पुणे : जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार मायकल एंजेलोच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, नऊ मार्च २०१९ रोजी तब्बल शंभर चित्रकार, शिल्पकार एकत्र येऊन व्यक्तिचित्रण करणार आहेत. पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप व भांडारकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी, नऊ तारखेला हा कार्यक्रम सकाळी नऊ ते पाच या वेळेत लॉ कॉलेज रोडवरील भांडारकर संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातून शंभर चित्रकार, शिल्पकार भाग घेणार आहेत.याच दिवशी हा कार्यक्रम मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व वाराणसी येथेही होणार आहे .
सकाळी नऊ ते बारा या वेळेत चित्रकार आपले व्यक्तिचित्रणाचे काम करतील. त्यानंतर साडे दहा ते दुपारी दोन या वेळेत रसिकांना ही चित्रे पाहता येतील. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप संध्याकाळी चार ते पाच या वेळेत संस्थेतील टाटा सभागृहात होणार आहे. या वेळी भांडारकर संस्थेचे रजिस्टार क्युरेटर श्रीनंद बापट हे संस्थेच्या कार्याविषयी, तर डॉ. माधवी मेहेंदळे मायकेल एंजलोवर भाष्य करणार आहेत.
अंतिम प्रत्यक्ष पोट्रेट स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना चित्रकार वासुदेव कामत पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप ग्रँड ट्रॉफी आणि रोख ७५ हजार रुपये, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्याला २५ हजार रुपये तर उत्तेजनार्थ नऊ स्पर्धकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून चित्रकार, शिल्पकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाविषयी :
व्यक्तिचित्रण उपक्रम
स्थळ : भांडारकर संशोधन संस्था, लॉं कॉलेज रोड,
दिवस व वेळ : शनिवार, नऊ मार्च, सकाळी १०.३० ते ५.