Ad will apear here
Next
चैतन्यस्पर्श
पालघर येथील ज्योतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मविषयक लेखक सचिन मधुकर परांजपे यांना आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात ध्यानातून, प्रत्यक्ष भेटीतून जे अनुभव आले, ते त्यांनी वाचनीय स्वरूपात ‘चैतन्यस्पर्श’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडले आहेत. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
..........
‘समग्र विश्वाशी आपण तदाकार झालो ही भावना एकदा का दृढ झाली, की मग माऊलींनी सांगितल्याप्रमाणे मुंगीचंही मनोगत जाणता येतं बाबा... अवघड काही नाही. सगळे आपले मित्र होतात. जात, धर्म, पंथ, योनी असं काही उरतच नाही बघ. तुला गंमत सांगतो... सतत ध्यानातच राहायचं. आणि सतत आपल्या आसपासच्या विश्वातील ऑब्जेक्ट्सचा अभ्यास करायचा. पेशन्स सोडायचा नाही. तुला मी कधीतरी त्राटक शिकवेन नाथसंप्रदायाचं... मग काय होतं? आसपासच्या चराचर सृष्टीत आपल्या नेहमीच्या नजरेला जे दृष्टीगोचर होतं, त्यापलीकडे चाललेल्या हालचाली आणि स्पंदने दिसू लागतात... सजीव निर्जीव सृष्टीतल्या अगम्य घटना समजू लागतात.. प्राणी-पक्ष्यांच्या मनात काय चाललंय ते कळतं. आता हेच बघ ना! आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’

‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’

‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे. तो पण तपश्चर्या करतो. मी त्याला गमतीने बापूसाहेब म्हणतो...’ इतकं बोलून तो धुनीतील लाकडं नीट करू लागला.

...ते अरण्य तसं बऱ्यापैकी गूढच होतं. झाडांची खूप दाटी नसली तरीही एक विचित्र काळोखी वातावरण जाणवत होतं. घनदाट जंगलात नेहमी जाणवणारा एक किर्रऽऽ आवाज सतत येत होता, विशिष्ट किडे करतात तो आवाज. सकाळचे साडेनऊ वाजले असावेत, ज्वारीची भाकरी, साजूक तुपात खमंग भाजलेले मक्याचे दाणे, कांदा आणि काल रात्रीचा शिळा झुणका अशी मजबूत न्याहारी करून आम्ही निघालो. पुढे तो आणि मागे मी...त्याची चालण्याची गती माझ्या शंभरपट होती; पण तरीही मला सोपं वाटावं म्हणून तो आरामात चालला होता. ‘सावकाश रे बाबा, इथे जंगलात जमिनीवर काटेकुटे फार असतात. तुझ्या त्या चामड्याच्या चपला इथे काही कामाच्या नाहीत,’ असं म्हणणारा तो अनवाणीच होता.... ‘जरा वेगाने चल..बापूसाहेब पुन्हा साधनेत गेले की मग भेट व्हायची नाही.’ आम्ही वेग वाढवला....पाचेक मिनिटांत जांभळाचा एक अवाढव्य वृक्ष दिसला...तो पुढे झाला आणि झपकन डावीकडे वळला...

एक जुना वृक्ष उन्मळून पडलेला होता आणि त्याचा पसारा सर्वत्र पसरलेला होता. तो वृक्ष पडूनही खूप काळ लोटला असावा कदाचित. कारण, आता फक्त फांद्या, काटक्याच शिल्लक होत्या...त्याने त्या पसाऱ्याकडे बघून हाळी घातली,

‘बापूसाहेब....बापूसाहेब’ दोन मिनिटं आम्ही स्तब्ध होतो...आणि अचानक समोर सळसळ झाल्यासारखी झाली.... मी इथे-तिथे बघत होतो..आवाज एक्झॅक्टली कुठून आला ते समजलं नाही मला. याने मला खूण केली आणि समोर बघायला सांगितलं...समोर आडव्या पडलेल्या एका अजस्र फांदीवर तो डौलाने उभा होता.... पिवळसर वर्ण, लांबसडक, मूठभर रुंदीचं शरीर असलेला तो भुजंग दोनेक फूट उंच फणा काढून अतिशय डौलाने आमच्या दिशेनेच मान वळवून बघत होता.... अधूनमधून त्याची ती काळसर जीभ मुखातून बाहेर येत होती... नकळत माझे हात जोडले गेले. हा साप आहे, त्याला हात कशाला जोडायचा? असल्या सायन्टिफिक गोष्टी मनावरून पुसल्यासारख्या झाल्या होत्या.... ‘बापूसाहेब’ अशी हाक मारल्यावर तो बाहेर येतो? त्याला काय कुत्र्यासारखे कान आहेत का ऐकायला? काहीही.... माझ्या मनात द्वंद्व सुरू झालं....

याने माझ्या खांद्यावर हात टाकला, ‘त्याला ऐकायला येत नाही; पण त्याच्या जाणिवा तुझ्यापेक्षा तीव्र आहेत. मी ‘बापूसाहेब’ अशी हाक मारायला आणि तो यायला एकच गाठ पडली. त्याला ऐकू येत नाही; पण त्याला तुझ्यापेक्षा जास्त आकलन आहे...तीव्र. काय बापूसाहेब बरोबर की नाही?’ हे बोलताक्षणी त्याने तिथून ‘स्सsss’ असा जोराने फुत्कार टाकला. तो इतका तीव्र होता की माझ्या अंगावर सर्र्कन काटाच आला....

‘बाबा, कानाने ऐकणं, तोंडाने बोलणं, नाकाने श्वास घेणं, त्वचेने स्पर्श अनुभवणं हे मानवी ज्ञान आहे. जे योग्य आणि तर्कशुद्धही आहे; पण जाणिवांच्या कक्षा यापलीकडेही रुंदावलेल्या असतात यावर तुमचं विज्ञान विश्वास ठेवत नाही ही खरी गोम आहे.... एखाद्याला भेटण्याची तीव्र इच्छा झाली की तो मनुष्य अनपेक्षितपणे अचानक दोन तासांत समोर उभा ठाकतो, हे कोणत्या इंद्रियाचं काम रे? पडलेली स्वप्नं जशीच्या तशी दिसतात हे कोणतं इंद्रिय? पोराच्या भेटीसाठी बापाचा जीव तळमळत असतो, आणि पोराची भेट झाली की बाप प्राण सोडतो? हे काय आहे... अरे, पंचज्ञानेंद्रियांपलीकडेही खूप काही आहे.... तुला एक गंमत सांगतो, मनुष्याला जे ज्ञान योगमार्गाने आत्मसात करावं लागतं आणि मग ध्यान-धारणा व समाधी या मार्गाने तो पुढे जातो ते ज्ञान सर्प आणि हत्ती या दोघांना उपजतच असतं बरं का...त्यांच्या त्यांच्या परीने ते साधना करत असतात. हे रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे...’ हे ऐकत असताना माझी एक नजर बापूसाहेब नामक त्या सर्पराजांवरच होती....

‘ए अरे बाबा, बापूसाहेब हे मी त्याला गमतीने म्हणतो रे... त्याची साधना खूप आहे. तो शिवसाधक आहे. नीट निरखून बघ त्याच्या अंगाकडे. कसलं दिव्य तेज आहे की नाही?....आता तू म्हणशील त्याला कुठे मंत्र तंत्र येतंय? त्याला शब्द, भाषा येत नाही; पण शिव हे एक तत्त्व आहे आणि तत्त्वाचा अभ्यास व साधना करण्याची असंख्य तंत्रं आजही अस्तित्वात आहेत. मंत्रसाधना हे आपलं मनुष्यांचं तंत्र आहे. तसं यांचं निराळं तंत्र आहे. तत्त्वाशी सामिप्य साधणं आणि एकतानता आणणं हे मात्र कॉमन’

त्या सर्पाच्या शरीरावर अधूनमधून काही राखाडी रंगाचे डाग दिसत होते... ‘ते भस्म आहे,’ तो म्हणाला. मी त्यावर काहीच बोललो नाही. थोडा वेळ झाला....आणि त्या सर्पराजांनी पुन्हा फुत्कार केला. त्यावर हा म्हणाला, ‘बापूसाहेब, दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद... आपण निघालात तरी हरकत नाही’ हे बोलणं ऐकल्यासारखं करावं तसा तो सर्पराज आल्यासारखा निघूनही गेला....त्याचा वेग आणि चपळाई जबरदस्त होती...

‘प्रत्येकाचा प्रवास हा मोक्षाकडेच सुरू असतो बाबा...तुझा, माझा आणि बापूसाहेबांचाही. प्रश्न हा आहे की वेग किती घ्यायचा, कधी घ्यायचा, एकाच ठिकाणी मुक्काम किती ठोकायचा? गिअर कधी बदलायचा? हे ज्याचं त्यानं ठरवायचंय.... तुम्ही गाडी कितीही सावकाश हाका, किंवा एका जागी उभी करून ठेवा...गाडीचं तोंड ‘वन वे’सारखं मोक्षाच्याच दिशेने असतं, हे विसरू नये आपण.... काय? आज ना उद्या प्रत्येकाला साधना करायची आहेच. लवकरात लवकर मायेच्या तावडीतून सुटका करून घेतात आणि साधना सुरू करतात ते श्रेष्ठ जीव..’ इतकं बोलून त्याने विडी शिलगावली आणि तो झपाझप चालू लागला...

(सचिन मधुकर परांजपे यांचे ‘चैतन्यस्पर्श’ हे पुस्तक किंवा ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZSDCH
Similar Posts
चैतन्यस्पर्श : सचिन मधुकर परांजपे (अभिवाचन व्हिडिओ) पालघर येथील ज्योतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मविषयक लेखक सचिन मधुकर परांजपे यांना आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात ध्यानातून, प्रत्यक्ष भेटीतून जे अनुभव आले, ते त्यांनी वाचनीय स्वरूपात ‘चैतन्यस्पर्श’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडले आहेत. त्या पुस्तकातील एका उताऱ्याच्या, परांजपे
प्रकाशपुत्र रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language