पुणे : केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. या विक्रमी प्रवासाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर, या प्रवासाची गोष्ट आता पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे. ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे सोमण यांनी लिहिलेले पुस्तक नऊ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार असून, ही गोष्ट एकाच पुस्तकात मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत सांगण्यात आली आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे हे पुस्तक प्रकाशित होत असून, ‘सकाळ’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषणविणार आहेत. (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सायंकाळी साडेसात वाजता पीवायसी क्लबच्या ए-थ्री सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

अमेरिकेतील कोलंबस ते दिल्ली हा हवाई प्रवास सतीशचंद्र सोमण यांनी एक जून ते १८ जुलै १९९४ या कालावधीत दोन टप्प्यांत केला. एकच इंजिन असलेल्या विमानाने दोन महासागर ओलांडणे हे खूप मोठे धाडस होते. वयाच्या चाळिशीत जिद्दीने विमान शिकून, त्यात आलेल्या सगळ्या अडचणींना धीराने तोंड देऊन सोमण यांनी हा विक्रमी प्रवास केला. त्यांना कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला. त्यांचा हा विक्रमी प्रवास प्रत्येकालाच एक नवी प्रेरणा देणारा आहे. त्यामुळेच या प्रवासाला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमण यांनी ही प्रेरक गोष्ट पुस्तकरूपाने मांडली आहे. इंग्रजी वाचकांनाही या गोष्टीचा आस्वाद घेता यावा, म्हणून एकाच पुस्तकात ही गोष्ट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत समाविष्ट करण्यात आली आहे. सई कुळकर्णी-मुखर्जी यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. हे पुस्तक ई-बुक स्वरूपातही प्रकाशित होणार आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सतीशचंद्र आणि स्मिता सोमण, तसेच ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर आणि संचालिका सुप्रिया लिमये यांनी केले आहे.