Ad will apear here
Next
मोटरसायकलवरून २९ दिवसांत देशभ्रमंतीचा विक्रम करणारी शिल्पा
देशाची चारही टोके कमी कालावधीत, एकटीने गाठणारी पहिली महिला
शिल्पा बालकृष्णन

देशाची चारही टोके सर्वांत कमी कालावधीत मोटरसायकलवरून एकटीने गाठून देशभ्रमंती करणारी देशातील पहिली महिला होण्याचा विक्रम मुंबईच्या शिल्पा बालकृष्णन (४३) यांनी केला आहे. २२ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०१८ या २९ दिवसांत म्हणजे अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच  त्यांनी सुमारे १५ हजार किलोमीटरचे हे अंतर पार केले. त्यांच्या या विक्रमाच्या निमित्ताने प्राची गावस्कर यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...
.........


-  ही मोहीम करायची तुम्ही कसे ठरवले? 
-  मोटरसायकल चालवायची हे माझे स्वप्न पूर्ण झाले वयाच्या २९व्या वर्षी. प्रवास करणे हे माझे वेड आहे. त्यामुळे मी मोटारसायकल चालवायला शिकले. तेव्हापासून मोटरसायकल माझी जीवश्चकंठश्च सखी बनली. दिवसातला सर्वाधिक वेळ मी तिच्यासोबतच असते. मी मोटरसायकल चालवायला लागले, तशी दूरवर फिरायला जायला लागले. आधी छोटे-मोठे ट्रेक केले. मग अख्खा देश पालथा घातला. २९ राज्ये, पाच केंद्रशासित प्रदेश असे एकूण २७ हजार किलोमीटरचे अंतर मी १३५ दिवसांत मोटारसायकलवरून एकटीने पार केले; पण मला आणखी वेगळे काही तरी करायचे होते. एक नवा विक्रम नोंदवायचा होता. अनेकांनी मला कन्याकुमारी ते लेह ही दक्षिणोत्तर टोके मोटारसायकलवरून गाठण्याचा सल्ला दिला. मी विचार केला, या दोन टोकांऐवजी आपण देशाची चारही टोके का गाठू नयेत? या आधी कोणत्याही महिलेने हे केलेले नाही. काही पुरुषांनीच असा उपक्रम केला होता. त्यातूनच मग मी हा विक्रम करायचे ठरवले.


-  या प्रवासामागचा तुमचा उद्देश काय होता?
- आपल्या देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे, हा माझा यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर पर्यावरण जपणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी मी प्रचार करते. या मोहिमेदरम्यान ‘मेरा पौधा’ हा हॅशटॅग वापरून झाडे लावण्यास प्रोत्साहन दिले. डीसीबी बँकेने माझ्या प्रत्येक किलोमीटरला एक याप्रमाणे १५ हजार झाडांची लागवड केली. जिथे जाईन तिथे डीसीबी बँकेच्या शाखेच्यावतीने झाडे लावण्यात आली. बँकेतले अधिकारी, कर्मचारी, मित्रमैत्रिणी यांनी ही झाडे लावली. तसेच रस्त्यावर वाहने चालवताना नियम पाळा, सुरक्षित वाहने चालवा,असा संदेशही मी देत असते. आपला देश खूप सुंदर आहे. परदेशातील लोक येऊन आपल्या देशातील अनेक अनवट ठिकाणी जातात. आपण मात्र परदेशात फिरायला जातो. आपला देश बघा, अनेक सुंदर ठिकाणे आपल्या देशात आहेत, जी अजून अनेकांना माहितीदेखील नाहीत. आपल्या देशातील बहुरंगी, बहुढंगी संस्कृती, ऐतिहासिक,पौराणिक वारसा हे सगळे अफलातून आहे. त्यामुळे आपण आपल्या देशात पर्यटन करायला प्राधान्य दिले, तर त्यातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. सुधारणा होतील, रोजगार मिळतील, परदेशी पर्यटकांचाही ओघ वाढेल. हाच संदेश मी माझ्या प्रवासादरम्यान देते. मोटरसायकलवरून जग पालथे घालायचे ही माझी मनीषा आहे; पण आधी आपला देश. त्यामुळे आपल्या देशात जिथे जिथे मोटरसायकलवरून प्रवास करण्याचे उपक्रम आयोजित केले जातात तिथे मी जाते. 


- तुम्ही एकट्याने मोटारसायकलवरून देशाचे चारही कोपरे गाठणार आहात, असे कळल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? वाटेत भेटलेल्या लोकांची, विशेषतः महिलांची प्रतिक्रिया काय होती? 
-  आजकाल मुली स्कूटर्स तर सर्रास चालवतातच; पण मोटरसायकल चालवणाऱ्या मुलींची संख्याही वाढत आहे. तरीही त्याचे अप्रूप सर्वांनाच आहे. अजूनही एखादी मुलगी मोटरसायकल चालवत असेल, तर सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात. माझा प्रवास सुरू असताना हा अनुभव मला येतोच. मला भेटलेल्या महिला, मुलींनी माझे खूप कौतुक केले. एकटी मुलगी मोटरसायकल चालवत अख्खा देश पालथा घालायला निघाली आहे, हे कळल्यावर अनेकांच्या तोंडाचा आ वासलेलाच राहायचा. मुलींना तर प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटायचा. आम्हीही तुमच्याप्रमाणे मोटारसायकल चालवू, तुम्ही काही ट्रेक आयोजित केले, तर त्यात सहभागी होऊ, असे त्या सांगायच्या. पुरुषांनीही खूप कौतुक केले. माझा हा प्रवास डीसीबी बँकेने प्रायोजित केला होता. तर बजाज कंपनीने त्यांची डॉमिनर ही मोटरसायकल दिली होती. त्यामुळे मी डीसीबी बँकेची ज्या ज्या गावी शाखा असेल, तिथे भेट देत असे. तेथील लोक माझे अगदी थाटात स्वागत करायचे. नागपूर आणि बेळगाव इथला अनुभव तर उल्लेखनीय आहे. तिथे मी ज्या वेळी पोहोचणे अपेक्षित होते, त्यापेक्षा खूप उशिरा पोहोचले. तरीही तेथील अधिकारी, कर्मचारी मी येईपर्यंत माझी वाट बघत थांबले होते. सकाळी ऑफिसला लवकर आले होते. दुसऱ्या दिवशी ऑफिस होते तरीही ते सगळे थांबले होते. हे खूप आनंददायी होते. 


- या प्रवासात कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले? 
- या प्रवासात माझ्यासाठी सर्वांत मोठे आव्हान ठरले ते म्हणजे हवामान. देशाच्या चारही कोपऱ्यांत हवामान वेगवेगळे आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना बदललेल्या हवामानाशी जुळवून घेताना शरीराला त्रास व्हायचा. कन्याकुमारीला समुद्रकिनारी हवामान एकदम आर्द्रतायुक्त, तर लेहकडे जाताना अतिशय थंड. लेहमध्ये मी प्रवास करत असताना तिथे बर्फवृष्टी होत होती. अरुणाचल प्रदेश म्हणजे पूर्वेकडे जाताना थंड, तर पश्चिमेकडे गुजरातमधील कोटेश्वर हे शेवटचे टोक गाठले, तेव्हा तेथील तापमान होते ५० अंश सेल्सिअस. हवामानातील हा बदल सोसणे आव्हानात्मक होते. तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते खूप नागमोडी, अरुंद, खडबडीत असे होते. बाकी विशेष काही त्रासदायक नव्हते. याआधी मी संपूर्ण देशाचा प्रवास केलेला असल्याने अनेक ठिकाणी लोक माझ्या ओळखीचे झाले आहेत. ते मदत करायचे. मला कधीही असुरक्षितता जाणवली नाही. भाषेचा अडथळा येत असे; पण आव्हानापेक्षा तो गमतीदार अनुभव होता, असे मी म्हणेन. लोक शब्दांऐवजी खाणाखुणा करून संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे. ते फार गमतीदार ठरत असे. 


-  या प्रवासात जेवण आणि राहणे, मार्ग आखणी आदी पूर्व तयारी कशी केली?
-  आधीच्या प्रवासाचा अनुभव असल्याने फार वेगळी तयारी करावी लागली नाही. जेवण मी नेहमीच त्या वेळेला जिथे असेन तेथील धाब्यावर करत असे. मी शाकाहारी असल्याने थोडी अडचण होत असे कधीकधी; पण सगळीकडे मला ताजे, स्वादिष्ट जेवण मिळत असे. धाबावाल्यांना मी एकटी मोटारसायकलवरून प्रवास करत आहे, असे कळल्यावर आवर्जून उत्तम जेवण मला वाढत असत. रात्री जिथे पोहोचेन त्या गावातील लॉज शोधायचे. त्या ठिकाणी कोणी ओळखीचे असेल, तर काहीच अडचण यायची नाही. कोणत्याही ठिकाणी आधी बुकिंग करणे शक्य नाही. कारण मी एका निश्चित ठिकाणी पोहोचेन असे पक्के ठरलेले नव्हते. त्यामुळे रात्री प्रवास पूर्ण झाला, थांबायचे असे ठरले, की मी त्या गावात जाऊन लॉज बघत असे. या प्रवासासाठी मार्गाची आखणी आधी केली होती. मी सुरुवात केली मुंबईतून. तिथून बेळगाव, बेंगळुरू, मग मदुराई आणि तिथून कन्याकुमारी. तिथून लेहकडे. मग सालेम, हैदराबाद, पानिपत, कुरुक्षेत्र, लुधियाना, जालंधर, पठाणकोट आणि पुढे लेह. लेहवरून अरुणाचल प्रदेशमधील किबिथू आणि तिथून गुजरातमधील कोटेश्वर आणि तिथून मुंबई असा मार्ग होता. 

-  एका दिवसात साधारण किती अंतर पार करत होतात? 
-  एका दिवसात ठरावीक इतके किलोमीटर अंतर पार करायचे असे काही निश्चित केले नव्हते. जास्तीत जास्त अंतर कापण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळे मी एकदा सोनपत ते गोरखपूर हे ८८९ किलोमीटरचे अंतरदेखील एका दिवसात पार केले. साधारण १२ ते १४ तास लागले. तसेच झाशी ते जालंधर हे ८६० किलोमीटरचे अंतरही मी एका दिवसात पार केले होते. 

-  तुमच्या या साहसांना घरातून पाठिंबा कसा मिळाला? 
-  मला सगळ्यात जास्त पाठिंबा दिला तो माझ्या आईने. मी मोटरसायकल चालवायला लागले, एकटीने दूरचे प्रवास करायला लागले, तेव्हा तिने मला अडवले नाही. लोक भीती व्यक्त करत असत; पण ती म्हणायची, तिला जे आवडते आहे ते तिला करू दे. माझा सगळ्यात मोठा आधार माझी आई आहे. तसेच माझे मित्रमैत्रिणी जे मला नेहमी प्रोत्साहन देतात, कोणत्याही अडचणीच्या वेळी ते हजर असतात. 


- आगामी नियोजन काय आहे? 
- आता परदेशातील काही साहसी मोहिमांमध्ये भाग घ्यायचा आहे. आपल्या देशाचा झेंडा तिथेही फडकवायचा आहे. त्याशिवाय आपल्या देशातील मुली, महिला, ज्या मोटरसायकलवरून साहसी मोहिमा करण्यासाठी उत्सुक आहेत, ज्यांनी अशा उपक्रमांत त्यांना सहभागी व्हायला आवडेल, असे मला सांगितले आहे, त्यांच्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करायचे आहे; पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आपल्या देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जे करता येईल ते मला करायचे आहे. 


- या प्रवासाचे, मोहिमेचे वेगळेपण काय सांगाल? 
- आपल्या देशात आजही एकटी महिला, मोटारसायकलवरून प्रवास करण्याचे चित्र खूप दुर्मीळ आहे. मी हे धाडस केले, त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझी ही मोहीम डीसीबी बँकेने प्रायोजित केली. त्यांची मी खूप आभारी आहे. सगळीकडे अत्यंत प्रेमाने लोकांनी माझे स्वागत केले. कोणत्याही अडचणीला लोक मदतीला धावून येत होते. आपुलकीने चौकशी करत होते, माझे कौतुक करत होते. हा प्रवास एक महिला म्हणून धोकादायक ठरू शकला असता; पण तसा कोणताही अनुभव मला आला नाही. महिलांमध्ये आता स्वतःबद्दल जागरूकता वाढत असल्याचे मला अनुभवता आले. हा प्रवास माझे अनुभवविश्व समृद्ध करणारा आणि आत्मविश्वास वाढविणारा ठरला. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZNUBW
Similar Posts
लता मंगेशकर... एकाच आवाजातल्या अनंत भावच्छटा! लताबाईंच्या आवाजाला साध्या फूटपट्ट्या का लावता येत नाहीत? एकच आवाज शिळा, एकसुरी न होता, अनेक तपं आपल्यावर अधिराज्य गाजवतो, हे कसं शक्य झालं असावं? हा आवाज कधीच सगळ्यांसाठी सारखा भासला नाही... सगळ्या भावनांसाठी तो एकाच प्रकारे लावण्यात आला नाही... प्रत्येक भावनेचा त्या त्या व्यक्तिरेखेसाठी असलेला सूक्ष्म पदर त्या आवाजातून समोर आला
लंबी रेस का घोडा! पवारांसारखा दिग्गज नेता समोर असताना आणि शिवसेनेसारखा सतावणारा मित्रपक्ष पाठीशी असताना देवेंद्र फडणवीस हे सरकार उत्तम पद्धतीने चालवू शकले, यात त्यांची कसोटी लागलेली आहे. त्यातून एक नवा नेता महाराष्ट्राला मिळाला आहे. अमिताभ बच्चनच्या शब्दात सांगायचे तर हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या
‘ओयो’ करणार चौदाशे कोटींची गुंतवणूक मुंबई : ‘ओयो हॉटेल्स आणि होम्स’ कंपनीने भारतात आणि दक्षिण आशिया भागात तब्बल १४०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
क्रिकेटचा युवराज! आपल्या खेळण्यातून ‘मॅचविनर’ अशी प्रतिमा तयार केलेला क्रिकेटपटू युवराजसिंग याने १० जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रत्यक्ष जीवनातही त्याने कॅन्सरसोबतची मॅच जिद्दीने जिंकली आणि यशस्वीपणे खेळात पुनरागमन केले. त्यामुळेच तो केवळ खेळाडू नव्हे, तर अनेकांचा प्रेरणास्रोत आहे. त्याच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language