Ad will apear here
Next
गौर गोपाल दास यांच्या ‘जीवन समजून घेताना’ पुस्तकाचे २६ मे रोजी प्रकाशन
विशेष व्याख्यानाचेही आयोजन
पुणे : आध्यात्मिक गुरू आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी लिहिलेले ‘जीवन समजून घेताना’ हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित होत असून, राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे. रविवारी (२६ मे २०१९) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील कँपमधील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. देशभरातील युवकांचे आवडते वक्ते व मार्गदर्शक गौर गोपाल दास यांच्या विशेष व्याख्यानाचेही आयोजन या वेळी करण्यात आले आहे. 

‘जीवन समजून घेताना : मनःशांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य’ या पुस्तकाच्या निमित्ताने गौर गोपाल दास ‘जीवनात आनंद कसा प्राप्त करायचा’ यावर त्यांच्या शैलीत मार्गदर्शन करणार आहेत. ‘जीवनाचा उद्देश शोधून आनंद कसा प्राप्त करायचा’ हेच ध्येय ठेवून गौर गोपाल दास जवळपास दोन दशकांपासून कार्य करत आहेत. नर्मविनोदी शैली, लवचिक देहबोलीतून हसत खेळत तत्त्वज्ञान मांडणारे आणि त्या तत्त्वज्ञानावर सहज चालायला प्रवृत्त करणारे ते युवकांचे आवडते वक्ते-मार्गदर्शक व आध्यात्मिक गुरू आहेत.

‘प्रत्येक जणच आनंदाच्या शोधात असतो आणि आपल्यापैकी बहुतांश लोक हे बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधतात; पण त्या क्षणिक आनंदाचा ठेवा संपल्यावर पुन्हा रितेपणा वाट्याला येतोच.  ‘आनंद क्षणभंगुर असतो का?’ तर अजिबात नाही! उलट हा प्रत्येकाच्या आयुष्यात वाहत राहणारा झरा असतो. परंतु तो झरा अटू नये, कायम खळाळता राहावा यासाठी प्रत्येकालाच काही ना काही कृती ही करावीच लागते,’ असे जीवनाचे सार सांगणारे गौर गोपाल दास श्रोत्यांच्या मनाला सहजरीत्या हात घालतात.  

ते म्हणतात, ‘सामान्य मनुष्य असो अथवा साधक, आपल्या सगळ्यांमध्ये तीन गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे आपण सगळे अडकलेलो आहोत, आपल्याला एक प्रवास पूर्ण करायचा आहे आणि विशिष्ट गंतव्य स्थान गाठायचं आहे.’ मनुष्याचं हे अडकणं, त्याचा जीवनप्रवास आणि गाठायचं असलेलं ‘आनंदस्थान’ या सगळ्यांचा ऊहापोह ‘जीवन समजून घेताना’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

हॅरी आणि ललिता अय्यर या प्रमुख पात्रांच्या माध्यमातून मांडलेली ही गोष्ट आहे. ओघवती भाषा, पटत जाणारे प्रसंग, आपल्या किंवा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, समस्या यांचे केलेले चित्रण आणि या समस्यांवर मात करण्यासाठी आयुष्यरूपी गाडीच्या चार चाकांत समतोल कसा साधायचा याविषयी केलेले मार्गदर्शन म्हणजे ‘जीवन समजून घेताना’ हे पुस्तक.

गौर गोपाल दासया पुस्तकात गौर गोपाल दासांनी आयुष्याला चारचाकी गाडीची उपमा दिली आहे. गाडीची ही चार चाके म्हणजे आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान. या चार चाकांपैकी एक चाक जरी नादुरुस्त असले, तर जीवनाची गाडी चालताना कुरकुरणार, त्रास देणार, हे नक्की! यासाठीच गौर गोपाल दास ‘संतुलन’ किंवा ‘समतोल’ या शब्दांकडे आपले लक्ष वेधतात. वरील चारही चाके समान पातळीवर काम करत असतील, तर जीवनाचा समतोल आपोआप साधला जाईल आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात खऱ्या आनंदाची, खऱ्या सुखाची बरसात होईल.

हा समतोल साधण्यासाठी गौर गोपाल दास यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स म्हणजे खरे तर प्रत्येकाने आपापल्या दृष्टीत, दृष्टिकोनात करण्याचा बदल असे म्हणता येईल. नकारात्मकतेमध्ये दडलेली सकारात्मकता कशी बघायची, आपल्या कुटुंबीयांपासून ते ईश्वराच्या कृपेपर्यंत वाट्याला आलेला चांगुलपणा कसा ओळखायचा आणि त्याबद्दल कृतज्ञ कसे राहायचे? ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी ध्यानधारणा, मनन कसे उपयुक्त पडते, याचे सुरेख विवेचन त्यांनी केले आहे. संवेदनशीलता हादेखील या चारही चाकांमध्ये समतोल साधण्यासाठीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. असेच वेगवेगळे, अनेकदा आपल्याकडून जाणून-बुजून किंवा अनवधानाने दुर्लक्षित होणारे महत्त्वाचे मुद्दे गौर गोपाल दासांनी या पुस्तकात मांडले आहेत. समस्या, स्पर्धा, स्व-शोध, सेवाभाव यातून जीवनाच्या गाडीचा, चार चाकांचा तोल कसा पेलला जातो, हे त्यांनी सहज पटेल अशा पद्धतीने सांगितलं आहे.

समतोलाचे महत्त्व वाचकांना पटते. कारण इथे गौर गोपाल दासांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग मोकळेपणाने, खुलेपणाने वाचकांसमोर मांडले आहेत. मग ते ‘इस्कॉन’मध्ये प्रवेश केल्यानंतर काही घटनांमुळे आलेली उद्विग्नता आणि त्यावर प. पू. राधानाथ स्वामींच्या मार्गदर्शनाच्या आधारे केलेली मात असो किंवा गौर गोपालांचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे स्वतःचे वैचारिक द्वंद्व असो... संतुलन साधण्यासाठी पुस्तकात दिलेल्या उपचार पद्धती या गौर गोपाल दासांनी स्व-जीवनाचा समतोल साधण्यासाठी वापरल्या आहेत. म्हणजेच हे पुस्तक म्हणजे एका अर्थाने ‘अनुभवाचे बोल’ आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ वाचनीय नसून अनुकरणीयही आहे. 

‘व्यक्ती ते समष्टी - मी ते आपण’ असा प्रवास या पुस्तकात मांडला आहे आणि या प्रवासाचा नात्यांतील परस्पर सामंजस्याचा पाया आहे अध्यात्म, रोजच्या जगण्यातले अध्यात्म. 

यावरूनच पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, ‘वितळण्याआधी आनंद घ्या’ हे आइस्क्रीमचे तत्त्व अंगीकारायचे, की ‘वितळण्याआधी इतरांना प्रकाश द्या’ हे मेणबत्तीचे तत्त्व स्वीकारायचे ही निवड करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा व्यक्तिगत असाच आहे. कारण गौर गोपाल दास म्हणतात त्याप्रमाणे ‘जीवन समजून घेताना अंतिम निवड आपणच करायची असते. कारण अंतिम निवडही आपलीच जबाबदारी असते.’

कार्यक्रमाच्या निःशुल्क प्रवेशिकांसाठी संपर्क : ७०६६२ ७६८८८

(गौर गोपाल दास यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)


(‘जीवन समजून घेताना’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPLCA
Similar Posts
जीवन समजून घेताना आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान या जीवनाच्या चार महत्त्वाच्या भागांमध्ये समतोल साधता आल पाहिजे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. यानुसार ‘जीवन समजून घेताना...’ मधून मन:शांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य त्यांनी उघड केले आहे.
टेस्टी हेल्दी रेसिपीज ‘टेस्टी हेल्दी रेसिपीज’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
पाहावे आपणासी आपण ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकाचा अल्प परिचय
मिस्टर अँड मिसेस जिना मोहंमद आली जिना हे अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. रुबाबदार जिना यांचे अनेकांना आकर्षण होते. पण कोणालाही फारसे जवळ करीत; मात्र अत्यंत सुंदर व हुशार रट्टी पेटीट हिला पाहिल्यानंतर मात्र त्यांना तिची ओढ लागली. तीही त्यांच्या प्रेमात पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language