ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘विठ्ठल’ या कवितेचा मराठीच्या विविध बोलींमधला अनुवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे आता आणखी एक ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविताही व्हायरल झाली आहे, ती तिच्या विविध बोलींमधल्या अनुवादासह... ती कविता आणि अनुवाद येथे देत आहोत. त्यात हिंदी आणि इंग्रजीसह मराठीच्या नगरी, मराठवाडी, वऱ्हाडी (बुलढाणा), लेवा गणबोली, आदिवासी तडवी भिल्ल, अहिराणी, बागलाणी, झाडीबोली, मालवणी, आगरी, परदेशी, बंजारा गोरबोली, पोवारी, तावडी, कादोडी-कुपारी (उत्तर वसई), वाडवळी (दक्षिण वसई), वऱ्हाडी (अमरावती), भोयरी (नागपूर ग्रामीण), दख्खनी सोलापुरी, डांगाणी या विविध बोलींचा समावेश आहे. .......
कणा (मूळ कविता)
‘ओळखलंत का सर मला?’
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहून.’
माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती
पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून,
फक्तव ‘लढ’ म्हणा!’
- कुसुमाग्रज
.........................
कना (नगरी बोली)
वळिकलं का सर मला?
पावसात आला कुनी;
कापडं व्हती चिकलानी माकलेली
क्यासावरती पानी!
खिनबर बसला मंग हासला
बोल्ला वर बघून;
गंगामाय पावनी आली,
गेली खोपटात ऱ्हाउन!
माह्यारवासनीसारकी
चारी भिताडभर नाचली;
रिकाम्या हातानी जात कशी,
बायकू मातर वाचली!
भित खसली, चूल इझली
व्हतं नव्हतं तेवडं न्हेलं;
परसाद म्हनून पापन्यावर
पानी उलसं ठिवलं!
कारबारनीला घिऊन संगच
सर, आता लडतो हाये;
पडकं भिताड बांध्तो हाये
चिकूल गाळ काडतो हाये!
खिशाकडं हात जाताच
लगीच हासत हासत उटला;
‘अंहं! पैका नकू सर,
जरा यक्ट्ंपना वाटला!
मुडून पडला सौंसार तरी बी
मोड्ला न्हायी पाटकना;
पाटीवर हात ठिऊन
नुस्तं लड म्हना!!!
नुस्तं लड म्हना!!!’
- काकासाहेब वाळुंजकर, अहमदनगर
.........................
कना (मराठवाडी बोली)
‘वळकलो का सर?’
पावसात आला कुनी;
कपडे व्हते भिजलेले,
केसावर पानी।
घटकाबर बसला पुना हासला
बोल्ला वर बगून;
‘गंगामाय सोयरी आली,
गेली खोपट्यात ऱ्हाऊन’
माहेरवासीण पोरीसारकी
चार भितीत नाचली;
रिकाम्या हातानं जाईल कसं,
बायकु तेवढी वाचली।
भित खचली, चूल ईझली,
व्हते न्हवते न्हेले;
परसाद म्हून डोळ्यात
पानी जरा ठिवले
खटल्याला घिऊन संगं,
सर आता लडलालाव;
पडकी भित बांधलालाव,
गाळ चिक्कूल काडलालाव।
खिशाकड हात गेल्यावर
हासत हासत उटला;
‘पयशे नकु सर,
नक्कर एकाकीपणा वाटला
मुडून पडला सौंसार पर
मुडला नाही कना;
पाटीवर हात ठिवून,
निसतं लड मना!’
- डॉ. बालाजी मदन इंगळे, उस्मानाबाद
.........................
कना (वऱ्हाडी)
‘वयखलं का सर मले?’
झळीत आला कोनी,
कपळे चिखलानं भरेल
अन डोक्शावर पानी.
जराभर बसला उलसाक
हासला बोलला वर पाहून,
‘गंगामाय पावनीन आली
गेली खोप्यात राहून.’
माहेरवाशीन लेकीसारखी
चार भितीत नाचली, रिकाम्या हाती जाईन कशी
लक्शीमी तेवळी वाचली.
भित पळली, चूल इजली होतंनोतं नेलं,
आठोन म्हनून पापन्यायवर
उलसक पानी ठेवलं.‘
‘कारभारीनले घिऊन संगं,
सर आता लढून रायलो,
पळकी भित बांधून रायलो
अन चिखोलगाय काळून रायलो.
खिश्यात जानारा हात पाहून
हासत हासत उठला,
‘पैशे नाई पायजत सर,
जरा यकटेपना वाटला.
मोळून पळला संसार तरी
मोळला नाई कना,
पाठीवर हात ठिऊन
नुसतं लढ म्हना!’
- अरविंद शिंगाडे, खामगाव
.........................
कना (लेवा गणबोली)
वयखलं का सर मले
पावसात आला कोनी;
कपळे होते आंबटवले
केसायवर पानी
घळीभर बसला मंगन हासला
बोल्ला वरहे पाहिसन;
गंगामाय पाहुनी आलती
गेलती घरट्यात राहिसन
माहेरवाशीन पोरसारकी
चार भीतीत नाचली;
खाली हाती जाईन कशी
बायको मातरं वाचली।
भीत खचली, चूल इझली
होते ना होते गेले;
परसाद म्हनिसन पापन्यायवर
पानी थोडुसं ठेवले
कारभारनीले घीसन
सर आता लढतोय;
पडकी भीत बांधतोय
गाराबिरा काहाळतोय
खिशाकळे हात गेला तसा
हासत हासत उठला;
‘पैसे नि पाहायजे सर
थोडुसा यकटेपना वाटला।
मोळी पडला सौसार तरी
मोळला नि कना;
पाठीवर हात ठिसन
नुस्तंच लढ म्हना’
- प्रशांत धांडे, फैजपूर, जि. जळगाव
.........................
कना (तावडी बोली)
‘वयखलं का सर माले?’
पावसात आला कोनी;
कपडे व्हते गदेल,
केसांवऱ्हे पानी।
खिनभर बसला मंग हासला
बोलला वऱ्हे पाहीसन;
गंगामाय पाव्हनी आली,
गेली खोप्यात राहीसन।
माहेरवासीन पोरवानी
चार भितीत नाचली;
मोक्या हाती जाईन कसी?
बायको मातर वाचली।
भीत खचली, चुला इझला
व्हतं नही व्हतं नेलं;
परसाद म्हनीसन पापन्यांवऱ्हे
पानी थोडं ठेवलं
कारभारीनले घीसन संगं
सर आता लढतो आहे;
पडकी भीत बांधतो आहे
गारा-गाय काढतो आहे
खिशाकडे हात जाताच
हासत हासत उठला;
‘पैसे नही पाहिजे सर,
जरा एकलेपना वाटला
मोडी पडला संसार
तरी मोडला नही कना;
पाठवऱ्हे हात ठीसन
फक्त लढ म्हना!’
- डॉ. प्रकाश सपकाळे, जळगाव
.................
कणा (आदिवासी तडवी भिल्ल बोली)
वयखला का सर माल?
बरसातमंझार आला कोणी;
कपळ्या होत्या मैल्या
बालांवर होता पाणी
घळीभर बसला मंघून हासला
बोलला वऱ्ह देखीकन;
गंगाबं पाव्हणीण आली
गेली खोपात राहीकन
माहेरं राहणारी पोरसरखी
चार भितीत नाचली;
मोकी हाती जाईन कशी
बायको मातर वाचली
भित धसली चुल्हा इंझाला
जी होता नाय होता ती गेला;
शिरणी म्हणीकन पापण्यांवर
पाणी थोळा धरला
नवरील माही लिकन संगं
सर आता लढ्याला हान;
पळेल भित बांध्याला हान
गारा गाय काहाळ्याला हान
खिसाकळं हात जाताच
हासत हासत उठला;
‘पैसं नाय होना सर
थोळा एखलासरखा वाटला
तुटीकन पळला सौसार
पण मुळला नाय कणा;
पाठीवर हात धरीकन
फकस्त लढ म्हणा’
- रमजान गुलाब तडवी, बोरखेडा खुर्द (यावल, जळगाव)
.........................
कना (अहिराणी)
वयखं का सर माले?
पानीमान उना कोनी,
कपडा व्हतात मयकटेल,
केसेसवरता पानी
जरसाक बसना मंग हासना
बोलना वऱ्हे देखी;
गंगामाय पाव्हनीन उनी,
गयी खोपटामा राही
माहेरवाशी पोरना गत
चार भितीस्मा नाचनी;
मोकया हाते जायी कशी,
बायको मातर वाचनी।
भित खसनी, चूल मलायनी,
व्हत नव्हतं ली गयी;
परसाद म्हणी पापन्यासवरते,
पानी थोडस ठी गयी।
कारभारीनले लिसन संगे
सर आते लढी रायनु;
पडेल भित बांधी रायनु,
चिखुलगारा काढी रायनु
खिसाकडे हात जाताच
हासत हासत उठना;
‘पैसा नकोत सर,
जरसा एखलापना वाटना
मुडी पडना सौसार तरी
मुडना नही कना;
पाठवरते हात ठिसन,
नुस्त लढ म्हना!’
- नितीन अर्जुन खंडाळे, चाळीसगाव
.........................
कना (बागलाणी)
वळखं का सर माले?
पानी मा वना कोणी;
कपडा व्हतात मळकटेल
आनी केससमा पानी
घडीभर बसना मजानं हासना
बोलना वर पाह्यी;
गंगा माय पाव्हनी वनी
गयी घरमा ऱ्हायी।
माहेरवाशीन पोरना गत
पुरा घरमा नाचनी;
रिकामा हाते जायी कशी
बायको मात्र वाचनी
भित खचनी, चूल इझनी
व्हतं नव्हतं घी गयी;
परसाद म्हणीसन पापनी मा
पानी थोडं ठी गयी
कारभारीनले घीसन संगे
सर, आते लढी राह्यनू;
पडेल भित भांदी राह्यनू
चिखलगाळ काढी राह्यनू
खिसामा हात जाताच
हसत हसत उठना;
‘पैसा नको सर,
जरासा एकलपणा वाटना
मुडी पडना संसार तरी
मुडना नही कना;
पाठवर हात ठेवा
आन फक्त ‘लढ’ म्हना!’
- वैभव तुपे, इगतपुरी
.........................
कना (झाडी बोली)
वळखल्या का सर मालं?
पान्यात आला कोनी;
कपळं होतं भरलेलं,
केसायवर पानी
घळीभर बसला मंग हासला
बोल्ला वरती पावून;
गंगाबाई पावनी आली,
गेली घरट्यात रावून
माहेरवासीन पोरीघाई
च्यार भितीत नाचली;
खाली हाताना जायेलकसी,
बायको तेवळी वाचली
भित खसली, चूल विजली,
होता नोहोता नेलन्;
परसाद मनून पापन्यावरत्या
पानी थोडसा ठेवलन्
कारभारनीलं धरून संगा
सर आता लढून रायलू;
पडकी भित बांधून रायलू,
चिखलगाळ काहाळून रायलू
खिस्याकन् हात जाताच
हासत हासत उटला;
‘पयसा नोको सर,
जरासा एकलापन वाटला.
मोळून पळला संसार तरी
मोळला नाई कना;
पाटीवर हात ठेवून
फक्त लळ म्हना!’
- रणदीप बिसने, नागपूर
.........................
कणो (मालवणी अनुवाद)
वळखलात काय सर माका?
पावसात इल्लो कोणी;
कापडा होती बरबाटलंली
टकलेर होता पाणी
वायच् बसलो मगे हसलो
बोललो बगून वरते;
गंगामाय पावणी इली
घरात ऱ्हावान गेली परते
म्हायेरवाशणीसारकी
चार भिंतीत नाचली;
रिक्यामी हातान जातली कशी,
बायल मात्र वाचली
भिंत खचली, चूल इझली,
होता नव्हता न्हेल्यान्;
परसादी म्हणान पापणेर
पाणी वायच् ठेवल्यान्
कारभारनीक घेवन् वांगडाक
सर आता लढतंय;
पडलंली भित बांदतंय,
सगळो चिकल काडतंय।
खिशाहार गेलो हात तर
हसत हसत उटलो;
‘पैशे नुको सर वायच्
एकटेपणा वाटलो
मोडान पडलो संसार,
तरी कणो नाय मोडाक;
पाटीवर हात ठेवन्,
ताकत दिया लडाक!’
- मेघना जोशी, मालवण
.........................
कना (आगरी)
वलखलांव काय सर मना?
पावसान आला कोनी,
कपरं व्हतं कलथारलेलं,
केसांवरशी पानी.
शनभर बसला मंग हासला
बोलला वरती बघून
गंगामाय पाव्हनी आली,
गेली घरटंन ऱ्हाऊन
माहेरवाशीन पोरीसारखी
चार भिंतीन नाचली,
मोकले हाती जाईल कशी,
बायको तव्हरी वाचली.
भित खचली, चूल इझली,
व्हता नता न्हेला
परसाद म्हंगून पापन्यांवरती
पानी थोरा ठेवला
कारभारनीला घेउन बरंबं
सर आथा लढतंय
परलेली भित भांदतंय
चिखलगाल काऱ्हतंय
खिसंकरं हात जाताच
हासत हासत उठला
‘पैशे नको सर,
जरा यकटंपणा वाटला.
मोरून परलाय संसार
तरी मोरला नाय कना
पाठनीवरती हात ठेउन,
निसता लढ म्हना!’
- तुषार म्हात्रे, उरण (रायगड)
.........................
कणो (परदेशी)
ओळख्यो की सर म्हकू
आयोकोई भर पाणीम;
कपडा हा वल्लागच
बाळं प भी पाणी
थोडो बठ्यो फिर हास्यो
बोल्यो उप्पर देखकन;
गंगामाई पाव्हणी आयी
गई घरटाम ऱ्हयकन
माहेरवाशी पोरीसरखी
चारो भीता नाची;
रिकामा हातस जायंगी कशी
फक्त बायको बची
भित खची, चुल्हो बुझ्यो
हो जे जे ल्हे गयी;
प्रसाद थोडो पापण्यांम्ह
पाणी थोडो रख गयी
कारभारणीकू संग ल्हेकन
सर आब लढरं है;
पडकी भीता भांदबुंदकन
वल्लो गारो काढरं है
खिसाम हात जाताच
हासत हासत उठ्यो;
‘पैसा बियसा नको सर
जरा एकठोपण वाट्यो।
तूट गयो संसार तरी
तुट्यो नही कणो;
पीठ फक्त हात रखकण
फक्त लढो कहो’
- विजयसिंग राजपूत, पाचोरा
.........................
कड (गोर बोली)
ओळखो कांयी सर मन?
पडते पाणीम आयोतो कोयी;
कपडा हेते गाळेमवलाये हे
लटापर हेतो पाणी
थोडसेक बेठो पच हासो
बोलो उपर देकन;
गंगायाडी पामणी आयी,
चलेगी घरेम रेनं’
मायरेन आयीही छोरीसरीखी
चार भितेम नाचगी;
छडे हातेर जायं कुकरेन,
तांडरी मातर बचगी
भित धसगी, चूलो वलागो,
हेतो न हेतो जे लेगी;
प्रसाद करन पापणी मायी
पाणी थोडसेक मेलगी
गोण्णीनं सोबत लेन
सर आबं लढरो छू;
पडीही भित बांदरोछू,
सारीगाळ काढरो छू
खिचासामू हात जातूच
हासतो हासतो उठगो;
‘पिसा न हेणू सर,
जरसेक एकलोच छू हानू वाटगो
तुटन पडगो संसार तरी
तुटी कोनी कड;
पुठेपरती हात मेलन,
फक्तीर केदं लड’
- एकनाथ गोफणे, चाळीसगाव
.........................
कनो (पोवारी बोली)
ओळख्यात् का सर मोला?
बरसात मां आयेव् कोनी;
कपडा होता पुरा माख्या,
केसपरा होतो पानी...!
सुटीकच बसेव् मंग हसेव्
बोलेव् वरती पाह्यकन्;
गंगामाई पाव्हनी आयी,
गयी घरटा मा रह्यकन्
माहेरवासीन् टुरीसरिखी
च्यार् भितमा नची;
खाली हात् जाये कसी,
हं घरवाली वु बची
भित खसी, चुल विझी,
होतो नोहोतो नेईस;
परसाद मुहून पापणीपरा
पानी थोडसो ठेईस
कारभारीनला लेयकन् संगमां
सर आब् मी लढ् रही सेव;
पडकी भित बांध रही सेव्,
चिखलगाळ काढ रही सेव
खिसाकन हात जाताच
हसत हसत उठेव;
‘पैसा नही पाह्यजे सर,
जरा एकलोपन लगेव
मोड पडेव संसार तरी
मोडेव नही कनो;
पाठपरा हात ठेयकन्
फक्त लढ कवो’
- रणदीप बिसने, नागपूर
.........................
कनो (कादोडी- कुपारी बोली)
माला ओळखीला गा तुमी, सर?
पडत्या पान्यात कुनतरी आलतो,
कपडे सगल्ये माखलोते;
आन केसातने पानी निखळातोतो
थोडॉ वेळ बेहलो, मग हावलो
वरती डोकावीत बॉयलो;
गंगामाय पावणी आलती
दोन दी रेवोन गेली
पोरी मायारा येते तहीस
दोन दी घरात उंदडली;
मोकळ्या हाताइ कही जाशी?
बायकू मात्र माई वासली
भीत पडली, सुल विझोन गेली
जा कय होता, ता घेवोन गेली;
डोळ्या पापणोर पानी
प्रसाद ठोवोन गेली
बायकुला जोडीला घेओन
सर, आत्ये मॅ लडात्ये;
मोडली भीत उभी करते
चिखलगाळ बार काडत्ये
मॅ खिशात हात घायलॉ
तिगाळा आहात आहात उठलो;
‘पैशे नाका, सर
जरा एकला वाटलं भगून आलतो
सवसार मोडलो,
पान कनो नाय मोडलो;
तुमये पठीओर हात ठोवोन
फकस्त लढ्यादो हांगा’
- जोसेफ तुस्कानो, वसई
............................
कणा (वाडवळी बोली)
ओळखीलं का माना, सर?
पडत्या पाण्यात आला कोणी;
कापडं त्यायी माखलेली
डोकं पण साफ भिजलोअं
जरा बवला, मंग हंवला
वर बगीत बोटला;
गंगामाय पावणी आल्ती
गेली घरात रेवून
मायेरवाशीण पोरीहारकी
ती अख्ख्या घरभर नासली;
रिकामी ती जाईल कयी,
बायको तवडी वासली
भित पडली, सूल बिझली
कांय होतं नवतं, तें गेलं;
परसाद मणून पापणीअर
पाणी जूरुक ठवून गेली
बायकोला घेवून जोडीला
सर, आथं लडतंय मी;
पडलेली भित बांदून काढतंय
शिक्कलगाळ उपून टाकीतंय
मी हत खिशात घटला,
तया तो हंवत हंवत उठला;
‘पैशे नाका, सर
थोडा एकला पडला मणून
संवसार मोडला,
पण कणा नय मोडला;
पाठीअर हात ठवून
फक्त लढ बोला’
- स्टॅन्ली गोन्सालविस, वसई
.................
कना (वऱ्हाडी - अमरावती)
वयखलं का गुर्जी मले?
बरसादित आला कोनी;
कपडे होते चांबटलेले,
डोकश्यावर पानी
घडीभर बसला मंग हासला,
बोल्ला वर पाहून;
गंगामाय पावनीन आली,
गेली खोपडीत ऱ्हाउन
म्हायेरवाशिन पोरीसारखी,
चार भितीत नाचली;
रित्या हाती जाईल कशी,
घरधनीन मात्र वाचली
भित खचली, चूल इझली,
होतं नवतं नेलं;
परसाद म्हनून पापन्यायवरती,
पानी जरासं ठिवलं
घरधनीनले घेऊन संगं,
गुर्जी आता लडून रायलो;
पडकी भित बांधून रायलो,
रेंदा गाटा काडून रायलो
खिशाकडे हात जाताच,
हासत हासत उठला;
‘पैशे नकोत गुर्जी,
जरासा यकटेपना वाटला
तुटून पडला सौसार,
तरी मोडला नाई कना;
पाठीवर हात ठिवून,
निरा लढ म्हना!!! ’
- स्वप्नाली ठाकरे, अमरावती
..........................
कनो (भोयरी बोली)
वरखे का गुरुजी मला?
बरसाद म आये कोनी;
चिक्खल कादा कन भऱ्या कपडा, बाल पर पानी
घडीभर बसे वोकं बास्त हासकन् बोले वरतं देखकन
गंगामाय पाव्हनी आयीती, गयी कोचोडा म रह्यकन
माहिरवासीन पोटी सरखी
चार दिवालम नाची-कुदी;
खाली हातकन जायेन कसी
लाडी मातर बाची
दिवाल खसी, चूल बुझी,
होतो नी होतो ती ले गयी,
परसाद मून पापनी पर
पानी धऱ्यो उलिसो
घरवाली ला संगं लेयकन
गुरुजी आबं कर रह्यास दुय हात;
खसी दिवाल बांध रह्येस, चिक्खल कादो काढ रह्येस
खिसा कितं हात जाताच
हासत हासत उठ्यो
‘पयसा अदला नी पाह्यजेन गुरुजी,
थोडो सो येकलो येकलो लाग रह्येतो
टुट्यो संसार
तरी बी टुट्यो नी कनो;
पाठ पर हात धरकन
सिरफ डटकन दुय
हात करनला कोवो’
- सुरेश महादेवराव देशमुख, नागपूर
............................
कना (दखनी सोलापूरी संवाद भाषा)
पैचाने क्या सर मजे?
बरसात मे आया कोई.
कपडे सारे गिल्ले गिल्ले
बालां मे पानी.
कुछ पल बैठ्या, फिर हश्या
बोल्या देख के उप्पर.
गंगामाय म्हेमान्नी आई
ऱ्हके गयी घरपर
मैके को आयले छोरीसरीकी
सारे घरभर नाची.
खाली हात जाने की कैशी
जोरू वत्ती बची.
दिवाल ढली, चुल्ला बुझ्या
सब सब लेके गयी.
तबरूक कर के पापन्या मे
पानी छोड के गयी.
जोरू को लेके संगट
सर, अभी लडना सुरू हाय.
पडेली दिवाल बंधतंय
चिक्कड गाळ काडना सुरू हाय.
जेब तरफ हात जातेच
हसते हसते उट्या.
‘पैसा नको सर,
जरा एकलापना लग्या.
संसार बिखऱ्या तबी
तुटेला नै कना.
पीटपर हात रकके तुमे
नुसता ‘लड’ कना...’
- फारूक एस. काझी, आजरा, जि. सोलापूर
........................
कणा (डांगाणी बोली)
वळाखला का मास्तर मला?
पावसात आलाय कोण,
कापडा व्हती भिजेल,
केसानमंधी पाणी
थ्वाडा यळ बसुन मांगुन हसला
बोलला वर पहून
गंग्याय पावणी आली,
गेली कोपीत रहुन’
माहेरवशीण पोरीवानी
च्यार भितीत नाचली,
मोकळ्या हातानी जाईल कशी,
बायकु मातर रयली
भित खसली, चूल इझली,
व्हता नव्हता न्याला,
परसाद म्हणून पापण्यावं
पाणी थ्वाडा ठीवला
बायकुला घेउन संग
धार आता लढतोय
पडेल भित बांधितोय,
चिखलगाळ काढीतोय
खिश्याक हात गेल्याव
हासत हासत उठला
‘पैस नको मास्तर,
थ्वाडा एकांटि वाटला
म्वडून पडला संसार तरी
म्वाडला नयी कणा
पाठीव हात ठिवुन,
फक्तव लढ म्हणा’
- रोहिदास डगळे, खिरवीरे, ता. अकोले, जि. अहमदनगर
.................
बोलो ‘बेटे लडते रहना’ (हिंदी)
पहचान गये सर?
बारीशमे कोई आवाज सुनी
किचडमय उसके कपडे थे, बालोंसे टपके पानी
तनिक बैठके थोडासा फिर, हंसके बोला आंख उठाकर
मेहमान थी, सर, गंगामैया, गयी मेरे घोसलेमे रहकर
दिवारोंमे नाँची खुलकर, मैके जैसे बेटी आयी
जाती कैसे खाली हाथ वो? नसीब! बीबी छुट गयी।
भग्न दिवारे, चुप है चूल्हा,
था जो सबकुछ धौल लिया
चंद बूँद पपनीपर पानी
प्रसाद उसने छोड दिया
शाम सुबह लड रहा अभी मै,
साथ लिये घरवालीका
प्रयास संसारके टुकडे बिखरे फिरसे जुटानेका
किचड किचड कोना कोना, हो जितना है उठानेका
जेबकी ओर बढ गया हाथ, तब उठते उठते तनिक हँसा
‘ना सर, पैसा नही!
थोडासा मनमे लगा अकेलापनसा।
रीढ नही अबभी टूटी है, बिखरा जो सुंदर सपना;
सिर्फ इस दफा कहना तुम सर,
‘रुक ना बेटे लडते रहना!’
- विद्याधर शुक्ल, पुणे
.................
Backbone (English)
“Sir, this is me, ” called in the stranger
Rains had ruined his clothes and hair.
Sat for a moment, then said with a smile,
“River Goddess visited us, stayed for a while.
Looking joyful, she danced in and out
But for my wife, everything was wiped out.
Walls sank and the kitchen is in ruins
Tears in my eyes, is her gift that now shines.
With wife on my side, I’m planning to fight back, Sir
Building back the walls, removing mud and mire.”
Looking at my hand in pocket, rose to his feet
“Don’t need money, Sir, was feeling lonely a bit -
Hearth is broken, but backbone’s still upright
You just pat my back and say, GO FIGHT!”
- Mandar Shinde, Pune
.........