
नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
कैद्यांना संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया, ई-कॉमर्स आदींचे ज्ञान मिळावे आणि शिक्षेनंतर त्यांना रोजगारासाठी त्याचा उपयोग व्हावा, म्हणून ही लॅब सुरू करण्यात आली आहे. कोर्सेससाठी तीनशे कैद्यांनी नावनोंदणी केली आहे.
खून, जन्मठेप, बॉम्बस्फोट आदी विविध प्रकारचे गुन्हे केलेले तीन हजारांहून अधिक कैदी नाशिक रोड कारागृहात आहेत. त्यामध्ये निम्मे पक्के (शिक्षा सुनावलेले) कैदी आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना रोजगार करता यावा, व्यवसाय सुरू करता यावा, ताठ मानेने जगता यावे हा त्यामागील उद्देश आहे. कैद्यांना फक्त कम्प्युटर ट्रेनिंगची कमतरता होती. ती आता दूर झाली आहे. अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पोलिस उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) दिलीप झळके यांचे मार्गदर्शन यासाठी उपयुक्त ठरले.
कारागृहाच्या ग्रंथालयात ही लॅब सुरू करण्यात आली असून, समता फाउंडेशनने तीस कम्प्युटर, तसेच कम्प्युटर टेबल्स, खुर्च्या आणि प्रशिक्षक या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणकाची दुरुस्ती, देखभालदेखील ही संस्थाच करणार आहे. तसेच संस्थेने नामवंत सॉफ्टवेअर कंपन्यांशी करार केला असून, त्यांच्यामार्फत कैद्यांना कारागृहातच कामही मिळवून दिले जाणार आहे.
लॅबच्या उद्घाटनासाठी समता फाउंडेशनचे संचालक मधुसूदन अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल खास हेलिकाप्टरने आले. कार्यक्रम संयोजनासाठी प्रशिक्षक, तज्ज्ञांसह तीस कर्मचारी त्यांनी सोबत आणले होते. पोलिस उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) दिलीप झळके, अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी पल्लवी कदम, यशवंत फड, श्यामराव गीते, प्रदीप बाबर, प्रशांत पाटील, कैलास कुसमोडे, अभिजित कोळी, ज्ञानेश्वर पाटील संदीप सरपाते आदी या वेळी हजर होते. ही संस्था देशभरातील कारागृहांना टीव्ही, महिला कैद्यांच्या मुलांना खेळणी, कैद्यांना मोफत वकील देते. आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम राबवते. ग्रामीण व शहरी भागात हे उपक्रम राबविले जातात.