Ad will apear here
Next
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन
नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
.............
डॉ. सतीश धवन
२५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगरमध्ये डॉ. सतीश धवन यांचा जन्म झाला. धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. त्यांनी गणित, भौतिकशास्त्रात बीए, इंग्रजी साहित्यात एमए, बीई आणि १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एमएस केले. १९५१ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, विमान विद्याशास्त्र व गणितात पीएचडी केली. 

शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ अशी ओळख निर्माण केलेल्या डॉ. सतीश धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधनाची सुरुवात केली. त्या काळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावरील शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. श्लिकटिंग यांच्या ‘बाउंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय. १९५९-६१ दरम्यान डॉ. कलामांना वायुयान विकास संस्थेत (एडीई), हॉवरक्राफ्टच्या विरुद्ध दिशांनी फिरणाऱ्या पंख्यांचा आराखडा बनवताना अडचण आली. आपल्या संचालकांच्या अनुमतीने ते भारतीय विज्ञान संस्थेत जाऊन ते धवन यांना भेटले. रोज एक तासाप्रमाणे १० शनिवार १० व्याख्याने त्यांनी डॉ. कलामांना दिली. व्याख्यानापूर्वी प्रश्न विचारून ते विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व उपयायोजनक्षमता पारखून घेत. 

१९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी डॉ. धवन यांची झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली. डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर ‘इस्रो’ला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले. १९८० साली, बंगलोरमधील ‘इस्रो’च्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुसऱ्या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या साह्याने आगामी १५ वर्षांतील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपणयाने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता. 

डॉ. धवन मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत. १० ऑगस्ट १९७९ रोजी कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली; पण पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही डॉ. धवन यांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुसऱ्या प्रक्षेपणयानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमणकक्षेत नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. 
त्यांनी सहकाऱ्यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला. या प्रकारात वरिष्ठांनी कनिष्ठांशी कसे वागावे याचा आदर्श ‘धवन सर’ असल्याचे कलमांना वाटे. १९८१ साली डॉ. धवन यांना पद्मविभूषण व डॉ. कलाम यांना पद्मभूषण देऊन देशाने गौरविले. 

१९८०पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय. १९९९मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ डॉ. सतीश धवन यांना लाभला. ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रो’च्या केंद्राचे नाव सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले. डॉ. धवन यांची समस्येविषयीची आस्था व कार्यातील वस्तुनिष्ठता या नेतृत्वगुणांचा गौरव पंतप्रधान वाजपेयी यांनी केला होता. डॉ. सतीश धवन यांचे ३ जानेवारी २००२ रोजी निधन झाले.
.........
अरविंद देशपांडे
३१ मे १९३२ रोजी अरविंद देशपांडे यांचा जन्म झाला. सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या दोघांचे नाट्यवेड कमालीचे टोकाचे होते. त्यामुळे तर त्यांची ओळख झाली. १९६०मध्ये सुलभा कामेरकर या सुलभा देशपांडे झाल्या आणि पुढे हे दाम्पत्य विलक्षण पद्धतीने शेवटपर्यंत नाटक जगले.

अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघेही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचने पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठ्या जमा झाल्यावर सुलभाताई त्यांना म्हणाल्या, ‘या चिठ्ठ्या घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं.

विजय तेंडुलकरांची नाटके अरविंद देशपांडे दिग्दर्शित करीत होते, तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केले. एक दिवस ‘रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. 

अरविंद यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडीस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचे तिचे स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअॅलिस्टिक पातळीवर येते. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’

अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ग्रंथ ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केला आहे. अरविंद देशपांडे यांचे तीन जानेवारी १९८५ रोजी निधन झाले.
..........
जॉय अॅडम्सन
२० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये जॉय अॅडम्सन यांचा जन्म झाला. आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणाऱ्या या लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या. एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन प्राणिसंग्रहालयाला देऊन एक तिने आपल्याजवळ ठेवला आणि तिचे नाव ‘एल्सा’ ठेवलं आणि तिला अगदी आपल्या घरातच वाढवले. पुढे तिची पूर्ण वाढ होऊन एल्सालाही छावे झाल्यावर ती त्यांना भेटत राहिली. त्या सर्व अनुभवांवर जॉय अॅडम्सनने तीन पुस्तके लिहिली ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरेव्हर फ्री.’

बॉर्न फ्रीची कथा आहे एल्सा सिंहीण आणि तिचे पालक जॉय आणि जॉर्ज अॅडम्सन या जोडप्याची. केनियाच्या जंगलात जंगलरक्षक असलेल्या जॉर्जने एकदा त्याच्या अंगावर चालून आलेल्या सिंहांवर स्वसंरक्षणार्थ रायफल चालवली आणि सिंह-सिंहीण ठार झाल्यावर त्याला दिसले ते या जोडीचे तीन छावे. या पिल्लांच्याच संरक्षणासाठी सिंह जॉर्जवर चालून गेले होते.

मग या तीन छाव्यांना जॉय आणि जॉर्जने वाढवले. त्यातलीच एक एल्सा. तिला आणि तिच्या भावंडांना वाढवताना आलेल्या अनुभवांवर अॅडम्सनने बॉर्न फ्री हे अनुभवकथनपर पुस्तक लिहिले आणि पुढे दिग्दर्शक जेम्स एच. हिल्स याने या जोडप्याच्या विलक्षण अनुभवांवर याच नावाचा सुंदर चित्रपट काढला.

एल्सा आणि तिची दोन भावंडे अॅडम्सनच्या घरातच लहानाची मोठी होतात. त्यापैकी दोघांची रवानगी रॉटरडॅमच्या प्राणिसंग्रहालयात केली जाते; पण एल्सा त्यांच्याबरोबरच राहत असते. दररोज धमाल मस्ती, जॉर्ज वा जॉयबरोबर भटकंती ही तिची दिनचर्या; पण तिचा खेळकरपणा इतरांना महाग पडत असतो.

एकदा ती हत्तींच्या कळपाच्या पाठी लागल्याने बिथरलेले हत्ती तिथल्याच एका गावात शिरतात, वस्तीची पार वाताहात करतात. या नासधुशीला कारणीभूत ठरलेल्या मस्तीखोर एल्साला आता एक तर जंगलात सोडायचे नाही तर प्राणीसंग्रहालयात पाठवायचे अशी वेळ ओढवते. त्या वेळी जॉय मनसोक्त बागडणाऱ्या, स्वच्छंद एल्साला जंगलात सोडायचा निर्धार करते.

पण, अॅडम्सन कुटुंबात एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे वाढलेल्या एल्साला जंगलचा कायदा, शिकारीच्या तऱ्हा कोण शिकवणार? वन्य प्राण्यांना आत्मसंरक्षणाचे, शिकारीचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळत असते. एल्सा तर पोरकी असते. शेवटी जॉयच तिला प्रशिक्षण देते, शिकार कशी करायची ते शिकवते, जंगलातील वास्तव्यासाठी तयार करते. एल्साची जंगलात पाठवणी करून जॉय आणि जॉर्ज तिचा जड अंतःकरणाने निरोप घेतात.

एल्सा जंगलात टिकाव धरेल का, इतर सिंह तिला स्वीकारतील का अशा अनेक प्रश्नांचे काहूर त्यांच्या मनात उठलेले असते; पण वर्षभराने लंडनहून परतलेल्या या दोघांना एल्सा पुन्हा भेटते, ओळखते. मधल्या काळात एल्साचे जंगलाशी आणि तिथल्या सिंहांशीही नाते जुळलेले असते. तिच्याबरोबर तिचे तीन छावेही असतात.. या सगळ्या अनुभवांवरील पुस्तक म्हणजे बॉर्न फ्री.

ही तिन्ही पुस्तके जगभर तुफान गाजली आणि त्यावर सिनेमे निघाले. पुढे त्यांनी चित्त्याचे ‘पिप्पा’ नावाचे एक पिल्लूही पाळले आणि त्या पिप्पाच्या जीवनावर ‘दी स्पॉटेड स्फिंक्स’ हे पुस्तक लिहिले. तेही लोकप्रिय झाले. बिबट्यांसंबंधी त्यांनी लिहिलेले ‘क्वीन ऑफ शेबा’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘दी सर्चिंग स्पिरीट’ हे त्यांचे आत्मचरित्रसुद्धा गाजले होते. तीन जानेवारी १९८० रोजी एका माथेफिरूने भोसकून जॉय अॅडम्सन यांची हत्या केली.

(माहिती संकलन : संजीव वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXUCI
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
प्रसाद ओक, पॅरिस हिल्टन प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर, डीजे व उद्योजिका पॅरिस हिल्टन यांचा १७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language