Ad will apear here
Next
बळीराजाला बळ देणारी संस्था
आज बलिप्रतिपदा आहे. त्या निमित्ताने ‘लेणे समाजाचे’ सदरात माहिती घेऊ या यवतमाळमधील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कार्याबद्दल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी आधार देण्यापासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठीदेखील ही संस्था काम करते.
..........शेतकरी आत्महत्यांचे देशातील सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. कर्जबाजारीपणा हे आत्महत्येचे एक प्रमुख कारण आहे. समाजाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची आत्महत्या हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. सरकारी कर्जमाफी हा एक मार्ग आहेच, पण समाजाचे काय? समाजानेही या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यातून सावरण्यासाठी मदत केली पाहिजे या विचाराने यवतमाळमधील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने आपल्या समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचाही कणा असलेल्या शेतकरी या घटकासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
२००६पासून संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांद्वारे त्यांना शैक्षणिक, व्यावसायिक मदत केली जाते आणि मानसिक आधार देण्याचेही काम केले जाते. तसेच शेतकरी आत्महत्या होऊच नयेत, यासाठीदेखील संस्था काही कार्यक्रम राबवत आहे.

संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेऊन त्याआधारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले. कुटुंबावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन व त्यांना इतर कोणत्याही प्रकारे मदत मिळालेली नाही याची खातरजमा करून संस्थेने अशा चारशे कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. त्या कुटुंबांचे सर्व प्रकारे पुनर्वसन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. संस्था या कुटुंबांना विविध स्तरावर मदत करत आहे.

शैक्षणिक मदतशैक्षणिक कार्य :
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करणे, तसेच त्यांना तांत्रिक,  व्यवसाय शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम संस्था करते. संस्थेच्या ‘विवेकानंद छात्रावास’मध्ये आणि तेजस्विनी सेवा समितीच्या ‘तेजस्विनी कन्या छात्रावास’मध्ये अशा कुटुंबातील मुलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. स्वतःच्या गावात राहूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही ही संस्था करते.
पालकांच्या आत्महत्येमुळे शालेय शिक्षणाचा मार्ग बंद होण्याची वेळ आलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेच्या मदतीने पुढे सुरू राहिले. त्यातील काही जणांनी बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळविले आणि आज ते सर्व जण विविध शाखांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
 
व्यावसायिक मदत :
शेतकऱ्याची आत्महत्या व शेतीवर असलेले कर्ज यामुळे त्याच्या कुटुंबाने आपला आर्थिक आधारच गमावलेला असतो. या कुटुंबांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी संस्था प्रयत्न करते. त्यांना वेगवेगळे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेकडून मदत व प्रोत्साहन दिले जाते. संस्थेने यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे. ही कुटुंबे आता स्वावलंबी झाली असून, सन्मानाने जगत आहेत. यातील काही जणी आपल्या व्यवसायातून इतर गरजू महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम करत आहेत.
 
मानसिक आधार :
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या कार्यकर्त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. संस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या एका तालुक्यातील अशा सर्व कुटुंबांची एक बैठक आयोजित करून, त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार संस्था आपला कार्यक्रम निश्चित करते. संस्थेच्या भाऊबीज कार्यक्रमातून महिलांना गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.

शेती सुधारणा कार्यक्रम :
आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठीही संस्था काम करते आहे. शेततळी, लघु बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करते. नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करून त्याचे प्रशिक्षण देण्याचे काम संस्था करते. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक बियाण्याचा पुरवठा संस्थेकडून केला जातो. शेतीतील लागवडीचा खर्च कमी करण्यासाठीदेखील संस्थेतर्फे विविध प्रयोग केले जातात.
संस्थेने लोकसहभागातून पाथरी गावातील तीन बंधाऱ्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असूनही गावातील शेती उत्पादनात वाढ झाली. दुष्काळी परिस्थितीत मदतीचा हात ठरू शकतील अशा शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

पारधी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य
अपराधीपणाचा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या प्रगतीसाठी संस्था १९९७पासून म्हणजे स्थापनेच्या काळापासूनच काम करत आहे. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने विवेकानंद विद्यार्थी वसतिगृह सुरू केले आहे. दुर्गम भागातील पारधी वस्तीत राहणाऱ्या पारधी लोकांना आरोग्य सेवा पुरवता यावी यासाठी संस्था फिरते रुग्णालय चालवते. तसेच, मुलांसाठी बालसंस्कार केंद्र, आरोग्य शिबिर, रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आदी उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. बालसंस्कार केंद्रात पारधी समाजातीलच सुशिक्षित महिला शिक्षिकेचे काम करतात. मुलांना चांगल्या सवयी लावण्याचे व त्यांच्यात चांगली मूल्ये रुजवण्याचे प्रयत्न या केंद्रात केले जातात.
केशव आरोग्यरक्षकांमार्फत वस्तीतील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती यासाठी जनजागृती केली जाते. आता संस्थेने महिला आरोग्य व बालकांचे कुपोषण याविषयी प्रबोधन करण्यासाठी महिला आरोग्यरक्षकांची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे.
सामाजिक कार्यासाठी संस्थेला २०१४मध्ये अंत्योदय पुरस्कार व २०१५मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे.

समाजाकडून मदतीची अपेक्षा :
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न आता एवढा बिकट बनला आहे, की केवळ सरकारी योजना, कर्जमाफी यातून तो सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी समाजानेही हातभार लावला पाहिजे. वैयक्तिकरीत्या आपल्याला काही करता आले नाही, तरी दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळासारख्या संस्थांना मदत करून आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. संस्थेच्या या कामासाठी आपण देणगी स्वरूपात मदत करू शकतो.
एका निराधार शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी पन्नास हजार रुपये, एका विद्यार्थ्याच्या एका वर्षाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी दहा हजार रुपये, तर एका विद्यार्थ्याचे एका वर्षाचे पालकत्व घेण्यासाठी वीस हजार रुपये अशी देणगी आपण देऊ शकता. यासाठी आपण ‘दीनदयाळ शेतकरी विकास प्रकल्प’ या नावाने धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट काढू शकता. ही देणगी प्राप्तिकर विभागाच्या ‘कलम ८०जी’नुसार करसवलतीस पात्र आहे.

संपर्क :
प्रदीप वडनेरकर, अध्यक्ष : ७७४१९ ४३४०६
विजय कद्रे, सचिव/प्रकल्पप्रमुख : ९८९०२ १७३८७
धनंजय चौहान, उपाध्यक्ष : ७०८३८ ९०४२७

वेबसाइट : http://www.deendayalvidarbha.org/

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTYBH
 Help me
 मि शेतकरी आहे माझ्या जवळ दोन एकर शेती आहे शेती बदल सरकारी धोरण चांगले नसल्यामुळे शेती परवडत नाही आहे मला माझ्या परिवाराला जगोन्या करीता रोज मजुरीची फार गरज आहे मला काही तरी काम द्या हि विनंती मु.पो.पोहा.ता.कारंजा जि.वाशिम पिन कोड 444105 मो 9921019869
 मि एक गरीब शेतकरी हाय आमच्या कडे मागील वर्षी दुबार पेरणी केली पण चारा सुधा आला नाही व शेती करता बैल पण नाही व कर्ज पण वाढत हाय जर तुम्ही काही मदत करणार तर बर होईल माझा फोन नंबर 9579714190
Similar Posts
विकलांगांच्या आशेचा किरण ‘रसिकाश्रय’ विकलांगांचे सामाजिक पुनर्वसन करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रसिकाश्रय’ ही संस्था झटत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विकलांगांच्या समस्येबरोबरच पाणी, स्वच्छता यांसारख्या सामाजिक समस्यांवरदेखील काम केले जाते. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज जाणून घेऊ या ‘रसिकाश्रय’ बद्दल... ......
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
अनाथ, वंचितांच्या विकासासाठी झटणारे हरी ओम बालगृह अहमदनगर जिल्ह्यातील हरी ओम बालगृह ही संस्था अनाथ, वंचितांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ लोकसहभाग व इच्छाशक्ती यांच्या जोरावर ही संस्था अडथळ्यांवर मात करत आपले कार्य नेटाने करते आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज जाणून घेऊ या टाकळी खंडेश्वरी या गावातील हरी ओम बालगृह या संस्थेविषयी
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language