पुणे : पुण्यातील सर्वोत्तम नाटकांचा महोत्सव असणाऱ्या पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातील नाटकांना पुणेकर रसिकांनी भरभरून दाद दिली. अशा या पुणे नाट्यसत्ताक महोत्सवाचा कळसाध्याय म्हणजे ‘नाट्यसत्ताक रजनी’. काळाच्या ओघात रात्रभर चालणारे मनोरंजनाचे कार्यक्रम होईनासे झाले; पण तरीही सच्च्या नाट्यरसिकांना रात्रभर नाटके पाहण्याची संधी या नाट्यसत्ताक रजनीच्या निमित्ताने मिळणार आहे.
‘वाइड विंग्ज मीडिया’ने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवातील रजनीचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २६ जानेवारीच्या सकाळी साडेसातपर्यंत रंगणार आहे. ‘बुलढाणा अर्बन बँक’ व ‘जाई काजळ’ यांनी महोत्सवाला आर्थिक पाठबळ दिले आहे.

या नाट्यरजनीची सुरुवात अभिनेते सचिन खेडेकर आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘मौनराग’ या सादरीकरणाने होईल. महेश एलकुंचवारांच्या ललित लेखांच्या अभिवाचनाच्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे व निर्मिती ‘आविष्कार’ या संस्थेची आहे. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता ‘देता का करंडक’ ही मिलिंद शिंत्रे लिखित पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका सादर होईल. देवेंद्र गायकवाड व परेश देवळणकर या दोन कलाकारांची ही धमाल पाहण्यास अनेक तरुण नाट्यकर्मी नेहमीच उत्सुक असतात. ही एकांकिका संपताच थिएट्रॉन एंटरटेनमेंटची ‘२०२ एलिना’ ही एकांकिका सादर होईल. मूकनाट्य स्पर्धांमध्ये गाजलेली ही एकांकिका, शब्दांशिवाय प्रेक्षकांचे मन जिंकते. यामध्ये शिवराज वायचळ, कौमुदी वालोकर, सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी हे टेलिव्हिजनवरील कलाकार रंगमंचावर अभिनयाची जादू करताना दिसतील.

एलिनाची रहस्ये उलगडल्यानंतर प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी येणार आहे, भारतीय डिजिटल पार्टी या संस्थेचा ‘सिक्रेट मराठी स्टँडअप’ हा लाईव्ह शो. वेबसीरिज व ऑनलाइन व्हिडिओजच्या माध्यमातून मराठी भाषेतील स्टँडअप कॉमेडी रसिकांपर्यंत पोहचविणारे सारंग साठ्ये, ओंकार रेगे आणि चेतन मुळे यांना लाइव्ह ऐकण्याची ही संधी नक्कीच हुकविण्यासारखी नाही.
अशी सर्व नाटके, अभिवाचन आणि कॉमेडी शो यांची मजा घेतल्यानंतर अखेरीस २६ जानेवारीची रसिकांची पहाट, ‘उर्दू अदब और सुफी मौसिकी की महफिल – सुख़न’ या उर्दू कार्यक्रमाने होणार आहे. सलग दोन वर्षे दिल्लीतील मानाच्या ‘जश्न-ए-रेखता’ महोत्सवात सादरीकरणाचा मान पटकाविलेल्या ‘सुख़न’च्या कार्यक्रमाला पुणेकरांनी पहिल्यापासूनच मनमोकळी दाद दिलेली आहे. त्यामुळे सुख़नच्या दर्दी शायरीने होणारी पुणे नाट्यसत्ताक व नाट्यरजनीची सांगता, यंदाचे वर्ष प्रत्येक रसिकासाठी नक्कीच अविस्मरणीय करेल यात शंका नाही.
नाट्यसत्ताक रजनीतील कार्यक्रमांची वेळ
समारोप समारंभ : २५ जानेवारी रात्री नऊ
मौनराग : रात्री साडेनऊ
देता का करंडक : रात्री साडेअकरा
२०२ एलिना : रात्री एक
सिक्रेट मराठी स्टँडअप : रात्री दोन
सुख़न : पहाटे चार
नाट्यसत्ताक रजनीची तिकिटे बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी नऊ ते ११:३० व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत उपलब्ध आहेत. तसेच https://www.ticketees.com/ च्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंगही करता येईल.
फोन बुकिंगसाठी संपर्क : ७०४०६ ०३४३३