हार्दिक ज्या वयाचा होता, त्याच वयाचे त्याचे मित्रही होते. त्यामुळे अनेकविध अनावश्यक विषयांवर होणाऱ्या गप्पा, चर्चा, अयोग्य, चुकीच्या माहितीची देवाण-घेवाण, मुलांकडून मिळणारे चुकीचे सल्ले, स्वतःला जाणून घेण्याची उत्सुकता, अनेक प्रकारांनी आपण मोठे झालो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि आई-वडिलांकडून या साऱ्यावर सतत लावले जाणारे निर्बंध या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हार्दिकमध्ये बदल घडून आले होते... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या मुले वयात येतानाच्या त्यांच्या मनःस्थितीबद्दल... ..................................................
हार्दिक वर्गातला तसा शांत, गुणी आणि हुशार मुलगा. त्यामुळे बाईही त्याचं नेहमीच कौतुक करायच्या. हार्दिक नेहमीच सर्व कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि बहुतेकदा उत्तम यशही मिळवायचा, पण तो ८वीमध्ये आल्यापासून त्याच्यात अनेक बदल जाणवू लागले. त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या बाईंनाही ते लक्षात येऊ लागले. हे सर्व पाहून हार्दिकच्या आईने त्याच्या शाळेतल्या बाईंशी चर्चा केली. चर्चेअंती हर्दिकला समुपदेशनाची गरज असल्याचा निष्कर्ष त्या दोघींनी काढला आणि त्या हार्दीकला समुपदेशनासाठी घेऊन आल्या. ते तिघे बसल्यानंतर आम्ही काही काळासाठी हार्दिकला बाहेर जाण्यास सांगितले, तसा तो रागारागाने बाहेर निघून गेला.
हार्दिक बाहेर गेल्यानंतर आईने हार्दिकबद्दल बोलायला सुरुवात केली. त्याच्यात अचानक झालेले बदल सांगायला सुरुवात केली. हार्दिक तसा खूपच शहाणा मुलगा होता, पण गेल्या वर्षभरात त्याच्यात खूप बदल झाले होते. शांत असणारा हार्दिक खूप चिडचिडा झाला होता. पूर्वी कधीही उलट उत्तरे न देणारा तो आता सारखीच उलट उत्तर देऊ लागला होता. त्याला समजावून सांगितले, की तेवढ्यापुरते ऐकतो आणि पुन्हा पाहिल्यासारखाच वागतो. त्याला समजावून सांगायला गेलो, तर त्याला खूप राग येतो. गेल्या वर्षभरात त्याचे मित्र पण बदललेत. आई हे सारे घाई-घाईने आणि खूप काळजीने सांगत होती. तिला हार्दिकची फारच काळजी वाटत होती, जे अगदीच स्वाभाविक होते.
आईने सांगितलेली सारी लक्षणे हार्दिक वयात येत असल्याचीच होती. त्यामुळे आईची काळजी आणि भीती कमी होण्यासाठी त्यांना या साऱ्याची कल्पना दिली. व काही उपायही सुचवले. त्यानंतर पुढील काही काळ हार्दिकची काही सत्रे घेण्यात आली. या सत्रांमधून असे लक्षात आले, की त्याच्यातील या बदलांची तीव्रता वाढवण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे होती. एक म्हणजे, समवयस्कांचा वाढलेला प्रभाव आणि दुसरे म्हणजे त्याच्या वर्तनातील बदल रोखण्यासाठी आई वडिलांकडून सतत घातली जाणारी बंधने.
हार्दिक ज्या वयाचा होता. त्याच वयाचे त्याचे मित्रही होते. त्यामुळे अनेकविध अनावश्यक विषयांवर होणाऱ्या गप्पा, चर्चा, अयोग्य, चुकीच्या माहितीची देवाण-घेवाण, मुलांकडून मिळणारे चुकीचे सल्ले, स्वतःला जाणून घेण्याची उत्सुकता, अनेक प्रकारांनी आपण मोठे झालो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि आई-वडिलांकडून या साऱ्यावर सतत लावले जाणारे निर्बंध या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हार्दिकमध्ये हे बदल घडून आले होते. वयात येताना त्याच्यात झालेल्या मानसिक व भावनिक बदलांमुळे त्याला मित्र हवेसे तर आई-वडिलांची बंधने नको होती. त्यामुळे साहजिकच उलट उत्तर देणे, चिडचिड करणे, राग व्यक्त करणे या मार्गाने तो हा विरोध व्यक्त करत होता आणि आई-वडिलांना ही त्याची मोठी समस्या वाटत होती.
त्याची समस्या लक्षात आल्यावर पुढील सत्रात त्याला लैंगिक प्रशिक्षणातील आवश्यक मुद्द्यांबाबतही अगदी सविस्तर माहिती दिली. सुरुवातीला तो बोलायला थोडा घाबरत होता, पण नंतर नंतर तो अगदी मोकळेपणाने बोलायला लागला. मनातल्या साऱ्या शंका त्याने न लाजता विचारल्या. या साऱ्या सत्रांमुळे त्याला शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. आपल्यात होत असलेल्या बदलांची कारणे समजल्याने आणि त्यावरील उपायही लक्षात आल्याने त्याच्यातल्या समस्या वर्तनाची तीव्रता आपोआपच कमी होत गेली. तो पूर्वीसारखच छान वागायला लागला आणि त्यामुळे आई-बाबांची चिंता भिती आपोआपअचं कमी झाली.
(केसमधील नावे बदलली आहेत.)
- मानसी तांबे-चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)