गुजरातमधील मातृभाषा अभियान या चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पटेल यांचे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला निधन झाले. गुजराती भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या या चळवळीबद्दल... ..........
चार दिवसांपूर्वी, म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरात मातृभाषा दिन साजरा झाला. मातृभाषा या शब्दातच या भाषेचे महत्त्व सामावले आहे. ज्या भाषेचे बाळकडू आपल्याला आईकडून मिळते ती मातृभाषा. त्यातूनच आपल्याला या जगाची ओळख होते, जगाचे ज्ञान मिळते आणि आपण समृद्ध होतो. त्यासाठी खरे तर विशिष्ट एखादा दिवस बाजूला ठेवण्याची गरज नाही; मात्र २१ फेब्रुवारीला तो मान देण्यात येतो. याचा संबंध भारत आणि पाकिस्तानशी आहे.
भारताची फाळणी होऊन १९४७ साली पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आले. यातील पश्चिम पाकिस्तानची भाषा उर्दू आणि पूर्व पाकिस्तानची भाषा बंगाली. आता बंगाली भाषक आपल्या भाषा आणि संस्कृतीबाबत अत्यंत हळवे असतात; मात्र पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना त्यांचे हे स्वभाषाप्रेम रुचणारे नव्हते. मुळात या पश्चिम पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचीही मातृभाषा उर्दू नव्हतीच मुळी, ती होती पंजाबी; मात्र उर्दू ही मुस्लिमांची भाषा असल्याचे गृहीत धरून त्यांनी तिला महत्त्व दिले आणि दुसरीकडे बंगाली भाषकांचे दमन सुरू केले.
भाषा ही मनुष्यांची अस्सल ओळख असते. माणसांची संस्कृती हीसुद्धा भाषेवरच अवलंबून असते. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि सुरू झाला एक उग्र संघर्ष. ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ या न्यायाने बंगाली भाषकांची स्वभाषेसाठीची तळमळ उर्दूप्रेमी पंजाबीभाषक सत्ताधाऱ्यांना कळण्यासारखी नव्हती. त्यातून मातृभाषेसाठी बंगाली भाषकांचे आंदोलन सुरू झाले आणि जन्म झाला बांग्लादेशाचा.
तत्पूर्वी पश्चिम पाकिस्तानने हे आंदोलन दडपण्यासाठी निर्दयतेची सीमा ओलांडली. याच दरम्यान ढाका येथे सुरू असलेल्या एका सभेत गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आणि १००हून अधिक जण जखमी झाले. तो दिवस होता २१ फेब्रुवारी १९५२. त्या दिवसापासून बांग्लादेशात २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा आंदोलन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वीस वर्षांपूर्वी ‘युनेस्को’ने या दिवसाला जागतिक पातळीवर मान्यता दिली.
एवढा प्रेरक इतिहास असलेला हा दिवस आज एक उपचार म्हणून पाळण्यात येत आहे. मातृभाषा दिन म्हणून ठराविक लेख, कार्यक्रम, शुभेच्छा आणि भाषणे या पलीकडे त्याची धाव जात नाही; मात्र मातृभाषा हा दिवस पाळण्याचा विषय नसून तो एक जगण्याचा दिवस आहे, याचे भान ठेवले जाताना दिसत नाही. तसे भान ठेवणारी एक चळवळ उभी राहिली आहे गुजरातमध्ये. आपण ज्या समाजाला केवळ व्यापारकेंद्रित आणि व्यवहारी म्हणतो त्या समाजात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या चळवळीच्या प्रणेत्याचे नुकतेच निधन झाले तेही या मातृभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला.
पुरुषोत्तम जी. पटेल हे त्या भाषायोग्याचे नाव. मातृभाषा अभियान नावाच्या एका विश्वस्त संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. अहमदाबाद येथे वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि शैक्षणिक मानसशास्त्रातील संशोधक होते. मातृभाषेतून (गुजरातीतून) शिक्षण देण्यात यावे, याचा ते सातत्याने आग्रह धरत. त्यासाठी भाषा शिकविण्याच्या अनेक अनोख्या पद्धती त्यांनी विकसित केल्या होत्या.
गुजराती भाषा ही दैनंदिन व्यवहाराचा भाग व्हावी, हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी मातृभाषा अभियान या चळवळीचे बीज पेरले. आज ती संपूर्ण गुजरात राज्यात फोफावली आहे. गुजराती भाषेचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा वाचविण्यासाठी हे ‘मातृभाषा अभियान’ सुरू करण्यात आले. या अभियानाचे संयोजक त्याला ‘नेटवर्क ऑर्गनायझेशन’ या नावाने ओळखतात. गुजरातमधील अनेक प्रसिद्ध विचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, तसेच अन्य मान्यवर या अभियनात सहभागी आहेत. गुजराती साहित्य परिषदेचे मातृभाषा संवर्धन केंद्र, गुजरात विद्यापीठ, गुजरात विश्वकोश ट्रस्ट, शारदा विद्यामंदिर, विवेकानंद रिसर्च अशा अनेक प्रसिद्ध संस्था त्यात सहभागी आहेत.
या अभियानाचा भाग म्हणून संस्थेचे स्वयंसेवक अहमदाबादमधील ३५, तर राज्यभरातील १४८ ठिकाणी शिबिरे घेतात आणि लोकांमध्ये गुजराती साहित्याचे वाटप करतात. याच अभियानात ग्रंथ मंदिर नावाचा एक उपक्रम आहे. त्या अंतर्गत जागोजागच्या दुकानात कपाटे ठेवण्यात येतात. या कपाटांमध्ये पुस्तके ठेवलेली असतात. वाचकांनी ती घेऊन जावीत आणि वाचून परत आणावीत, ही अपेक्षा. तेही संपूर्णपणे मोफत. कोणत्याही प्रकारे का होईना, पण लोकांपर्यंत पुस्तके आणि भाषा पोहोचावी, हा त्यामागचा उद्देश.
मातृभाषा ऑलिम्पियाड प्रकल्प नावाचा या अभियानाचा एक भाग आहे. यात ‘मने गमतुं पुस्तक वार्तालाप’ (माझे आवडते पुस्तक), वक्तृत्व, लेखन, काव्यपठण, पदपूर्ती (कविता पूर्ण करणे), शीघ्र निबंधलेखन, शब्दकोशांमधून शब्द शोधण्याची स्पर्धा अशा अनेक भाषिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
आता हे अभियान सुरू करण्यामागची गुजराती विचारवंतांची प्रेरणा आपल्यासारखीच होती. मातृभाषेचे खालावणारे प्रमाण हीच चिंता त्यांनाही भेडसावत होती. ‘गुजरातकडे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा सुमारे हजारो वर्षांचा प्राचीन वारसा आहे. या वारशाच्या अभिव्यक्तीचे माध्यम गुजराती भाषा हेच राहिले आहे; मात्र स्वातंत्र्य उलटल्यावर ५० वर्षांनंतरही गुजरातमधील शैक्षणिक व व्यापार जगतात, तसेच व्यवहारात गुजराती भाषेचे महत्त्व कमी होत आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत आहे. भारतीय प्रादेशिक भाषांच्या संरक्षणासाठी आपण पुढे यायला हवे. पाश्चात्य संस्कृती आणि सामाजिक आक्रमणामुळे दृकश्राव्य माध्यमांमधून गुजराती भाषा व संस्कृती आणि परंपरांची अवहेलना होत आहे. कळत-नकळत आपण आपली ओळख गमावून बसत आहोत,’ अशी भूमिका या अभियानाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
आपली तरी स्थिती काय वेगळी आहे? मराठीचे प्रमाण कमी होत आहे, हीच आपली चिंता नाही काय? मग एक दिवस मातृभाषा दिवस साजरा करून किंवा पाळून भाषेला आपण काय योगदान देणार आहोत? व्यापारकेंद्रित समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये त्यासाठी साहित्यिक व विचारवंत पुढे येतात आणि इंग्रजीची लाट थोपविण्यासाठी सक्रिय होतात. आपण आपला खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे? तेवढे केले तरी कॅलेंडरवरचे सर्व दिवस आपल्या भाषेचे दिवस ठरतील.
– देविदास देशपांडे