Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर...
‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन  यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
...........
केरळमधील उत्तर मलबारमधील मुस्लिम केई (Keyi) कुटुंबाच्या मालकीची मुंबईत बरीच जमीन होती. केई म्हणजे पर्शियन भाषेत ‘जहाज मालक’. आताचा मलबार हिल व चौपाटीच्या आसपास त्यांच्या मालकीची जागा होती. म्हणून त्या भागाला आता मलबार हिल म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज, ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्याशी त्यांचे व्यापार संबंध होते. परंतु जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी समस्या निर्माण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी संपूर्ण क्षेत्र इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात कराराने दिले. मलबार हिल भागात राजभवन, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला, सह्याद्री अतिथीगृह, तसेच अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. यातील काही बंगले जुन्या ब्रिटिश शैलीतील आहेत. वृक्षाच्छादित मलबार हिल साधारण १८० फूट उंच आहे. दोन्ही बाजूला समुद्र असल्याने नैसर्गिकदृष्ट्या मुंबईच्या सौंदर्यात भर पडली आहे. या भागात नामवंत उद्योगपतींचे बंगले आणि कार्यालयेही आहेत. 

राजभवन

राजभवन :
पहिले राजभवन १७७० ते १७९० दरम्यान फोर्ट भागात (किल्ला) होते. त्यानंतर ते परळ भागात हलविण्यात आले. तेथून ते १८८०मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांनी मलबार हिल भागात हलविले. ‘प्राइसेस मेमारियल’मधील नोंदीनुसार गव्हर्नर मेडोस १७८८ ते १७९० या काळात अधूनमधून येथे राहायला यायचे. सर ईवान नेपियन १८१२ ते १८१९ या काळात या ठिकाणी एका लहान खोलीत राहत होते. समुद्राची किनार आणि वृक्षराजी असलेल्या ५० एकर जागेवर रीतसर गव्हर्नर निवास बांधण्यात आला. राजभवन परिसरात जलभूषण, जलचिंतन, जललक्षण, जलविहार आणि जलसभागृह या इमारती आहेत. 

राजभवन

जलभूषण :
गव्हर्नर माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन जेथे राहिले होते, त्याच टुमदार बंगलीच्या पायावर जलभूषण उभे आहे. ब्रिटिश लेखक हेबर यांनी याचे वर्णन ‘समुद्राच्या पाण्याने धुतली जाणारी खडकाळ व वृक्षाच्छादित भूभागावरील टुमदार बंगली’ असे केले आहे. लॉर्ड एलफिन्स्टन यांनी बांधलेला रस्ता राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या ‘जलभूषण’ कडे जातो. माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आयात केलेले फ्रेंच फर्निचर राज्यपालांच्या भव्य कार्यालयात ठेवले आहे. दुर्मीळ कलाकुसर असलेले अतिशय सुंदर लाकूडकाम, सुबक चित्रकाम असलेल्या तसबिरी आणि लाकडावर केलेले ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण यांनी जलभूषण संपन्न आहे. कुंचल्याच्या कुशल फटकाऱ्यांनी कलाकारांनी लेसचा नाजूकपणा आणि मोत्यांचे तेज जिवंत केले आहे. वैभवशाली निवासस्थानात व कार्यालयात भारतीय कलेच्या कलाकारांनीदेखील आपले मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय श्रेष्ठ कलाकारांनी रेखाटलेली चित्रेही ‘जलभूषण’मध्ये आहेत. 

जलचिंतन हे राजभवनला भेट देणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आवडीचे निवासस्थान होते. या बंगल्यावरून सागराचे सुंदर दर्शन होते. लयबद्ध किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटा आणि संध्याकाळी दिसणारा मोहक सूर्यास्त पाहत असताना मन एकाग्र होत असे. म्हणून या बंगल्याला ‘जलचिंतन’ असे नाव दिले असावे. पं. नेहरू व अन्य पंतप्रधान हे समुद्रातील अंधुक प्रकाशाकडे पाहत चिंतन-मनन करीत ‘जलचिंतन’च्या बाल्कनीत उभे राहत असत. 

राजभवन

जललक्षण :
हे निवासस्थान भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. येथे मराठा सरदारांच्या तसबिरींचा संग्रह आहे. असे म्हणतात, की सर बॅटल फ्रेरे यांनी १८५७च्या बंडानंतर ही चित्रांची मालिका चित्रित करण्यासाठी थिओडोर जेन्सेन यांची नेमणूक केली होती. आपल्या कुंचल्याने व तैलरंगांच्या साह्याने जेन्सेनने सरदारांचा बाणेदारपणा व डौल प्रत्यक्षात उतरवला आहे. 

ही चित्रे गव्हर्न्मेंट हाउस येथे आणण्यात आली होती. या कलाकारांना राजकीय योग्यतेने प्रोत्साहनही देण्यात आले होते. या आदरांजलीमुळे नेत्यांचा विरोध मावळेल व ब्रिटिश राज्य स्वीकारण्यास त्यांने मन वळविता येईल अशी आशा फ्रेरेला वाटत होती. 

जलविहार : मेजवानी दिवाणखाना (बँक्वेट हॉल) आता जलविहार या नावाने ओळखला जातो. येथील दोन्ही दिवाणखान्यांच्या घुमटाकार छतांवर भारताच्या अशोकस्तंभावरील सिंहाची नक्षी काढली आहे. जमिनीवर अत्यंत किमती असे मुघल काळाची आठवण करून देणारे पर्शिअन गालिचे पसरलेले असून, या गालिच्यांवर प्राचीन भरतकामाच्या कलाकृती आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती व भेट देणारे राज्याचे प्रमुख यांच्यासाठी येथे राज्यपाल मेजवान्या आयोजित करतात. चांगल्या प्रसंगी जेव्हा अनेक स्तर असलेल्या झुंबरांचा प्रकाश चांदीच्या तबकांमधून परावर्तित होतो तेव्हा पाहुण्यांना जलविहारमध्ये जेवणाचा एक मनोवेधक अनुभव मिळतो. 

राजभवन परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी पडून असलेल्या २२ टन वजनाच्या दोन तोफा आता जलविहार (बँक्वेट हॉल) इमारतीच्या पुढे मोठ्या ओट्यावर सर्वांना दिसतील अशा ठेवण्यात आल्या आहेत. माजी राज्यपाल सीएच. विद्यासागर राव यांच्या सल्ल्यानुसार तोफा पुन्हा साफ करून गंज न येण्यासाठी त्यांच्यावर अँटी ऑक्सिडायझिंग ट्रीटमेंट करण्यात आली. या तोफा हलविण्याचे काम पाच तास चालू होते. 

जलसभागृह : जलसभागृह म्हणजे राजभवनाचा शांत व प्रसन्न असा दरबार हॉल आहे. क्षितिज समांतर असलेल्या फ्रेंच पद्धतीच्या खिडक्यांमधून आत येणारी उगवत्या सूर्याची किरणे येथे चकाकत असतात. शपथविधीसारखे महत्त्वाचे कार्यक्रम या जलसभागृहामध्ये होतात. या भव्य सभागृहाचा वापर राज्यपाल साहित्यिक व कलाकार यांचा गौरव करण्यासाठीही करतात. 

राजभवनाखाली सापडलेला बंकर

२०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळजवळ १५ हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून, ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय तयार केले गेले असून, त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षांमध्ये राजभवनच्या इतिहासाची झलकदेखील दाखविली जाणार आहे. 

बंकरचा शोध लागला, त्या वेळी तेथे सापडलेल्या खोल्यांना शेल स्टोअर, गन शेल, काडतूस भांडार, शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. याचा उपयोग युद्धसामग्री दडवून ठेवण्यासाठी करण्यात येत असावा असे दिसून येते. बंकरमध्ये नैसर्गिक प्रकाश, शुद्ध हवा व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केल्याचेही आढळून आले आहे. 

बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर मंदिर (१८५५)

वाळकेश्वर मंदिर :
वाळकेश्वर व बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात आहे. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव इ. स. ११२७मध्ये शिलाहार राजवटीत बांधला. त्यानंतर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी हे मंदिर नष्ट केले. परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा उभे राहिले. वालुकेश्वर म्हणजेच वाळूचा देव व त्यावरून वाळकेश्वर हे नाव रूढ झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, श्री रामचंद्राने सीतेचा शोध घेत असताना शिवाची पूजा करण्यासाठी येथे वाळूचे शिवलिंग बनविले व पूजेसाठी पाणी नसल्याने बाण मारला असता गंगा अवतरली व कालांतराने येथे तलाव बांधला गेला आणि त्याचे नाव बाणगंगा पडले. बाणगंगा तलाव आयताकृती असून, त्याला चारही बाजूंनी पायऱ्या बांधल्या आहेत. तलाव खूपच सुंदर दिसतो एका बाजूला तळाकडे येण्यासाठी असलेल्या वाटेवर बाजूला दोन सुंदर मनोरे बांधले आहेत. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. बाणगंगेच्या जवळ आणखी एक जुने महादेवाचे मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणून ते ओळखले जाते. हा परिसर अतिशय शांत व मनाला आनंद देणारा आहे. 


जिना हाउस

जिना हाउस :
मुंबईतील मलबार हिलवरील साउथ कोर्ट भागात समुद्राकडे तोंड करून असलेला, पाकिस्तानचे बॅ. मोहम्मद अली जिना राहत असलेला बंगला आहे. आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी युरोपियन शैलीने यांचे संकल्पचित्र बनवले होते. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याजवळच हा बंगला आहे. पाकिस्तान सरकार त्यावर अधिकार सांगत आहे. 

इब्राहिम जेठा आर्ट गॅलरीइब्राहिम जेठा आर्ट गॅलरी : वाळकेश्वर रस्त्यावर मरीन ड्राइव्हकडून राजभवनकडे येताना मुंबईच्या प्रसिद्ध तीन बत्तीच्या आधी इब्राहिम जेठा आर्ट गॅलरी आहे. डोळे दिपून जाणारी मार्बल शिल्पकला, कारंजे, कलश, दिवे, टाइमपीसेस आणि बरेच काही येथे आहे. अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि हौशी लोकांची येथे वर्दळ असते. 

आर्टिस्ट्री : शिवानी विराणी यांनी २००३मध्ये आर्टिस्ट्रीची स्थापना केली. मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या या गॅलरीमध्ये अनेक विषयांशी संबंधित प्रतिभासंपन्न तरुण भारतीय कलाकारांच्या कलेचे दर्शन होते. सुमारे १०० नवीन व जुन्या कलाकारांच्या कलांचा आस्वाद येथे घेता येतो. यात वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट), अंतर्गत सजावटकार (इंटेरियर डेकोरेटर), चित्रकार, मूर्तिकार, ज्वेलर्स यांचा समावेश आहे. टाटा गार्डनच्या समोरच ही गॅलरी आहे. 

शांती मनोरा/पारशी विहीर : केम्स कॉर्नरवरून मलबार हिलकडे जाणाऱ्या रिज रोडवर पारशी लोकांची स्मशानभूमी आहे. सन १६७२मध्ये शेठ मोदी हिरजी यांनी हा टॉवर बांधला. येथे पारशी लोकांव्यतिरिक्त कोणासही जात येत नाही.

शांतिवन

शांतिवन :
नावाप्रमाणेच हे या भागातील शांती देणारे निसर्गरम्य ठिकाण आहे. नैसर्गिक उतारावर असलेल्या या उद्यानात विविध लतावृक्ष आहेत. बांधीव पायऱ्यांनी याची शोभा अधिकच वाढते. आजूबाजूला फिरणारे मोर लक्ष वेधून घेत असतात. हँगिंग गार्डनच्या मागे हे उद्यान आहे. मलबार हिल भागात प्रियदर्शनी पार्क, चक्रवर्ती उद्यान, आदित्य बिर्ला पार्क अशा अनेक खासगी जागांमध्ये समुद्रकिनारी बागा व निवासी संकुले आहेत. रिज रॉड आणि लीला जगन्नाथ मार्ग यांच्यामध्ये इको पार्क आहे, तसेच अनेक उद्याने आहेत. 

कसे जाल मलबार हिल भागात?
येथे जाण्यासाठी गिरगाव चौपाटीकडून वाळकेश्वर मार्ग, तसेच ऑगस्ट क्रांती मार्गावरून जाता येते. उपनगरी रेल्वेचे जवळचे स्थानक  -चर्नी रोड

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYFCF
Similar Posts
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
दक्षिण मुंबईतील विविध बाजार ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे.
मुंबई पर्यटन : धोबी तलाव परिसर ‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या धोबी तलाव परिसरातील ठिकाणांची...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language