Ad will apear here
Next
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र
‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. २४०० वर्षांपूर्वी लिहिले गेलेले कौटिल्याचे अर्थशास्त्र आजही सनदी/प्रशासकीय अधिकाऱ्यांना अभ्यासावे लागते. केवळ आर्थिक नव्हे, तर व्यवहाराच्या अनेक गोष्टींबद्दल सखोल मार्गदर्शन करणाऱ्या या ग्रंथाबद्दल माहिती सांगत आहेत ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.......
‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य.विष्णुगुप्त हे त्याचे मूळ गाव. नंद राजदरबारात अपमान झाल्यामुळे, शेंडीला गाठ मारून त्या घराण्याचा नाश करणारा, चंद्रगुप्त मौर्य याला राजव्यवहारासाठी आवश्यक त्या सर्व विषयांत पारंगत करून सम्राट बनवणारा, तोच तो कौटिल्य!

इ. स. पूर्व ३५०च्या सुमारास त्याचा जन्म झाला. तक्षशिला विद्यापीठात तो अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचे अध्यापन करत असे. ‘अर्थशास्त्र’ या अद्वितीय ग्रंथाची रचना त्यानेच केली. महर्षी व्यासांनी ज्याप्रमाणे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या वेदांची व्यवस्था लावली - ऋग्वेदादि चार वेदांची रचना केली, त्याप्रमाणे कौटिल्याने अर्थशास्त्रावर त्या काळात उपलब्ध असलेल्या ग्रंथांचे संकलन करून आपला ग्रंथ तयार केला. देश-परदेशात दोन सहस्रकांहून अधिक काळ अभ्यासला जाणारा तो संदर्भग्रंथ आहे.

‘अर्थशास्त्रा’ची व्याप्ती फार मोठी आहे. ‘इकॉनॉमिक्स’ हा त्यातला एक भाग आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, वित्त व्यवस्थापन, करव्यवस्था, दंडनीती, गुप्तहेर नेमणूक, मंत्री व अमात्यांची निवड, शत्रूंचा समाचार, भ्रष्टाचार नियंत्रण, विविध खात्यांची व्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, युद्धनीती, लगतच्या राष्ट्रांशी संबंध... विषयांची ही यादी पाहून आपण थक्क होतो.

या ग्रंथाची एकूण १५ अधिकरणे (प्रकरणे) आहेत. त्यात प्रत्येक विषयाचे अत्यंत सूक्ष्म विवेचन केलेले आहे. इ. स. १९०९मध्ये म्हैसूरचे श्यामशास्त्री यांनी संस्कृतमधील उपलब्ध प्रत प्रथम प्रकाशात आणली. त्यानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. जर्मन, रशियन भाषांचाही त्यात समावेश आहे. त्यातील पंधराव्या प्रकरणात असे म्हटले आहे, की ‘माणसाची उपजीविका म्हणजे अर्थ. माणसांची वस्ती असलेल्या भूमीचा म्हणजेच पृथ्वीचा लाभ आणि तिचे पालन, याबाबतचे उपाय सांगणारे शास्त्र, म्हणजेच अर्थशास्त्र. मुळात पद्यमय असलेल्या ग्रंथाचे पुढे गद्यात रूपांतर झाले. ज्या प्राचीन ग्रंथांवरून याची रचना झाली, (ज्यांची नावे ग्रंथात समाविष्ट आहेत) त्यातील एकही ग्रंथ आज कुठेही उपलब्ध नाही.

संपूर्ण अर्थशास्त्राचा परामर्श घेणे येथे शक्य नाही. त्यातील महत्त्वाच्या निवडक विषयांचा आपण परिचय करून घेऊ.

राजपुत्राने शिक्षण कसे घ्यावे? तिसऱ्या वर्षी लेखन आणि अंकगणित शिकण्यास प्रारंभ करावा. उपनयन झाल्यावर त्रयी आणि आन्वीक्षिकी या विद्यांचे अध्ययन विद्वान आचार्यांजवळ करावे. (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, तसेच अथर्ववेद, इतिहासवेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदशास्त्र, ज्योतिष, वार्ताशास्त्र, दंडनीती इत्यादी इत्यादी.) सोळाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून नंतर विवाह करावा. दिवसाच्या सुरुवातीला हत्ती, घोडे, रथ व शस्त्रे यांच्याविषयी अभ्यास. नंतर इतिहासाचे अध्ययन. पुराणे, बखरी, आख्यायिका, धर्मशास्त्र-अर्थशास्त्र यांचा इतिहासात अंतर्भाव होतो. उरलेल्या काळात नवीन विषयांचे ग्रहण आणि आधीच्या विषयांची उजळणी करावी. सततच्या अभ्यासाने बुद्धी परिपक्व होते. त्यामुळे कार्य करण्याची शक्ती वाढते. परिणामी आत्मप्रत्यय वाढतो. अशा अध्ययनामुळे विनयसंपन्न आलेला राजा सर्व प्रजा आणि प्राणिमात्रांच्या कल्याणाविषयी तत्पर असतो आणि पृथ्वीवरील एकछत्री साम्राज्याचा उपभोग घेतो.

इसवी सनपूर्व चौथ्या शतकातील हे लेखन आहे. याचा अर्थ वरील सर्व विद्यांचा अभ्यास भारतात पूर्वापार चालत आलेला होता. त्यासाठी आचार्यांची गुरुकुले होती. अमात्य, मंत्री आणि पुरोहित यांची नेमणूक कशी करावी, हे ग्रंथात सविस्तर सांगितले आहे. ‘तो आपल्याच राज्याचा नागरिक असावा. चांगल्या कुळात जन्मलेला, ताब्यात ठेवण्यास सुलभ, कला-शास्त्रांमध्ये प्रवीण, बुद्धिमान, उत्तम स्मरणशक्ती असलेला, बोलण्यात वाकबगार, धीट, समयसूचक, उत्साह-सामर्थ्ययुक्त, क्लेश सहन करणारा, शुद्ध आचरण असलेला, स्वामिभक्त असा सर्वगुणसंपन्न अमात्य असावा. त्यांची वेळोवेळी परीक्षा घेण्यात यावी.’

स्थानिक आणि बाहेरील गुप्तहेरांची नेमणूक कशी करावी, याचेही उत्तम मार्गदर्शन ग्रंथात आहे. फितुरीवर कसे नियंत्रण ठेवावे, शत्रूच्या राज्यातील लोकांना आपल्या बाजूला कसे वळवावे, मंत्रीपरिषद कशी आणि केवढी असावी, राजपुत्रांच्या संबंधी घ्यावयाची खबरदारी, तसेच राजाचे दैनंदिन व्यवहार, त्याने स्वत:चे रक्षण कसे करावे, या सगळ्या गोष्टींचा तपशील पाहून आपण त्या वैभवशाली काळाची कल्पना करू शकतो.

कररचना, शेतसारा, व्यापारी धोरणे, वजनमापे, विविध विभागांचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्य, न्यायव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांना शिक्षा, दुष्काळ-रोगराई, युद्ध आदी संकटांचा परिहार इत्यादी विषय ‘अर्थशास्त्रा’त सोदाहरण मांडलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा किती सूक्ष्म विचार त्या काळी केला जात होता, हे त्यावरून लक्षात येते. आजही ती सर्व सूत्रे पूर्णपणे लागू होतात. त्यांचा स्वीकार केल्यास भारत हे एक समर्थ राष्ट्र बनून जगाचेही नेतृत्व आपण करू शकू.

‘अर्थशास्त्रा’तील निवडक सूत्रे आता आपण पाहू.

- जनतेचे सुख आणि कल्याणातच शासकाचे सुख सामावलेले आहे.
- दुष्ट प्रवृत्तीच्या आणि चरित्र्यशून्य राज्यकर्त्याला जनता नष्ट करते किंवा शत्रू त्याचा पराभव करतात.
- अनेकांच्या आज्ञांखाली वावरणारी सेनादले परस्परांच्या भीतीमुळे शत्रूवर चालून जात नाहीत. (त्यांना योग्य ते स्वातंत्र्य असावे.)
- कोषागाराच्या शक्तीमधूनच लष्कर निर्माण होते.
- ऐहिक संपत्ती महत्त्वाची आहे, कारण सदाचरण आणि सुखसमाधान त्यावरच आधारलेले असते.
- पाण्यातील मासा कधी पाणी पितो, हे समजणे जसे अशक्य आहे, त्याप्रमाणे शासकीय अधिकारी केव्हा आणि कसा पैशाचा अपहार करतात, हे शोधून काढणे अवघड असते.
- गुप्ततेचा भंग राज्यकर्ता आणि सेवकवर्गाच्या सुख-कल्याणासाठी धोकादायक असतो.
- जिथे धार्मिक नियम आणि नैतिक व न्याय्य गोष्टींमध्ये संघर्ष असतो, तिथे सबळ मुद्द्यानुसार न्याय द्यावा. लिखित मजकुराची ग्राह्यता तिथे संपते.
- गुन्हा काहीही असो, ज्ञानी व्यक्तीचा छळ करू नये.
- गुन्हेगाराला शिक्षा न दिल्याने आणि निर्दोष व्यक्तीला कडक शासन केल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होते.
- बेशिस्त आणि दुराचारी सदस्यांमुळे सत्ताधारी घराण्याचा वाळवी लागलेल्या लाकडासारखा नाश होतो.
- अर्थशास्त्र नैतिकता, समृद्धी आणि भौतिक सुखे निर्माण करते आणि त्यांचे रक्षण करते.
- तत्त्वज्ञान हे सर्व ज्ञानांचा प्रकाश, सर्व कर्मांची पूर्तता करणारे साधन आणि नैतिक (धार्मिक) कल्पनांचे उगम/आश्रमस्थान समजले जाते.
- सत्ता, स्थान आणि काळ एकमेकांना मदत करतात.
- शहाणा प्रशासक आपल्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.
- मधमाशी ज्याप्रकारे फुलातून मध शोषून घेते, त्याचप्रमाणे सरकारने कर गोळा करावा.
- सत्तेचे तीन मुख्य घटक असे : बौद्धिक शक्ती, लष्करी ताकद आणि उत्साह व मानसिक धैर्य.  
- शेती हा अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 

असे ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ निदान एकदा तरी अवश्य वाचावे. वर्तमान भारताच्या अनेक आर्थिक आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश झालाच पाहिजे.

- रवींद्र गुर्जर
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(कौटिल्याच्या अर्थशास्त्रासंबंधीची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZIBP
Similar Posts
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल
माझं घर ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...
आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर इंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर याचा जन्म व मृत्यूचा दिनांक २३ एप्रिल हाच आहे. जागतिक पुस्तक दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने, ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरातून शेक्सपिअरला वाहिलेली ही आदरांजली...
अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती - हेडी लमार हॉलिवूडमधील अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे हेडी लमार. अभिनयासोबतच तिने एक अत्यंत महत्त्वाचा असा वैज्ञानिक शोधही लावला होता. एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला नंतरच्या काळात विपन्नावस्थेत राहावे लागले. ही अभिनेत्री म्हणजे एक वेगळेच रसायन होते. नऊ नोव्हेंबर हा तिचा जन्मदिन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language