Ad will apear here
Next
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन
ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
..........
अब्दुल हलीम जाफर खान 
भारतीय चित्रपटसृष्टीतील गाणी आपल्या सतारवादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. १८ फेब्रुवारी १९२७ रोजी अब्दुल हलीम जाफर खान यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्यवादनाची प्रचंड आवड होती. अब्दुल खान यांनी सतारवादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली व रागांवर आधारित एका कार्यक्रमात अब्दुल खान यांच्या सतारवादनाचे प्रसिद्ध भारतीय संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी कौतुक केले होते. 

उस्ताद खान यांनी सतारवादनात स्वतःचा ‘जाफरखानी’ बाज निर्माण केला होता. तसेच त्यांनी संगीत जगतात सतारवादनाची स्वतःची एक स्वतंत्र शैलीही त्यांनी निर्माण केली होती. हिंदी सिनेसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘ये जिंदगी उसी की हैं’ या अजरामर गाण्यांतील सतारवादन उस्ताद अब्दुल खान यांनी केलेले आहे. तसेच ‘मुघल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजे’ या भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यातील त्यांच्या सतारवादनाने गाण्यांना एक उंची मिळाली. 

अब्दुल खान यांच्या सतारवादनाच्या दिलखेचक शैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. सतारवादनाच्या क्षेत्रातील त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. पं. रविशंकर, उस्ताद विलायतखान आदी दिग्गज व प्रसिद्ध सतारवादकांच्या बैठकीत अब्दुल हालीम जाफर खान यांना मानाचे स्थान मिळाले. तसेच त्यांच्या बरोबरीने उस्ताद अब्दुल खान यांचे नाव घेतले जाऊ लागले. भारतीय सिनेसृष्टीसाठी उस्ताद खान यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

उस्ताद अब्दुल खान यांना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, जीवन गौरव, पद्मश्री, पद्मभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अब्दुल हलीम जाफर खान यांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत. त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. हलीम खान यांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. 

हलीम खान यांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले. सतारवादनाची कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता १९७६ला मुंबईत ‘हलिम अकादमी ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख ही त्यांच्या शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.

उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. तसेच पुरस्कार व प्रसिद्धीपेक्षा त्यांनी कलेलाच अधिक महत्त्व दिले. ते अखेरपर्यंत कलेची निष्ठेने सेवा करत राहिले. अब्दुल हलीम जाफर खान यांचे चार जानेवारी २०१७ रोजी निधन झाले. 
...........
पं. उल्हास बापट
३१ ऑगस्ट १९५० रोजी पं. उल्हास बापट यांचा जन्म झाला. अभिजात संगीतात तंतुवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते. शास्त्रीय, तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूरवादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. 

या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले. पुरेसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोदवादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के. जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले ज्ञान मिळविले. दोन घराण्यांच्या गायकीच्या केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. 

गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची ‘क्रोमॅटिक ट्युनिंग’ ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती. संतूरवर ‘मींड’ काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका), तसेच अनेक भावगीतेही क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारकरीत्या सादर करत असत. (याविषयी अधिक माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पं. उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या ‘संतूरच्या भावविश्वात’ या सीडीद्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी ‘बंदिश’ म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. 

आर. डी. बर्मन यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्यांचे ते लाडके संतूरवादक होते. त्यांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. त्यांनी अनेक हिंदी, मराठी गीतांना संतूरच्या सुरांनी सजवले होते. ‘इजाजत’मधील मेरा कुछ सामान, ‘जैत रे जैत’मधील मी रात टाकली, शिवाय ‘तळव्यावर मेंदीचा’ अशा किती तरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं. उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन, चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती. पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ‘इन कस्टडी अँड कॉन्व्हर्सेशन्स’ नावाचे दोन अल्बम प्रकाशित झाले आहेत. 

पं. उल्हास बापट यांनी त्यांच्या ‘सहज स्वरांतून मनातलं’ हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवरही उत्तम प्रभुत्व असल्याचे आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत. पं. उल्हास बापट यांचे चार जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
........
सर आयझॅक पिटमॅन
चार जानेवारी १८१३ रोजी इंग्लंडमध्ये ट्रॉब्रिज येथे आयझॅक पिटमॅन यांचा जन्म झाला. त्यांच्या लघुलिपीच्या (शॉर्टहँड) शोधामुळे कार्यालयीन कामात आमूलाग्र बदल झाले. कार्यालय प्रमुखाला आपल्या डोक्यातील कल्पना त्यामुळे त्वरित कागदावर उतरविण्याचे साधन मिळाले. अठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखनकला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता. 

अभ्यास करत शैक्षणिक प्रगतीही कित्येक लघुलेखकांनी साध्य केली. एवढेच नव्हे, तर सरकारी व खासगी क्षेत्रात लघुलेखक अशी सुरुवात करून उच्च पदापर्यंत गेलेल्या व्यक्तींची उदाहरणेही खूप दिली जातात. हे सर्व सर आयझॅक पिटमॅन यांच्या लघुलिपीमुळे शक्य झाले. 

१९८६मध्ये त्यांच्या पुस्तकाच्या १० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. जगातील शिक्षणशास्त्रात ते नामवंत प्रकाशक म्हणून प्रसिद्ध झाले होते. सर आयझॅक पिटमॅन यांचे २२ जानेवारी १८९७ रोजी निधन झाले. 

(माहिती संकलन : संजीव वसंत वेलणकर)

(चार जानेवारी हा आर. डी. बर्मन यांचाही स्मृतिदिन आहे. त्यांच्याविषयी आणि त्यांनी संगीत दिलेल्या ‘जिंदगी के सफर में...’ या गीताविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXBCI
Similar Posts
पं. प्रभुदेव सरदार, पं. रमेश मिश्र, विलायत खाँ ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार, प्रख्यात सारंगीवादक पंडित रमेश मिश्र आणि ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ यांचा १३ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
पद्मा गोळे, भक्ती बर्वे, दत्ता मारुलकर मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे, नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार आणि संगीत समीक्षक-लेखक दत्ता मारुलकर यांचा १२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
देविका राणी, पं. अनंत मनोहर जोशी अभिनेत्री देविका राणी यांचा आठ मार्च हा स्मृतिदिन. ग्वाल्हेर परंपरेतले एक थोर गायक व गुरू पं. अनंत मनोहर जोशी यांचा आठ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language