संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हम तुम ये बहार...’ या गीताचा................१८ मार्च १९६८ या दिवशी संगीतकार गुलाम मोहम्मद यांचे निधन झाले. गुलाम मोहम्मद हे नाव उच्चारताच ‘म्हणजे ते ‘पाकिजा’ चित्रपटाचे संगीतकार ना!’ असेच म्हटले जाते. ‘पाकिजा’ चित्रपटातील सुमधुर गीते आज ४६-४७ वर्षांनंतरही मनावर गारूड करून राहिली आहेत. वास्तविक पाहता ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला १९७१मध्ये! आणि गुलाम मोहम्मद यांचे निधन झाले आहे १९६८मध्ये! ‘पाकिजा’च्या निर्मितीची प्रक्रिया दीर्घ काळ चालली होती. गुलाम मोहम्मद यांच्या हयातीत त्यांनी त्यातील ‘
इन्हीं लोगों ने...’, ‘
ठाडे रहियो...’, ‘
यूँ ही कोई मिल गया था...’,
‘मौसम है आशिकाना...’, ‘
चलो दिलदार चलो...’, ‘
आज हम अपनी दुआओं का...’ अशी सहा एकापेक्षा एक सुंदर गीते मधुर संगीत देऊन तयार करून ठेवली होती. ती लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या स्वरांत होती आणि निर्माता, दिग्दर्शकांनी संपूर्ण चित्रपट पूर्ण करण्यापूर्वी संगीतकार नौशाद यांच्याकडून आणखी तीन गीते व शीर्षक संगीत (लता मंगेशकर यांच्या आलापांसह) तयार करून घेतले व त्या सर्वांचा समावेश ‘पाकिजा’ चित्रपटात केला.
परंतु या नऊ गीतांपैकी गुलाम मोहम्मद यांनी तयार केलेली सहा गीतेच प्रचंड लोकप्रिय ठरली व आजही आवर्जून ऐकली जातात. वास्तविक पाहता १९७०नंतरचे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बदलाचे दशक होते. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळानंतरची दहा वर्षे निघून गेली होती. चित्रपटाची कथानके सूड-बदला अशा भावनांभोवती फिरू लागली होती. ओघानेच चित्रपटातील भावगर्भ आशयाची व हळुवार मधुर संगीत असलेली गीते यांचे स्थान काय व किती राहणार? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ‘पाकिजा’चे संगीत कालबाह्यच ठरायला हवे होते; पण तसे घडले नाही. केवळ त्या दशकातच नव्हे, तर आज चार दशकांनंतरही ते संगीत मन रिझवते. ‘चलो दिलदार’ असे सांगत ‘आशिकाना मौसम’ ‘यूँ ही कोई मिल गया था’ हे सांगतो.
आणि असा तो ‘कोई’ म्हणजे अशी गीते सुंदर संगीतात गुंफणारा गुलाम मोहम्मद काळाच्या पाटीवर आपली ठळक रेघ आखून गेला आहे. ती रेघ मनाला भुरळ घालते व ओठांवाटे शब्द बाहेर पडतात ‘असे संगीत हवे बाबा! अशी गाणी हवीत!’
वास्तविक पाहता या ‘पाकिजा’च्या संगीताआधी १९४३मध्ये गुलाम मोहम्मद चित्रपटसृष्टीत आले होते, तेव्हा ‘मेरा ख्वाब’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु पुढील चार-पाच वर्षांत तीन-चार चित्रपट मिळूनही त्यांचे नाव फारसे कोणाला ज्ञात झाले नव्हते. परंतु नंतर १९४८मध्ये प्रदर्शित झालेला ‘गृहस्थी’ आणि १९४९चा ‘पारस’ या चित्रपटांतील मुकेश, लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीतांनी चित्रपटप्रेमींचे लक्ष ‘गुलाम मोहम्मद’ या नावाकडे वेधले गेले.
त्यानंतर ‘शायर,’ ‘परदेस’ (१९५०), ‘बिखरे मोती,’ ‘नाजनीन’ (१९५१) अशा चित्रपटांमधून गुलाम मोहम्मद यांच्या संगीतातील गीते रसिकांपर्यंत पोहोचली. १९५२च्या ‘अंबर’ चित्रपटातील दहा गीतांनी तर चित्रपटप्रेमींच्या मनात पक्के स्थान मिळवले आणि ओघानेच गुलाम मोहम्मद म्हणजे मधुर संगीत हे समीकरण तयार झाले. १९५२च्या ‘शीशा’नंतर १९५३मध्ये तर गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेले पाच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामधील ‘लैला –मजनू’ चित्रपटातील तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘
आसमांवाले तेरी दुनियासे...’, तसेच तलतनी गायलेले ‘
चल दिया कारवाँ...’ अशा गीतांनी त्या जमान्यातील तरुणाई गुलाम मोहम्मद यांच्यावर खूश होती.
दिले नादान, गौहर, हजार रातें, रेल का डिब्बा अशा चित्रपटांपैकी ‘दिले नादान’ची गीते तर उच्च कोटीची होती. या चित्रपटानंतर पुढील वर्षात ‘गुजारा’ व ‘मिर्झा गालिब’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘मिर्झा गालिब’ला राष्ट्रपती पदक मिळाले. सुरैया, मोहम्मद रफी, तलत यांनी गायलेली ‘मिर्झा गालिब’ची गीते आजही मनाला आनंद देतात.
‘हुरे अरब’, ‘पाक दामन’, ‘मालिक’, ‘दो गुंडे’ अशा चित्रपटांना संगीत देत देत १९६१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शमा’ चित्रपटाला गुलाम मोहम्मद यांनी दिलेले संगीत हे त्यांच्या जीवनकाळाच्या अखेरच्या टप्प्यावरचे संगीत ठरले. यानंतर त्यांनी ‘पाकिजा’ची गीते तयार केली; पण तो चित्रपट त्यांच्या हयातीत पूर्णही झाला नाही आणि प्रदर्शितही झाला नाही; मात्र ‘शमा’ हा त्यांच्या हयातीत प्रदर्शित झाला. यामधील ‘
आपसे प्यार हुआ जाता है...’, ‘
धडकते दिल की तमन्ना हो...’ ही सुरैयाने गायलेली गीते, तसेच ‘
दिल गमसे जल रहा है...’, ‘
मेरे मेहबूब तुझे प्यार...’ ही सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गीते, अशी एकेक सुमधुर अशी ११ गाणी ‘शमा’ चित्रपटाकरिता गुलाम मोहम्मद यांनी दिली होती.
स्वतंत्र संगीतकार म्हणून अशी कामगिरी करणाऱ्या गुलाम मोहम्मद यांनी संगीतकार नौशाद यांना ‘शबाब’, ‘बैजू बावरा’, ‘अमर’, ‘उडनखटोला’, ‘मुघल-ए-आज़म’ या चित्रपटांना संगीत देताना त्यांचे सहायक म्हणून काम केले होते. अशा या संगीतकाराच्या उद्या असलेल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे एक सुनहरे गीत पाहू या!
जगत पिक्चर्स, मुंबई या चित्रसंस्थेचा ‘अंबर’ हा चित्रपट १९५२मध्ये प्रदर्शित झाला होता. नर्गिस आणि राज कपूर ही नायिका-नायकाची जोडी या चित्रपटात होती. जयंत देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. वेशभूषाप्रधान असलेल्या या चित्रपटाची गीते शकील बदायुनी यांनी लिहिली होती आणि संगीतकार गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केली होती. एकूण १० गीते या चित्रपटात होती आणि ती शमशाद बेगम, जोहराबाई अंबालावाली, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली होती.
त्या सुमधुर गीतांपैकीच एक गीत म्हणजे ‘हम तुम ये बहार...’ हे गीत होय! हे एक सुखद प्रेमगीत आहे. तशी त्या गीताची शब्दरचना फार आलंकारिक भाषेत नाही; पण या गीताची चाल मात्र अत्यंत आकर्षक असून सहजपणे गुणगुणता येण्यासारखी आहे. गीत सुरू झाल्यावर कानावर येणारा ठेका आपणास ताल धरायला लावतो.
या गीताच्या वेळी प्रकाश-सावल्यांच्या खेळातून दिसणारे तरुणपणीच्या राज कपूर व नर्गिस यांचे आकर्षक चेहरे हे या गीताचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कारण प्रेमात बुडून गेलेल्या प्रेमिकांचे भाव दर्शवणारे त्यांचे डोळे व चेहरा हा अभिनयाचा वेगळा आविष्कार आहे. मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी हे गीत गायले आहे. चित्रपटाचे नायक-नायिका रात्रीच्या वेळी भेटतात व प्रेमाच्या सौख्यात न्हाऊन निघून गातात -
लता - रिमझिम ये फुहार, दिल गाये रे मल्हार
इक आग ये सीने में
तुझे व माझे (एकत्र येणे म्हणजे ही एक) बहारच आहे. या वर्षा ऋतूतसुद्धा आपल्या प्रेमाने केवढे रंग भरले आहेत, बघ ना!
यावर ती म्हणते, की रिमझिम पावसाच्या या धारा बघून माझे मन मल्हार राग आळवू लागले आहे, (पण) हृदयात मात्र प्रीतीचा एक अग्नी फुलला आहे.
अशा प्रकारे गीताचा मुखडा झाल्यानंतर अंतरा सुरू होण्याच्या आधी संगीतकार दोन्ही गायकांकडून ‘हो ऽ ऽ ऽ हो ऽ ऽ हो’ असे आलाप गाऊन घेऊन त्या गीताची गोडी वाढवतात. ‘तो’ पुढे म्हणतो –
रफी - तेरी जुल्फों की ये रंगत है, जो बादल बनके छायी है
लता - तेरी आँखों की ये मस्ती है, जो सावन बनके आयी है
(हे प्रिये) तुझ्या (काळ्याभोर) केसांची जी शोभा आहे (ती या वसंत ऋतूत) कृष्णमेघ बनून पसरली आहे. यावर ‘ती’ म्हणते, की तुझ्या नजरेतील (प्रीतीचा) धुंदपणाच ‘श्रावण’ बनून आळा आहे.
या दोन ओळींनंतर मुखड्यावर येताना गुलाम मोहम्मद यांच्या संगीताच्या ठेक्यात शकील बदायुनी शब्दांची रचना करताना लिहितात -
रफी – मेरा दम जब तक, रहे प्यार की चमक, मेरे दिल के नगीने में
जोपर्यंत मी जिवंत आहे, माझा श्वासोच्छ्वास चालू आहे, तोपर्यंत (आपल्या) प्रेमाची चमक माझा हृदयरूपी दागिना धारण करणार आहे. येथे पुन्हा ‘रिमझिम ये फुहार...’ या दोन ओळी गाऊन लतादीदी या गीतात रंग भरतात. नंतर पुढच्या अंतऱ्याची सुरुवात करताना त्या गातात -
लता -
दुनिया को हमारी हो न खबर
आँखो में इशारे हो हो जाये
रफी -
उल्फत का भी चले ऐसा जादू
दुश्मन भी हमारे हो जाये
हे जग आमची दखल घेवो अगर न घेवो (पण आमचे मात्र) नेत्रसंकेत झालेले आहेत. (आणि ही) प्रेमाची जादू (एकदा सुरू झाली, की) शत्रूसुद्धा आमचे होऊन जातील. (प्रेमामुळे शत्रुत्व राहत नाही. प्रेम शत्रूलासुद्धा जिंकते.)
असा हा दोन प्रेमिकांचा वार्तालाप झाल्यावर अखेरीस ‘ती’ म्हणते -
लता - गम दिल से हो दूर
ना होई कोई मजबूर
फिर आये मजा जीने में
(ही प्रेमाची जादू अशी आहे, की त्यामुळे) मन दु:खापासून दूर जाते. मजबुरी अर्थात विवशता, असमर्थता राहत नाही. (त्यामुळेच) जगण्यात मजा येते. अखेरीस दोघेही पुन्हा ‘रिमझिम ये फुहार...’ या ओळी एकत्र गाऊन एक सुखद प्रेमगीत शेवटास नेतात.
राज कपूर यांना मोहम्मद रफी यांचा स्वर असलेल्या मोजक्या गीतांपैकी हे एक गीत, हे या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य!
अशी सुनहरी गीते संगीतबद्ध करणाऱ्या गुलाम मोहम्मद यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!