Ad will apear here
Next
रुक जाना नहीं, तू कहीं हार के...
वेध या कार्यक्रमात बोलताना डॉ. शारदा बापटबीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका  स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. पियानोचे सूरही छेडले आणि आता शाश्वत शेतीचा ध्यासही त्यांनी घेतला आहे. आपल्या बहुरंगी बुद्धीला त्यांनी आपल्या परिश्रमानं आणखी फुलवलं. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज त्यांचीच प्रेरक गोष्ट...
............
वर्षभरापूर्वी शारदा बापट या स्त्रीशी माझी ‘पुणे वेध’ या कार्यक्रमात भेट झाली. सौम्य व्यक्तिमत्त्वाची, हसतमुख, साध्या पांढरट सुती साडीतली तिची मूर्ती एकदम भावून गेली; मात्र तिचं साधेपण, तिचं सौम्य व्यक्तिमत्त्व किती वादळी आहे याची प्रचितीही काहीच वेळात आली. शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. माणूस कधीही आपल्या इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर काहीही साध्य करू शकतो, हे ती तिच्या कृतीतून सांगत होती. असं जगावेगळं तिनं काय केलं, याचं उत्तर तिच्या प्रवासात मिळतं; मात्र हा खडतर प्रवासही तिनं अतिशय प्रसन्नपणे, हसत हसत केला हे विशेष!

शारदा बापट यांच्या मातोश्री

इतर सगळ्या सर्वसामान्य मुलींप्रमाणेच शारदानं इंग्रजी विषय घेऊन बीए केलं. पुढे एलएलबी करून ती कायद्याची पदवीधरही झाली. यथावकाश नरेंद्र नावाचा योग्य मुलगा भेटला आणि लग्नही झालं. संसार सुरू झाला. या संसाराच्या जबाबदाऱ्या पेलत असताना मुलगा झाला. एकीकडे हे सगळं सुरू असताना, शारदाचं मन मात्र तिच्या आईमध्ये गुंतलेलं असायचं. शारदा आठवीच्या वर्गात असल्यापासून तिची आई सतत आजारी असायची. आपल्या आईला नेमकं काय झालंय, याचं कारण शारदाला सापडायचं नाही. आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं, तिला होणारा नेमका त्रास कशामुळे होतोय, हे आपल्याला कळायला हवं या विचारांनी ती अस्वस्थ होत असे; मात्र शारदाची अस्वस्थता फक्त विचारांपुरती सीमित राहिली नाही. 

शारदा बापट यांचे आई-वडील

एका अस्वस्थ क्षणी शारदानं निर्णय घेतला आणि आपण वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायचा, असं ठरवलं. कला शाखेत शिक्षण झालेल्या आणि वयाची पस्तिशी गाठलेल्या शारदानं आईचं आजारपण आणि उत्सुकता या दोन गोष्टींपोटी चक्क डॉक्टर व्हायचं ठरवलं. निर्णय पक्का होताच शारदानं त्या दृष्टीनं हालचाल करायला सुरुवात केली. शारदानं कला शाखा घेऊन बारावीची परीक्षा त्या वेळी दिली होती. त्या गोष्टीला बरीच वर्षंही झाली होती. डॉक्टर होण्यासाठी आता विज्ञान विषय घेऊन पुन्हा एकदा बारावीची परीक्षा देणं गरजेचं होतं. ही परीक्षा देताना पुन्हा शून्यापासून विज्ञानाचा अभ्यासही करावा लागणार होता. शारदानं महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि उच्च शिक्षण मंडळाच्या कार्यालयात चकरा मारायला सुरुवात केली. तिला कुणाकडूनच नीट समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. प्रत्येक वेळी ‘एकदा बारावी झाल्यावर पुन्हा बारावी करता येणार नाही,’ अशा प्रकारची उत्तरं मिळून तिला घरी जाण्याविषयी सांगण्यात येत होतं. शारदाच्या जागी दुसरं कोणीही असतं, तरी त्यानं/तिनं कंटाळून नाद सोडला असता; पण शारदानं चिकाटीनं आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तिनं एके दिवशी थेट संचालकांची भेट घेतली आणि आपल्याला विज्ञान विषय घेऊन पुन्हा एकदा बारावी करायचं असल्याचं ठामपणे सांगितलं. संचालकांनी तिला बारावी करता येईल असं सांगितलं; मात्र त्यासाठी कुठल्या तरी सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं. 

डॉ. आनंद नाडकर्णी आणि लेखिका दीपा देशमुख यांच्यासह शारदा बापट

शारदा आनंदानं बाहेर पडली खरी; पण अडथळे संपलेले नव्हते. पुण्यातल्या ज्या एसपी कॉलेजमध्ये तिचं शिक्षण झालं होतं, त्याच कॉलेजमध्ये जाऊन तिनं प्रवेशासंबंधी चौकशी सुरू केली; मात्र इथे तसं काही करता येणार नाही, असं सांगून तिला तिथून घालवून देण्यात आलं. प्रवेश घेणं आवश्यक होतं आणि आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश नाकारला जात असेल, तर दुसरीकडे काय होणार हा विचार क्षणभर शारदाच्या मनात डोकावला; पण तो विचार तसाच झटकून तिनं हुजूरपागा या शाळेचा रस्ता पकडला. शारदाचं शालेय शिक्षण पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत झालं होतं. त्याच शाळेत आता कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्गही सुरू झालेले होते. शारदा तिथल्या प्राचार्यांना जाऊन भेटली. आपली वैद्यकीय शिक्षणाची तीव्र इच्छा तिनं बोलून दाखवली आणि तिला तिथं प्रवेश देण्यात आला; मात्र प्रवेश मिळण्यासाठी ‘एसपी कॉलेजमधून एनओसी घेऊन आलीस, तर प्रवेश मिळू शकेल,’ असं तिला सांगण्यात आलं होतं. मग परत एसपी कॉलेजच्या चकरा सुरू झाल्या. सुरुवातीला एसपी कॉलेजनं एनओसी वगैरे काही मिळणार नाही असंच सांगितलं. मग शारदा त्या वेळचे प्राचार्य श्री. मोडक यांना जाऊन भेटली. त्यांना तिची तळमळ समजली आणि त्यांनी तिला ताबडतोब एनओसी देण्याची व्यवस्था केली. शारदा एनओसी घेऊन हुजूरपागा कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचली आणि तिनं रीतसर प्रवेश घेतला. आपल्याला विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा द्यायचीय, डॉक्टर व्हायचंय, असं तिनं घरात सगळ्यांना सांगितलेलं असलं, तरी सगळ्यांना ते खरं वाटलं नव्हतं; मात्र प्रत्यक्ष हुजूरपागा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शारदा आपल्या वर्गात नियमित उपस्थित राहू लागली, हे बघून ‘हिला वेड तर लागलं नाही ना’ असंच सगळ्यांना वाटायला लागलं. बरं, कॉलेजमध्येही इतर मुली आणि शारदा यांच्या वयातलं अंतरही बरंच होतं. पहिल्या दिवशी तर ती वर्गात आली, तेव्हा सगळ्यांना ती प्राध्यापकच आहे असं वाटलं; मात्र जेव्हा ती इतर मुलींसोबत बसली, तेव्हा इतरांच्या डोळ्यांत आश्चर्य उमटलं. शारदाच्या मृदू स्वभावानं मात्र इतर मुली आणि तिच्यातलं अंतर काहीच दिवसांत मिटून गेलं. तिची सगळ्यांबरोबरच छान गट्टी जमली. घरातली सगळी कामं करत, आपल्या मुलाकडे बघत नंतर धावतपळत कॉलेज गाठणं असं चक्र सुरू झालं. विषयातली गोडी वाढू लागली. बारावी करत असतानाच शारदानं आपल्याला मेडिकलला प्रवेश मिळू शकेल ना, याचीदेखील चौकशी करायला सुरुवात केली होती. पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या डीनना भेटून तिनं चौकशी केली; पण त्यांच्याकडून तिला नीटशी माहिती कळाली नाही. या वयात पुन्हा बारावी पास होऊन डॉक्टर होण्याच्या भानगडीत कशाला पडतेस, अशाच प्रकारचे सल्ले तिला याही काळात सगळीकडून ऐकायला मिळत होते; पण चिकाटीनं केलेल्या या प्रयत्नात एके दिवशी शारदाला वाडिया हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या अँजेल्स युनिव्हर्सिटी फाउंडेशन या फिलिपिन्समधल्या एका आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉलेजची माहिती डेव्हिड पिल्ले यांच्याकडून मिळाली. 

कुटुंबीयांसह शारदा बापट

बारावी झाल्यानंतर या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची खात्री शारदाला वाटायला लागली; मात्र याच वेळी एक मोठा आघात शारदावर झाला. ज्या आईसाठी हे सगळं तिनं करायला घेतलं होतं, ती हे जग सोडून कायमची निघून गेली. आपल्या आईच्या मृत्यूनं शारदाची मनःस्थिती खूप वाईट झाली. एक प्रकारचा सुन्नपणा आला. या दिवसांत शारदाचा नवरा नरेंद्र यानं तिला मानसिक आधार दिला. ‘आई नसली, तरी तू तिच्यासाठी बारावीची परीक्षा द्यायलाच हवीस,’ असं सांगून त्यानं तिला तयार केलं. शारदानं आपलं दुःख गिळून बारावीची परीक्षा दिली आणि त्यात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णदेखील झाली. 

शारदानं मेडिकलच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू केली. एकूण अभ्यासक्रमातली दोन वर्षं फिलिपिन्स देशात राहून शिक्षण पूर्ण करण्याची अट त्या संस्थेत होती. एक परका देश, परकं वातावरण, आपलं म्हणावं असं तिथे कोणीही नाही, असं असतानाही डॉक्टर व्हायचंय या ध्येयानं झपाटलेल्या शारदानं आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फिलिपिन्सला जाण्यापूर्वी तिनं आपल्या घरात आपण नसल्यावर काय काय अडचणी येऊ शकतात याचा विचार करून आपल्या मुलाला आणि नवऱ्याला अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांचं कुठलंही काम तिच्यावाचून अडू नये यासाठी तिनं त्या दोघांना चक्क ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. अल्पावधीतच दोघांनीही घरातली कामंच नव्हे, तर स्वयंपाकही शिकून घेतला. या सगळ्यांत एक गंमतच झाली. शारदाचा नवरा नरेंद्र यानं एका आठवड्याचा कुकिंगचा कोर्स केला. त्या वेळी पुरुष या क्षेत्रात अभावानंच दिसत. त्यामुळे त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या दुसऱ्याच पानावर नरेंद्रचा स्वयंपाक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला. त्याखालचा मथळा होता, ‘लूक हू इज कुकिंग!’ त्या बातमीनं घरात धडाधड फोन यायला सुरुवात झाली. काही फोन कौतुकाचे, तर काही टोमणे मारणाऱ्या स्वरातले होते! अर्थातच, या कुठल्याही गोष्टींचा परिणाम आता शारदाच्या कुटुंबातल्या कोणावरही होणार नव्हता!

शारदा फिलिपिन्सला पोहोचली. तिथं पोहोचल्यावरही तिच्या मार्गात अनेक अडचणी उभ्या होत्याच. कुठली ना कुठलीतरी कागदपत्रं लागत होती आणि त्या कागदपत्रांमुळे तिला फिलिपिन्स ते दिल्ली, फिलिपिन्स ते पुणे अशा चकराही माराव्या लागल्या. त्यात एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हवं होतं. हे प्रमाणपत्र मिळतानाही अनेक अडचणी आल्या. मुळात शारदानं दोन वेळा बारावी केली, हेच कोणाच्या पचनी पडत नव्हतं; पण अखेर तेही प्रमाणपत्र भारतातून हातात पडलं आणि पुढला मार्ग सुकर झाला.  

सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे शारदानं आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जरा हुश्श केलं. शारदाला तिथं शाकाहारी जेवण मिळण्यातही खूप अडथळे आले. तसंच थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलला खूप महत्त्व असल्यानं शारदाचे कामाचे तास खूप होते. कधी कधी तर सलग ३६ तासांची ड्युटीही करावी लागायची; मात्र या काळात शारदानं ‘आपल्याला झेपत नाहीये, जमत नाहीये’ असे विचारही मनात येऊ दिले नाहीत. ‘आपल्याला जेवढं मिळेल तेवढं शिकायचं आहे,’ हाच एक विचार तिनं मनात पक्का केला. शारदाला जेव्हा साप्ताहिक सुट्टी असायची, तेव्हा इतर मुलंमुली कुठे पिकनिकला जा, खरेदीला जा, चित्रपट पाहा, अशा गोष्टींत आपली सुट्टी व्यतीत करायची; मात्र अशा गोष्टींत शारदाला रस नव्हता. या सुट्टीला कसं कारणी लावायचं या विचारात असताना एके दिवशी शारदाला भेटायला तिचा नवरा नरेंद्र आणि मुलगा फिलिपिन्सला आले. तेव्हा त्यांनी माउंट पिनॅटुबो व्होल्कॅनो या ज्वालामुखीच्या पर्वताला भेट दिली. ही जागा पर्यटकांचं खास आकर्षण असलेली आहे. फिलिपिन्स हा ७१०० छोट्या-छोट्या बेटांचा बनलेला देश आहे. तिथं अनेक फ्लाइंग स्कूल्स आहेत. वाहतुकीसाठी आकाशात कायम विमानांचं विहरणं पाहायला मिळतं. तिथून जवळच विख्यात असा क्लार्क इंटरनॅशनल विमानतळही आहे. हे सगळं बघितल्यावर एके दिवशी शारदा थेट फ्लाइंग स्कूलमध्ये जाऊन पोहोचली. आपल्याला वैमानिक (पायलट) व्हायचं असल्याचं सांगून तिनं तिथं रीतसर प्रवेश मिळवला. हा अनुभव तिच्यासाठी विलक्षण आनंद देणारा होता. विमान हवेत उडवणं, एका वेगळ्या स्वावलंबनाचे, आत्मविश्वासाचे धडे देत होतं. हे प्रशिक्षण घेत असताना शारदासमोर अनेकदा संकटंही आली. हवेत, जमिनीपासून उंच असताना अपघात होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना परिस्थिती कशी हाताळली पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे ती शिकली. कुठलीही परिस्थिती समोर आली, तरी गोंधळून न जाता संयम बाळगला तर तिच्यावर उपाय शोधता येतो, ही गोष्ट शारदाच्या लक्षात आली. याच गोष्टींमुळे एकदा तर शारदाचा विमान अपघात होता होता टळला. अनुभव आपल्याला परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात, हेही शारदाच्या लक्षात आलं. काहीच दिवसांत शारदा वैमानिकाची सगळी तंत्रं आत्मसात करून एक कुशल वैमानिक झाली. वैमानिक झाल्याचं प्रशस्तिपत्र जेव्हा तिच्या हातात पडलं, तेव्हा त्याचा आनंद शब्दातीत होता. यथावकाश शारदानं आपलं वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केलं. आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं. तोपर्यंत शारदाचं वय ४२ वर्षं झालं होतं. शारदानं पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधितांची भेट घेतली. आता रुबी हॉस्पिटल आणि घर अशा दोन्हीही ठिकाणी तिनं आपली प्रॅक्टिस सुरू केली. घरी प्रॅक्टिस करताना शारदाला जवळचे, ओळखीचे लोक गृहीत धरायचे. त्यामुळे कुठल्याही वेळी ते हक्कानं आपल्या समस्या घेऊन तिच्याकडे यायचे. अशा वेळी-अवेळी येणाऱ्यांमुळे कामाचं चक्र तर विस्कळीत व्हायचंच; पण मनावरचा ताणही वाढायचा. अशा परिस्थितीत ठाम राहून ‘नाही’ कसं म्हणायचं, ही कठीण गोष्टही शारदा शिकली.

हे सगळं सुरू असतानाच शारदानं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर्स या विषयातलंही ज्ञान संपादन केलं. कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमा घेतल्यावर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनदेखील तिनं ‘डेटा सायन्स’ या कंपनीत काम करायला सुरुवात केली. यामुळे तिचं याही विषयातलं ज्ञान उपयोगात येत आहे. हे सुरू असतानाच शारदाला संगीताची आवड असल्यानं तिनं ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन’च्या पियानोवादनाच्या परीक्षा देऊन त्यातही तज्ज्ञता मिळवली. शारदासाठी पियानोवादन हा तिच्या आनंदाचा भाग आहे. 

एवढं सगळं झाल्यावर, डॉक्टर होण्याचं ध्येय साध्य झाल्यावर शारदानं गप्प बसायला हरकत नव्हती; पण तिच्यातलं कुतूहल, चिकाटी आणि परिश्रम करण्याची वृत्ती यामुळे तिचं मन शाश्वत शेती या क्षेत्राकडे वळलं आणि त्यातलीही खोलात शिरून माहिती घेऊन तिनं शाश्वत शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. अन्न, वायू आणि पाणी यांच्या प्रदूषणासंदर्भात ठोस धोरण असण्याची गरज शारदाला वाटते. त्यासाठी लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचं तिचं मत आहे. शारदा बापट या स्त्रीचा हा प्रवास थक्क करणारा आहे. विख्यात मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींच्या मते बुद्धिमत्ता ही एकपदरी गोष्ट नाही. आपण बुद्धीचं परंपरागत मापन करतो आणि आपल्या मर्यादित क्षमतांचा विचार करतो; पण या सगळ्या पलीकडे एक वेगळी बुद्धिमत्ता असते. ६० प्रकारच्या बुद्धिमत्तांमध्ये काही रंगांबरोबर, काही सुरांबरोबर, काही माणसांबरोबर, तर काही यंत्रांबरोबर असतात. काही माणसांमध्ये तर बहुरंगी बुद्धिमत्ता असते; मात्र अनेक वेळा आपली चौकटीतली शिक्षणव्यवस्था अशा बहुरंगी बुद्धिमत्तेला छाटून टाकते. आपण पालकही अनेकदा आपल्या मुलांना ‘एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर’ वगैरे सल्ले देतो आणि अशा सल्ल्यांमुळे आपण आपल्या मुलांमध्ये असलेल्या बहुरंगी बुद्धीचं बोन्साय करून टाकतो. या बहुरंगी बुद्धीला आपण योग्य खतपाणी, योग्य वाव दिला तर ती वेगळ्या रीतीनं समोर येईल. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शारदा बापट या स्त्रीनं तिच्यातल्या बहुरंगी बुद्धीचं बोन्साय होऊ दिलं नाही. एकीकडे कायद्याचं ज्ञान, दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स,  तिसरीकडे वैद्यकीय शाखेतलं ज्ञान आणि चौथीकडे संगीताचं ज्ञान आणि याबरोबरच शाश्वत शेतीचा घेतलेला ध्यास हे सगळं सगळं एकरूप झालेलं पाहायला मिळतंय. या सगळ्यात विमानाची लय आणि पियानोचे सूर गुंफले जाऊन ‘अवघाचि रंग एक झाला’ असंच म्हणावं लागेल. 

शारदा बापट यांनी आपल्या बहुरंगी बुद्धीला आपल्या परिश्रमानं आणखी फुलवलं. दाही दिशांमध्ये विहरणारे आपले पंख छाटले नाहीत. कधीही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ केला नाही. शारदा बापट यांच्या प्रयत्नांना, त्यांच्यातल्या चिकाटीला, त्यांच्यातला कुतूहलाला, त्यांच्यातल्या आनंदी वृत्तीला, त्यांच्यातल्या झपाटलेपणाला मनापासून सलाम! 

ई-मेल : shardabapat@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZOYBV
Similar Posts
श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न! आपला मुलगा ऑटिस्टिक आहे, हे समजल्यानंतरही पुण्यातील श्रीकृष्ण गोडबोले आणि त्यांच्या पत्नीनं वास्तव स्वीकारून वाटचाल करायचं ठरवलं. श्रीकृष्ण यांनी नोकरी सोडून स्वतःची फॅक्टरी सुरू केली आणि त्यात मानसिक विकलांग, अपंगांनाही कामाची संधी दिली. त्यांना जणू आपल्या कुटुंबातच सामावून घेतलं. अशा मुलांसाठी आणखीही बरंच काही करण्याची त्यांची इच्छा आहे
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए... ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ असा विचार करणारे अनेक तरुण आज तयार होत आहेत, ही देशाच्या दृष्टीनं सुदैवाची गोष्ट आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट गावचा संतोष भूमकर हा तरुण पोलीस अधिकारीही त्यापैकीच एक. स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या संतोषने आपल्या
किसी का दर्द मिल सके तो ले उधार... पुण्यातल्या कर्वेनगरमधलं नंदादीप हे पाळणाघर कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालवलं जातं. नंदा बराटे या महिलेनं १९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या पाळणाघराची कीर्ती आज सगळीकडे पसरलीय. मुलांना सांभाळण्यापासून शिस्त लावण्यापर्यंत आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नंदाताई आपुलकीनं करतात. ‘अनवट
संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवणारा राजू कुठल्याही विषयातलं शिक्षण खूप महत्त्वाचं असतंच; मात्र फक्त शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीत बदल करायचा असला, तर संवाद जास्त महत्त्वाचा आहे. हेच ओळखून राजू इनामदार हा कार्यकर्ता गेली २५ वर्षं कार्यरत आहे. किशोरवयीन मुलांचं वा प्रौढांचं मानसिक आरोग्य असो, त्यांचे लैंगिकतेचे प्रश्न

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language