Ad will apear here
Next
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय
संस्कृत अभ्यासक, निवेदक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. बलदेवानंद सागर यांचे प्रतिपादन


रत्नागिरी :
‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू असून, ऑनलाइन व्यासपीठावर संस्कृतला वाहिलेली असंख्य पोर्टल्स आहेत,’ असे प्रतिपादन संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक, निवेदक आणि पत्रकार डॉ. बलदेवानंद सागर यांनी केले.

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६२व्या कालिदास स्मृती समारोहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत (एक मार्च २०१९ रोजी) ते बोलत होते. संस्कृत पत्रकारितेची विविध माध्यमांतील उदाहरणे त्यांनी दिली.

‘हिंदी ही राजभाषा आहे, राजव्यवहाराची भाषा आहे; मात्र ज्याप्रमाणे राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी आहेत, त्याप्रमाणे संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हायला हवी. ही मागणी संस्कृतप्रेमींनी लावून धरायला हवी. कारण ही देशाला जोडणारी भाषा आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर संस्कृतमधून बातम्या प्रसारित होतात, काही कार्यक्रमही होतात; मात्र संपूर्णपणे संस्कृतला वाहिलेल्या सरकारी वाहिन्या सुरू व्हायला हव्यात. त्यासाठीही संस्कृतप्रेमींनी सरकारकडे मागणी करायला हवी,’ असे डॉ. सागर म्हणाले. 

‘संस्कृत ही जगातील सर्वांत स्पष्ट भाषा आहे. १०२ अब्ज ७८ कोटी ५० लाख शब्द संस्कृतच्या शब्दकोशात आहेत. त्यामुळे ही सर्वाधिक शब्दसंख्येची भाषा आहे. संस्कृत ही सूत्रमय आणि गणिती व्याकरण असलेली भाषा असल्याने कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशयाचे वाक्य तयार करता येणे, हे संस्कृतचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतमधील वाक्यरचनेत शब्द उलट-सुलट झाले, तरी अर्थात फरक पडत नाही. ‘नासा’कडून झालेल्या प्रयोगावेळी अंतरिक्षात पाठवले गेले अन्य सर्व भाषांतील संदेश शब्दांचे क्रम बदलल्यामुळे अर्थहीन झाले होते. संस्कृत भाषेत पाठवलेले संदेश मात्र शब्दांचे क्रम बदलले तरी अर्थपूर्ण होते. नीट बोलता न येणाऱ्यांसाठी अमेरिकेत संस्कृत श्लोकांची स्पीच थेरपी वापरली जाते. संगणकाच्या अल्गोरिदमसाठीही संस्कृत जवळची भाषा आहे. त्या दृष्टीनेही बरीच वर्षे संशोधन होत आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे,’ अशी माहिती डॉ, सागर यांनी दिली. २०३४पर्यंत संस्कृतमधील परम संगणक तयार होणार असल्याचेही डॉ. सागर म्हणाले. 

डॉ. सागर म्हणाले, ‘उत्तराखंड, हिमाचल प्रदेशची द्वितीय भाषा संस्कृत आहे. अशा प्रकारे अन्य राज्यांनीही द्वितीय भाषा म्हणून संस्कृतची निवड करावी. देशातील अनेक संस्थांची ब्रीदवाक्ये संस्कृतमध्ये आहेतच; पण इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका या देशांच्या काही संस्थांचीही ब्रीदवाक्ये संस्कृतमध्ये आहेत.’ 

‘वाल्मिकी रामायणातून लौकिक संस्कृत पुढे आले. आधुनिक संस्कृतमध्ये गद्य, पद्य प्रकाशित होत आहे. ध्वनिविज्ञानानुसार संस्कृत ही मधुर भाषा आहे. अनेक ई- मॅगझिन्स, वृत्तपत्रे, वेबसाइट्स संस्कृतमध्ये सुरू आहेत. ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांनी संस्कृतच्या अनुवादासाठी सॉफ्टवेअर बनवले आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे संस्कृत पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू आहे. काही वाहिन्याही सुरू आहेत. तिरुअनंतपुरममधील एका कंपनीने महाभारतातील पात्रे घेऊन संस्कृतमध्ये अॅनिमेशनपट साकारले आहेत. ‘सम्प्रति वार्ता:’ या संस्कृत वेबसाइटवर शालेय विद्यार्थी संस्कृत बातम्या देतात. तसे १०० व्हिडिओ आतापर्यंत प्रसारित झाले आहेत. संस्कृत शिकण्यासाठी लाइव्ह मार्गदर्शन वर्गही होतात. इंग्लिश पत्रकार रोहिणी बक्षी या संस्कृतचा प्रसार करत आहेत. तमिळनाडूतील विश्वास वासुकी हे गुगलमध्ये असून ते संस्कृत प्रोसेसिंगचा अभ्यास करत आहेत. १९७०मध्ये सुधर्मा हे संस्कृत वर्तमानपत्र आणि १९७४मध्ये आकाशवाणीवरून संस्कृत बातम्या सुरू झाल्या. संस्कृत पत्रकार संमेलनही होते. sanskritdocuments.org ही उत्तम वेबसाइटही विकसित करण्यात आली आहे,’ अशी माहिती डॉ. सागर यांनी दिली.

डॉ. सागर यांचा सत्कार

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी डॉ. सागर यांचा सत्कार केला. ‘प्रा. नेने यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली. त्या काळी शहरात उद्घोषणा करून श्रोते जमवले. लोकांच्या शेताला पाणी लावून त्यांच्याकडून व्याख्यानमालेसाठी निधी उभा केला. त्यांच्याबद्दल आज खरोखर अभिमान वाटतो. संस्कृत पवित्र भाषा आहे. माझे वागणे, बोलणे, कार्य हे समाजासाठी असले पाहिजे, हे संस्कृतमुळेच शक्य आहे,’ असे पटवर्धन म्हणाल्या. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, शालिनी सागर यांच्यासमवेत रत्नागिरीतील अनेक संस्कृतप्रेमी उपस्थित होते.

संस्कृतमधील सांस्कृतिक कार्यक्रमाने डॉ. सागर आनंदित

कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेसाठी आलेले डॉ. बलदेवानंद सागर व सौ. शालिनी सागर यांच्यासाठी संस्कृतमधून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी, संस्कृतप्रेमी आणि नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवले जाणारे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र, संस्कृत भारती, नारायणी पठण मंडळ, स्वानंद पठण मंडळातर्फे सादरीकरण करण्यात आले. हे सारे कार्यक्रम पाहून सागर दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. 



‘रत्नागिरीत संस्कृत प्रसाराचे कार्य खूप जोमाने सुरू असून, मी अन्य भागात व्याख्यानांसाठी जाईन, त्या वेळी नक्कीच रत्नागिरीचे काम सांगेन. या कामाची प्रशंसा झाली पाहिजे,’ असे डॉ. सागर यांनी आवर्जून सांगितले. संस्कृत स्तोत्रे, वर्गामधील शिक्षक-विद्यार्थी संवाद, सध्या पृथ्वीला भेडसावणाऱ्या प्रदूषणाबाबत संवाद, संस्कृत गीते, कथ्थक नृत्य आदींचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.


आकाशवाणीच्या परराष्ट्र विभागात सिंधी भाषा विभागात कार्यरत असलेल्या सौ. शालिनी सागर यांनीही या सर्व कलाकारांचे अभिनंदन व कौतुक केले. या वेळी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्यासमवेत विद्यार्थी आणि रत्नागिरीकर उपस्थित होते. आशिष आठवले यांनी आभार मानले. 

(या कार्यक्रमांची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZYSBY
 जयतु संस्कृतम्।जयतु भारतम् । पठत संस्कृतम्।वदत संस्कृतम् । संस्कृतेन सम्भाषणं कुरुत।
 Latin is the base of many languages in Europe . Nobody disputes that .
Will it be a language of everyday use?
 People learn a language if it helps them in everyday life . That is why
those from the south of India , go to the Notrh , but are not proficient
in English , learn workable Hindi . Not because of the love for that
language . Necessity and usefulness are the in incentives .
Similar Posts
आधुनिक वैज्ञानिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची संस्कृतमध्ये क्षमता रत्नागिरी : ‘संस्कृत ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. विज्ञानातील अत्याधुनिक पारिभाषिक, तांत्रिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. कारण या भाषेत २२ उपसर्ग, दोन हजार धातू (मूळ क्रियापदे) आणि दोनशे प्रत्यय आहेत. त्यांच्या योग्य वापराने इंग्रजी भाषेतील वैज्ञानिक संज्ञांनाही अर्थपूर्ण
‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’ रत्नागिरी : ‘देशात गेल्या पाच वर्षांत संस्कृतसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘आयआयटी’मध्ये वैकल्पिक विषय म्हणून संस्कृत शिकवतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही संस्कृत शिकवले जाते. तमिळनाडूमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत संस्कृत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील संस्कृत शिक्षकांनीही लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे
रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण १६ जुलैला सुरू झाले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण आहे. नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती आणि गोगटे-जोगळेकर
विविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language