
एक वाक्य समान ठेवून त्यावर वेगवेगळ्या कथा लिहिण्याचे आवाहन रवींद्र भयवाल यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर केले. त्यातून त्यांना १२३ कथा मिळाल्या. त्यातील निवडक २९ कथा ‘अनामिका एक - रूपे अनेक’ या पुस्तकातून वाचायला मिळतात. ‘फार काळ बंद पडलेल्या कै. अभयराव इनामदार स्मृती वसतिगृहात शिशिरातील एका भल्या पहाटे अनामिका आपली लेखणी घेऊन डोकेफोड करीत बसलेली होती. प्रश्न होताच तितका गहन!’ या वाक्याने प्रत्येक कथेची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्त गाव योजनेत सहभागी न होता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंगळूर नवघरे येथील इनामदार हॉस्टेलमध्ये ठेवण्यात येत असे. त्यातून घडलेल्या गमतीजमती ‘खुला आसमा’मध्ये आहेत. ‘मी आधीच सांगितलं होतं’मध्ये हॉस्टेल बंद का पडले, याचे कारण शोधण्यासाठी रात्री हॉस्टेलवर येणाऱ्या अनामिकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडतो. ‘जले मन मेरा’मध्ये रूम नं. १३मधील डिटेक्टिव्ह अनामिका रश्मीच्या आत्म्याला शांत करते. अशा भय, गूढ, विनोदी, रहस्यमय अशा विविध प्रकारच्या गोष्टींतून अनामिकेची अनेक रूपे वाचकांना भेटतात. साहित्यविश्वातील हा एक वेगळा प्रयोग आहे.
पुस्तक : अनामिका एक - रूपे अनेक
संपादक : रवींद्र भयवाल
प्रकाशन : राजेंद्र प्रकाशन
पृष्ठे : २३४
मूल्य : २६० रुपये
(‘अनामिका एक- रूपे अनेक’ हा कथासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)