
केवळ आशियात नव्हे, तर एकूणच आंतरराष्ट्रीय समुदायात भारताचा एक अग्रणी राष्ट्र म्हणून ठसा उमटविण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. चीन, रशिया या शेजारी देशांशी संबंध दृढ करीत असतानाच जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इस्राइल, अरब देश आदी देशांमध्ये पंतप्रधानांनी दौरे केल्याने भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत होण्यास मदत झाली आहे.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत ४८ परदेश दौऱ्यांत ५५ हून अधिक देशांना भेट दिली. त्यातून जागतिक माध्यमांना भारताच्या परराष्ट्र धोरणाची दाखल घ्यायला लावली. भारतीय विदेशनीतीला एक नवी गती आणि अधिक सुस्पष्ट दिशा मिळवून देण्याच्या या प्रयत्नांना जे यश मिळाले आहे, त्यात पंतप्रधानांनी अनेक जागतिक नेत्यांशी व्यक्तिगत संबंधांचे जे रसायन निर्माण केले आहे त्याचा मोठा वाटा आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींनी ठाम भूमिका घेत जागतिक पातळीवर भारताबद्दल विश्वास निर्माण केला आहे. ‘भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे’मधून अनय जोगळेकर यांनी प्रासंगिक लेखांमधून भारताच्या परराष्ट्रनीतीची वैशिष्ट्ये संदर्भासह उलगडली आहेत.
पुस्तक : भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे
लेखक : अनय जोगळेकर
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
पाने : २५९
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)