पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या या चित्रपट महोत्सवात ६० हून अधिक देशांतील विज्ञानपट आले होते. यातील शाळा-महाविद्यालय विद्यार्थी गटात कस्तुरी कुलकर्णीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. झाडांभोवती निर्माण होणाऱ्या बुरशीचे महत्त्व, त्याचे पर्यावरणातील स्थान या विषयावर तिने ‘सिंबायोसिस’ हा लघुपट बनवला होता.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असलेल्या कस्तुरीला लहानपणापासून अभिनयाचे वेड आहे. निर्माते, दिग्दर्शक राजू भोसले यांच्या विज्ञानविषयक शिबिरात ती नियमितपणे सहभागी होते. तिथेच तिला या विज्ञानविषयक चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती मिळाली. पहिल्यांदा तिने या महोत्सवासाठी ‘आजीबाईंचा बटवा’ हा औषधांची माहिती देणारा लघुपट तयार केला होता. त्यात सीमा चांदेकर यांनी काम केले होते. इयत्ता नववीमध्ये असताना कस्तुरीने बेरीज वजाबाकी या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, तसेच त्यात अभिनयदेखील केला आहे. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.