Ad will apear here
Next
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले
समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
प्रा. मधू दंडवते
२१ जानेवारी १९२४ रोजी प्रा. मधू दंडवते यांचा जन्म झाला. ‘साधी राहणी, उच्च विचारसणी’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. मधू दंडवते. कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात आणताना विरोधकांची होणारी बोचरी टीका हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहून सहन करणारे ‘आधुनिक युगातील महात्मा’ दंडवतेच होते...!!! 

प्रा. मधू दंडवते यांनी कोकणात समाजवादी बालेकिल्ला उभारला. कोकणात समाजवादी विचारसरणी काही काळ रुजली आणि फोफावलीही. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.

अर्धशतकाहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिलेले समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती. १९७१ ते १९९० एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. विनोद व बोचरा उपरोध असणारी त्यांची संसदेतील भाषणे सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर कठोर टीका करणारी असत. १९७८ साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, १९८९ साली व्ही. पी. सिंग सरकारमध्ये अर्थमंत्री आणि १९९० साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले होते. ध्येयवादी, स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून दिल्लीत इतर राजकीय नेत्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप होती. 
रेल्वेमंत्री असताना काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील रेल्वेत लाकडी फळ्या बदलून त्यावर दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले.

भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल, तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील. १९७७मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेंना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरीब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात. 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दंडवते म्हणाले होते, ‘मला फर्स्ट क्लासचे महत्त्व कमी करायचे नाही. मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे.’

अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने प्रा. मधू दंडवतेंना पराभूत केले. कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दंडवतेंना देशाचा पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालून आली होती. राज्यसभेतून निवडून जाऊन पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर विनम्रतापूर्वक पंतप्रधानपद नाकारताना ते म्हणाले होते, ‘मागच्या दरवाज्याने (राज्यसभेतून निवडून जाऊन) पंतप्रधानपद स्वीकारणे मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारले. तिथेच माझे राजकरण संपले.’

देशाच्या अर्थमंत्रिपदी असलेले दंडवते मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले. कारण दंडवतेंनी राजकरणातून स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कधी पैसा उभारू दिला नाही. त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. मधू दंडवते यांचे १२ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.
.........
शांताराम आठवले
२१ जानेवारी १९१० रोजी शांताराम आठवले यांचा जन्म झाला. शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमध्ये झाले. बेबंदशाही, शिवसंभव यांसारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करून ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह. ना. आपटे यांची व आठवलेंची पत्रमैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह ‘एकले बीज’ या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्यापाठोपाठ १९४० साली ‘बीजांकुर’ हा दुसरा संग्रह प्रसिद्ध झाला. सकाळ, स्वराज्य अशा वर्तमानपत्रांत, मनोहर, वाङ्मयशोभा यांसारख्या मासिकांमधून व शालापत्रक या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या भाग्यश्री या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले अमृतमंथन. 

शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले.  ताराम आठवले यांना ‘प्रभात’मध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहायक दिग्दर्शक अशी जबाबदारी सोपवण्यात आली. ‘अमृतमंथन’नंतर संत तुकाराम, कुंकू, गोपालकृष्ण, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, शेजारी, संत सखू, दहा वाजता आणि रामशास्त्री या प्रभातच्या चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. 

काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान मराठी चित्रपटगीतांचे आद्य कवी असे आहे. त्यांच्या अशा नावलौकिकामुळे त्यांना ‘प्रभात’च्या चालकांच्या परवानगीने भरतभेट, आपले घर अशा ‘प्रभात’बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली. यामध्ये भाग्यरेखा, बेलभंडार, झंझावात, वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा, आई मला क्षमा कर, पडदा, सुभद्राहरण, वावटळ या चित्रपटांचा समावेश आहे. 

शांताराम आठवले यांनी शांतिचिया घरा, बकुळफुले, वनातली वाट, कुंडलिनी जगदंबा, सुखाची लिपी, ओंकार रहस्य आणि प्रभातकाल यांसारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली. याशिवाय त्यांच्या भावकविता, चारोळ्या, बालगीते यांसारखे वाङ्मयदेखील लोकप्रिय ठरले आहे. शांताराम आठवले यांचे दोन मे १९७५ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZNGCI
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रसाद ओक, पॅरिस हिल्टन प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर, डीजे व उद्योजिका पॅरिस हिल्टन यांचा १७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language