Ad will apear here
Next
‘ख्याल-महर्षी’


ऋषितुल्य ख्यालमहर्षी पं. मल्लिकार्जून मन्सूर यांचा स्मृतिदिन १२ सप्टेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
.........
माझ्या पहिल्यावहिल्या प्रकाशचित्र प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली होती. माझ्या संग्रहात अजून काही महत्त्वाच्या व दिग्गज अशा कलाकारांच्या भावमुद्रा जमण्याची मला गरज होती. एखाद्या ठिकाणी अमक्या कलाकाराचा गाण्याचा अथवा वादनाचा कार्यक्रम आहे असं कळलं, की मला लगेच त्या ठिकाणाची ओढ लागे. प्रवास घडत. जवळपासची शहरे व मुंबईचे कार्यक्रम तर नित्याचेच. ते साल होतं १९८६. अशातच मी पोहोचलो होतो मिरज या गावाला. मिरजेला स्टेशनजवळच एक दर्गा आहे. मीरासाहेब दर्गा. बऱ्याच हिंदू-मुस्लिमांचं ते श्रद्धास्थान आहे. तेथे साजऱ्या होणाऱ्या उरुसात किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कलाकार येऊन आपली सेवा सादर करण्याची परंपरा आहे. मी त्याच उरुसात एका कलाकाराची वाट पाहत बसलेलो होतो. दर्ग्याच्या मध्य भागातील मोकळ्या जागेत बिछायत अंथरलेली. सर्व स्तरांतले रसिक श्रोते बसलेले. समोर एक छोटासा मंच उभारलेला. दर्ग्याकडे पाहून कलाकार आपली सेवा सादर करीत आहेत. कडेच्या रिकाम्या बाजूने भाविकगण दर्ग्याच्या आत जाऊन दर्शन घेऊन दुसऱ्या बाजूच्या वाटेने बाहेर पडत आहेत. दोन्ही बाजूला होणाऱ्या सततच्या हालचालीकडे दुर्लक्ष करीत आणि तरीही एकाग्रता साधत कलाकार गायन-वादन करीत आहेत असे सारे दृश्य. ध्वनिक्षेपण यंत्रणाही अत्यंत जुन्या प्रकारची. हे कला सादरीकरण सेवावृत्तीने असल्याने अर्थातच कलाकारांची संख्याही भरपूर. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला मिळणारा वेळही कमी. मला पुण्या-मुंबईच्या शिस्तशीर कार्यक्रमांची सवय. कलाकारांची ओळख व क्रम सांगणाऱ्या निवेदनाची सवय. एकामागून एक कलाकार येत असूनही मला ज्यांचे फोटो काढायचे आहेत ते कलाकार काही मंचावर येईनात. काही तास प्रतीक्षेत गेले. बरेच कलाकार झाले. माझी चुळबूळ वाढू लागली. सिंग बंधूंचे गायन झाल्यावर मी तडक उठलो व ध्वनिक्षेपण करणाऱ्या व्यक्तीजवळ गेलो. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मला एका दुसऱ्याच व्यक्तीला भेटण्यास पाठवले. आणि मला कळले की प्रकृतीच्या तक्रारीमुळे पंडित मल्लिकार्जुन मन्सूर हे त्या मैफलीत येऊ शकणार नाहीत. माझी घोर निराशा व थोड्याच वेळात माझा पुण्याला परतीचा प्रवास सुरू.

पुढील काही दिवसांत परत नव्या आशेची धुगधुगी. आता ठिकाण औरंगाबाद. त्यानंतर मुंबई; पण या दोन्ही ठिकाणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंडित मल्लिकार्जुन यांची अनुपस्थिती. त्या वेळी त्याचं वय होतं शहात्तर वर्षे. माझ्या मनात कितीही इच्छा असली, तरीही माझं नशीब मला साथ देत नव्हतं. अखेर जून १९८६मध्ये माझं प्रकाशचित्राचं प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शित झालं, त्यांच्या फोटोशिवाय.

...पण म्हणतात ना, की मनातली इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला रस्ता दाखवणारा भेटतोच. तसेच झाले. १९८६च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन.’ प्रदर्शनाचे नाव ‘स्वरचित्रांच्या काठावरती...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. कलादालनाच्या भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुना, किशोरीताई, रविशंकर, विलायत खाँ, अमजदअली खाँ, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. १६ जून. साडेचार वाजलेले. मी चहा पिण्यासाठी खालच्या कँटिनमध्ये गेलो. पुढ्यात चहा आला. एक–दोन घोट घेतोय तोवर माझा मित्र प्रमोद पळत पळत आला व म्हणाला, ‘लवकर चल. वर कलादालनात पु. ल. देशपांडे व त्यांचे एक मित्र आलेत. ते तुझी चौकशी करताहेत.’

आनंदात मी हातातला कप तसाच ठेवला. धावलो. प्रदर्शनातील मधल्या पॅनेलपाशी दोघेही तन्मय होऊन फोटो पाहत होते. मी हळूच जाऊन शेजारी उभा राहिलो. ते आल्याने स्वाभाविकच त्यांच्या आजूबाजूला गर्दी झाली होती. थोड्या वेळाने ‘पुलं’चे माझ्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, ‘अरे तुलाच शोधतोय, कुठे होतास? हे माझे मित्र नंदा नारळकर.’ मी दोघांनाही नमस्कार केला. माझा विश्वास बसत नव्हता; पण समोर साक्षात अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या एका जिवलग मित्रासोबत. आणि ते दोघेही माझ्या कामाचं तोंडभरून कौतुक करीत होते. मग पुढील जवळजवळ एक तास सर्व प्रकाशचित्रे बारकाईने पाहताना... त्यांची उपस्थिती असलेल्या मैफलींबद्दलच्या आठवणी जागवण्यात गेला. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘पुलं’नी अभिप्राय लिहिला - ‘या अप्रतिम छायाचित्रांतून स्वर ऐकू येतात.’ करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला हा अभिप्राय माझ्यासाठी जगातील सर्वात मोठे ‘ॲवॉर्ड’ होते.

... पण दरम्यान ‘पुलं’नी मला विचारले, की यात अण्णांचा म्हणजे पंडित मल्लिकार्जून मन्सूर यांचा फोटो कुठे दिसला नाही. मी त्यांना सांगितले, की ‘मी त्यांचे फोटो काढण्यासाठी औरंगाबाद, मुंबई येथील तीन-चार वेगवेगळ्या मैफलींत, अगदी मिरजेच्या दर्ग्यात त्यांचे गाणे होणार आहे असे कळल्यावरून तेथेही जाऊन आलो; पण त्या प्रत्येक मैफलीत त्यांची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत. व मी निराश मनाने परत आलोय.’ माझ्या या सांगण्यावर ‘पुलं’नी तेथेच मला एका खास मैफलीचे आमंत्रण दिले. ती मैफल पुढच्याच महिन्यात होणार होती, पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या श्री. एम. ए. बाक्रे यांच्या घरी.

मैफलीच्या दिवशी मी सकाळपासूनच तयार होतो. ठरल्या वेळी मी बाक्रे यांच्या घरी पोहोचलो. निमंत्रित रसिक एक एक करून येत होते. स्वतः यजमान श्री. बाक्रे यांनी मला नाव विचारल्यावर मी त्यांना सांगितले, की ‘मला पु. ल. देशपांडे यांनी आमंत्रण दिलंय.’ यावर बाक्रे मला थेट आत एका खोलीत घेऊन गेले. तेथे ‘पुलं’ व पं. मल्लिकार्जुन गप्पा मारीत बसले होते. मला पाहताच ‘पुलं’ म्हणाले ‘ये रे, मी तुझी ओळख करून देतो.’ मग ते मल्लिकार्जुन यांच्याकडे बघत म्हणाले, ‘अण्णा, हा सतीश पाकणीकर. फोटोग्राफर आहे. याची आवड म्हणजे हा शास्त्रीय संगीतातील कलाकारांचे फोटो काढतो. नुकतंच त्यानं एक छान प्रदर्शन भरवलं होतं. त्यात तुमचा फोटो असावा म्हणून तो काढण्यासाठी तुमच्या काही मैफलींना हा आला होता; पण तुमच्या तब्येतीमुळे त्या मैफलींना तुम्ही आला नाहीत. म्हणून मी आज त्याला खास तुमचे फोटो काढण्यासाठी बोलावलंय.’ त्यावर मल्लिकार्जुन एकदम खळाळून हसले, जसे ते अशोक दा. रानडे यांनी टीव्हीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत हसले होते तस्सेच. मग ते मला त्यांच्या कानडी ढंगात म्हणाले, ‘भाईंनी सांगितलंय. म्हणजे ऐकायलाच पाहिजे. तू माझ्या समोर बस. हवे तेवढे फोटो काढ.’

ती बैठकीची खोली साधारण चाळीस-पन्नास श्रोते बसू शकतील इतकी मोठी होती. छतावरून एक मोठं थोरलं लोलकांचं झुंबर टांगलेलं. लोलकांतून परावर्तित होणारा प्रकाश खोलीभर पसरलेला. पुढची काही जागा सोडून सर्वत्र श्रोते बसलेले. अत्यंत सुसंस्कृत असं वातावरण.

पंडितजींचं वय ७६ असल्यानं या वयात ते किती वेळ गातील असा मी मनात विचार करीत असतानाच ऋषितुल्य ख्यालमहर्षी पं. मल्लिकार्जून मन्सूर त्यांच्या साथीदारांसह येऊन बसले. त्यांच्या त्या नुसत्या ताठ बैठकीतूनच माझा त्यांच्याबाबतचा अंदाज साफ फसलाय हे माझ्या ध्यानात आलं. त्यांच्या साथीला तबल्यावर होते श्री. बाळकृष्ण अय्यर व संवादिनीवर श्री. बाळ माटे, तर स्वरसाथीला होते सुधीर व सुहास दातार. श्रोत्यांत वामनराव देशपांडे, मनूकाका गर्दे, दत्तूकाका गर्दे, नंदा नारळकर, नारायणराव कानेटकर, ग. ह. तारळेकर, गजाननराव वाटवे, पं. उल्हास कशाळकर, शरदचंद्र चिरमुले, सौ. चिरमुले, रोहिणी भाटे, प्रा. मधुकर खाडिलकर असे गिनेचुने रसिक. माझ्या शेजारी पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई. पं. मल्लिकार्जुन यांच्यापासून हातभर अंतरावरून मी ५० एमएमच्या लेन्समधून त्यांचे चक्क ‘क्लोज-अप’ टिपण्यास सज्ज होतो. ‘गाण्यात राहणारा माणूस’ असं ज्याचं वर्णन लिहिलंय ती व्यक्ती समोर अन् ज्यांनी ते लिहिलंय ते शेजारी, अशी माझी अवस्था. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता.

पंडितजींनी गायला सुरुवात केल्यावर गानदेवता जणू त्यांना लगेचच प्रसन्न झाली होती. सुरुवातीच्या दोन-तीन मिनिटांतच दमसासपूर्ण रसदार स्वरांनी त्यांनी सर्वच श्रोत्यांना आश्चर्यमुग्ध करून सोडले. सहज आलाप, सहज तान, सहज मींड आणि त्यांची खासियत असलेली मुखबंदी तान. त्यांचे ते आतून उमलून येणारे गायन तेथील सर्व श्रोत्यांच्या कानांचा आणि हृदयाचा ठावच घेत होते जणू. कृष्णधवल आणि रंगीत असे दोन्ही कॅमेरे वापरत मी त्या गानमुद्रा लुब्ध होऊन टिपत होतो. साधारण अडीच तासांच्या सादरीकरणानंतर त्यांनी एक तिहाई घेत त्याचं गायन संपवलं आणि एक बालसुलभ असं हास्य करीत पुढच्याच क्षणाला म्हणाले – ‘आता चहा हवा.’

पुढे होऊन मी त्यांना नमस्कार केला. मला म्हणाले, ‘मिळाले का फोटो?’ माझ्या चेहऱ्यावरील आनंदानेच त्यांना त्यांचे उत्तर मिळाले होते. मी फक्त मान हलवू शकलो. ते परत एकदा खळाळून हसले. त्यानंतर कॉफीपानाचा कार्यक्रम होता. माझ्या कॅमेऱ्यात अण्णांचे जवळजवळ शंभरेक फोटो जमा झाले होते आणि खिशात होते श्री. नंदा नारळकर यांच्या घरी दोन दिवसानंतर होणाऱ्या मैफलीचे आमंत्रण.

मी तातडीने सर्व फिल्मरोल डेव्हलप केले. त्यातील काही निवडक फोटोंचे मोठे प्रिंट्स काढले. नारळकरांच्या घरी जाताना ते घेऊन गेलो. अण्णांची ती मैफलपण संस्मरणीय झाली. त्या मैफलीत त्यांना तंबोऱ्यावर साथीला होत्या वीणा सहस्रबुद्धे; पण तो हॉल जास्त मोठा व तेथे श्रोते जास्त असल्याने मी फार फोटो काढू शकलो नाही.

मैफल संपल्यावर मी अण्णांजवळ गेलो. त्यांच्यासाठी आणलेले फोटोंचे पाकीट त्यांना दिले. त्यांनी ते उत्सुकतेने उघडले. एक-एक फोटो पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंदाचा भाव मी माझ्या डोळ्यांत साठवत होतो. त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी दिली आणि म्हणाले ‘चांगले काढले आहेस की फोटो!’ यातील ‘चांगले’ शब्दातील ‘चां’चा उच्चार खास कर्नाटकी ढंगात होता आणि काळ्या जाड भिंगांच्या मागील डोळ्यांत कौतुकाचे सारे भाव दाटले होते. माझ्यासाठी मोठंच बक्षीस! त्यातीलच एका फोटोवर त्यांनी मला कन्नड लिपीत स्वाक्षरीही दिली.

या मैफलीनंतर परत त्यांचं गाणं ऐकण्याचा योग पुण्यातच १९९१ साली आला. त्या वेळी त्याचं वय झालं होतं ८१; पण ‘ट्रॅव्हल लाइट’ अशी शिडशिडीत आणि चपळ अंगकाठी आणि तोच लहान मुलासारखा उत्साह कणभरही कमी झाला नव्हता. पुन्हा एकदा त्यांच्या स्वरमुद्रा माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्या.

१९९२ साली भारतीय शास्त्रीय संगीतावर दोन आघात झाले. १२ जानेवारीला कुमारजी गेले. त्यानंतर सप्टेंबरात मल्लिकार्जुनही गेले. त्या दोघांना समर्पित असे एक प्रदर्शन मी एप्रिल १९९३मध्ये केले. नंतर २००८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात न्यू एज फाउंडेशनने मन्सूर अण्णांवर एक कार्यक्रम केला. त्यात त्यांचे फोटो प्रदर्शन मी सादर केले होते. अण्णांचे चिरंजीव डॉ. राजशेखर मन्सूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्तम जमला. कार्यक्रमानंतर रात्री आम्ही काही सहभागी लोक पुण्याजवळच्या एका फार्म हाउसवर जेवण्यास गेलो होतो. गप्पांचा ओघ अर्थातच अण्णांच्या आठवणी.

त्यातील डॉ. राजशेखर यांनी सांगितलेली अण्णांची आठवण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारी होती. ते म्हणाले, ‘अण्णा शेवटचे श्वास मोजत होते. कॅन्सरच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या; पण त्यांनी मला सांगितले, की तानपुरा छेडायला सुरुवात कर. त्यांचं डोकं माझ्या मांडीवर होतं. मी तानपुरा छेडू लागलो. वातावरणात भरून राहिलेला तो स्वर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना कमी होऊ लागल्या. काही वेळातच त्यांना छान झोप लागली आहे असे मला वाटले; पण घडू नये ते घडले होते. त्या स्वरांच्या साथीनेच माझ्या वडिलांनी, माझ्या गुरूंनी आपले प्राण सोडले होते.’

‘गाण्यात राहणारा माणूस’ स्वरांच्या साथीनेच हा इहलोक सोडून गेला होता. सुप्रसिद्ध हिंदी कवी श्री. अशोक वाजपेयी यांना त्यामुळेच अशी रचना सुचली असेल ना? वाजपेयी लिहितात -

‘अपनी रफ्तार से चलते हुए
बहुत बाद में
आते हैं
मल्लिकार्जुन मंसूर
और समय से आगे निकल जाते हैं

अपने लिए कुछ नहीं बटोरते उनके सन्त-हाथ
सिर्फ लुटाते चलते हैं सब कुछ
गुनगुनाते चलते हैं पंखुरी-पंखुरी सारा संसार

ईश्वर आ रहा होता
घूमने इसी रास्ते
तो पहचान न पाता कि वह स्वयं है
या कि मल्लिकार्जुन मंसूर’

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XWZTCQ
Similar Posts
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
परीसस्पर्श महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...
गृहिणी-सखी-सचिव (पूर्वार्ध) सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास.
‘पु. ल.’ नामक गुरू-किल्ली सतत प्रोत्साहित करत राहणे, हे त्या ‘पु. ल. नामक गुरू-किल्ली’चे महान वैशिष्ट्य. दोन वेगवेगळ्या कला प्रांतातील ऋषितुल्य अशा दोन ‘अण्णां’शी त्यांनी परिचय करून देण्याचे भाग्य मला एकाच जन्मात लाभणे यालाच मी नशिबाची उत्तम साथ असे म्हणतो.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language