Ad will apear here
Next
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला...
चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती म्हणून त्या कशा दिसल्या अन् जाणवल्या याचे स्वानुभवकथन त्यांनी केले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. 
..........
आक्कांसारख्या दु:खानं, काळजीनं, कष्टानं खूप स्त्रिया आजवर पिचल्या असतील. त्यांनीसुद्धा अपमान गिळून, दु:ख गिळून मुलांना वाढवलं असेल. संसार चालवले असतील; पण प्रतिभेची अशी वीज अंगात बाळगून त्याचा दाह, चटका दुसऱ्याला न जाणवता, कवितेची फुलंच फक्त दुसऱ्याच्या ओंजळीत टाकणाऱ्या एकमेव आक्काच.

माझ्या मैत्रिणी, नातेवाईक, आक्कांच्या काव्याचे चाहते, हटकून मला एक प्रश्न विचारत. ‘आक्का केव्हा लिहितात?’ त्या प्रश्नाचा रोख असा असायचा, की त्यांची लेखनाची काही ठरलेली वेळ असते का? त्या लेखनासाठी त्यांना एकांत हवा असतो का? काही ठरावीक वातावरण असावं लागतं का? कधी लेखनाच्या, विचाराच्या तंद्रीत असल्या, तर त्यांना अवतीभोवती चाललेल्या बोलण्याचा, लोकांच्या अस्तित्वाचा त्रास होत असे का? या सर्व प्रश्नांचं उत्तर साधं-सोपं-सरळ होतं, की ‘नाही.’ 

कधी त्या पत्र लिहीत असत, कधी कविता लिहीत असत, कधी वाचत असत; पण मूडबद्दल म्हणाल, तर मात्र एकदाही कवी लोकांचा जो मनस्वी, विशिष्ट असा मूड असतो म्हणतात, तसा मी कधीही पाहिलेला नाही. घरातल्या कोणीच पाहिलेला नाही. केव्हाही तुम्ही त्यांना साधं, कुणी आलंय म्हणून जरी बोलावलं, तरी त्यांनी कधीही कुरकुर केली नाही. शांतपणे पदर सावरत हातातलं काम नीट बाजूला ठेवत खोलीच्या बाहेर येत.

एक विचार मला नेहमी सतावतो तो असा, की एकीकडे दिवसभराची घरातली कामं, मग नोकरी, घरी आल्यावर पुन्हा उरकून टाकायचं काही शिल्लक राहिलेलं काम असंच काहीबाही, कधी पाहुणे आलेले असणार, त्यांची ऊठबस, कधी पैशांची विवंचना असणार, कधी कोणाबरोबर दु:खदायक, तापदायक, गैरसमज झालेले असणार. एकीकडे मनात दु:खाचा, भावभावनांचा तो लसलसता कोंब, मनातलं ते उकळतं, उसळतं रसायन असणार, प्रतिभेची कारंजी फवारत असणार; पण आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांना ते कधी दिसलं नाही.

ही कसली किमया असावी? जवळपासच्या लोकांना शांतपणे काम निपटणाऱ्या आक्का दिसायच्या. हे सारं आपोआप घडत असेल, की स्वत:ला आवरण्याची, सावरण्याची, समजवण्याची एखादी जादू आक्कांजवळ होती?

‘किती उठली वादळे, किती सावट दाटले
किती ताणले तणावे, किती काहूर माजले
किती सोसले, साहिले, किती टाकिले गिळून
कात उलटून टाकिली, मन मोकळे कोवळे
आता त्याची न जाणीव, नाही तीही आठवण
उन्हावारियाची मूस कशी वेल्हाळ सळसळे’

अशी किमया त्यांना कशी साधली होती?

जीवनात अनंत दुःख, वंचना, अपमान त्यांच्या वाट्याला आले. मान-सन्मानही आले; पण भावजीवनाची राखरांगोळी झाली तरी त्या राखेतून, ‘फिनिक्स पक्षी नाही’, तर ही ‘वेल्हाळ तुळस’ आपल्या नाजूक मंजिऱ्या अंगावर लेऊन डोलत राहिली.

आक्कांच्या लेखनाला काही विशिष्ट वातावरण, काळ-वेळ असं बंधन नव्हतं, हे खरंच; पण आपल्या काव्यनिर्मितीला काय हवं असतं ते त्यांनी कवितेतच शब्दबद्ध केलंय...

हवा झुकता काजवा काळ्याशार अंधारात,
ब्रह्महृदय सुजाण हवे उभे खिडकीत,
हवा जरा वाऱ्यासंगे ओल्या गवताचा गंध,
पाखरांची नीज जशी हवी तशी रात्र धुंद,
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला,
हवी चांदण्याची वाळू ओळीवरी शिंपायाला

ह्या सर्व काळात आक्कांच्या आयुष्यात वेगळ्याच तऱ्हेनी; पण स्थित्यंतरं झाली. त्यांना आर्थिक स्थैर्य, मानसिक स्थैर्य मिळालेलं होतं.

नातवंडांचे जन्म झाले. त्यांचं बालपण, त्यांचा आसपास वावर त्या अनुभवत होत्या. पाहुणे यायचे, त्यांच्याबरोबर आक्का समरस होऊन वेळ घालवायच्या. एकामागून एक पुरस्कार मिळाले, तसेच त्या निमित्तानं सत्कार झाले, एकामागून एक पुस्तकं प्रकाशित झाली. अशा अनेक घटनांनी आक्कांच्या स्थिर आयुष्यात थोडेथोडे तरंग उठत होते, तरी आक्कांचा स्थायीभाव स्थिर आणि शांत होता. आक्कांच्या स्वभावाची जी वैशिष्ट्यं सुरुवातीला मला जाणवली होती, ती कधीही कोमेजली नाहीत.

(‘आक्का, मी आणि...’ हे वीणा संत यांचे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)


(इंदिरा संत यांच्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांच्या ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘दारा बांधता तोरण’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZXACI
Similar Posts
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि
‘आक्का, मी आणि ....’ म्हणजे इंदिरा संतांना जाणून घेण्यासाठी नवा दस्तऐवज पुणे : कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. पुण्यात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ
सुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व बेळगाव : कवयित्री इंदिरा संत यांच्या स्नुषा वीणा रवींद्र संत यांनी ३५ वर्षांच्या सहवासात त्यांना उमजलेल्या इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्व ‘आक्का, मी आणि...’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केले आहे. इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला या पुस्तकाचे बेळगावमध्ये प्रकाशन झाले. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’ डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language