संगीत देवबाभळी या नाटकातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलेली गायिका म्हणजे शुभांगी सदावर्ते. ‘आई आणि संगीत हे माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत,’ असे ती म्हणते. ‘बी पॉझिटिव्ह’ सदरात आज वाचा तिची मुलाखत... ............
- तुझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कोणता?
- माझ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे माझी आई आणि संगीत. आपल्या आयुष्यात काहीही निराशाजनक, वाईट घडते तेव्हा आपण आईला सांगतो. आई नेहमीच आपल्याला चांगले काय, वाईट काय हे सांगत असते. निराशा आली तर तिचा आधार, विश्वास आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे बळ देतो. दुसरा स्रोत म्हणजे संगीत. संगीत, गाणे ऐकले, तर मूड चांगला होतो.
- अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?
- मी मुळात गायिका आहे. अभिनय क्षेत्रात माझा प्रवेश झाला तो गाण्यामुळेच. देवबाभळी नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि संगीतकार आनंद ओक गाणाऱ्या मुलीच्या शोधात होते. त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हा त्यांनी मला नाटकात काम करण्यासाठी विचारले. मी पार्श्वगायिका म्हणून आवाज देईन, पण अभिनय जमणार नाही, असे सांगितले; पण त्या दोघांनी मला खूप प्रोत्साहन दिले, विश्वास दिला, की मी गाण्याबरोबरच अभिनयही करू शकते. माझा आत्मविश्वास वाढवल्यामुळेच मी ‘संगीत देवबाभळी’ या माझ्या पहिल्यावाहिल्या व्यावसायिक नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे.
- आयुष्यातील असा एखादा प्रसंग सांग, ज्यातून सकारात्मक ऊर्जेच्या बळावर बाहेर पडता आले?
- खरे तर मी कधी निराश होत नाही. आतापर्यंत अशी काही आठवण नाही आणि कधी काही वाईट वाटले तर आई असतेच सोबत आणि संगीतही. आई सांगतेच हे कर, ते करू नको. संगीत, गाणी ऐकली की आनंद वाटतो.
- सकारात्मक पद्धतीने कसे जगावे, याबद्दल लोकांना काय सांगशील?
- स्वतःमधील नकारात्मकता काढून टाका. छान, छान गाणी ऐका, संगीत ऐका. आयुष्यात खूप चढ-उतार येत असतात; पण त्याने हरून न जाता त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संगीत देवबाभळी नाटकात दोन स्त्रियांची जी व्यथा, कथा दाखवली आहे, ती नक्कीच एक दिशा देणारी आहे. स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुषांनाही आपल्या जोडीदाराबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करील. सकारात्मकतेने जगायला प्रेरणा देईल. आत्महत्येसारखे पाऊल कोणत्याही परिस्थितीत उचलू नका.
(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. शुभांगी सदावर्ते यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)