई अर्धांगिनी होत्या. समाजसुधारणेच्या ज्या ज्या दालनात जोतिबा गेले त्या त्या दालनात सावित्रीबाई गेल्या. स्त्रीशिक्षण, बालविवाह प्रतिबंध, सतीची चाल बंद केशवपन, विधवा पुर्नविवाह, बालहत्याप्रतिबंधक गृह, शेतमजूर, शेतकरी, दीनदुबळे यांची सेवा, शूद्र अतिशूद्रांची सेवा शिक्षण, दुष्काळपीडितांना आधार, सत्यशोधक समाज इत्यादींमध्ये त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारी असेच आहे.
सावित्रीबाई म्हणजे भारतीय संस्कृतीचा आदर्श होय. स्त्रिया, दीनदुबळे व पददलितांच्या उद्धारासाठी अनेक संकटांशी टक्कर देऊन सत्य, समता व मानवतेसाठी जोतिरावांच्या क्रांतिक्रार्यात सहभागी झाल्या, म्हणून सावित्रीबाई स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या आद्य जनक, समाजक्रांतीच्या प्रेषित ठरतात.
बालहत्या प्रतिबंधक गृह
२८ जानेवारी १८६३ रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले व वाट चुकलेल्या स्त्रियांना आधार दिला. या बालहत्याप्रतिबंधक गृहातील मुलांची सावित्रीबाई अविरतपणे प्रेमाने सेवा करीत. एवढेच नव्हे तर काशीबाई या ब्राह्मण विधवेस झालेल्या यशवंतराव या मुलास दत्तक घेऊन डॉक्टर बनवले व आपली तत्त्वे बावनकशी असल्याचे कृतीने दाखवून दिले.
विधवा पुनर्विवाह
तत्कालीन समाजात बालविवाह व बालजरठ विवाह केले जात. त्यामुळे बालविधवांचे प्रमाणही खूप मोठे होते. अशा बालविधवांना मात्र पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. त्यांच्या दुःखाला पारावर नसे. एक तर त्यांचे केशवपन केले जाई व त्यांना अनेक बंधनांनी जखडून ठेवले जाई. त्यांना पांढऱ्या पायाची म्हणून हिणवून कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नसे. तेव्हा अशा विधवांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना केली व पुण्यात विधवा-विधुरांचा एक पुनर्विवाह पुण्याच्या नातूबागेत १८६४मध्ये घडवून आणला.
आजही २१व्या शतकात विधवा विवाह करताना सामाजिक रोषांना सामोरे जावे लागते. अजूनही लोकांची मानसिकता बदललेली नाही. तेव्हा १५० वर्षांपूर्वी सावित्रीबाई व जोतिबांनी केलेले हे कार्य क्रांतिकारी असेच आहे.
त्याकाळी अत्यंत अनिष्ठ अशा प्रथा समाजामध्ये रूढ होत्या. एखाद्या बालिकेला वैध्यव प्राप्त झाले तर एक तर जबरदस्तीने सती घालवले जाई किंवा तिचे केशवपन केले जाई. अशा अघोरी कृत्यांना थांबविण्यासाठी सावित्रीबाईंनी १४ एप्रिल १८९० ला पुणे परिसरातील न्हाव्यांची एक परिषद बोलावून या अघोरी कृत्यापासून त्यांना परावृत्त केले. न्हाव्यांनादेखील आपण हे वाईट कृत्य करत आहोत याची कल्पना आली व त्यांनी संपाचा निर्णय घेतला. थोडक्यात अशा प्रकारचा न्हाव्यांचा हा देशातील पहिला संप होता व जोतिबा आणि सावित्रीबाई हे संप घडवून आणणारे पहिले क्रांतिकारक होत.
सत्यशोधक समाज
अन्याय्य जुनी समाजरचना बदलण्यासाठी जोतिबांनी १८७३मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी अखंड योगदान दिले. जोतिबांच्या मृत्यूनंतर त्यांनी या समाजाचे नेतृत्व केले. एवढेच नव्हे तर १८९३ला सासवड येथे भरलेल्या समाजाच्या २०व्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
दुष्काळग्रस्तांना साह्य
१८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळात गोरगरीब, अनाथांचे प्राण वाचविण्यासाठी अन्नधान्य जमविले, अन्नछत्रे उभारली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सत्यशोधक समाजामार्फत छात्रालये उघडून २००० मुलामुलींच्या जेवणाची व्यवस्था केली. या छात्रालयाचा कारभार सावित्रीबाई पाहत होत्या. सावित्रीबाई म्हणजे सहनशीलता सेवा, त्याग, धाडस यांचा संगम होत्या. म्हणून असे अलौकिक कार्य त्यांनी केले.
जोतिबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत धीरोदात्तपणे स्वतः पुरुषाच्या हिमतीने हातात गाडगे धरणाऱ्या सावित्रीबाई विचार व आचार या बाबतीत काळाच्या किती तरी पुढे गेल्या होत्या.
दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई. प्लेगच्या साथीत प्लेग झालेल्या मुलाला खांद्यावरून आपल्या मुलाच्या दवाखान्यात नेत असताना त्यांनाही संसर्ग झाला व ही समाजक्रांतीची जोतिबांनी प्रज्वलित केलेली ज्योत अनंतात विलीन झाली.
आधुनिक भारताच्या इतिहासात १९व्या शतकात सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षण, पददलितांचा उद्धार, अखिल मानवजातीचे कल्याणकारी कार्य केले आणि त्या समाजक्रांतीच्या प्रणेत्या ठरल्या.
त्यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
- प्रा. डॉ. सौ. कल्पना राजीव मोहिते
(प्रोफेसर, इतिहास विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण कॉलेज, इस्लामपूर जि. सांगली)