अहमदाबाद : गुजरातमध्ये पोलीस महासंचालकपदी पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. गुजरात हाउसिंग कॉर्पोरेशनच्या सध्याच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या गीता जोहरी आता गुजरातच्या पोलीस महासंचालक होणार आहेत. जोहरी या १९८२च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
याधीचे पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांना पदावरून पायउतार केल्यानंतर त्यांच्या जागी जोहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इशरत जहाँ एन्काउंटरप्रकरणी पांडे हे आरोपी आहेत. २००४मध्ये झालेली ही चकमक बनावट असल्याचा आरोप आहे. परंतु तत्कालीन पोलिसांनी इशरत दहशतवादी होती, असे म्हटले आहे. सध्या ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, गीता जोहरी यांच्यावरही काही आरोप असल्याचे समजले आहे. २००६मध्ये सोहराबुद्दीन खटल्याचा तपास त्यांच्याकडे आला होता. त्या वेळी त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून वादळ उठले होते. खरे पाहता पोलीस महासंचालकपदी महिलेची नियुक्ती होणे ही आनंदाची बाब आहे. परंतु आपली प्रतिमा लोकांमध्ये चांगली करण्याचे मोठे आव्हान गीता जोहर यांच्यासमोर असेल.