
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञ व फोटोग्राफर केव्हिन स्टँडेज यांनी नुकतीच या चित्रांना भेट देऊन माहिती घेतली. त्यामुळे या ठेव्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
रॉक आर्ट या विषयातील जागतिक तज्ज्ञ आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर ऑस्ट्रियाचे रहिवासी असून, भारतातील रॉक आर्ट यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. गेली ४०हून अधिक वर्षे ते भारतातील प्रागैतिहासिक कलेचा अभ्यास करीत आहेत. भारतातील कला या विषयावर त्यांनी लिहिलेली ‘पॉप्युलर इंडियन आर्ट’, ‘
प्रिहिस्टॉरिक रॉक आर्ट ऑफ इंडिया’ (लाइन्स ऑन स्टोन), ‘प्रिहिस्टॉरिक इंडियन रॉक पेंटिंग’, ‘राजा रविवर्मा’, ‘भारतमाता’ अशी
पुस्तके जागतिक पातळीवर प्रकाशित झाली आहेत.
बीबीसी वृत्तवाहिनीने कातळ-खोद-चित्रांची (पेट्रोग्लिफ्स) दखल घेतली होती. तेथून न्यूमायर यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर एक फेब्रुवारीला ते रत्नागिरीत दाखल झाले.

कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि पुरातत्त्व खात्याचे समन्वयक ऋत्विज आपटे यांच्यासोबत त्यांनी दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या काळात कोळंबे, बारसू, पन्हाळे, देवाचे गोठणे, चवे, देऊड, उक्षी, निवळी, कापडगाव, उमरे येथील कातळ-खोद-चित्रांना भेटी दिल्या. त्याचबरोबर राजापूर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आवर्जून भाग घेऊन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना या रचनांची माहिती दिली आणि त्यांचे महत्त्वही सांगितले. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील अशा गोष्टींची माहिती घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. इंग्लंडचे केव्हिन स्टँडेजही या दौऱ्यात सहभागी झाले होते.

पाहणी करताना त्यांनी अनेक बाबी शोधकर्ते आणि समन्वयकांकडून जाणून घेतल्या. या चित्ररचनांबाबत आपले मत व्यक्त करताना डॉ. न्यूमायर यांनी अनेक बाबींचा खुलासा केला. ‘रत्नागिरी, राजापूर परिसरातील ही खोद-चित्रे अद्वितीय असून, आकाराने मोठ्या आणि खूप अंतरापर्यंत पसरलेल्या अशा रचना अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाहीत. कशेळी येथील हत्तीची रचना खोद-चित्र या प्रकारातील जगातील सर्वांत मोठी रचना आहे. चित्ररचनांमधील चौकोनी उठावाच्या रचनादेखील आगळ्यावेगळ्या असून, अशा प्रकारच्या रचनाही जगात अन्यत्र कोठेही पाहण्यात आल्या नाहीत,’ असे डॉ. न्यूमायर म्हणाले.

शोधकर्त्यांनी देवाचे गोठणे येथे लावलेल्या चुंबकीय विस्थापनाच्या शोधाबद्दल मत व्यक्त करताना ‘ही गोष्ट अविश्वसनीय असून, खोद-चित्र आणि निसर्ग चमत्कार अशी ही जगातील एकमेव जागा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. उक्षी येथील रचनेच्या संरक्षणासाठी लोकसहभागातून केलेल्या कामाचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
‘या रचना मध्य-अश्मयुगीन असाव्यात,’ असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. परंतु, यावर सखोल अभ्यासाची गरज असून, त्यानंतरच या रचनांची नेमकी कालनिश्चिती करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘या रचना असणे ही बाब गौरवास्पद गोष्ट असून, आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी त्याचे महत्त्व खूप आहे. या रचनांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले. काही चित्ररचनांच्या परिसरात चाललेल्या विकास योजना, तसेच चिरा खाणी याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या चित्ररचना अबाधित ठेवून विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या चित्ररचनांबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
‘डॉ. न्यूमायर यांच्या भेटीमुळे आमच्या शोधकार्याला अधिक दिशा मिळाली असून, पूरक माहितीही मिळाली आहे. आमच्या शोधकार्यातील कातळ-खोद-चित्रांचे वेगळेपण आणि महत्त्व यांच्या भेटीमुळे अधोरेखित झाले आहे,’ असे मत डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी व्यक्त केले.
इंग्लंडचे केव्हिन स्टँडेज यांचीही भेट
इंग्लंडचे केव्हिन स्टँडेज यांनीही दोन आणि तीन फेब्रुवारीला रत्नागिरी, राजापूर परिसरातील कातळ-खोद-चित्रांना भेट दिली. केव्हिन स्टँडेज हे सॉफ्टवेअर इंजीनिअर असून, पुरातत्त्व शास्त्रज्ञदेखील आहेत. ते उत्तम छायाचित्रकार असून, त्यांनी काढलेली छायाचित्रे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा
‘ट्रॅव्हलर ब्लॉग’ प्रसिद्ध असून, त्यांची छायाचित्रे आणि ब्लॉग पाहून देश-विदेशातील अनेक पर्यटक आपल्या पर्यटनाची आखणी करतात.

दोन फेब्रुवारीला पुण्यातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ पल्लवी गोखले यांच्याबरोबर केव्हिन रत्नागिरीत कातळ-खोद-चित्रे पाहण्यासाठी आले होते. चित्रांचे शोधकर्ते, पुरातत्त्व खात्याचे समन्वयक, तसेच डॉ. एर्विन न्यूमायर यांच्यासह केव्हिन यांनीही सर्व चित्रांच्या ठिकाणांना भेटी दिल्या. ही ठिकाणे दाखविल्याबद्दल त्यांनी शोधकर्ते आणि पुरातत्त्व विभागाचे आभार मानले.
‘मी युरोप, अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांमधील, तसेच भारतातील इतर ठिकाणी अशा प्रकारचे ‘रॉक आर्ट’ पाहिले आहे. परंतु रत्नागिरी, राजापूरमधील अनुभव खासच आहे. कारण येथील रचना अद्वितीय आणि अत्यंत आकर्षक आहेत,’ असे ते म्हणाले.
‘ही खोद-चित्रे पाहण्यासोबतच या सांस्कृतिक ठेव्याबद्दल स्थानिक मुलांशी संवाद साधता आला. या कातळ-खोद-चित्रांचे अप्रूप तर आहेच. परंतु शोधकर्ते सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी पुढाकार घेऊन मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, हेही अतिशय उल्लेखनीय आहे. आमच्यासाठी खोद-चित्रे बघणे जितके महत्त्वाचे होते, तितकाच हा संवादही महत्त्वाचा होता. कारण त्याचे महत्त्व स्थानिकांना उमगणे आणि त्या ठेव्याचे जतन करणे, ही त्यांची जबाबदारी आहे, याची त्यांना, विशेषतः मुलांना जाणीव होणे अतिशय महत्त्वाचे आहे,’ असेही केव्हिन यांनी सांगितले.

पल्लवी गोखले म्हणाल्या, ‘कातळ-खोद-चित्ररचनांना स्वच्छ ठेवणे, त्यांची हानी होणार नाही याची काळजी घेणे, तेथे पोहोचण्यासाठी रस्ते बनविणे, अशी महत्त्वाची कामे करण्यासाठी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर काम करणारे लोक पुढे येत आहेत. काही ठिकाणी अशी कामे झाल्याचे दिसले. जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळविताना स्थानिक लोकांचा अभिमान उंचावणे आणि त्यांची जबाबदारी घेणे याची उदाहरणे राजापूर आणि रत्नागिरीमध्ये पाहायला मिळाली. अशा बाबींना सर्वांचेच सर्वतोपरी सहकार्य मिळाल्यास आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी खूप मोठे प्रागैतिहासिक दालन उपलब्ध होईल. त्यातून गावाचा विकासादेखील होईल.’
केव्हिन यांनी उक्षी येथील भेटीवेळी सरपंच मिलिंद खानविलकर यांनी केलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. या खोदचित्रांचे संरक्षण करताना परदेशी पर्यटकांना काय अपेक्षित आहे, याबाबत आपले अनुभव सांगून त्यांनी मार्गदर्शनदेखील केले. शोधकर्त्यांनी आणि पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेल्या कामाचे कौतुक करून केव्हिन यांनी कोकणातील खोद-चित्रांचा ठेवा जगासमोर ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
‘केव्हिन यांच्यासारख्या व्यक्तीच्या भेटीने कोकणातील कातळ-खोद-चित्रे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरतील, हा विश्वास अधोरेखित झाला आहे. त्यांच्या भेटीदरम्यान आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या अपेक्षा, त्यांचा या ठेव्याकडे पाहायचा दृष्टिकोन याबाबत अधिक माहिती मिळाली. त्याचा उपयोग ही ठिकाणे विकसित करताना होणार आहे,’ असे मत सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी व्यक्त केले.
(उक्षीतील कातळ-खोद-चित्राबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)