Ad will apear here
Next
मैत्रीण
मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.
समांतर जाणाऱ्या पण कधीच एकत्र न येणाऱ्या रेल्वे रुळासारखी ती दोन आयुष्ये होती.
वाडियात शिकणाऱ्या माझ्या गावातल्या एका मित्राला भरपूर मित्र होते, मैत्रिणी होत्या आणि खास मैत्रीणही होती.
'तुझ्या जिंदगीत काही अर्थ नाही. वर्ष झालं कॉलेजला येतोय; अजून तुला साधी मैत्रीणही नाही,' तो चिडवायचा.
'मला मुलींची भीती वाटते. मला कुठून मैत्रीण मिळायची?' मी सांगायचो.
'मुलींशी मैत्री करायला डेअरिंग लागते.' तो दात काढायचा. 'आपला राजेश बघ. दर वर्षी नवी पोरगी फिरवतो.'
'सगळ्यांना ते जमत नाही,' मी मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो.
तसं मीराला मी शाळेच्या दिवसांपासून ओळखत होतो. ती आमच्याच इयत्तेत पण दुसऱ्या तुकडीत शिकत होती. माझ्या धाकट्या भावाची तिच्या धाकट्या भावाशी मैत्री होती. तिचा भाऊ आमच्या घरी नेहमी यायचा. माझा भाऊदेखील त्यांच्या घरी जायचा. तसं पाहिलं तर गावात सर्वजण एकमेकांना ओळखायचे. विशेषत: एकाच कॉलेजात जाणारी पोरं-पोरी.
लोहगाव ते पुणे स्टेशन. मार्ग क्र. १५८. सकाळी सातच्या बसने आम्ही वाडियाला जायचो. मीरा आणि मी. म्हणजे आम्ही सगळेच. माझ्याबरोबर माझे मित्र असायचे; तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी. ती पुढच्या दाराने आत शिरली तर मी मागच्या दाराने. ती मागे बसली तर मी पुढे. बसमधला प्रवास एकमेकांत अंतर ठेवूनच व्हायचा.
मुलींबद्दल आकर्षण नव्हतं, मैत्रीण नको वाटत होती, असं नव्हतं. पण एखाद्या मुलीने स्वतःहून 'हायऽ माझ्याशी मैत्री करणार का?' विचारलं तरच तिच्याशी मैत्री करायची असा माझा स्वभाव. आणि असं अकडून बसल्यावर कोण मुलगी पुढे येईल?
कॉलेजात येणाऱ्या गावातल्या मुलीशी मैत्री करणं सहजासहजी शक्य नव्हतं. शाळेत असतानाही 'नाव जोडलं जाण्याच्या भीतीने' मुली मुलांशी बोलायच्या नाहीत. आता कॉलेजात आल्यानंतरही 'आपल्या मागे गावात नको त्या चर्चा होतील' म्हणून मुली गावातल्या मुलांपासून दूर राहत.
वर्गातल्या मुलींशी बोलणं होतं पण ते तेवढ्यापुरतं. 'पाॅलीटिक्सचं लेक्चर झालं का? इकनाॅमिक्सचे सर आलेत का? कालच्या लेक्चरच्या नोट्स काढल्या का?' वगैरे.
'काल तू आला नाही? मी तुला खूप मिस केलं... आपल्याला अलंकारला 'दिलवाले' बघायला जायचं होतं...' वाटे, एखाद्या मुलीने असंही बोलावं. पण तसं बोलणारी मुलगी भेटत नव्हती.
आमच्या वर्गात मराठी मिडियमच्या मुला-मुलींचा एक ग्रुप होता. सर्वजण एकत्र असता - वर्गात, कॅम्पसमध्ये, ग्राउन्डवर, कॅन्टीनमध्ये गप्पागोष्टी व्हायच्या. काही बिन्धास्त मुली बाहेर भेटल्या तरी मोकळेपणाने बोलत तर काही मुली बाहेर भेटल्यास खाली मान घालून निघून जात
तसं पाहता सगळं ठिकठाक चाललं होतं - म्हणजे कॉलेज, लेक्चर्स, परीक्षा. मात्र एक कमतरता जाणवायची - मैत्रीणीची. कॉलेज संपून गेलं पण एकाही मुलीशी मैत्री झाली नाही असं होऊ नये असं वाटे.
आमच्या वाडियात प्रत्येकाला मैत्रीण नसली तरी बऱ्याच जणांना होती हे देखील खरं. अशी नशीबवान पोरं त्यांच्या मैत्रिणींना घेऊन लायब्ररीत खुसफूस करत, मैदानातल्या हिरवळीवर मांडीला मांडी लावून गप्पा करत, पार्किंगध्ये झाडाआड उभं राहत, एकमेकांचा हात हातात घेऊन रेल्वेच्या रुळाकडेने स्टेशनला जात, तर काही थेट एम्प्रेस गार्डन गाठत. एवढं सगळं होत असल्यावर त्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात का होणार नाही?
माझ्या अशा काही अपेक्षा नव्हत्या. पण मित्रांना दाखवण्यासाठी तरी एखादी मैत्रीण असावी! परिस्थिती 'जैसे थे' होती आणि तशीच राहणार होती. कारण ना मी काही पावलं उचलणार होतो, ना कुणी मुलगी स्वतःहून माझ्या आयुष्यात येणार होती.
पण या कथेत लेखकाने मीरा आणि माझी काही एकत्र दृश्ये लिहिली होती. त्यामुळे आम्हाला भेटावं लागणार होतं.
एका सकाळी आमचा मुला-मुलींचा ग्रुप लायब्ररीच्या जीन्याखाली उभा होता. अचानक मीरा समोरून आली व आमच्या ग्रुपमधील कल्पनाला 'हाय' म्हणाली. कल्पनाशी थोडं बोलून ती निघूनही गेली.
'मीरा लोहगावलाच राहते,' कल्पना म्हणाली, 'ती माझी मावसबहिण आहे. मी तुमची ओळख देता देता विसरले!' कल्पनाने 'च्चऽ' करून कपाळावर हात मारला.
'त्याची काही गरज नाही,' मी म्हणालो, 'आम्ही एकमेकांना ओळखतो.'
आकाशातल्या लाखो ताऱ्यांपैकी अचानक एखाद्या ताऱ्याची ओळख पटावी, त्याचं नाव समजावं, त्याची उगवायची - मावळायची वेळ समजावी आणि आपण रोज रात्री त्याची वाट पहावी. मीराबाबत माझं अगदी तसंच झालं. कालपर्यंत जिच्या अस्तित्वाची मला फारशी जाणीवही नव्हती, आज ती अचानक डोळ्यांसमोर येऊ लागली. तिच्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. तिचं बोलणं, चालणं, वागणं; तिचं एकेक वैशिष्ट्य ठळकपणे आठवू लागलं.
आम्ही एकाच बसने कॉलेजला जायचो. एरवी कुणाही मुलीबद्दल विचार न करणारा मी मीराबाबत विचार करू लागलो. माझा स्पेशल विषय इंग्रजी तर तिचा इतिहास होता.
'तू ऑप्शनलला कोणते विषय घेतलेत?' मीराला विचारायच्या पहिल्या प्रश्नाची मी मनोमन तालीम करू लागलो. पुढच्या वेळी जर मीरा ग्रुपमध्ये आली तर तिला हा प्रश्न विचारायचाच.
त्या दिवशी कॉलेजमध्ये 'ट्रॅडिशनल डे' होता. अगदी जत्रेचं वातावरण. आमच्यासारखी साधारण मुलं कुर्ता, पायजमा व कोल्हापुरी घालून आलेली तर मुली विविधरंगी साड्यांत. त्या दिवशी पहिल्यांदा मीराला साडीत, इतक्या जवळून पाहिलं.
पाचवीत फ्रॉक, आठवीत परकर, अकरावीला सलवार-कमीजमध्ये पाहिलेली मुलगी आज भलतीच वेगळी दिसत होती. ती आता लहान राहिली नव्हती. अंगावरच्या फिक्कट निळ्या साडीने तिचं रूप खुलवलं होतं. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. माझ्या डोळ्यांसमोर, तरीही माझ्या नकळत, एका कळीचं फूल झालं होतं.
'स्त्री-पुरुषात निखळ मैत्री होऊ शकत नाही. त्या मैत्रीचं कधी ना कधी प्रेमात रूपांतर होणारच. विशेषतः ते प्रेमात पडायचं वय असेल तर...' अशी पुस्तकी वाक्ये डोक्यात घुमू लागली. आपल्याला मीराशी फक्त मैत्री करायची आहे का अजून काही? मनातल्या विचारांचे वारू 'नको त्या दिशेला उधळण्याआधीच' मी मित्रांच्या गप्पांत सहभागी होऊन त्यांना आवरलं.
त्या सकाळी लागोपाठ दोन बस आल्या. एक बस लेट होती. बहुतेक प्रवासी पहिल्या बसमध्ये निघून गेले. मीरा दुसऱ्या बससाठी थांबली म्हणून मीही थांबलो. ती ज्या सीटवर बसली त्यामागच्या सीटवर मी हिंमत करून बसलो. त्या बसमध्ये इकडे तिकडे बसलेले पण मोजके प्रवासी होते.
कंडक्टर आमचे प्रवासी पास चेक करून गेला. मीराने मोकळे सोडलेले काही केस तिच्या सीटवरून मागे आले होते. तिच्या केसांना हळूवार स्पर्श करण्याची इच्छा झाली पण कुणी बघेल म्हणून मी तसं केलं नाही.
आपल्याला आवडणाऱ्या मुलीच्या केसांची बट कापून ताईतमध्ये जपून ठेवण्याच्या प्रेमवीरांच्या साहसाबद्दल मी अलेक्झांडर पोपच्या कवितेत वाचलं होतं. मीराच्या केसांची बट कापून घ्यावी की काय? तिच्या केसांची बट ताईतमध्ये ठेऊन मी तो ताईत गळ्यात बांधला आहे असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं.
तसं तर मीराच्या केसांची बट कापून घेणं शक्य नव्हतं. पण सीटवरून मागे आलेल्या तिच्या केशसंभारातून एखादा केस तोडून घेणं शक्य होतं. मी इकडं तिकडं बघितलं आणि हळूच तिचा एक केस बोटांच्या चिमटीत पकडला. तेवढ्यात 'टिकटिक' आवाज झाला. दचकून मागे पाहिलं तर कंडक्टर पुढे येताना दिसला. मी हात मागे घेतला आणि मग सबंध प्रवास होईपर्यंत शांत बसून राहिलो.
योगायोगाने एका दिवशी मीरा कॅन्टीनमध्ये आली. आमचा ग्रुप तिथेच बसलेला. खुर्ची ओढून ती कल्पनाशेजारी बसली. 'ट्रॅडिशनल डे' विषयी चाललेल्या गप्पांत तिने ऐकण्याची भूमिका घेतली. अधूनमधून मीरा कल्पनाच्या प्रश्नांना उत्तरे देई तर कधी कधी स्वतःच तिला प्रश्न विचारी.
'तू ऑप्शनलला कोणते विषय घेतलेत?' मी मनातल्या मनात माझ्या प्रश्नाची तयारी करू लागलो. 'ट्रॅडिशनल डे'च्या गप्पा सुरू असताना असा प्रश्न विचारणं चुकीचं वाटत होतं. पण कुठून तरी तिच्याशी संवाद सुरू करायचा होता. एक-दोनदा धीर एकवटून मी बोलायची तयारी केली. पण तिची नजर माझ्याकडे फिरली की माझे शब्द ओठांतच विरून जात.
कॅन्टीनमधला अर्धा तास छानच गेला. मी तिला चोरून पाहत होतो. तिचा आवाज कानात साठवत होतो. तिच्या हालचाली टिपत होतो.
मैत्रीण असावी तर अशी; साधी, सालस आणि सुंदर. मी विचार करू लागलो. मीरा माझ्या गावातली, माझ्या शाळेतली असल्याने 'तिच्याशी मैत्री करण्याचा पहिला अधिकार मलाच आहे' असंही माझं दुराग्रही मन मला सांगत होतं.
दिवस जात होते. पण मीराशी बोलायची माझी हिंमत होत नव्हती.
एरवी मी कधी गावात फिरकायचो नाही पण आताशा संध्याकाळी गावात चक्कर मारावीशी वाटू लागली. तिच्या आळीत जाऊन 'ती घराबाहेर दिसते का? पहावं असंही मनात येऊ लागलं. एक दोन संध्याकाळी मी गावात चक्करही मारली पण तिच्या घराकडे जाण्याची हिंमत झाली नाही.
चिंचवड-आकुर्डीवरून वाडियाला येणारा कल्पना व तिच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप मागच्या रेल्वे गेटकडून रुळाच्या कडेने चालत स्टेशनला जात असे.
'तू का नाही येत आमच्याबरोबर?' मला बरोबर घ्यावं म्हणून कल्पना माझ्याजवळ येऊन थांबली. मग मीराही थांबली. ग्रुपमधली बाकी मुलं-मुली बोलत पुढे निघाली.
'नको, मला उशीर होईल. मी गेटजवळच्या स्टाॅपवर बस पडकतो.' मी कल्पनाला नकार दिला. तसं त्या ग्रुपबरोबर गेलो असतो तर मला मीराची कंपनी मिळाली असती; खासकरून कल्पनाचा ग्रुप लोकल पकडायला गेल्यानंतर.
'चल की आमच्याबरोबर. मीरालाही तुझी कंपनी मिळेल.' कल्पनाने आग्रह केला. त्यावेळी माझी नजर मीराकडे गेली. खाली झुकलेल्या तिच्या चेहऱ्यावर मी लाजरं हास्य पाहिलं.
'नाही, नको! मला खरंच घरी काम आहे.' मी माझा हट्ट सोडला नाही.
'तुझी मर्जी!' कल्पनाने हात झटकले.
मीराने स्वतःहून मला 'आमच्याबरोबर चल' म्हणावं असं मला वाटत होतं. पण तोपर्यंत मीरा तोंड फिरवून पुढे निघाली होती.
घरी येताना मला पश्चाताप झाला. एवढी चांगली संधी सोडली. पुढच्या वेळी मीरा भेटली की स्वतःहून तिच्याशी बोलायचं!
पुढचे तीन-चार दिवस मीरा सातच्या बसला नव्हतीच. काॅलेजला उशीरा येत होती की काय तेही कळेना. माझे लेक्चर्स सोडून मी तिच्या लेक्चर हाॅलच्या चकरा करू लागलो. पण तिचं दर्शन दुर्लभ झालं होतं.
वाटलं, कल्पनाकडे चौकशी करावी. पण तसंही करण्याची हिंमत झाली नाही.
त्या दिवशी दुपारी धावत येऊनच बस पकडली. बसमध्ये बहुतांशी कॉलेजचे विद्यार्थी होते. मागच्या दाराजवळच्या सीटवर मी बसलेलो. कंडक्टर दारात उभा असल्याने बसमध्ये कोण होतं, कोण नव्हतं समजलं नाही. गावचा स्टॉप आल्यावर मी निवांत खाली उतरलो. बघतो तर समोरच्या दरवाजातून उतरलेली मीरा छत्री उघडत होती.
'अगं तू? कुठे होती तीन-चार दिवस? दिसली नाहीस...' आयुष्यात पहिल्यांदा मी मीराशी बोललो.
'तू ऑप्शनलला कोणते विषय घेतलेत? 'गरवारेला ॲडमिशन का घेतली नाही? बीए नंतर काय करणार आहेस?' इतके दिवस तयारी करून ठेवलेले प्रश्न सोडून मी भलतंच विचारून बसलो.
'काय सांगू तुला? घरी थोडं काम होतं. त्यामुळे काॅलेजला येता आलं नाही.' असं उत्तर देताना मीरा कशी दिसेल याचा मी विचार करत होतो.
'साॅरी! मी ओळखलं नाही तुम्हाला...' डोक्यावरची छत्री थोडी वर करून माझ्याकडे निर्विकारपणे बघत मीरा म्हणाली.
तिने दिलेल्या धक्क्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी ओठ आवळले. माझी नजर खाली पडली. माझं उत्तर ऐकण्यासाठी मीराचे पायदेखील काही वेळ तिथे रेंगाळले. मला काय बोलावं सुचेना. खाली मान घालूनच मी माघारी फिरलो.
'ए वेड्याऽ थांब जरा...' मीराने आवाज दिला. माझी इच्छा नसतानाही माझे पाय जागेवर थांबले. मागे बघितलं तर मीरा माझ्याकडे बघून हसत होती. मीही अवघडल्यासारखं हसलो.
'उद्यापासून आपण सव्वासातच्या बसने जाऊ.' छत्री बंद करत मीरा म्हणाली. मग तिने मानेला एक झटका दिला आणि तिचे मोकळे केस तिच्या पाठीवर स्थिरावले. माझ्या उत्तराची वाट न बघता ती माघारी फिरली व बंद छत्री गोल गोल फिरवत तिच्या घराच्या दिशेला निघाली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZZNDY
Similar Posts
मैत्रीण मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.
मैत्रीण मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.
मैत्रीण मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.
मैत्रीण मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language