पुणे : तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयाचे नामवंत प्राध्यापक... महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी... विश्ववृत्त मासिकाचे संपादक... रागिणी, आश्रमहरिणी, सुशीलेचा देव, इंदू काळे आणि सरला भोळे या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक... मराठी साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष... १९३० साली मडगाव (गोवा) येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन मल्हार जोशी यांच्या पंच्याहत्तराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मराठी साहित्य परिषदेतर्फे (मसाप) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात वामन मल्हार जोशींचा आवाज पंच्याहत्तर वर्षानंतर ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळाली आणि रसिक क्षणभर भारावले. दुर्मिळ रेकॉर्डसचे संग्राहक संजय संत यांच्यामुळे हा दुर्मिळ योग साहित्य रसिकांच्या वाट्याला आला. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर वामन मल्हार जोशी यांनी दिलेल्या व्याख्यानाची ध्वनिमुद्रिका श्रोत्यांना ऐकायला मिळाली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कलावंत अपूर्व साठे व सचिन जोशी यांनी जोशी यांच्या ‘स्मृतिलहरी’ या ललित लेखसंग्रहातील निवडक अंशाचे अभिवाचन केले. या वेळी व्यासपीठावर ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, दीपक करंदीकर, संजय संत उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘तात्विक कादंबरीचे जनक म्हणून वामन मल्हार जोशींचा उल्लेख केला जातो. त्यांची वाड्मयीन भूमिका एकांगी नव्हती, तर ती व्यापक, उदार आणि सर्वसमावेशक होती. नितीविषयक विचार त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये आणले. विवाहसंस्था, घटस्फोट, समाजातील स्त्रियांचे स्थान या विषयावर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या.’
दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.