
२६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती करणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपाने साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहे.
१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये जन्म झालेले नारळीकर हे भारताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ. भारत सरकारने त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा उचित गौरव करून त्यांना ‘पद्मविभूषण’ पदवी बहाल केली आहे. २०१० साली महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन अत्यंत हुशार गणितज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. तिथे असताना त्यांना १९६२ साली स्मिथ्स पुरस्कार आणि १९६७ साली अॅडम्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. किंग्स कॉलेजचे फेलो म्हणून १९७२पर्यंत तिथल्या विद्यापीठात काम करत असताना त्यांनी आपले गुरू फ्रेड हॉइल यांच्याबरोबर खगोलशास्त्रात संशोधन करून ‘बिग-बँग-थिअरी’पेक्षा वेगळा असा ‘स्टेडी-स्टेट-थिअरी’ सिद्धांत मांडला. तो हॉइल-नारळीकर सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे.
१९७२नंतर भारतात परत येऊन त्यांनी १९८९पर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या ख्यातनाम संस्थेमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. क्वांटम फिजिक्स, क्वांटम कॉस्मोलॉजी, गुरुत्वाकर्षण या विषयांमध्ये त्यांनी संशोधन केलं आहे.
१९९९पासून पृथ्वीभोवतालच्या वातावरणात अतिउंचीवर (४१ हजार मीटर्स) ‘सूक्ष्मजीवांचे अस्तित्व’ या विषयावर एका आंतरराष्ट्रीय समूहासह त्यांचं काम सुरू असून, त्यांना त्या उंचीवर काही सूक्ष्म पेशी आणि जीवाणूंचं अस्तित्व असल्याचे धक्कादायक शोध लागले आहेत.
जयंत नारळीकर हे अत्यंत वाचकप्रिय विज्ञान लेखक असून, त्यांनी आपल्या साहित्यातून विज्ञान सोपं करून सांगितलं आहे. मातृभाषेतून साहित्यनिर्मिती आणि व्याख्यानं या माध्यमातून त्यांचे मराठीसाठीचे योगदान मोठे आहे. ‘चार नगरातले माझे विश्व’, ‘
आकाशाशी जडले नाते’, ‘खगोलशास्त्राचे विश्व’, ‘
टाइम मशीनची किमया’, ‘
यक्षांची देणगी’, ‘
वामन परत न आला’, ‘
प्रेषित’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘
चार नगरातले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. ‘
यक्षांची देणगी’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.
‘विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाने डॉ. विजया वाड यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
(डॉ. नारळीकर यांचे साहित्य बुकगंगा डॉट कॉमवरून सवलतीत थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)