Ad will apear here
Next
असामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस!


मनोहर पर्रीकर यांचं वागणं-बोलणं अगदी तुमच्या-आमच्यासारखं, म्हणजे सामान्य माणसासारखं असलं, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नाही. तरीही मनोहर पर्रीकरांच्या वेळी तो नियम बदलून त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांना एवढी लोकप्रियता कशामुळे मिळाली होती? सर्वसामान्यांसाठीच्या त्यांच्या कामाची चुणूक त्या वेळीच दिसली होती. १७ मार्च हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या काही आठवणी सांगणारा हा लेख... 
...........
कर्करोग अंतिम टप्प्यात असताना आणि किंबहुना आपल्याकडे थोडेच दिवस शिल्लक आहेत, याची स्पष्ट जाणीव असताना एखादी व्यक्ती काय काय करू शकते? राज्याचा अर्थसंकल्प सादर करू शकते! पुलाचे बांधकाम व्यवस्थित होते आहे की नाही, याची साइटवर जाऊन पाहणी करू शकते! दिवसभर वेगवेगळ्या स्तरांतल्या लोकांसोबत बैठकांमध्ये मार्गदर्शन करून, ठोस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढू शकते! राज्याचा अर्थसंकल्प सादर करू शकते! एवढंच नव्हे, तर तो सादर करताना विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ‘हाऊ इज दी जोश’ असा प्रश्नही त्याच जोशात विचारू शकते!.... हे सगळं वर्णन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कारण केवळ गोवेकरांनीच नव्हे, तर बहुतांश भारतीयांनी यातल्या प्रत्येक गोष्टीच्या बातम्या वाचल्या आहेत, त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत, त्याबद्दलचे मेसेज शेअर केले आहेत. 

कर्करोगाशी झुंज देत शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी कार्यरत राहण्याची लीला त्यांनी कशी साधली असेल बरं? त्याचं कारण म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्त्व नावाप्रमाणेच ‘मनोहर’ होतेच; पण सध्याच्या काळात एकंदर समाजातच आणि त्यातही राजकीय क्षेत्रात दुर्मीळ असणारे अनेक गुण त्यांच्याकडे होते. त्यांचे मन कणखर होते आणि जनसेवेच्या कामाप्रति प्रचंड निष्ठा त्यांच्या ठायी होती. ‘माणसाचं मन कोणत्याही विकारावर मात करू शकतं...’ असं ट्विट त्यांनी मृत्यूच्या जेमतेम महिनाभर आधी म्हणजे चार फेब्रुवारी २०१९ रोजी जागतिक कर्करोगदिनी केलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याच्या त्यांच्या कृतीतून त्यांनी ते सिद्धही केलं. 

क्षेत्रफळानुसार देशातल्या सर्वांत छोट्या आणि दरडोई उत्पन्नानुसार सर्वांत श्रीमंत राज्याचे उच्चशिक्षित मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांनी आपली कारकीर्द गाजवलीच; पण संरक्षणमंत्रिमदाच्या सुमारे अडीच वर्षांच्या काळातही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. ‘मला राजकारण आवडत नाही, प्रशासन आवडतं,’ असं ते म्हणायचे. त्यांच्या कामाच्या पद्धतीतून ते दिसून यायचं. प्रश्नाचा अभ्यास करून नेमकी आणि अचूक कार्यवाही वेगानं करणं, हे त्यांच्या कामाचं तत्त्व होतं.

‘आयआयटी’तून बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले ते देशातले पहिले मुख्यमंत्री होते. आयआयटी किंवा आयआयएम या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वेगळ्याच करिअरची वाट चोखाळणाऱ्या १८ व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारं ‘माय लाइफ, माय रुल्स’ हे पुस्तक सोनिया गोलानी यांनी लिहिलं आहे. त्यात मनोहर पर्रीकरांचाही समावेश आहे. त्या पुस्तकात पर्रीकरांबद्दलच्या काही वेगळ्या गोष्टी कळतात. त्यापैकी ही एक. मुंबई आयआयटीत शेवटच्या वर्षात शिकत असताना निवडून आलेले ते पहिलेच जीएस होते. कारण उत्तीर्ण होऊन बाहेर पडण्याच्या वर्षी ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नसे; पण त्यांना तशी संधी देण्यात आली. एवढी लोकप्रियता कशी मिळाली किंवा नियम कसा बदलला गेला, या प्रश्नावर पर्रीकरांचं उत्तर होतं, ‘कमी पैशांत चांगलं खाणं उपलब्ध केल्यामुळे.’

‘मी निवडणूक लढवायचं काही ठरवलेलं नव्हतं; पण साबुदाणा वड्यामुळे मी निवडणूक लढलो,’ अशी आठवण त्यांनी सांगितली होती. त्याचं असं झालं होतं, की त्या वेळी कॉलेजच्या मेसमध्ये केरळी आचारी होता. तो दाक्षिणात्य पदार्थ बनवण्यात कुशल असला, तरी त्याला साबुदाण्याचे वडे चांगले करता येत नसत. ते एखाद्या स्प्रिंग बॉलसारखे होत; मात्र विद्यार्थ्यांना ते आवडत नसले, तरी मेस को-ऑर्डिनेटरला ते आवडत असत. सर्वांनीच वारंवार तक्रारी करून किंवा हरतऱ्हेचे उपाय करूनही त्यात काहीही बदल झाला नाही. त्यामुळे मेस को-ऑर्डिनेटर बदलल्याशिवाय चांगला बदल होणार नाही, असा विचार करून मनोहर पर्रीकरांनी ती निवडणूक लढवायचं ठरवलं. दुसऱ्या वर्षाला असताना ते मेस को-ऑर्डिनेटर म्हणून निवडूनही आले. सलग दोन वर्षं ते त्या पदावर निवडले गेले. त्या कालावधीतल्या त्यांच्या कामामुळे त्यांना शेवटचं वर्ष असूनही ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा तिथेच प्रवेश घ्यायचा अशी अट त्यांना घालण्यात आली होती आणि अर्थात, ती त्यांनी पाळलीही.

मेस को-ऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना त्यांनी किराणा सामान घाऊक बाजारातून आणायला सुरुवात केली. त्यामुळे मेसच्या महिन्याच्या खर्चात खूपच बचत होऊ लागली. अशा वेगवेगळ्या कामांमुळे त्यांचं वेगळेपण विद्यार्थ्यांना जाणवलं. त्यामुळेच शेवटचं वर्ष असूनही जीएस होण्याची गळ विद्यार्थ्यांनी घातली. पुढे राजकारणात यायचं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं; पण सर्वसामान्यांसाठीच्या त्यांच्या कामाची चुणूक अशी आधीच दिसली होती. 

राजकीय नेते उच्चशिक्षित असावेत, असं अनेकदा म्हटलं जातं. पर्रीकर यांचं मात्र याबद्दलचं मत वेगळं होतं. शहाणपणाचा शिक्षणाशी संबंध नाही. उच्चशिक्षित असण्यापेक्षा शहाणं असणं अधिक श्रेयस्कर. राजकीय नेत्यांकडे आवश्यकतेएवढं शिक्षण आणि उच्च पातळीचा प्रामाणिकपणा असावा, असं त्यांना वाटे. पदव्युत्तर शिक्षणातलं शेवटचं एक सेमिस्टर नंतर पूर्ण करू असं त्यांनी ठरवलं. कारण त्यांना काम करायचं होतं आणि नंतर त्यांनी राजकारणात झोकून दिल्यामुळे ते शिक्षण पूर्ण झालंच नाही. 

इंजिनीअर व्हायचं त्यांनी ठरवलं होतं; पण आयआयटीत प्रवेश घेण्याचं, किंबहुना आयआयटी-जेईई परीक्षाही द्यायचं ठरवलं नव्हतं. त्यांच्या एका मित्रानं या परीक्षेचा अर्ज आणला होता; पण आपल्याला शिक्षणाचा खर्च पेलणार नसल्यानं त्यानं तो विचार सोडून दिला. तो अर्ज मनोहर पर्रीकरांनी भरला. त्या वर्षी गोव्यातून जी १८ मुलं आयआयटी-जेईई परीक्षेत उत्तीर्ण झाली, त्यात पर्रीकर होते. तरीही ‘व्हीजेटीआय’ संस्थेला त्यांचं प्राधान्य होतं; पण आयआयटीचा कॅम्पस पाहिल्यावर तिथेच प्रवेश घ्यायचं निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मुंबई आयआयटी’त प्रवेश आणि राजकीय क्षेत्रात येणं, हे दोन निर्णय आपण भावनिक आधारावर घेतले असल्याचं त्यांनी सांगितल्याचा उल्लेखही गोलानी यांच्या पुस्तकात आहे.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्यानं आणि वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि समानतेचे धडे मिळालेले असल्यानं त्यांची जडणघडण तशीच होत गेली. पुढे प्रमोद महाजन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना त्यांनी मनोहर पर्रीकरांमधले गुण हेरले आणि त्यांना पुढे आणलं. पुढच्या सगळ्या गोष्टींनी एक इतिहासच घडविला. त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात पक्ष म्हणून भाजप मोठा झालाच; पण माणूस म्हणूनही पर्रीकरांची उंची वाढतच गेली. स्कूटरवरून कार्यालयात जाणं, संरक्षणमंत्री झाल्यानंतरही साधा शर्ट, चप्पल अशा वेशात राहणं, लग्नाला गेल्यानंतर स्वतः ताट घेऊन रांगेत उभं राहणं, पहाटेपासून रात्री-अपरात्रीपर्यंत काम करत राहणं अशा त्यांच्या दैनंदिन वागण्यातल्या अनेक गोष्टी सर्वसामान्य जनतेला खूपच भावल्या. त्यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या निर्णयासह संरक्षण दलांना सुसज्ज करण्यासंदर्भातले आणि खर्च कमी करून स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीबद्दलचे अनेक दूरगामी निर्णय त्यांनी घेतले. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या सुविचाराचं अलीकडच्या काळातलं याहून चांगलं उदाहरण पटकन सापडणार नाही. म्हणूनच असामान्य व्यक्तिमत्त्वाचा हा ‘सामान्य माणूस’ लोकांच्या मनात दीर्घकाळ राहील, यात शंका नाही. त्यांना आदरांजली!

- अनिकेत कोनकर

(लेख पूर्वप्रसिद्धी : १८ मार्च २०१९ )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZRPCK
Similar Posts
राजकारणापलीकडचे पर्रीकर आज (१७ मार्च) मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी अनुभवलेल्या ‘राजकारणापलीकडच्या पर्रीकरां’बद्दलचा लेख दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. तो या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
व्रतस्थ योग्याचं चटका लावणारं जाणं रत्नागिरीतील वैद्यचूडामणी प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचे आज (२७ जुलै) करोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
स्वयंप्रकाशित होण्याची प्रेरणा देणारे नेते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जसे क्रांतिकारी समाजसुधारक, अस्पृश्यांचे उद्धारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बौद्धधम्म प्रवर्तक आहेत, त्याचप्रमाणे ते एक महान शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी समाजातील उपेक्षित वर्गाच्या शैक्षणिक विकासाला चालना दिली. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लेख...
‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’.... स्वामी विवेकानंदांची शिकागो सर्वधर्मपरिषदेतील भाषणे ‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’ या संबोधनाने स्वामी विवेकानंदांनी भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली होती. शिकागो येथे १८९३मध्ये झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांचे ते ऐतिहासिक भाषण झाले होते. त्या भाषणाला १२७ वर्षे होऊन गेली आहेत. त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सहा भाषणे केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language