Ad will apear here
Next
स्वर-भावगंधर्व


२६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
........
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातला एक गौरव पुरस्कार प्रदान सोहळा. तसे पुण्यात पुरस्कारांचे सोहळे खूपच असतात; पण हा जरा विशेष होता. प्रसिद्ध बासरीवादक, कॉपी रायटर, संगीताचे जाणकार व प्राध्यापक श्री. अजित सोमण यांच्या नावे देण्यात येणाऱ्या ‘स्वर-शब्द-प्रभू’ या पुरस्काराचा सोहळा होता तो. पुरस्कारार्थी होते श्री. अरुण काकतकर आणि प्रमुख पाहुणे होते प्रतिभावान संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर. पुरस्कार वितरणानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर बोलण्यास उभे राहिले. प्रमुख वक्ते अशा वेळी पुरस्कारार्थीबद्दल गौरवाचे शब्द बोलतातच. इथे तर बऱ्याच वर्षांपासूनचे त्यांचे मित्र असलेले काकतकर पुरस्कारार्थी होते. त्यांच्याबरोबरच्या आठवणी तर पंडितजींनी खास हृदयनाथी शैलीत जागवल्याच; पण मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांवर आश्चर्य करण्याची वेळ आली ती पंडितजींच्या एका महत्त्वाच्या वाक्याने – पंडितजी म्हणाले, ‘मला लोकप्रिय करण्यात, माझे संगीत रसिकांपर्यंत पोहोचण्यात व आज मी जो काय प्रसिद्ध आहे त्यात ८० टक्के वाटा हा अरुण काकतकर यांचा आहे. त्यांनी मला आग्रह करून दूरदर्शनवर नेले नसते, तर मी आज कोणीच नसतो.’

त्यांच्यासारख्या व्यक्तीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून सगळे प्रेक्षागृह स्तब्धच झाले. असे उद्गार जाहीरपणे तोंडून येण्यासाठी लागणारी पारदर्शकता, मनस्वीपणा व दुसऱ्याला त्याचे श्रेय देण्याची वृत्ती रसिक अनुभवत होते. हे आठवण्याचे कारण म्हणजे हेच नव्हे, तर पं. हृदयनाथ मंगेशकर या असामान्य कलावंताची अशी अनेकानेक वैशिष्ट्ये त्यांच्या बऱ्याच वर्षांच्या ओळखीमुळे मला अनुभवता आली. त्यांचा स्नेह लाभला, संगीताशिवाय इतरही अनेक कलांचा त्यांचा अभ्यास जाणून घेता आला. एखादी व्यक्ती वेगवेगळ्या अंगाने किती श्रेष्ठ आहे याचा जेव्हा आपल्याला उलगडा होऊ लागतो त्या वेळी आपल्याला नशिबाने मिळालेल्या या आयुष्यात किती बहार आहे, किती ज्ञान आहे याचा साक्षात्कार होऊ लागतो. मग तो साक्षात्कार ही माझ्यासारख्यांच्या आयुष्याची न संपणारी पुंजी बनून जाते.

साधारण १९८७ सालच्या एका कार्यक्रमाची आठवण माझ्या मनात आजही ताजी टवटवीत आहे. पुण्यातल्या लक्ष्मी क्रीडा मंदिरचा हॉल तरुणाईने खचाखच भरलेला. स्टेजवर अगदी मोजकीच वाद्ये. साथीदार मंडळी आपापली वाद्यं सुरात जुळवीत असतानाच कडेच्या पॅसेजमधून हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचे काही शिष्य यांचे आगमन झाले. उत्सुक माना आपोआप मागे वळल्या. पांढऱ्याशुभ्र कपड्यांतील हृदयनाथ त्यांच्या टिपिकल अशा शैलीत दाट केसातून कपाळाकडून मागे हात फिरवीत स्वरमंचावर स्थानापन्न झाले. काही क्षणांतच ‘भावसरगम’ या मैफलीला सुरुवात झाली. निवेदन, गाण्यांचे अप्रतिम शब्द आणि हृदयनाथांचे भावगर्भ गायन यातून एक संपूर्ण ‘स्वर-शिल्प’ उभे राहिले. भावसमाधीच होती ती!

मी नुकतीच प्रकाशचित्रण व्यवसायास सुरुवात केली होती. बरोबरीने मला सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये रुची असल्याने अशा मैफलीत माझ्याबरोबर माझ्या कॅमेऱ्यानेही प्रवेश केलेला. हृदयनाथ मंगेशकरांच्या काही भावमुद्रा टिपण्याचा इरादा होताच. माझे कान आणि डोळे आपापले काम करू लागले होते. एक से एक खुलत जाणाऱ्या त्या गाण्यांबरोबर हृदयनाथांच्या काही भावमुद्रा मी कॅमेराबद्ध केल्या. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके याही तेथे आलेल्या. त्यांचेही एक दोन छान फोटो मला मिळाले; पण या सगळ्यात प्रामुख्याने मनावर ठसल्या त्या हृदयनाथांच्या त्या दिवशीच्या कार्यक्रमातील स्वर-मुद्राच! त्यानंतर ‘भावसरगम’चे अनेक कार्यक्रम मी ऐकले आणि प्रत्येक वेळी हृदयनाथांचा नवनवा आविष्कार अनुभवण्याची संधी मिळाली. मनात विचार येत, की त्यांच्याशी माझी कधी ओळख होईल का?

तो योग यायला पुढे दहा वर्षे गेली. मार्च महिन्यातील एके दिवशी माझे एक मित्र श्री. प्रकाश रानडे यांचा फोन आला. ‘२४ एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या ओरिजिनल पेंटिंगवरून मोठे फोटो करायचे आहेत. त्या कामासाठी मंगेशकरांनी तुम्हाला घरी बोलावले आहे.’ मला काम मिळण्यापेक्षाही आपल्या आवडत्या गायक-संगीतकाराची ओळख होणार हा आनंद जास्त होता.

त्या आनंदातच मी पुण्यातील सारसबागेजवळील ‘श्री मंगेश’ या इमारतीतील मंगेशकरांच्या घरी पोहोचलो. आतल्या दिवाणखान्यात डाव्या हाताला असलेल्या सोफ्यावर हृदयनाथ व समोरच्या सोफ्यावर सौ. भारती मंगेशकर बसलेल्या. त्यांनी माझं स्वागत केलं. माझ्या समोरील भिंतीवरच ती दोन्ही पेंटिंग्ज लावलेली होती. त्यापैकी मा. दीनानाथांचे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार श्री. एस. एम. पंडित यांनी चितारलेले, तर माई मंगेशकर यांचे चित्र कोल्हापूरच्या एका नवोदित चित्रकाराने रेखाटलेले. दोन्ही शैलीत जमीन-अस्मानाचा फरक. एकात ब्रशचे एकदम बोल्ड स्ट्रोक्स, तर दुसरे गुळगुळीतपणाकडे झुकलेले. चित्रातील पार्श्वभूमीही पूर्णपणे वेगळ्या. साधारण एकाच आकाराच्या असलेल्या दोन्ही चित्रांवर काचा असल्याने त्यामध्ये समोरील गोष्टीचे प्रतिबिंब दिसत होते. हृदयनाथ मला म्हणाले, ‘२४ तारखेच्या कार्यक्रमासाठी मला ही चित्रे मोठी करून हवी आहेत. त्यांचा परत फोटो काढायला लागेल ना? काचा काढायला लागतील का? आणि कधीपर्यंत तुम्ही ते देऊ शकाल?’ मी त्यांना प्रतिबिंबाची अडचण सांगून म्हणालो, ‘ही पेंटिंग्ज मला माझ्या स्टुडिओत न्यावी लागतील, ज्यायोगे अनावश्यक प्रतिबिंबे टाळता येतील व रंगांचाही अचूकपणा साधता येईल.’ त्यांनी क्षणभरच विचार केला व म्हणाले, ‘ती व्यवस्थितपणे घेऊन जाण्याची व परत आणून देण्याची जबाबदारी तुमची.’ मी होकार दिला.

दुसऱ्या दिवशी जाऊन मी ती पेंटिंग्ज माझ्या स्टुडिओत घेऊन आलो. त्या वेळी मी ‘सिनार’ हा जगप्रसिद्ध आणि मोठ्या फॉरमॅटचा कॅमेरा वापरीत होतो. इतर कामांप्रमाणेच एखाद्या आर्टवर्कची तंतोतंत कॉपी करण्याचे काम या कॅमेऱ्याने अप्रतिम साधता येत असे. तो माझ्या व्यवसायाचा नेहमीचाच भाग होता. त्या दोन्ही चित्रांचे मी कलर निगेटिव्ह व कलर स्लाइडच्या फिल्मवर कॉपिंग केले. दुसऱ्याच दिवशी त्या चित्रांच्या आठ इंच बाय १० इंच आकाराच्या एकेक प्रिंट्स तयार केल्या. दोन्ही पेंटिंग्ज व तयार असलेले त्यांचे प्रिंट्स घेऊन मी परत एकदा ‘श्री मंगेश’वर दाखल झालो. या वेळी दिवाणखान्यात इतरही काही पाहुणे मंडळी होती. मी ती पेंटिंग्ज परत त्यांच्या मूळ जागेवर लावली आणि हृदयनाथांकडे प्रिंट्सचे पाकीट सोपवले. त्यांनी ते पाहिले. मूळ चित्रातील रंग आणि त्यांच्या प्रिंट्समधील रंगांचे साम्य पाहून ते एकदम खूश झाले. मग शेजारीच असलेल्या एका ब्रीफकेसमधून त्यांनी एक पाकीट काढले. माझ्याकडे देत म्हणाले, ‘आता हे पाहा.’ त्यात काही प्रिंट्स होते. मुंबईतल्या एका नामवंताने त्याच पेंटिंग्जची आधी केलेली ती कॉपिंग्ज होती; पण किती तरी निराळीच! मी ती पाहत असतानाच हृदयनाथांनी मला अभिप्राय दिला, की ‘पाकणीकर, तुमचे फक्त तुमच्या कामावरच प्रेम आहे असे नाही, तर संगीतावरही तुमचे खूपच प्रेम असले पाहिजे. म्हणूनच तुम्ही इतका चांगला रिझल्ट आणू शकलात.’

त्यानंतर त्यांनी त्या फोटोंचे चार फूट बाय सहा फूट आकारात प्रिंट व फ्रेम करण्याचे काम माझ्यावर सोपवले. या काळात त्यांचा व साऱ्या मंगेशकर कुटुंबीयांचा माझा परिचय होत गेला. कोणत्याही कामात अचूकतेचा ध्यास ही त्या सर्वांची खासियत मला उमगत गेली.

दीनानाथ व माई मंगेशकर या दोघांच्याही पेंटिंग्जमधील पार्श्वभूमी वेगळी असल्याने ती स्टेजवर शेजारी शेजारी लावल्यास मोठ्या आकारामुळे त्या खूपच वेगवेगळ्या दिसतील, तर आपल्याला माईंच्या पेंटिंगमधील पार्श्वभूमी बदलता येईल का, अशी विचारणा करणारा बाळासाहेबांचा फोन आला. ‘कॉम्प्युटरच्या साह्याने आपण ते करू शकतो; पण ते तितके परिणामकारक होईलच असे वाटत नाही,’ असे माझे उत्तर होते. कारण त्या वेळी माझ्याकडे असलेला कॉम्प्युटर व त्यावर वापरल्या जाणाऱ्या फोटोशॉपसारख्या प्रणाली प्राथमिक अवस्थेत होत्या; पण बाळासाहेब म्हणाले, ‘आपण प्रयत्न तर करून पाहू.’ मग मी त्या स्लाइड्सचे ‘स्कॅनिंग’ करून आणले व त्यावर काम सुरू केले. उषाताई उत्तम चित्रकार असल्याने त्यांनीही एका प्रिंटवर ते काम सुरू केले. पार्श्वभूमी बदललेले ते प्रिंट्स मग आम्ही एकत्रितपणे बघितले. लगेचच सर्वांच्या हे लक्षात आले, की माईंच्या पेंटिंगमधील बदललेली पार्श्वभूमी परिणामकारक वाटत नाही. ती दीनानाथांच्या चित्रातील पार्श्वभूमीबरोबर जुळत नाही. या चर्चेत मी अनवधानाने असे म्हणून गेलो, की ‘काहीही झालं तरी ती दोन वेगवेगळ्या शैलीच्या चित्रकारांनी काढलेली चित्रं आहेत. आणि त्या खाली सह्या करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवातील फरक आहे तो.’ माझ्या या वाक्यावर खूश होत बाळासाहेब मला टाळी देत म्हणाले, ‘खरंय तुम्ही म्हणता ते. सही करणाऱ्यातला फरक आहे तो!’

त्यानंतर काही दिवसांनी त्यांना काही प्रिंट्स हवे होते ते देण्यासाठी संध्याकाळी मी व माझी पत्नी वैशाली त्यांच्या घरी गेलो. प्रिंट्स दिले. आम्हा दोघांकडे पाहत सौ. भारतीमामी चेष्टेच्या स्वरात म्हणाल्या, ‘पाकणीकर, आज एकतर अगदी जोडीने आला आहात आणि तेही इतकं आवरून आला आहात. कुठल्या फंक्शनला जायचे आहे वाटतं?’ मीही हसत उत्तर दिलं, की ‘हो, एका कार्यक्रमाला जाणार आहोत. भरत नाट्यमंदिरमध्ये कार्यक्रम आहे ‘भावसरगम’ म्हणून.’ यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. काही वेळात आम्ही तेथून निघालो. कार्यक्रमाला वेळ असल्याने निवांत जेवून आम्ही भरत नाट्यमंदिरवर पोहोचलो. कार्यक्रम ‘हाउसफुल’ होता. मी स्कूटर पार्क करून तिकिटांच्या खिडकीकडे वळलो, तर पाठीमागून हाक ऐकू आली. वळून पाहिले तर श्री. दत्ता ढवळे मला बोलावत माझ्याकडेच येत होते. ते बाळासाहेबांचे फार जुने आणि विश्वासू मित्र. माझ्याजवळ येत त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवले आणि म्हणाले, ‘बाळासाहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितले आहे. मी तुमची वाटच पाहत होतो.’ मी पाकिटात पाहिले, तर त्यात पहिल्या रांगेमधील मधली दोन तिकिटे होती. आमचे पुढील साडेतीन तास हे स्वर्गीय अशा सुरांच्या आनंदात गेले हे सांगणे न लगे.

गेल्या काही वर्षांत कॉम्प्युटर प्रगत होत गेले, त्याच्या प्रणाली वेगवान व अचूक होत गेल्या आणि मुख्य म्हणजे फोटोशॉपबद्दलचे माझे आकलन थोडेफार वाढले. त्यामुळे परत एकदा मी नव्याने माईंच्या पेंटिंगमधील पार्श्वभूमी बदलता येईल का याचा विचार माझ्या ‘स्वर-मंगेश’ या थीम कॅलेंडरच्या वेळी केला व त्यात यशस्वी झालो. बदललेल्या पार्श्वभूमीचे ते प्रिंट्स मी बाळासाहेबांना दिल्यावर त्यांना आनंद झाला. आज ती दोन्ही चित्रे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर विराजमान आहेत. त्या चित्रांवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या अभंगातील एक ओळ लिहिली आहे – ‘बापरखुमादेवीवरू सहज निटु जाला.’ खरोखरीच ती गोष्ट अगदी सहजच घडून गेली आहे.

पं. हृदयनाथ व मंगेशकर कुटुंबीय यांचं प्रेम नंतरच्या काळात आजपर्यंत मी अनुभवत आलो. त्यांच्यासाठी प्रकाशचित्रण करता आले. त्यांच्या घरगुती, जाहीर कार्यक्रमात, मग तो दीनानाथांच्या पुण्यतिथीचा असो, बाळासाहेबांना मिळालेल्या ‘डी. लिट.’चा समारंभ असो, हॉस्पिटलचे उद्घाटन असो वा आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यावर घरी आयोजित केलेल्या सत्काराचा कार्यक्रम असो, मला त्यांनी नेहमीच निमंत्रित केले. मा. बाळासाहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटलो, त्या प्रत्येक वेळी मला प्रकर्षाने जाणवत गेले, की या प्रतिभावंत कलाकाराकडे आहे एक अनोखी चिकित्सक नजर, कोणत्याही कामात अचूकता, परिपूर्णता कशी येईल याचा सदोदित ध्यास, प्रचंड वाचनातून आलेली प्रगाढ विद्वत्ता, पण त्याबरोबरच आलेलं कमालीचं साधेपण. उगीच नाही भारतरत्न लता मंगेशकर त्यांना ‘साधू पुरुष’ असे संबोधतात.

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AWIOCR
Similar Posts
स्वरसम्राज्ञी २८ सप्टेंबर हा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
शहंशाह-ए-गज़ल गज़लसम्राट मेहदी हसन यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘रसराज’ पंडित जसराज तसं म्हटलं तर शेवटच्या श्वासापर्यंत गात होते. ८९व्या वर्षी ‘सवाई’ त गायले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील त्यांच्या घरी पोहोचले. मग सारं जग ‘करोना’मय झालं. तरी यांचं ऑनलाइन शिकवणं सुरूच होतं. १७ ऑगस्ट २०२०ला त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला. ‘जसराज’ नावाचं एक
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language