Ad will apear here
Next
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली...


चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते. काळाच्या ओघामध्ये चीनचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थान आणि महत्त्व निरनिराळे होते. परंतु, मुळातच चीनच्या व्यापाराची पाळेमुळे अतिशय घट्ट रुजलेली आहेत. चीनच्या व्यावसायिकतेचा आढावा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या, तिसऱ्या भागात घेण्यात आला आहे. 
.........

चीन म्हटले, की अफाट लोकसंख्या, विस्तीर्ण भूप्रदेश, जगाशी मोकळेपणे संवाद न साधता काहीसे कोषात राहण्याची परंपरा, साम्यवाद, अगम्य भाषा अशी वैशिष्ट्ये डोळ्यांसमोर येतात. तरीही चीनने उत्पादन, निर्यात या बाबतीत कमालीचे वर्चस्व निर्माण केलेले आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य, अभेद्य देशालाही तोडीस तोड टक्कर दिलीच आहे. शिवाय त्या देशालाही आपली दखल घ्यायला लावली आहे. चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते. काळाच्या ओघामध्ये चीनचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थान आणि महत्त्व निरनिराळे होते. परंतु, मुळातच चीनच्या व्यापाराची पाळेमुळे अतिशय घट्ट रुजलेली आहेत. 

‘सिल्क रोड’
‘सिल्क रोड’ किंवा ‘सिल्क रूट’ असे नाव कुठे ना कुठे ऐकलेले-वाचलेले असेल. चिनी व्यापाराची यशोगाथा सिल्क रोडच्या उल्लेखाविना अपुरी ठरेल. पूर्व युरोप ते चीन यांना जोडणारा मार्ग ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखला जातो. सिल्क रोड हा चीनच्या समृद्ध व्यापारी परंपरेचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक आहे. या मार्गाचा वापर प्रामुख्याने चीनमध्ये तयार होणारे सिल्क पाश्चिमात्य देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात असे. या मार्गाने आशिया खंडाला भूमध्य समुद्राशी जोडले. दीर्घ मार्ग व्यापणारा व्यापार या रोडच्या निमित्ताने वाढीस लागला. या मार्गावर व्यापाराची अनेक केंद्रे असल्याने प्राचीन काळी तेथे व्यापार निर्माण करण्यामध्ये त्याचे योगदान अनन्यसाधारण आहे. या मार्गाने विविध साम्राज्ये व राज्ये यांना एकमेकांशी जोडले. संस्कृती, आचारविचार, विशेष उत्पादने, नवे शोध यांची देवाणघेवाण केली. सिल्कच्या व्यापारामुळे त्याला सिल्क रोड हे नाव मिळाले. चीन तेव्हा विकत असलेले सिल्क युरोप आणि आशियामध्ये कमालीचे प्रसिद्ध होते. सिल्कबरोबरच चीन चहा, मसाले, साखर, यांचीही निर्यात करत असे. तसेच, व्यापारी संबंधांबरोबरच, निरनिराळ्या देशांमध्ये आर्थिक आणि राजकीय संबंधही प्रस्थापित होऊ लागले. चीनच्या व्यापाराच्या इतिहासाताला हा कालावधी हान राजघराण्याच्या राजवटीचा काळ म्हणून ओळखला जातो. या राजघराण्याने सिल्क रूटलगत निरनिराळ्या वस्तूंच्या व्यवसायाला चालना दिली. युआन राजवटीच्या काळात या मार्गाचे महत्त्व शिगेला पोहोचले होते.



१०० फूट लांब आणि २५ फूट रुंद अशा १२० टन माल आणि ६० जणांचा क्रू असणाऱ्या अवाढव्य जहाजांचा ताफा चीनने हिंदी महासागरात पाठवला. या जहाजातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी इंडोनेशिया, सिलोन, भारताचा पश्चिम किनारा इथे भेट दिली. चू ती या सम्राटाच्या कार्यकाळात चीनने भारतात, अरेबियात आणि पूर्व आफ्रिकेत असंख्य जहाजे, म्हणजेच ‘ट्रेझर शिप्स’ पाठवली. या देशांशी व्यापार वाढवणे, हे उद्दिष्ट यामागे होते. १४०५ साली पहिल्यांदा पाठवलेल्या ताफ्यामध्ये ३१७ जहाजे आणि २८ हजार चिनी होते. त्यांनी सिल्कचा व्यापार केला. बदल्यात जेम्स, लोकर, कार्पेट खरेदी केली. तसेच सिंह, बिबटे, अरबी घोडे असे प्राणी घेतले. 

चिनी लोकांमध्ये व्यवसायाची बीजे किती खोल मुरलेली होती, हे यातून जाणवते. त्या वेळी चीनचा व्यापारातला दबदबा आणि प्रभुत्व इतके होते, की चीनमधले तंत्रज्ञान, राहणीमान आणि जागतिक स्तरावरचा प्रभाव पाश्चिमात्यांपेक्षाही सरस होता. चीनचे शेती क्षेत्रही तितकेच भक्कम होते. अर्थव्यवस्था सर्वांत प्रगत होती. आशियामध्ये तर निर्विवादपणे चीन आघाडीवर होता.

घोडदौडीला ब्रेक
व्यापार करण्याच्या उद्देशाने जग पादाक्रांत करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चीनने पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत जगापासून काहीसे दूर राहण्यास सुरुवात केली. आधीच प्रगत आणि समृद्ध असणाऱ्या चीनला जगाकडून घेण्यासारखे फारसे काही उरले नसल्याचे वाटले आणि जगाशी आधी व्यापारी आणि पर्यायाने काहीसे सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या चीनने स्वतःच्याच कोषात रमण्यास सुरुवात केली. सांस्कृतिक आणि आर्थिक स्वावलंबन, कवाडे बंद करणारी व केंद्रीय राजकीय व्यवस्था यामुळे चीनने १५व्या शतकात जगाकडे जणू पाठ फिरवली. चीनमधल्या उच्चशिक्षित मंडळींनाही पाश्चिमात्य तंत्रज्ञानामध्ये आणि लष्करी क्षमतेमध्ये रस उरलेला नव्हता; ना त्यांना या देशांतील उत्पादनांची गरज भासत होती.

त्याचे परिणामही चीनला भोगावे लागले. चीनच्या आर्थिक वाटचालीच्या वेगावर टाच आली. १८२०मध्ये पश्चिम युरोपपेक्षा ३० टक्के जास्त जीडीपी असणारा चीन १९५०पर्यंत पश्चिम युरोपपेक्षा आघाडीवर असला, तरी आघाडीचे प्रमाण नक्कीच घसरलेले होते. १९०० साल उजाडल्यावर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर निरनिराळे देश या लाटेवर स्वार झालेले असताना चीनला मात्र त्यासाठी काही दशके वाट पाहावी लागली. 

पुन्हा भरभराट
व्यापार नसानसामध्ये भिनलेल्या चीनने या परिस्थितीवर यशस्वी मात केली आणि पुन्हा प्रगतीची वाट धरली. आता चीन किती सक्षम झाला आहे, हे आपण पाहतोच आहोत. उत्पादनाच्या क्षमतेवर आणि त्यामागच्या धोरणांवर चीनने स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. चीनमध्ये किती स्वस्त रकमेमध्ये उत्पादन केले जाते, हेही सर्वश्रुत आहे. 

याचे मुख्य कारण म्हणजे, सरकारने १९७०च्या दशकात राबवलेल्या सुधारणा. या सुधारणांमुळे चीनची दारे पुन्हा एकदा जगासाठी खुली झाली. अगोदर, चीनने थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) अजिबात थारा दिलेला नव्हता. नव्या सुधारणांमुळे मात्र ‘एफडीआय’चा मार्ग मोकळा झाला. २००१मध्ये चीनने जागतिक आरोग्य संघटनेत (डब्लूटीओ) सहभागी होण्याची तयारी दाखवल्यावर तर चीनला आता एकटे राहायचे नसल्याचे अवघ्या जगाला समजले. १९१३मध्ये चीनची निर्यात जीडीपीच्या केवळ १.२ टक्के होती. जगाशी असलेला व्यापार फक्त २० अब्ज डॉलर होता. या सुधारणा राबवण्यास सुरुवात झाल्यानंतर तो ५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढला.

आधुनिक चीनचे शिल्पकार
पाचशे वर्ष एकलकोंड्या राहिलेल्या चीनच्या प्रगतीच्या मागे तंग श्याओ फिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना आधुनिक चीनचे शिल्पकार म्हटले जाते. तंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने भूतकाळाच्या जाचक बेड्या मोडून काढल्या आणि प्रत्यक्षात उपयुक्त ठरतील अशा धोरणांचा अवलंब केला. त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी उद्युक्त केले. एखाद्याकडे पुरेशी जमीन नसेल तर सरकार त्याला जमीन कसायला देत असे. यामुळे शेतकऱ्याचे आणि परिणामी देशाचे उत्पादन वाढले. उद्योगांचा विस्तार करण्याच्या तंग यांच्या धोरणामध्ये संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व देण्यात आले. निकृष्ट प्रतीची उत्पादने बंद करण्यात आली. कन्झ्युमर गुड्सवर अधिक भर देण्यात आला. कारखान्यात काम करणाऱ्या मॅनेजरनी अधिकाधिक कार्यक्षम व्हावे आणि स्वतःची, कारखान्याची प्रगती करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. चीनचे एकटेपण दूर करण्यासाठी तंग यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी देशात तंत्रज्ञान आणि व्यापार यांचा ओघ सुरू केला. चीन पुन्हा एकदा एफडीआय स्वीकारण्यासाठी सज्ज झाला. तंग यांनी ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ (एसईझेड) विकसित केली. त्यांना भरपूर सवलती दिल्या. उद्योजकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिले.

तंग यांच्या या धोरणांमुळे चीनची अर्थव्यवस्था उभारी घेऊ लागली. विकासदर वाढला. औद्योगिक उत्पादनही वाढले. त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसून येऊ लागला. राहणीमान उच्च होऊ लागले. लोकांच्या सर्जनशीलतेला आणि उद्योजकतेला नवी प्रेरणा मिळाली.

आधीपासूनच चीनची लोकसंख्या अफाट असल्याने सर्वांना पुरेल इतके अन्नधान्य, इतर वस्तू यांचे उत्पादन घेण्याची सवय आणि कसब चीनला होते. त्यामुळे अंगभूत असलेली व्यापारी मानसिकता तंग यांच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे उत्तरोत्तर वाढत गेली. तिने किती उंची गाठलीय हे आज आपण पाहतच आहोत.

- गौरी देशपांडे
ई-मेल :
gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HXTQCO
Similar Posts
युरोपमध्येही ‘मेड इन चायना’ चिनी वस्तू भारताच्या कानकोपऱ्यात पोहोचल्यात... चिनी उत्पादकांनी भारतीय संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून सणासुदीसाठी लागणाऱ्या इत्थंभूत वस्तू बनवल्यात आणि भारताला निर्यात केल्यात... चायनीजच्या गाड्या अगदी खेड्यापाड्यांतही दिसून येतात... अशी आपली निरीक्षणे आणि अनेकदा तक्रार असते; पण सगळीकडे चिनी छाप असलेला भारत हा एकमेव देश नाही
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
चिनी माल स्वस्त का? चिनी वस्तू स्वस्त असतात, हे जणू समीकरणच तयार झाले आहे. महागाई भस्मासुरासारखी वाढत असल्याचे चटके आपल्याला सारखे बसत असताना, उत्पादनाची सगळी गणिते चीन जुळवतो तरी कशी? इतक्या स्वस्त दरामध्ये वस्तू विकणे चीनला शक्य तरी कसे होते, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे अतिशय स्वाभाविक आहे. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १२वा भाग
भारत चीनमधून काय काय आयात करतो? भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे; मात्र त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. चीनमधून भारत वेगवेगळ्या क्षेत्रांतील आयात करतो आणि त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या व्यापाराच्या वस्तुस्थितीचा आढावा घेऊ या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या पाचव्या भागात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language