Ad will apear here
Next
विज्ञानप्रसारासाठी दोन नव्या सरकारी वाहिन्या
डीडी सायन्स आणि इंडिया सायन्स या वाहिन्यांचे लोकार्पण


नवी दिल्ली :
आजचे युग विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची विज्ञानाबद्दलची समज वाढविणे आणि नव्या पिढीमध्ये विज्ञानातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे ही आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने विज्ञानाला वाहिलेल्या डीडी सायन्स आणि इंडिया सायन्स या हिंदी भाषेतील दोन वाहिन्या सुरू केल्या आहेत. डीडी सायन्स ही वाहिनी दूरदर्शनवरून दिसणार असून, इंडिया सायन्स ही ऑनलाइन वाहिनी आहे.

डीडी सायन्स हे चॅनेल म्हणजे दूरदर्शनच्या राष्ट्रीय चॅनेलचाच भाग असून, दर आठवड्यात रविवार वगळता दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत या चॅनेलचे प्रसारण केले जाणार आहे. इंडिया सायन्स ही वेबसाइट असून, त्यावर काही लाइव्ह कार्यक्रम, तर काही रेकॉर्डेड कार्यक्रम पाहायला मिळतील. विज्ञानावर आधारित डॉक्युमेंट्री, स्टुडिओतील चर्चा, विज्ञानविषयक संस्थांमध्ये आभासी सफर, मुलाखती, शॉर्टफिल्म्स अशा प्रकारचे कार्यक्रम या दोन्ही वाहिन्यांवरून प्रसारित केले जाणार आहेत. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असलेली विज्ञान प्रसार ही स्वायत्त संस्था आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते या दोन वाहिन्यांचे लोकार्पण १५ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्लीत करण्यात आले. ते म्हणाले, ‘एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात विज्ञानाचे वातावरण तयार करणे ही आत्यंतिक गरज आहे. या उद्दिष्टाची पूर्ती ही दोन्ही चॅनेल्स करतील. डीटीएच आणि इंटरनेट या माध्यमातून ती चॅनेल्स उपलब्ध असतील. नागरिकांना विज्ञान समजून घ्यायला ही चॅनेल्स मदत करतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करायचा, हेही त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकेल.’

‘गेली दोन वर्षे यासाठी काम सुरू होते. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांसाठी आणि खास करून लहान मुले आणि युवा वर्गासाठी विज्ञानावर आधारित दर्जेदार साहित्यनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने समाजाला, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी  हे कार्यक्रम नक्की उपयुक्त ठरतील,’ असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. 

‘सध्या एका तासाच्या कार्यक्रमांपासून सुरुवात झाली आहे. तो कालावधी वाढवत चार तास, सहा तास, बारा तास आणि अंतिमतः ‘२४ बाय ७’ अशी संपूर्णतः विज्ञानाला वाहिलेली वाहिनी सुरू केली जाणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. आशुतोष शर्मा म्हणाले, ‘विज्ञान प्रसारासाठीची ही दोन नवी चॅनेल्स विज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहेत. देशभरातील वैज्ञानिक संस्थांमध्ये दर्जेदार संशोधन होत आहे. या कामाची फळे सामान्य माणसापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्या कामात ही दोन चॅनेल्स मदत करतील, असा विश्वास आहे.’

‘डीडी सायन्सवरील कार्यक्रम सुरुवातीला हिंदी भाषेत असतील. पुढे ते स्थानिक प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केले जाणार आहेत,’ असे ‘दूरदर्शन’च्या महासंचालिका सुप्रिया साहू यांनी सांगितले. 

विज्ञानाच्या विविध शाखा
‘इंडिया सायन्स’वर विज्ञानाच्या विविध शाखांना वाहिलेले व्हिडिओज आहेत. शाळकरी मुलांना विज्ञानाच्या संकल्पना समजण्यासाठी आवश्यक व्हिडिओजपासून कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, कम्प्युटर, इंटरनेट, इंजिनीअरिंग, आरोग्यविज्ञान अशा विविध विषयांवरील माहिती, व्हिडिओज या वेबसाइटवर आहेत. विज्ञानविषयक बातम्या, तसेच खास महिलांसाठीही काही विज्ञानविषयक माहिती यावर आहे. गणित, नवे शोध, विविध क्षेत्रांत विज्ञानाचे उपयोग, विविध संशोधकांच्या कहाण्या यांचाही यात समावेश आहे. एकंदरीत विज्ञान या विषयातील जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, ही वेबसाइट असल्याने इंटरनेट असलेल्या कोणत्याही उपकरणावरून यातील माहिती/व्हिडिओ पाहणे शक्य होणार आहे. ‘इंडिया सायन्स’वरील कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीत असून, या नावाचे अॅपही गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

(इंडिया सायन्स वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZOMBW
Similar Posts
पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला राष्ट्रीय पातळीवरील कायाकल्प पुरस्कार नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र खासगी रुग्णालयांमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प २०१९’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’ नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे
मधुबनी चित्रांनी सजणार जपानी रेल्वेगाड्या नवी दिल्ली : लवकरच जपानमधील रेल्वेगाड्या भारतीय मधुबनी (मिथिला) चित्रशैलीतील चित्रांनी सजलेल्या दिसल्या, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण या मधुबनी चित्रांच्या सौंदर्याची भुरळ जपानलाही पडली आहे. भारतीय रेल्वेप्रमाणे आपल्या रेल्वेगाड्याही मधुबनी चित्रांनी सजवण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. त्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language