ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता.
या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली. अभियानाअंतर्गत चांबळे (जि. पालघर) येथील आदिवासी शाळकरी मुलांनी शाळेच्या आवारात विविध रोपट्यांची लागवड केली. याशिवाय ‘प्रसाद चिकित्सा’च्या गणेशपुरी येथील अनुकंपा आरोग्य केंद्रामध्ये मोफत वैद्यकीय सेवाही पुरवण्यात आल्या. यामध्ये मोतिबिंदू तपासणीसह नेत्रशिबीर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी या सेवांचा समावेश होता.

या वेळी संस्थेमार्फत स्थानिक शेतकऱ्यांना विविध फळझाडांचे वाटप करण्यात आले. भिनार (जि. पालघर) गावातील ऐंशीपेक्षा जास्त महिलांनी एकत्र येऊन भजन गायन, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. चार ते सहा या वयोगटातील सुमारे २०० मुलांना ‘प्रसाद चिकित्सा’मार्फत दररोज सकस आहाराचे वाटप केले जाते. या सर्व मुलांनी गुरुमाई स्वामी चिद्विलासानंदांना शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक भेटकार्डे बनविली. ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे ३० अंगणवाड्यांचा यामध्ये सहभाग होता.

‘प्रसाद चिकित्सा’चे विश्वस्त उदयन भट म्हणाले, ‘स्वामी चिद्विलासानंद यांच्या आशीर्वादाने १९९४ साली ‘प्रसाद चिकित्से’ची सुरुवात झाली आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या तेवीस वर्षांपासून ही संस्था तानसा खोऱ्यातील जनसामान्यांशी निगडित राहून नावीन्यपूर्ण आणि शाश्वत विकास घडवणारे उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात आरोग्य सेवा, स्त्री सक्षमीकरण, शेतकरी विकास, कुपोषण निर्मूलन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. याद्वारे हजारो लोकांचा निरंतर विकास साधला जात आहे.’