प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर, डीजे व उद्योजिका पॅरिस हिल्टन यांचा १७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... .........
प्रसाद ओक
१७ फेब्रुवारी १९७५ रोजी प्रसाद ओक यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत. प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती.
रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो सारेगमप या झीच्या रिअॅलिटी शोचा. प्रसाद ओक यांच्या आई संगीत विशारद आहेत; पण प्रसाद ओक कधीच गाणे शिकले नाही, त्यांना उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळाली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातनं केली होती, ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसाद ओक यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनले. एका वाहिनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते.
आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो, वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसाद ओक यांनी सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःचे फॅनफॉलोइंग निर्माण केले आहे. नांदी या नाटकात त्यांनी रुक्मिणीची भूमिका केली होती. नांदीचे एकूण १०० प्रयोग केले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘नांदी’ या संगीत नाटकांतील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या, ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे.
........
पॅरिस हिल्टन१७ फेब्रुवारी १९८१ रोजी पॅरिस हिल्टनचा जन्म झाला. सामाजिक काम, चित्रपट व मालिकांतील भूमिका, गाण्याचे अल्बम, स्वतःच्या नावाचे पर्फ्यूम, अमली पदार्थांच्या सेवनामुळं शिक्षा.... अशाच अनेक गोष्टींमुळं पॅरिस हिल्टन कायम चर्चेत असते. अमेरिकेतील ‘हिल्टन हॉटेल्स’चे मालक कोनार्ड हिल्टन यांची पॅरिस ही नात. वयाच्या १९ व्या वर्षीच तिनं जाहिरात क्षेत्रात पदार्पण केलं व तिला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. लिओनार्डो दी कॅप्रिओ व ऑस्कर होया या अभिनेत्यांबरोबच्या संबंधांमुळं तिचं नाव मनोरंजन क्षेत्रातही गाजलं. ‘द सिंपल लाइफ’ या तिच्या ‘रिअॅलिटी शो’च्या पूर्वसंध्येला २००३ मध्ये तिची सेक्सटेप प्रसिद्ध झाली. याचा सर्वाधिक फायदा तिच्या शोला मिळाला. पुढच्याच वर्षी तिचं ‘कन्फेशन ऑफ ए हेअरस्’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि गाजलंही.
‘हाउस ऑफ वॅक्स’ हा २००५ मध्ये प्रदर्शित चित्रपट व गाण्याचा अल्बम ‘पॅरिस’ यांमुळे ती चर्चेत राहिली. ‘पॅरिस हिल्टन्स माय न्यू बीएफएफ’ या २००९ मध्ये सुरू झालेल्या ‘रिअॅलिटी शो’मुळे तिचं नाव घराघरात पोचलं. तिला ‘फोर्ब्स’ मासिकानं संपत्तीसाठी, तर ‘मेन्स वर्ल्ड’ मासिकानं ‘हॉट’ असण्यासाठी गौरवलं आहे. जगभरात ‘पॅरिस हिल्टन स्टोअर्स’ या नावानं ४२ आउटलेट असून, त्यातून तिला मिळणारं उत्पन्न आहे एक कोटी डॉलर! ताज्या आकडेवारीनुसार तिचं उत्पन्न आहे १० कोटी डॉलर.
पॅरिसनं २००६ मध्ये लहान मुलांसाठी इस्पितळ उभं केलं. इराक व अफगाणिस्तानमध्ये लढणारे सैनिक, जपानमधील भूकंपपीडितांनाही तिनं मदत केली आहे. मात्र, वेगानं गाडी चालवून नियम तोडणं व ड्रग्जसेवनाबद्दल तिला अनेकदा शिक्षा झाली आहे. ऑगस्ट २०१० मध्ये कोकेनसेवनाबद्दल तिला एका वर्षाची शिक्षा झाली. बेधुंद जगणारे, प्रकाशझोतात राहण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे अनेक जण आहेत, अशा ‘संस्कृती’ची पॅरिस ही प्रतिनिधी आहे. पॅरिस हिल्टन आपल्या सौंदर्य आणि अदाकारीने अनेक तरुण चाहत्यांचा ‘वीक पॉइंट’ आहे. ती इतर सेलिब्रिटींपेक्षा अधिक ‘सोशलाइट’ असल्याने तिच्या वेगवेगळ्या उपक्रमांतील सहभागाबद्दल त्यांना उत्सुकता लागलेली असते.
माहिती संकलन : संजीव वेलणकर