Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह)
प्रातिनिधिक छायाचित्र

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
.......
सर्व रसिकांना उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! दूरध्वनी आणि मेसेजच्या माध्यमातून आपण दिलेली दाद आणि पुढच्या भागाची विचारणा, यामुळे नाट्यसंजीवनीच्या या उपक्रमालाच संजीवनी मिळाल्याची भावना आमच्या मनात आहे.

‘संगीत स्वरयात्री’साठी खल्वायन संस्थेनं खूप मेहनत घेतली होती, खूप खर्च केला होता. कथानक वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्यानं फिरत्या रंगमंचाला पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर फिरता रंगमंचदेखील तयार केला. अर्थात हे सगळं नवीन असल्यानं, पहिल्यांदाच घडत असल्यानं सर्वांचा उत्साह अवर्णनीय होता.

याच फिरत्या रंगमंचाची मजेशीर आठवण अजून ताजी आहे.

नाटकात एका प्रसंगात नायक विमनस्क होऊन बसलेला असतो. विपरीत काळात आपलं गाणं गहाण ठेवायला लागल्याचं दुःख तो व्यक्त करतो आणि त्या प्रसंगानंतर पहिला अंक संपतो. पडदा पडतो. तो प्रसंग गंभीर आणि करूण आहे. नायकाचं काम करणारे (कै.) आनंद प्रभुदेसाई सोलो पीसनंतर खूप अस्वस्थ असायचे. इतका तो प्रसंग गंभीर.

पण त्या प्रयोगात खूप काही अनपेक्षित घडले.

एक तर त्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे नायिकेची एका प्रयोगापुरती रिप्लेसमेंट होती. अर्थात त्या अभिनेत्रीने तिच्या दृष्टीने खूप तयारी केली होती. त्याकरिता मुंबईहून चार दिवस अगोदर येऊन खूप प्रॅक्टिस केली होती. फिरत्या रंगमंचावर वावरण्याची तयारी केली होती.

पहिल्या अंकातील शेवटचा प्रवेश सुरू होण्यापूर्वी तिचा आणि अन्य पात्राचा प्रवेश झाला. अंधार झाला. ती विंगेत गेली आणि पुढच्या प्रवेशाला वेळ असल्याने तिथेच बसली. फिरता रंगमंच फिरू लागला आणि आनंद प्रभुदेसाई प्रेक्षकांच्या समोर आला. आणि कुणाला काही कळायच्या आधी किंकाळ्या ऐकू आल्या. आनंद बावरला, त्यानं बाजूला बघितलं तर ती अभिनेत्री ओरडत होती. आनंद संवाद विसरून गेला. प्रेक्षक हसू लागले, टाळ्या, शिट्या ऐकू येऊ लागल्या. आणि त्याच गडबडीत कुणीतरी पडदा पाडला. सगळ्या प्रवेशाचा बट्ट्याबोळ झाला होता.

झालं होतं काय, की ती अभिनेत्री विंगेत गेल्यावर लाकडी सीटीवर म्हणून जी बसली, तो प्रत्यक्ष फिरत्या रंगमंचाचा भाग होता. अंधारात कुणाला काही न दिसल्यानं रंगमंच नेहमीप्रमाणं फिरवला गेला आणि तिचा गोंधळ उडाला. पर्यायाने सगळा विचका झाला. त्यातही पुढच्या अंकात ती वेगळी हेअरस्टाइल करणार होती म्हणून तिनं केसही मोकळे केले होते.

आता हे दृश्य खूपच विनोदी दिसत होतं. नायक रंगमंचावर, नायिका केस मोकळे सोडून किंचाळतेय आणि मी लेखक म्हणून प्रेक्षकांत बसून डोक्याला हात लावतोय आणि विचार करतोय की हा सीन आपण केव्हा लिहिला होता...

असो. अशा अनेक गमतीजमती पडद्याआड घडत असतात. हौशी रंगभूमी त्यातूनच समृद्ध होत असते.

... पण नाट्यगीतांच्या बाबतीत, मी नाट्यलेखक म्हणून आणखी वेगळ्या कारणाने समृद्ध झालो आहे.

पूर्वीच्या संगीत नाटकातील पदांच्या चाली, जेव्हा ते नाटक रंगभूमीवर आले, त्या वेळी ज्या होत्या त्याच आज आहेत, उद्याही राहतील; पण माझ्या संगीत नाटकाबाबत वेगळे घडले आहे. वेगवेगळ्या संस्था माझी नाटके करीत असल्याने, त्यांचे संगीतकार, माझ्या नाटकातील पदांना, त्यांच्या प्रतिभाशक्तीनुसार चाली बांधत आहेत. एका अर्थाने ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण प्रत्येक संगीतकाराची माझ्या नाटकाकडे, पदांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. विचार वेगळा असतो. त्यामुळे पदांवर होणारे सांगीतिक संस्कार, नाट्यपदांना समृद्ध करणारे असतात. त्यांचे स्वातंत्र्य मी मानतो.

आता हेच पाहा ना.

नाट्यसंजीवनीच्या कालच्या (पहिल्या) भागात आपण ‘स्वरयात्री’मधील नांदी ऐकली, तिची जातकुळी वेगळी होती. त्याच नांदीला, पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य असलेले ठाण्याचे अनंत जोशी यांनी जेव्हा चाल लावली, तेव्हा ती खूप वेगळी आणि पूर्वीच्या चाली इतकीच मनभावन वाटली. (या सदराचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

व्हर्टिकल नोट्स या संस्थेमार्फत अनंत जोशी आणि डॉ. अशोक रानडे यांच्या ज्येष्ठ शिष्या कल्याणी साळुंके ‘नवनाट्यधारा’ या कार्यक्रमात माझी अनेक नाट्यपदे सादर करतात. त्या कार्यक्रमात ही नांदी सादर केली जाते.

आज ही नांदी आम्ही सादर करीत आहोत. गोव्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात ती सादर करण्यात आली होती. सकारात्मक ऊर्जा मिळवून देणारी चाल हे या नांदीचे वैशिष्ट्य.

पटदीप रागाची सुरावट असलेली ही नांदी गायली आहे पं. डॉ. राम देशपांडे आणि कल्याणी साळुंके यांनी. त्यांना तबलासाथ केली आहे रोहिदास परब यांनी. संगीत दिग्दर्शन आणि संवादिनीसाथ आहे श्री. अनंत जोशी यांची.

एकाच नाट्यपदाला दोन संगीतकार वेगवेगळ्या चाली लावतात, ते ऐकणे खूप आनंददायी असे मला वाटते. अर्थात इथे तुलना अभिप्रेत नाही. कारण स्वतंत्र प्रज्ञेने दिलेली चाल असल्याने नाट्यपदासाठी ती संजीवनीच आहे, असे म्हणायला हवे.

तर ऐकू या ही नांदी...

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZEQCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पहिला (व्हिडिओसह) नवीन नाटक, नवीन कथानक, नवीन गाणी, नवीन संगीत अशा नावीन्याने भारलेल्या काळात रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी संगीत नाटकांच्या लेखनाकडे वळले आणि रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ संस्थेनं त्यांची अनेक नाटकं संगीत रंगभूमीवर आणली. त्यातील काही नाटकांतील नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language