देवरुख (रत्नागिरी) : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरुख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे.
सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण घरी बसलेले असताना करोना रोखण्यासाठीचा लढा इतरांना मदतीचा हात द्यावा, त्याबरोबर व्यवसायही व्हावा, या उद्देशाने साडवली, देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी फेस शील्ड निर्मितीचा प्रयोग केला आहे. श्रेयस संतोष डोंगरे, सुयोग अणेराव, कपिल मुळे (राजेंद्र माने महाविद्यालय, आंबव, ता. संगमेश्वर) श्रेणीक संतोष डोंगरे (संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर) आणि धीरज प्रकाश कोळी (कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. टाकाऊ वस्तूंपासून राजेंद्र माने महाविद्यालयाने सर्वांत मोठी प्रतिकृती तयार केली होती. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २०१७ साली त्याची नोंद झाली होती. याच प्रतिकृतीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून टॉप १०० असा पुरस्कार २०१८मध्ये मिळाला. सर्वांत मोठी डीएसएलआर कॅमेऱ्याची प्रतिकृती याच महाविद्यालयाने तयार केली. तिचीही नोंद २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. समुद्रातील आणि इतर जलस्रोतांमधील तरंगणारा कचरा व तेल यासाठी उपाययोजना म्हणून रिमोट कंट्रोल कचरा सफाई बोट तयार करण्याच्या प्रयोगात या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
असे वेगळे प्रयोग करणाऱ्या या विद्यार्थ्यांना करोनाच्या सुट्टीतही काही करावे, असे वाटत होते. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर, तसेच इंटरनेटच्या काही वेबसाइटवरही फेस शील्डविषयीची माहिती प्रसारित होत होती. ते फेस शील्ड पाहिल्यानंतर त्यातील काही त्रुटी या विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्या. शील्ड परिधान केल्यानंतर ते जागेवर राहण्यासाठी डोक्याच्या मागील बाजूला इलॅस्टिकची पट्टी असते. प्रत्येकाच्या डोक्याचा आकार कमीजास्त असल्यामुळे ती पट्टी अनेकांना त्रासदायक ठरते. डोके मोठे असलेल्या व्यक्तीला पट्टीचा त्रास होतो. अधिक वेळ शील्ड परिधान केल्यानंतर डोके दुखू लागते. वेदना होतात. ही त्रुटी या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि आपण यापेक्षा वेगळे करून सुटसुटीत आणि कमी त्रास होणारे शील्ड तयार करावे, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी त्यात यश मिळविले. त्यासाठी पारदर्शी पीव्हीसी शीट, आयलेट, आकारमानानुसार कमी जास्त होणाऱ्या चिकटणाऱ्या (वेलक्रो) पट्ट्या, डोक्याला त्रास होऊ नये यासाठी स्पंज, स्टिकर्स इत्यादींचा वापर केला गेला आहे. खोकताना किंवा शिंकताना तोंडातून होणारा फवारा रोखायला त्याची मदत होते. बाजारात उपलब्ध शील्डपेक्षा उत्तम गुणवत्ता असूनही शील्डची जोडणी साधी आणि सोपी आहे. तसेच ते हलके असल्याने वापरायला सोपे आहे.
हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टर्स, पेशंट, पोलीस, केश कर्तनालये, दुकानदार, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी वावरणाऱ्यांसह सामान्य व्यक्तींनाही हे शील्ड उपयुक्त आहे. देवरुख आणि परिसरात त्यांनी अनेकांना या शील्डची विक्री केली आहे. त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेल्या या शील्डची मागणी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नजीकच्या काळात वाढणार आहे, हे लक्षात घेऊन व्यावसायिक स्वरूपात निर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे.
संपर्क : ८७७९३ ८१९६०